जहांगीरानं अहमदाबादला 'जहन्नुमाबाद' का म्हटलं? ताप, धूळ आणि साथीच्या रोगामागची कहाणी

1730 मध्ये एका कलाकारानं जहांगीर आणि त्याची पत्नी नूरजहाँ यांचं चित्र रेखाटलं होतं.
फोटो कॅप्शन, 1730 मध्ये एका कलाकारानं जहांगीर आणि त्याची पत्नी नूरजहाँ यांचं चित्र रेखाटलं होतं.
    • Author, जय शुक्ला
    • Role, बीबीसी प्रतिनिधी
  • Published
  • वाचन वेळ: 6 मिनिटे

"या शहराच्या संस्थापकांनी या ठिकाणी असं कोणतं सौंदर्य पाहिलं असेल की त्यांनी इथं शहर वसवलं? आणि इतर सम्राटांनी आपल्या आयुष्यातील मौल्यवान वर्षं इथं कशी घालवली असतील? याची मी कल्पनाही करू शकत नाही. इथं गरम वारं वाहतं आणि पाण्याची टंचाई आहे."

"मी या शहराला गर्दाबाद हे नाव दिलं आहे. इथली हवा देखील धुळीनं भरलेली आहे. पाणी अतिशय खराब असून पिण्यायोग्य नाही. शहराजवळून वाहणारी नदी पावसाळ्याचा काळ सोडला तर नेहमीच कोरडी असते. विहिरीतील पाणी बहुतांश खारट आहे. धोबी कपडे धुतल्यानंतर तलावांचं पाणी ताकासारखं करून टाकतात. श्रीमंत लोकांच्या घरांमध्ये टाक्या आहेत. ते पावसाळ्यातील पाणी साठवून ठेवतात आणि वर्षभर त्याचा वापर करतात. बाहेरच्या हवेच्या संपर्कात न आलेलं पाणी आरोग्यासाठी हानिकारक असतं."

"शहराबाहेरील जमीन हिरवळीऐवजी काटेरी झुडपांनी (थ्रश) व्यापलेली आहे. या झुडपांमधून वाहणाऱ्या वाऱ्याचा परिणाम सर्वज्ञात आहे. मी या शहराला आधी गर्दाबाद म्हणत होतो, आता याला काय म्हणावं हेच मला कळत नाही."

"मी याला शमूमिस्तान म्हणू का, की आर्यिस्तान, की जुकुमदार (काट्यांचं शहर) किंवा जहन्नुमाबाद (नरकाचं शहर)? कारण ही सगळी नावं योग्यच आहेत."

हे सगळं जहांगीरानं आपल्या आत्मचरित्रात 'तुजुक-ए-जहांगीरी' म्हणजेच 'जहांगीरनामा'मध्ये लिहिलं होतं.

आज अहमदाबाद आपल्या समृद्ध वारशाचा, भव्य वास्तुकलेचा आणि युनेस्कोच्या जागतिक वारसा शहराच्या सन्माननीय दर्जाचा अभिमानानं उल्लेख करू शकतं.

पण मुघल सम्राट जहांगीरासोबत अहमदाबादमध्ये असं काय घडलं होतं की त्यानं या शहराला अशी नकारात्मक नावं दिली?

'तुजुक-ए-जहांगीरी'मध्ये जहांगीरानं अहमदाबादबद्दलचा आपला राग आणि तिटकारा इतक्या उघडपणे का व्यक्त केला?

अहमदाबादला पोहोचल्यानंतर जहांगीराला ताप आला

सम्राट जहांगीरच्या कारकिर्दीत अहमदाबादमध्ये आठ सुभेदारांची नियुक्ती करण्यात आली होती.

सुभेदार मुकर्रब खान यांच्या कारकिर्दीत जहांगीर गुजरातच्या दौऱ्यावर आला होता. तो माळवामार्गे खंभातहून अहमदाबादकडे येत होता. हिजरी सन 1027 किंवा इसवी सन 1618 च्या सुमारास 30 डिसेंबर रोजी सम्राटाचा ताफा खंभातहून जलप्रवास करून अहमदाबादच्या दिशेनं निघाला.

पाच दिवसांच्या प्रवासानंतर त्यांचा ताफा अहमदाबादला पोहोचला आणि शहरात प्रवेश करण्याची वेळ दुसऱ्या दिवशी असल्यामुळे त्यांनी कांकरिया तलावाजवळ तळ ठोकला.

जहांगीर आपल्या दरबाऱ्यांसोबत दिसत आहे.
फोटो कॅप्शन, जहांगीर आपल्या दरबाऱ्यांसोबत दिसत आहे.
Skip podcast promotion and continue reading
BBC News मराठी आत्ताच फॉलो करा WhatsApp कर
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

जहांगीर लिहितो, "कांकरिया तलावाच्या मधोमध असलेली बाग उद्ध्वस्त झाली होती आणि इमारती कोसळल्या होत्या. मी सफीकाकडून तिची दुरुस्ती करून घेतली."

कांकरियाची ही रचना सम्राटाला खूप आवडली होती. पण नागिनावाडी पुलाजवळ तलावाच्या काठावर 'तबाकात-ए-अकबरी'चे लेखक बख्शी निजामुद्दीन अहमद खान यांची एक बाग होती. जहांगीर लिहितो की त्या बागेतील झाडंसुद्धा तोडून टाकण्यात आली होती.

दुसऱ्या दिवशी तो अहमदाबादमध्ये दाखल झाला तेव्हा मिरवणूक पाहण्यासाठी रस्त्यांवर प्रचंड गर्दी झाली होती.

जहांगीर लिहितो, "कांकरियापासून भद्रापर्यंतचा रस्ता धुळीनं भरलेला होता. मुख्य रस्ता रुंद आणि विशाल होता, पण दुकानांचं स्वरूप त्या रस्त्याला साजेसं नव्हतं. घरं लाकडाची होती आणि रस्त्यालगतच्या घरांचे खांब बारीक व हलके होते."

अहमदाबादला पोहोचल्यानंतर जहांगीरानं आपला मुलगा शाहजहानचा 27 वा वाढदिवस साजरा केला.

जहांगीराला अहमदाबाद आवडलं नाही, म्हणून त्यानं माळवामार्गे आग्र्याला जाण्याचा विचार केला. तो 10 फेब्रुवारी 1618 रोजी अहमदाबादहून निघाला. पण सम्राटाचा ताफा माळव्याच्या सीमेवर पोहोचल्यावर जहांगीर कंटाळला आणि त्यानं पुन्हा अहमदाबादला परतण्याचा निर्णय घेतला. माळव्याच्या सीमेवरून तो झालोदमार्गे अहमदाबादला आला. 17 एप्रिल 1618 रोजी त्यानं अहमदाबादमध्ये प्रवेश केला.

त्या वेळी त्याचा अहमदाबादमधील मुक्काम दीर्घकाळाचा होता, पण त्याच काळात अहमदाबादमध्ये एका साथीच्या रोगाचा प्रसार झाला होता.

जहांगीर लिहितो, "अहमदाबादमध्ये या रोगाचा परिणाम न झालेला एखादाही माणूस शोधणं कठीण होतं. चांगली गोष्ट म्हणजे मृत्यूदर अपेक्षेइतका वाढला नव्हता."

जहांगीरालाही ताप आला. त्या काळात अहमदाबादमध्ये राहणारे युरोपीय लोकही या आजाराच्या विळख्यात सापडले.

या आजाराच्या वेदना आणि अशक्तपणानं त्रस्त होऊन जहांगीरानं अहमदाबादबद्दलची आपली नापसंती आणि नाराजी व्यक्त केली आणि त्याला गर्दाबाद, जहन्नुमाबाद आणि शमूमिस्तान अशी टोपणनावं दिली.

अहमदाबादच्या हवेची गुणवत्ता तपासण्यासाठी जहांगीरानं केलेला प्रयोग

'जहांगीरनामा'मध्ये उल्लेख आहे की जहांगीराचं निसर्गप्रेम आणि पशुपक्ष्यांविषयीचं सखोल ज्ञान विलक्षण होतं. त्यानं चित्रकारांना प्रोत्साहन दिलं आणि तो स्वतःही एक कुशल चित्रकार होता. याशिवाय त्याला संगीत आणि बागकामाचीही आवड होती.

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स ऑफ इंडियाने प्रकाशित केलेल्या आणि एम. ए. अल्वी व ए. रहमान यांनी लिहिलेल्या 'जहांगीर - द नॅचरलिस्ट' या पुस्तकात अहमदाबादमध्ये त्यानं केलेल्या एका प्रयोगाचा उल्लेख आहे. या प्रयोगात जहांगीरानं अहमदाबाद आणि मेहमदाबाद येथील हवा व पाण्याची तुलना करण्यासाठी चाचणी केली होती.

'जहांगीरनामा'मधून जहांगीरच्या व्यक्तिमत्त्वाचे आणि स्वभावाचे विविध पैलू उलगडतात.
फोटो कॅप्शन, 'जहांगीरनामा'मधून जहांगीरच्या व्यक्तिमत्त्वाचे आणि स्वभावाचे विविध पैलू उलगडतात.

नोंदीनुसार, "हा प्रयोग अहमदाबाद आणि मेहमदाबादच्या हवामानाचा मानवी आरोग्यावर होणारा परिणाम तपासण्यासाठी करण्यात आला होता. जहांगीर लिहितो, 'निश्चितच मेहमदाबादचं पाणी आणि हवा अहमदाबादच्या पाणी व हवेसारखी नाही. याची चाचणी करण्यासाठी मी कठोर आदेश दिले की एका मेंढीची कातडी काढून तिला कांकरिया तलावाच्या काठावर टांगून ठेवावं.'"

"त्याच वेळी मेहमदाबादमध्येही अशाच प्रकारे आणखी एक मेंढी टांगण्यात आली, जेणेकरून दोन्ही ठिकाणच्या वातावरणातील फरक समजू शकेल. अहमदाबादमध्ये मेंढी सात प्रहर उलटल्यावर टांगण्यात आली."

"दिवसाचे फक्त तीन प्रहर शिल्लक असताना तिच्या शरीरात इतका बदल झाला होता आणि ते इतकं सडून गेलं होतं की त्याच्या जवळून जाणंही कठीण झालं होतं. दुसरीकडे, मेहमदाबादमध्ये सकाळी टांगलेली मेंढी संध्याकाळपर्यंत बदलली नव्हती आणि रात्रीचा दीड प्रहर उलटल्यानंतरच तिचं शरीर सडण्यास सुरुवात झाली."

थोडक्यात, अहमदाबाद परिसरात मेंढीचा मृतदेह आठ तासांत सडलं, तर मेहमदाबादमध्ये त्याला सडण्यासाठी 14 तास लागले. (रॉजर्स, खंड II, लंडन, 1914, पृष्ठ 33)

जहांगीर जवळपास नऊ महिने अहमदाबादमध्ये राहिला

इतिहासकार रत्नमणिराव भीमराव यांनी लिहिलेल्या आणि गुजरात साहित्य सभेनं प्रकाशित केलेल्या 'गुजरातची राजधानी - अहमदाबाद' या पुस्तकात नमूद केल्याप्रमाणं जहांगीरची नाराजी अहमदाबाद शहराबद्दल नव्हती, तर हे शहर या ठिकाणी का वसवलं गेलं याबद्दल होती.

रत्नमणिराव लिहितात, "एका परदेशी प्रवाशानंही अहमदाबादचे रस्ते धुळीचे असल्याचं लिहिलं आहे. पण 18व्या शतकापर्यंत त्यावर टीका करणारा दुसरा कोणी आढळत नाही."

"अबुल फजल लिहितो की पाटणपासून वडोदऱ्यापर्यंतचा परिसर एखाद्या बागेसारखा दिसत होता. जहांगीरनंतरच्या प्रवाशांनी अहमदाबादला एक विशाल बाग म्हटलं आहे."

"सुलतान महमूद बेगडाला शुद्ध हवा आणि मोठमोठ्या बागा अतिशय आवडत असत. तो विशेषतः उन्हाळ्यात चंपानेरहून अहमदाबादला येत असे."

या सर्व गोष्टींवरून असं दिसतं की सम्राटानं अहमदाबादची निंदा करण्यामागचं मुख्य कारण त्याची प्रकृती बिघडणं हेच असावं.

जहांगीरानं कांकरियामध्ये आपला 50 वा वाढदिवस साजरा केला.
फोटो कॅप्शन, जहांगीरानं कांकरियामध्ये आपला 50 वा वाढदिवस साजरा केला.

रत्नमणिराव लिहितात, "असं नाही की जहांगीरानं अहमदाबादमध्ये आनंद घेतला नाही. त्याच काळात एका दिवशी मुसळधार पाऊस पडला आणि साबरमतीला पूर आला."

"या पावसात अनेक घरं कोसळली होती. अहमदाबादच्या नागरिकांनी इतका पाऊस यापूर्वी कधीच पाहिला नव्हता, असंही जहांगीरानं नोंदवलं आहे. जहांगीरानं अहमदाबादमध्ये भरपूर मौजमजा देखील केली."

"कांकरिया ही त्याची आवडती जागा असल्याचं दिसतं. शब-ए-बरातच्या रात्री त्यानं कांकरियाभोवती रोषणाई करण्याचे आणि फटाके फोडण्याचे आदेश दिले."

सम्राट इतका आनंदी झाला की त्यानं दुसऱ्या दिवशीही दिव्यांची रोषणाई करण्याचे आदेश दिले. त्याच वेळी त्यानं कांकरियाच्या काठावर राहणाऱ्या एका साधूची भेट घेतली आणि त्याच्याशी संवाद साधला.

भारतामध्ये ब्रिटिश व्यापारकेंद्र स्थापण्याची परवानगी मिळवणारा इंग्रज थॉमस रो याचा संदर्भ देत रत्नमणिराव लिहितात, "जेव्हा जहांगीर अहमदाबादला आला तेव्हा मी त्याला भेटण्यासाठी गेलो. सम्राट शहरातील एका बागेत महिलांसह नदीकाठी बसला होता. मी सम्राटाला भेटू शकलो नाही आणि मला भद्राच्या राजवाड्यात बोलावण्यात आलं. जेव्हा मी राजवाड्यात पोहोचलो तेव्हा सम्राट तिथं नव्हता."

2 सप्टेंबर 1618 रोजी सम्राटाचा ताफा पुन्हा निघाला आणि कांकरिया तलावाजवळ तळ ठोकला. रत्नमणिराव नोंद करतात की त्याच वेळी सम्राटानं तिथे आपला 50 वा वाढदिवस साजरा केला.

त्या वेळी इस्लामचा पवित्र महिना रमजान सुरू होता. त्यामुळे जहांगीरानं अहमदाबादमधील विद्वानांना रोजा सोडण्यासाठी निमंत्रित केलं आणि रत्नमणिराव लिहितात की त्या दिवशी मोती आणि सोन्याची फुलं उधळण्यात आली होती.

जहांगीर चार दिवस कांकरियात राहिला. तो जवळपास नऊ महिने अहमदाबादमध्ये राहिला.

त्याच वर्षी जहांगीरानं आपला मुलगा शाहजहान याची अहमदाबादचा सुभेदार म्हणून नियुक्ती केली. अहमदाबादमध्ये राहत असताना जहांगीरानं नाणीही पाडली. त्या वेळी राज्यकारभार त्याची पत्नी नूरजहाँ हिच्या हाती होता. त्यामुळे त्या नाण्यांवर 'राज्याच्या तेराव्या वर्षी जहांगीरची पत्नी नूरजहाँ अहमदाबादची राज्यपाल झाली' असे शब्द कोरले गेल्याचं म्हटलं जातं. अहमदाबादच्या कालूपूरमधील टांकसाळ जहांगीरच्या काळापासून अस्तित्वात आहे.

जहांगीरच्या मुक्कामाच्या वेळी शाहजहान 27 वर्षांचा होता आणि त्यानं आपलं तारुण्य मोठ्या प्रमाणात अहमदाबादमध्ये घालवलं. मात्र, तीन वर्षांनंतर शाहजहाननं स्वतःच्या वडिलांविरुद्ध बंड पुकारलं.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)