18 महिन्याच्या बाळाचा मृत्यू: शरीरावर 51 जखमा, आई आणि लिव्ह इन पार्टनरला अटक

फोटो स्रोत, IMRAN QURESHI
- Author, इम्रान कुरेशी बंगळुरूहून
- Role, बीबीसी हिंदीसाठी
- Published
- वाचन वेळ: 5 मिनिटे
(या बातमीतील काही तपशील तुम्हाला विचलित करू शकतील)
18 महिन्यांच्या एका लहान मुलाचा मृत्यू त्याच्या शरीरावरील 51 गंभीर दुखापतींमुळे झाला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, या दुखापती मुलाच्या आईच्या लिव्ह-इन पार्टनरने आणि कदाचित स्वतः आईनेही केल्या असाव्यात.
मात्र, हा अजूनही तपासाचा विषय आहे.
मुलाच्या शरीरावर सिगारेटने चटके दिल्याच्या खुणा आढळून आल्या आहेत. त्याच्या गुप्तांगांवर, पायांवर, बोटांवर आणि शरीराच्या इतर अनेक भागांवर या खुणा दिसून आल्या होत्या.
या गंभीर जखमांमुळे मुलाच्या शरीरांतर्गत रक्तस्राव झाला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला, असं पोलिसांनी म्हटलं आहे.
तिरुअनंतपूरम ग्रामीण क्षेत्रातील नेदुमंगडचे पोलीस उपअधीक्षक (डीएसपी) बैजू कुमार यांनी बीबीसी हिंदीला सांगितलं की, "पोस्टमॉर्टम (शवविच्छेदन) अहवालात लहान मुलाच्या शरीरावर 51 दुखापतींचा उल्लेख आहे. याशिवाय, शरीरावर अनेक लहान जखमाही आढळून आल्या आहेत."
याप्रकरणी पोलिसांनी मुलाची आई अखिला (21) आणि तिचा लिव्ह-इन पार्टनर अश्कर (31) यांना अटक केली आहे. त्यानंतर दोघांनाही न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
"हे कृत्य त्यांनी का केलं, याचा तपास करण्यासाठी आम्ही दोघांना चौकशीसाठी पोलीस कोठडीची मागणी करणार आहोत," असं तपास अधिकाऱ्यांनी सांगितलं.

फोटो स्रोत, IMRAN QURESHI
अश्कर हा व्यवसायाने ड्रायव्हर असून अखिला डान्सर आहे. या प्रकरणात पोलिसांनी अश्कर आणि अखिला या दोघांविरुद्धही खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
तिरुअनंतपूरम ग्रामीणचे पोलीस अधीक्षक (एसपी) जुवनापुडी महेश यांनी पोलिसांकडून अश्करच्या पार्श्वभूमीचीही चौकशी केली जात असल्याचे सांगितले.
ते म्हणाले, "अश्करची पत्नी सध्या रुग्णालयात उपचार घेत आहे. अश्करच्या सासूने तक्रार दाखल करून आपल्या मुलीला कायदेशीर मदत मिळावी, अशी मागणी केली आहे."
पोलीस अधीक्षक महेश यांच्या माहितीनुसार, अश्करविरोधात सार्वजनिक ठिकाणी मद्यपान केल्याचा एक गुन्हाही नोंद आहे.
आरोपीने गुन्हा मान्य केल्याचा पोलिसांचा दावा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (30 मे) मुलाला उलट्या होऊ लागल्या. त्यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आलं.
पोस्टमॉर्टममध्ये मुलाचे दोन्ही हात मोडलेले असल्याचे समोर आले.
मुलाची आई आणि तिच्या पार्टनरने मुलगा सायकलवरून पडल्याचा दावा केला होता.
मात्र, पोलीस उपअधीक्षक बैजू कुमार यांनी "अश्करने आपला गुन्हा कबूल केला आहे," असं सांगितलं.
आतापर्यंत अश्कर किंवा अखिलाच्या एकाही नातेवाईकाने किंवा वकिलाने सार्वजनिकपणे त्यांचा बचाव केलेला नाही.

फोटो स्रोत, IMRAN QURESHI
तिरुअनंतपूरम जिल्हा विधी सेवा प्राधिकरण ही संस्था समाजातील वंचित आणि गरजू लोकांना न्यायालयीन लढाईसाठी मोफत कायदेशीर मदत करते.
प्राधिकरणाने सांगितलं की, अश्करच्या पहिल्या पत्नीच्या आईकडून मिळालेल्या तक्रारीवरून कारवाई सुरू आहे. तसेच त्यांना लवकरच कायदेशीर मदत उपलब्ध करून दिली जाईल.
सध्या एफआयआरमध्ये या प्रकरणाचा सविस्तर तपशील नाही. लहान मुलाचा शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच पोलिसांनी दोन्ही आरोपींविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला.
या प्रकरणातील उर्वरित माहिती रिमांड अहवालातून समोर येईल. हा अहवाल न्यायालयात सादर केला जाणार आहे.
उपअधीक्षक बैजू कुमार म्हणाले की, "प्राथमिक तपासात असं दिसून येतं की, दोघांनाही त्यांच्या पद्धतीने आयुष्य जगायचं होतं आणि त्यांना हे मूल अडथळा वाटत होते."
एका पोलीस अधिकाऱ्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितलं की, मुलाचे दोन्ही हात मोडल्यानंतर अखिलाच्या आईने त्याची काळजी घेण्याची तयारी दर्शवली होती.
मुलाच्या वडिलाच्या आई-वडिलांनीही त्याला स्वतःकडे ठेवण्याची इच्छा व्यक्त केली होती.
मुलाच्या वडिलांनी सुमारे दोन वर्षांपूर्वी आत्महत्या केली होती. पण, अखिलाने मुलाला कोणाच्याही ताब्यात देण्यास नकार दिला होता.
(आत्महत्या ही एक गंभीर मानसिक आणि सामाजिक समस्या आहे. तुम्हीही तणावाखाली असाल, तर भारत सरकारच्या जीवनसाथी हेल्पलाइन 1800 233 3330 वर मदत घेऊ शकता. तसेच, तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईकांशी बोलायला हवं.)
या घटनेवर उपस्थित होत असलेले प्रश्न
या प्रकरणाबाबत मानसोपचार तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, स्वतःच्या मुलासोबत अशा प्रकारच्या हिंसक वर्तनामागे अनेक कारणं असू शकतात. विशेषतः असे प्रकार लिव्ह-इनसारख्या अपारंपरिक नातेसंबंधांमध्ये घडू शकतात.
तिरुअनंतपूरम येथील श्री अवित्तम तिरुनल रुग्णालय या सरकारी रुग्णालयातील बाल मानसोपचार तज्ज्ञ डॉ. आर. जयप्रकाश म्हणतात, "अशा नात्यांमध्ये पुरुषाचं स्त्रीवर वर्चस्व असू शकतं. अनेकदा स्त्रीला भीती वाटत असते की, जर तिने पुरुषाचं ऐकलं नाही, तर तो तिला सोडून जाईल."
तिरुअनंतपूरमच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातील मानसोपचार विभागाचे प्राध्यापक डॉ. मोहन रॉय म्हणतात, "सामान्यतः सावत्र पालकही आपल्या मुलांची काळजी घेतात. पण काही प्रकरणांमध्ये पुरुषाला वाटतं की, मूल त्याचं जैविक मूल नाही."
"त्यामुळे त्याच्या मनात ईर्ष्या निर्माण होऊ शकते आणि तो त्या मुलाला आपल्या नातेसंबंधात अडथळा म्हणून पाहू शकतो."
डॉ. रॉय हे अशा हिंसक वर्तनला मानसिक आरोग्याशीही जोडतात. त्यांनी जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) आकडेवारीचा उल्लेख करून सांगितलं की, कोणत्याही समाजात सुमारे 20 टक्के लोक कोणत्या ना कोणत्या मानसिक आरोग्य समस्येनं त्रस्त असतात.
परंतु, मुलाच्या मृत्यूमध्ये आईची काही भूमिका होती की नाही, हा अजून तपासाचा विषय आहे.
नशा आणि हिंसाचाराचा धोकादायक संबंध
नशेच्या आहारी गेल्यामुळेही हिंसक प्रवृत्ती निर्माण होऊ शकते, असं डॉ. रॉय आणि डॉ. जयप्रकाश या दोघांचंही म्हणणं आहे.
डॉ. रॉय म्हणतात, "अशा लोकांसाठी निरोगी आणि चांगलं किंवा सकारात्मक नातेसंबंध टिकवणं कठीण होतं. घरात सतत हिंसाचार होत राहिला तर कुटुंबातील लोक हळूहळू त्याकडे दुर्लक्ष करायला लागतात किंवा ते असंवेदनशील होऊ लागतात. या प्रकरणात आईसोबतही असंच घडलं असण्याची शक्यता आहे."
डॉ. जयप्रकाश यांचं म्हणणं आहे की, "आईने मुलाला त्रास दिला की तिने सगळं मूकपणे होऊ दिलं, हे अद्याप स्पष्ट नाही. पण अशा नात्यांमध्ये अनेकदा स्त्रीच्या स्वातंत्र्यावर सर्वात आधी परिणाम होतो."
त्यांनी असंही म्हटलं की, त्यांच्या अनुभवातून त्यांनी पाहिलं आहे की अनेक स्त्रिया पुरुषाच्या आधीच्या नात्यातील मुलांची काळजी घेतात. पण, अनेक पुरुष स्त्रीच्या आधीच्या नात्यातील मुलांना तितक्या सहजपणे स्वीकारू शकत नाहीत.
लहान मुलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत आहेत
उपलब्ध आकडेवारीनुसार लहान मुलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत आहेत, असं डॉ. मोहन रॉय सांगतात.
त्यांच्या मते ही एकच घटना नाही.
ते म्हणाले, "समस्या आपल्या व्यवस्थेतही आहेत. आपल्याकडे आशा कार्यकर्त्या आहेत, पण समाज पातळीवर जागरूकतेचा अभाव आहे. त्यामुळे वेळीच हस्तक्षेप होऊ शकत नाही."
केरळमध्ये जन्माला येणाऱ्या मुलांची संख्या सातत्याने कमी होत आहे, असंही डॉ. रॉय यांनी सांगितलं.
2014 मध्ये राज्यात 5.36 लाख बालकांचा जन्म झाला होता, तर 2024 मध्ये ही संख्या कमी होऊन 3.48 लाखांवर आली.
म्हणजेच एका दशकात सुमारे 1.8 लाखांनी कमी मुले जन्माला आली आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
त्यांनी प्रश्न उपस्थित करत म्हटलं की,"आपण खरंच मुलांसाठी सुरक्षित आणि चांगलं वातावरण निर्माण करू शकलो आहोत का? प्रत्येक मुलाला जगण्याचा अधिकार आहे. यासाठी धोरणात्मक पातळीवर, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पातळीवर आणि संपूर्ण समाज व्यवस्थेत मोठे बदल करण्याची आवश्यकता आहे."
महत्त्वाची सूचना
औषधोपचार आणि थेरपीच्या मदतीने मानसिक आजारांवर उपचार शक्य आहेत. यासाठी तुम्ही मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेणं गरजेचं आहे. तुम्हाला किंवा एखाद्या परिचित व्यक्तीमध्ये अशा प्रकारच्या मानसिक आजारांची लक्षणं दिसल्यास या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधून मदत मिळवू शकता.
सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालय -1800-599-0019 (13 भाषांमध्ये उपलब्ध)
इन्स्टिट्यूट ऑफ ह्यूमन बिहेवियर अँड एलाइड सायन्सेस - 9868396824, 9868396841, 011-22574820
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्स - 080 - 26995000
विद्यासागर इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड एलाइड सायन्सेस, 24X7 हेल्पलाइन-011 2980 2980
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)


























