सयानी घोष : कधी सुरांनी, कधी शब्दांनी लक्ष वेधून घेणाऱ्या सयानी TMC च्या स्टार प्रचारक कशा बनल्या?

सयानी घोष सध्या तृणमूल काँग्रेसच्या स्टार प्रचारक आहेत. त्या पश्चिम बंगालच्या बाहेरही जाऊन पक्षाचा प्रचार करत आहेत. (फाइल फोटो)

फोटो स्रोत, Sayani Ghosh FB

फोटो कॅप्शन, सयानी घोष सध्या तृणमूल काँग्रेसच्या स्टार प्रचारक आहेत. त्या पश्चिम बंगालच्या बाहेरही जाऊन पक्षाचा प्रचार करत आहेत. (फाइल फोटो)
    • Author, दिलनवाज पाशा
    • Role, बीबीसी प्रतिनिधी
  • वाचन वेळ: 7 मिनिटे

पश्चिम बंगालच्या एकूण 294 विधानसभा जागांसाठी दोन टप्प्यात मतदान झालं. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला निवडणूक प्रचाराचा गोंगाट गेल्या सोमवारी (27 एप्रिल) सायंकाळी थांबला. आता सर्वांचं लक्ष 4 मे रोजी होणाऱ्या मतमोजणीकडे लागलं आहे.

या निवडणुकीच्या गदारोळात एक नाव सातत्याने ऐकू येत आहे आणि ज्याची प्रसारमाध्यमं आणि सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे, ते नाव म्हणजे तृणमूल काँग्रेसच्या 33 वर्षीय खासदार सयानी घोष यांचं.

सयानी केवळ आक्रमक भाषणच करत नाहीत, तर राजकीय व्यासपीठावर गाणं गाऊनही लोकांचं लक्ष वेधून घेत आहेत.

2021 मध्ये पश्चिम बंगालच्या सत्ताधारी ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यापूर्वीच सयानी घोष हे चर्चेतलं नाव होतं. पण, त्यावेळी त्यांना राजकारणाचा अनुभव नव्हता.

बंगाली भाषेतील चित्रपटांमधील अभिनय आणि गायनामुळे राजकारणात येण्यापूर्वीच त्या पश्चिम बंगालमध्ये लोकप्रिय झाल्या होत्या. कोलकात्यातील प्रसिद्ध साउथ पॉइंट हायस्कूलमधून शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी कलकत्ता विद्यापीठातून पदवी मिळवली होती.

शाळा आणि कॉलेजच्या दिवसांपासूनच त्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सक्रिय होत्या आणि नाटकांमध्येही भाग घेत असत.

कॅमेऱ्यासमोर आत्मविश्वासाने आणि मोकळेपणाने बोलण्याच्या त्यांच्या कलेमुळे त्यांना कमी वयातच टीव्हीमध्ये भूमिका आणि अँकरिंगच्या संधी मिळाल्या.

पुढे जाऊन त्यांनी चित्रपटांमध्येही काम केलं. टीव्ही, अँकरिंग आणि अभिनय करताना विकसित झालेली वक्तृत्व शैलीच पुढे त्यांची राजकीय स्टाइल बनली.

राजकारणात प्रवेश

2021 च्या विधानसभा निवडणुकांपूर्वी टीएमसी तरुण चेहऱ्यांच्या शोधात होती. सयानी त्यासाठी अगदी योग्य होत्या. त्या महिला, तरुण आणि लोकप्रियही होत्या. पक्षात प्रवेश केल्यानंतर त्यांनी आसनसोल मतदारसंघातून निवडणूक लढवली, परंतु भाजप उमेदवाराकडून त्यांचा पराभव झाला.

राजकारणात आल्यानंतर सयानी घोष वादांच्या भोवऱ्यातही सापडल्या. 2021 मध्ये त्यांना त्रिपुरामध्ये अटकही करण्यात आली होती. स्थानिक निवडणुकांच्या काळात त्यांनी भाजपच्या एका नुक्कड सभेजवळून (कॉर्नर सभा) जाताना 'खेला होबे' अशी घोषणा दिली होती.

Caption- सयानी घोष 2021 मध्ये टीएमसीमध्ये आल्या, तेव्हा पक्ष नव्या आणि तरुण चेहऱ्यांच्या शोधात होता.

फोटो स्रोत, Sayani Ghosh FB

फोटो कॅप्शन, सयानी घोष 2021 मध्ये टीएमसीमध्ये आल्या, तेव्हा पक्ष नव्या आणि तरुण चेहऱ्यांच्या शोधात होता.

'खेला होबे' ही 2021 च्या पश्चिम बंगाल निवडणुकीत ममता बॅनर्जी यांनी दिलेली प्रसिद्ध घोषणा होती.

या घोषणाबाजीनंतर आगरतळा येथील एका पोलीस ठाण्यात सयानी घोष यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांना अटक करण्यात आली. पोलीस ठाण्याबाहेर टीएमसी समर्थक आणि काही अज्ञात लोकांमध्ये झटापटही झाली.

या घटनेची आठवण सांगताना सयानी घोष यांनी नुकतंच इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं की, "मी त्रिपुरामध्ये प्रचार करत होते, तेव्हा आम्हाला रोखण्यासाठी त्यांनी सर्व प्रयत्न केले. परंतु पश्चिम बंगालमध्ये असं नाही, येथे कोणीही येऊन प्रचार करू शकतो."

Caption- बंगाली भाषेतील चित्रपटांमधील अभिनय आणि गायनामुळे राजकारणात येण्यापूर्वीच त्या पश्चिम बंगालमध्ये लोकप्रिय होत्या.

फोटो स्रोत, Sayani Ghosh FB

फोटो कॅप्शन, बंगाली भाषेतील चित्रपटांमधील अभिनय आणि गायनामुळे राजकारणात येण्यापूर्वीच त्या पश्चिम बंगालमध्ये लोकप्रिय होत्या.

मात्र, सयानी घोष यांच्याशी संबंधित हा एकमेव वाद नाही. 2023 मध्ये त्या टीएमसीच्या युवा शाखेच्या अध्यक्ष असताना, पश्चिम बंगालमधील कथित भरती घोटाळ्याच्या तपासात ईडीने त्यांची तब्बल 10 तास चौकशी केली होती.

तेव्हा सयानी घोष यांनी म्हटलं होतं की, "मी पंचायत निवडणुकीसाठी प्रचार करत होते. मला येथील ईडी कार्यालयात बोलावण्यात आलं. मी येथे आले आहे आणि मला तपासात पूर्ण सहकार्य करायचं आहे."

1993 मध्ये कोलकात्यात जन्मलेल्या सयानी घोष आज पश्चिम बंगालच्या राजकारणातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या युवा चेहऱ्यांपैकी एक आहेत.

बंगाली चित्रपटांमुळे त्यांना संपूर्ण बंगालमध्ये वेगळी ओळख मिळाली आणि राजकारणात येण्यापूर्वीच त्या सांस्कृतिक क्षेत्रातील प्रसिद्ध चेहरा बनल्या होत्या.

राजकारणात येण्याबद्दल विचारलं असता त्या म्हणाल्या होत्या की,"मी आता पूर्णवेळ अभिनेत्रीपासून पूर्णवेळ राजकारणी बनत आहे."

2021 च्या विधानसभा निवडणुकीत पराभवानंतर सयानी घोष यांनी 2024 मध्ये टीएमसीच्या तिकिटावर जाधवपूरमधून लोकसभा निवडणूक लढवली आणि त्या विजय झाल्या.

संसदेत आक्रमक भाषणं

संसदेतील भाषणांमुळे त्यांना एक वेगळी ओळख मिळाली आहे. त्यांची भाषणं सोशल मीडियावर व्हायरल होतात. त्या बंगाली, हिंदी आणि इंग्रजी भाषेत अस्खलित आणि प्रभावीपणे बोलतात.

संसदेत नुकत्याच केलेल्या एका भाषणात त्यांनी भारतीय संविधान हेच माझ्यासाठी भगवद्गीता असल्याचं म्हटलं होतं.

या भाषणात घोष म्हणाल्या होत्या की, "जसं हे संसद भवन पंतप्रधानांसाठी मंदिर आहे, त्याचप्रमाणे ते आमच्यासाठीही मंदिर आहे. भारतीय गणतंत्र ही आमची पूजा आहे. संविधान हीच आमची भगवद्गीता आहे."

Caption- सयानी घोष यांची संसदेतील भाषणं सोशल मीडियावर व्हायरल होतात.

फोटो स्रोत, SANSAD TV

फोटो कॅप्शन, सयानी घोष यांची संसदेतील भाषणं सोशल मीडियावर व्हायरल होतात.
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

एप्रिलमध्ये अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान घोष यांनी संसदेतील भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे इशारा करत म्हटलं होतं की, "आम्ही तुमच्याशी लढतो, पण संविधान हातात घेऊन लढतो. आमच्या हातात तलवार नाही, सर."

या भाषणात सयानी घोष या भारताच्या परराष्ट्र धोरणावर प्रश्न उपस्थित करत म्हणाल्या होत्या की,"भारत कुणाकडून तेल खरेदी करणार, किती दिवसांत करणार, कुणाशी मैत्री ठेवणार आणि कुणाशी शत्रुत्व ठेवणार, हे दुसऱ्या देशाचा राष्ट्राध्यक्ष ट्विटरवर येऊन आम्हाला सांगतो. आणि तुम्ही म्हणता आम्ही विरोध करू नये आणि शांत बसावं."

सयानी आपल्या भाषणांत गाणी आणि शायरीचाही मोठ्या प्रमाणात वापर करतात.

याच भाषणात पंतप्रधानांकडे इशारा करत सयानी यांनी शायराना (काव्यात्मक) अंदाजात म्हटले, "तू लाख बेवफा आहेस, पण मान वर करून चाल. तुला पश्चात्तापात पाहून माझं मनही रडेल." (तू लाख बेवफ़ा है मगर सर उठा के चल, दिल रो पड़ेगा तुझे पशेमान देखकर.)

संसदेत त्यांनी बेरोजगारी, महागाई, सांप्रदायिकता, संघराज्य आणि पश्चिम बंगालबाबत केंद्र सरकारकडून भेदभाव होत असल्याचे मुद्दे जोरदारपणे मांडले आहेत.

गेल्या वर्षी जूनमध्ये ऑपरेशन सिंदूरवर संसदेत झालेल्या चर्चेदरम्यान सयानी घोष यांनी "हिंदू, मुस्लीम, शीख, ख्रिश्चन, आस्तिक-नास्तिक सगळेच भारतीय आहेत," असं म्हटलं होतं.

घोष म्हणाल्या, "तुम्ही विटेला उत्तर विटेनं दिलं, पण देशाची अपेक्षा होती की तुम्ही विटेला दगडाने उत्तर द्यावं."

धर्मनिरपेक्ष प्रतिमा

फोटो स्रोत, Sayani Ghosh FB

याच भाषणात भारतीय प्रसारमाध्यमांवर निशाणा साधत घोष म्हणाल्या की, "या लढाईत कदाचित तुम्ही जिंकलात, पण नॅरेटिव्हच्या लढाईत हरलात. पाकिस्तानवर विजय मिळवला हे तुम्ही देशाला पटवून सांगू शकलात नाही."

"प्रसारमाध्यमांनी लोकांची दिशाभूल केली. अशा बातम्या दाखवल्या जात होत्या की, आज मी कोलकात्यात झोपेन आणि उद्या मला कराचीत जाग येईल. आज लखनौमध्ये मी जेवेन आणि उद्या लाहोरमध्ये नाश्ता करेन. असं चालणार नाही."

धर्मनिरपेक्ष प्रतिमा

सयानी संसदेत तृणमूल काँग्रेसचा प्रभावी आवाज म्हणून समोर आल्या आहेत. संसदेबाहेर त्या पक्षासाठी गर्दी खेचणाऱ्या (क्राऊड पुलर) चेहरा ठरल्या आहेत. त्यांच्या सभा आणि रॅलींना मोठी गर्दी होत असते. त्या फक्त भाषणांनीच नाही, तर आपल्या गायनानेही सर्वांचं लक्ष वेधून घेत असतात.

सोशल मीडियावर त्यांच्या रील्समध्ये बॉलिवूडपासून बंगाली हिट गाणी असतात. तर व्यासपीठावरून त्या धार्मिक गीते गाऊनही लोकांशी जोडल्या गेल्या आहेत. नुकत्याच एका निवडणूक सभेत त्यांनी बंगाली नज़्म गायली, ज्याचा अर्थ आहे, "माझ्या हृदयात काबा आहे, डोळ्यांत मदीना आहे."

Caption- सयानी घोष राजकीय मंचांवर नज़्मही (कविता) सादर करतात आणि हनुमान चालीसाचे पठणही करतात.

फोटो स्रोत, Sayani Ghosh FB

फोटो कॅप्शन, सयानी घोष राजकीय मंचांवर नज़्मही (कविता) सादर करतात आणि हनुमान चालीसाचे पठणही करतात.

त्यांच्या या शैलीचे एका बाजूने कौतुक झाले, तर काही लोकांनी हा मुस्लीम मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न असल्याचे म्हणत त्यांना ट्रोलही केलं. त्यानंतरच्या निवडणूक सभांमध्ये त्यांनी हनुमान चालिसाचे पठण केले आणि इतर धर्मग्रंथांचेही पठण केले.

दुसऱ्या एका रॅलीत त्यांनी आधी कलमाचे पठण केले आणि त्यानंतर हनुमान चालिसाही म्हटली.

याच भाषणात सयानी घोष म्हणाल्या, "वाहती गंगा हेही पाणी आहे, अबे झमझम हेही पाणी आहे. पंडितही पितो, मुल्लाही पितो, मग पाण्याचा धर्म कोणता?" (बहती गंगा भी पानी है, आबे ज़म-ज़म भी पानी है, पंडित पिए मुल्ला पिए, पानी का मज़हब क्या होगा?)

त्या आपल्या भाषणांमध्ये वारंवार धर्मनिरपेक्षतेचा उल्लेख करतात आणि सर्व धर्मांच्या लोकांना ममता बॅनर्जींना मत देण्याचे आवाहन करतात.

ममता बॅनर्जींच्या निकटवर्तीय

सयानी घोष स्वतःला ममता बॅनर्जी यांच्या जवळच्या नेत्या म्हणून सादर करतात आणि आपल्या भाषणांमध्ये वारंवार ममता बॅनर्जी यांचा उल्लेख करतात.

सयानी ममता बॅनर्जी यांच्यासारखीच साडी परिधान करतात आणि अनेकदा त्यांच्यासारख्याच चप्पल घालून सभांना हजेरी लावतात.

Caption- सयानी घोष स्वतःला ममता बॅनर्जी यांची सैनिक म्हणवतात.

फोटो स्रोत, Sayani Ghosh FB

फोटो कॅप्शन, सयानी घोष स्वतःला ममता बॅनर्जी यांची सैनिक म्हणवतात.

नुकत्याच एका मुलाखतीत एनडीटीव्हीच्या पत्रकाराने ममता बॅनर्जी यांच्या स्टाइलची तुम्ही कॉपी करता का, असा प्रश्न विचारला.

त्यावर त्या म्हणाल्या की, "यात वाईट काय आहे? मी माझ्या नेत्याला फॉलो करते, नरेंद्र मोदींना नाही. हे चांगलंच आहे. कारण मी नरेंद्र मोदींना फॉलो केलं असतं, तर मी 8 हजार कोटींच्या जेटमधून फिरले असते. माझ्या नेत्या खूप साध्या आहेत, सामान्य लोकांसारख्या आहेत. आम्हीही इतरांप्रमाणेच सामान्य लोक आहोत."

सयानी घोष आपल्या भाषणांमध्ये सातत्याने म्हणतात, "ममता दीदींचा विजय म्हणजे आपला विजय आहे. ममता जिंकल्या तर तो बंगालचा विजय असेल."

त्यांच्याकडे ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांच्या जवळच्या आणि विश्वासू नेत्या म्हणून पाहिलं जातं. टीएमसीने त्यांच्यावर पश्चिम बंगालबाहेर त्रिपुरा आणि आसाममध्येही प्रचाराची जबाबदारी दिली होती. त्यामुळे त्यांची राष्ट्रीय पातळीवर ओळख निर्माण होण्यास मदत झाली आहे.

सयानी घोष यांनी महुआ मोईत्रा यांच्यासारख्या प्रसिद्ध महिला नेत्यांमध्ये पक्षात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे.
फोटो कॅप्शन, सयानी घोष यांनी महुआ मोईत्रा यांच्यासारख्या प्रसिद्ध महिला नेत्यांमध्ये पक्षात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे.

प्रसारमाध्यमं आणि सोशल मीडियावर त्या खूप लोकप्रिय आहेत, पण त्यांचा स्वतःचा फार मजबूत जनाधार नाही. पश्चिम बंगालच्या राजकारणात त्यांचा उदय थेट नेता म्हणून झाला आहे, कार्यकर्ता म्हणून त्यांनी काम केलेलं नाही.

टीएमसीमध्ये सयानी यांचा झालेला उदयही पक्षाच्या बदलत्या संघटनात्मक धोरणाचे चित्र दाखवतो. टीएमसीची ओळख ही कार्यकर्त्यांवर आधारित पक्ष म्हणून आहे. परंतु, अलीकडच्या काळात ममता बॅनर्जी यांनी अनेक सेलिब्रिटी नेत्यांना पक्षात घेतलं असून सयानी घोष यादेखील त्यापैकी एक आहेत.

टीएमसीच्या एकूण 29 खासदारांपैकी 11 महिला खासदार आहेत. टक्केवारीनुसार टीएमसीमध्येच सर्वाधिक महिला खासदार आहेत. सयानी घोष यांनी महुआ मोइत्रा यांच्यासारख्या चर्चित महिला नेत्यांमध्ये पक्षात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे.

सयानी घोष सध्या चर्चेत आहेत. परंतु, पश्चिम बंगाल आणि देशाच्या राजकारणात त्या पुढे किती यशस्वी होतील, हे काही प्रमाणात आगामी पश्चिम बंगाल निवडणुकांच्या निकालांवर आणि राजकारणी म्हणून त्यांच्या कामगिरीवर अवलंबून असेल.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)