उन्हाळ्यात एसीचे स्फोट का होतात? असे अपघात टाळण्यासाठी 'ही' काळजी घ्या

एसी

फोटो स्रोत, Getty Images

वाचन वेळ: 4 मिनिटे

भारतात उष्णता वाढते आहे. अनेक भागात तापमान 40-45 अंशापर्यंत पोहोचलं आहे.

दाट लोकवस्तीच्या शहरांमध्ये वाढती लोकसंख्या, ट्रॅफिकचा दबाव आणि प्रदूषणामुळे उष्णतेचा कहर वाढतच चालला आहे.

अशा परिस्थितीत एअर कंडिशनरचा (एसी) वापर वाढला आहे.

मात्र, त्याचबरोबर प्रचंड उष्णतेमुळे अनेकदा एअर कंडिशनरमध्ये (एसी) स्फोट होण्याच्या घटनादेखील होऊ लागतात.

त्यामुळे एसीचा सुरक्षितपणे वापर कसा करावा हे जाणून घेणं आवश्यक आहे.

उन्हाळ्यात एसीमध्ये स्फोट होण्याच्या घटना का घडतात? एसीचा स्फोट होण्यापासून कसं टाळता येऊ शकतं?

एसीच्या देखभालीमध्ये काय सावधगिरी बाळगायला हवी, जेणेकरून अशा घटना टाळता येतील.

तापमानातील वाढ हे एसीमध्ये स्फोट होण्यामागचं कारण आहे का?

घरांमध्ये, कार्यालयांमध्ये एसीचा स्फोट होणं आणि वाढतं तापमान यामध्ये संबंध आहे.

यामागे काय विज्ञान आहे, हे समजून घेण्यासाठी बीबीसीचे प्रतिनिधी अरशद मिसाल यांनी काही दिवसांपूर्वी आयआयटी बीएचयूचे मेकॅनिकल विभागाचे प्राध्यापक जहर सरकार यांच्याशी संवाद साधला होता.

भारतावरील ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम, सततच्या वाढत चाललेल्या तापमानातून दिसून येतो आहे

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, भारतावरील ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम, सततच्या वाढत चाललेल्या तापमानातून दिसून येतो आहे

प्राध्यापक सरकार यांचं म्हणणं होतं की कूलिंगसाठी एसीच्या सभोवतालचं तापमान (कॉम्प्रेसरच्या आजूबाजूचं), कंडेन्सरच्या तापमानापेक्षा जवळपास 10 अंश सेल्सिअसनं कमी असलं पाहिजे.

"भारतात सर्वसाधारणपणे एसीच्या कंडेन्सरचं तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत असतं. जेव्हा एसीच्या सभोवतालचं तापमान कंडेन्सरच्या तापमानापेक्षा अधिक होतं, तेव्हा एसीचं काम करणं थांबतं. अशा परिस्थितीत एसीच्या कंडेन्सरवरील दबाव वाढतो. त्यामुळे कंडेन्सरमध्ये स्फोट होण्याची शक्यता वाढते," असं ते म्हणाले.

कोणत्या कारणांमुळे एसीमध्ये स्फोट होऊ शकतो?

अधिक तापमानाव्यतिरिक्त इतरही काही कारणांमुळे एसीच्या बाबतीतील अपघात किंवा घटना घडू शकतात.

गॅस लीकेज: जाणकार सांगतात की कंडेन्सरमधून गॅस गळती झाल्यामुळे देखील एसीशी संबंधित अपघात होऊ शकतो. गॅस कमी झाल्यामुळे कंडेन्सरवरील दबाव वाढतो. यामुळे तो अधिक गरम होऊ लागतो. त्यामुळे आग लागण्याची शक्यता वाढते.

एसीमध्ये स्फोट होण्यामागे गॅस लीकेज हेदेखील एक कारण असू शकतं, असं तज्ज्ञ म्हणतात

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, एसीमध्ये स्फोट होण्यामागे गॅस लीकेज हेदेखील एक कारण असू शकतं, असं तज्ज्ञ म्हणतात

घाणेरडं कॉईल: एसीच्या कूलिंगमध्ये कंडेन्सरचे कॉईल महत्त्वाची भूमिका बजावतात. ते हवेतून उष्णता बाहेर फेकतं. कॉईलमध्ये घाण किंवा कचरा साठल्यामुळे ते जॅम होतात. त्यावेळेस गॅसच्या सामान्य प्रवाहात अडथळे निर्माण होतात. त्यामुळे कंडेन्सर अधिक तापू लागतो. त्यातून आग लागण्याचा धोका वाढतो.

व्होल्टेजमधील चढ-उतार: व्होल्टेजमधील सततच्या चढ-उतारांमुळे देखील कॉम्प्रेसरच्या परफॉर्मन्सवर परिणाम होतो. यामुळे देखील अपघात होऊ शकतो.

एसीमध्ये स्फोट होणं कसं टाळावं?

  • उष्णता वाढल्यानंतर एसीच्या कॉम्प्रेसरला सावलीत ठेवावं. कॉम्प्रेसर आणि कंडेन्सर युनिटच्या जवळपास योग्य प्रकारे व्हेंटिलेशन असावं. म्हणजे तिथे हवा खेळती असावी. जेणेकरून ते युनिट अधिक तापत नाही.
  • नियमितपणे एसीची सर्व्हिसिंग करावी. त्यामुळे कोणतीही समस्या वेळीच सोडवता येते.
  • एअर फिल्टर आणि कूलिंग कॉईल्स नियमितपणे स्वच्छ करावेत. यामुळे कॉम्प्रेसरवर अधिक ताण येत नाही आणि तो योग्यप्रकारे काम करतो.
  • वेळोवेळी कूलिंग फॅनदेखील तपासून घ्यावा. जर त्यात काही समस्या असेल तर ती लगेच दुरुस्त करावी.

तज्ज्ञांच्या मते, नियमितपणे सर्व्हिसिंग केल्यास एसीचा स्फोट होण्यासारख्या घटना टाळल्या जाऊ शकतात

फोटो स्रोत, Indranil MUKHERJEE / AFP via Getty Images

फोटो कॅप्शन, तज्ज्ञांच्या मते, नियमितपणे सर्व्हिसिंग केल्यास एसीचा स्फोट होण्यासारख्या घटना टाळल्या जाऊ शकतात

ज्या एसीचे कंडेन्सर तांब्याचे असतात, ते ॲल्युमिनियमचा कंडेन्सर असणाऱ्या एसीपेक्षा महागडे असतात. मात्र तांबे अधिक चांगलं असतं, असं जाणकार सांगतात.

तांबे या धातूची पाणी किंवा हवेतील आर्द्रतेबरोबर अभिक्रिया होत नाही. म्हणजे ते अधिक नॉन-कोरोसिव्ह (म्हणजे ते ओलावा किंवा आर्द्रतेमुळे खराब होत नाहीत) असतं. त्यामुळे ते अधिक मजबूत असतं.

तांब्यामध्ये 'लो स्पेसफिक हीट प्रॉपर्टी'चं वैशिष्ट्यं असतं. त्यामुळे तांबे लवकर गरम होत नाही आणि कूलिंगदेखील लवकर करतं.

तज्ज्ञ अनेकदा, ॲल्युमिनियम धातू असणाऱ्या एसीऐवजी तांबे असणाऱ्या एसींना प्राधान्य देतात.

भारतात एसीच्या विक्रीत वेगानं वाढ

ग्लोबल वॉर्मिंगचा भारतावरील परिणाम स्पष्ट दिसतो आहे. आता जवळपास दरवर्षी उष्णतेचा कहर अधिक वाढताना दिसतो आहे.

बीबीसीच्या एका वृत्तानुसार, भारतातील 30 कोटी घरांपैकी फक्त 8 टक्के घरांमध्ये एअर कंडिशनर आहेत. यापैकी काही घरांमध्ये एकापेक्षा अधिक युनिट आहेत. असं असूनही, भारत ही एअर कंडिशनरची जगातील सर्वात वेगानं वाढणारी बाजारपेठ आहे.

भारतातील एसीच्या विक्रीत लक्षणीय वाढ झाली आहे

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, भारतातील एसीच्या विक्रीत लक्षणीय वाढ झाली आहे

इकोनॉमिक टाइम्समधील एका वृत्तानुसार, 2025 मध्ये भारतात एअर कंडिशनर्सचे 1 कोटी 40 लाख युनिट्स खरेदी करण्यात आले.

गेल्या वर्षी जागतिक स्तरावर विकण्यात आलेल्या 17 कोटी एअर कंडिशनर युनिटपैकी 9 कोटी युनिटची विक्री चीनमध्ये झाली, तर भारतात 1 कोटी युनिटची विक्री झाली.

इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी (आयईए) या पॅरिसमधील ऊर्जा थिंक टँकचा अंदाज आहे की 2050 पर्यंत भारतात घरगुती एअर कंडिशनरची मालकी 9 पटींनी वाढेल. टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि वॉशिंग मशीनसह इतर सर्व घरगुती उपकरणांच्या मालकीतील वाढीपेक्षा ती कितीतरी अधिक असेल.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)