इराणी गायिकेला चाबकाचे फटके मारण्याची शिक्षा कायम; 'त्या' कॉन्सर्टमध्ये नेमकं काय घडलं?

फोटो स्रोत, youtube.com/@ParastooAhmadii
- Author, गोंचे हबीबीझाद
- Role, बीबीसी पर्शियन
- Published
- वाचन वेळ: 4 मिनिटे
इराणच्या अपीलीय न्यायालयानं सुप्रसिद्ध गायिका परस्तू अहमदी यांना सुनावलेल्या 74 फटक्यांची शिक्षा कायम ठेवली आहे, असं वकिलांनी सांगितलं आहे.
परस्तू अहमदी यांनी डिसेंबर 2024 मध्ये त्यांच्या यूट्यूब चॅनेलवर थेट प्रक्षेपित झालेल्या एका मैफिलीत 'स्लीव्हलेस' अर्थात बाही नसलेला ड्रेस घालून गाणं गायलं.
इराणी कायद्यानुसार, महिलांना सार्वजनिक ठिकाणी गाण्यास मनाई आहे. तसेच, त्यांना डोक्यावर स्कार्फ आणि अंग झाकणारे कपडे घालणं बंधनकारक आहे.
व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर आणि लाखो वेळा पाहिला गेल्यानंतर, इराणच्या न्यायव्यवस्थेनं 29 वर्षीय परस्तू अहमदी यांच्यावर कारवाई सुरू केली. तसेच, न्यायालयानं म्हटलं की त्यांच्या या सादरीकरणामुळे "देशाच्या कायदेशीर आणि सांस्कृतिक नियमांचं उल्लंघन झालेलं आहे."
जून महिन्यात, कोममधील एका फौजदारी न्यायालयानं परस्तू अहमदी आणि त्यांच्या बँड व प्रोडक्शन टीममधील आठ सदस्यांना "अश्लील आणि आक्षेपार्ह कंटेट" प्रकाशित केल्याच्या आरोपाखाली दोषी ठरवल्याचं वृत्त आहे.
परस्तू अहमदी यांना 74 फटक्यांव्यतिरिक्त दोन वर्षांसाठी दृकश्राव्य उपक्रमांमध्ये भाग घेण्यास आणि देश सोडण्यासही बंदी घालण्यात आली.
शुक्रवारी, एका उच्च न्यायालयानं आरोपींचे अपील सुनावणी न घेताच "फेटाळले", असं त्यांच्या वकिलांनी सांगितलं आहे.
अहमदी यांच्या वकिलांनी बीबीसीला सांगितलं की, "आमच्या मते, संगीत कार्यक्रम आयोजित करणं हा गुन्हा नव्हता."
"दंड आणि इतर कमी गंभीर शिक्षांची तरतूद असूनही, कनिष्ठ न्यायालयानं या आरोपांसाठी सर्वात कठोर शिक्षांपैकी एक शिक्षा सुनावली," असंही त्यांनी म्हटलं.
वकील म्हणाले की, "अपील न्यायालयाकडे खटला ऐकण्याचा पर्याय होता. परंतु, त्यांनी तो ऐकला नाही आणि कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला."
पुढे ते म्हणाले की, "अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत, हेच हा निर्णय देण्यामागील मुख्य कारण असावं, असं दिसतं."

फोटो स्रोत, youtube.com/@ParastooAhmadii
निर्णयाबद्दलचा राग
सुरुवातीच्या शिक्षेच्या बातमीमुळे सोशल मीडियावर इराणी नागरिकांमध्ये व्यापक प्रतिक्रिया उमटली.
त्यावेळी निर्वासित म्हणून राहत असलेल्या गायिका गुगुशने इन्स्टाग्रामवर लिहिलं की, "आशा आहे की हे काळे दिवस संपतील. महिलांना पुन्हा एकदा 'त्यांनी कसं जगावं आणि काय घालावं' हे ठरवण्याचं स्वातंत्र्य मिळेल. आपल्या प्रिय देशात कलात्मक अभिव्यक्ती पुन्हा एकदा बहरेल."
दरम्यान, संगीतकार हुसेन अलीझादेह म्हणाले की, ते "परस्तू अहमदी यांच्या जागी 70 फटके खाण्यास तयार आहेत."

फोटो स्रोत, CNR_hindiService@okhla025
मानवाधिकार कार्यकर्त्यांनीही या शिक्षेचा निषेध केला. 'अॅम्नेस्टी इंटरनॅशनल'नं म्हटलं आहे की, "चाबकाचे फटके मारणं ही एक क्रूर, अमानवीय आणि अपमानजनक शिक्षा आहे. अशी शिक्षा फर्मावणं ही कृती छळ आणि इतर प्रकारच्या अत्याचारावरील संपूर्ण बंदीचं उल्लंघन करणारी आहे."
जानेवारी 2024 मध्ये, कुर्दिश-इराणी कार्यकर्त्या रोया हेशमती यांना सोशल मीडियावर हिजाबशिवाय स्वतःचा फोटो पोस्ट केल्याबद्दल "सार्वजनिक नैतिकतेचं उल्लंघन" केल्याच्या आरोपाखाली दोषी ठरवण्यात आलं. त्यानंतर त्यांना 74 वेळा चाबकाचे फटके मारण्यात आले.
कुर्दिश मानवाधिकार संघटना 'हेंगो'च्या वृत्तानुसार, रोया हेशमती यांनी तक्रार केली आहे की, तेहरानच्या अभियोक्ता कार्यालयातील एका महिला अधिकाऱ्यानं त्यांच्या डोक्यावर जबरदस्तीनं हिजाब घातला. त्यानंतर एका पुरुष अधिकाऱ्यानं त्यांच्या खांद्यावर, पाठीवर, कमरेवर आणि पायांवर चाबकाचे फटके मारले.
महसा अमिनीचा पोलीस कोठडीतील मृत्यू आणि आंदोलनं
इराणचे कायदे हे देशाच्या शरिया कायद्याच्या व्याख्येवर आधारित आहेत. या कायद्यानुसार, 18 वर्षांवरील महिला आणि मुलींना हिजाबने केस झाकणं आणि शरीर झाकणारे लांब, सैल कपडे घालणं बंधनकारक आहे.
2022 मध्ये, महसा अमिनी या 22 वर्षीय कुर्दिश महिलेचा पोलीस कोठडीत मृत्यू झाल्यानंतर इराणमध्ये व्यापक निदर्शनं उसळली.
महसा अमिनी यांना सप्टेंबर 2022 मध्ये 'हिजाब योग्य रीतीनं न घातल्याच्या' आरोपावरून तेहरानच्या 'मॉरेलिटी' पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं.

फोटो स्रोत, Matteo Nardone/Pacific Press/LightRocket via Getty Images
धर्मगुरूंच्या राजवटीविरोधात देशभरात झालेल्या आंदोलनांदरम्यान महिलांनी आपले हिजाब जाळले किंवा हवेत फडकवले होते. ही आंदोलनं सुरक्षा दलांनी दडपली होती. या आंदोलनांमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला होता.
तेव्हापासून, अनेक महिला आणि मुलींनी सार्वजनिक ठिकाणी केस झाकणं पूर्णपणे बंद केलं आहे. हा इराणमधील पेहरावासंबंधीच्या नियमांचा उघडपणे केलेला अवमान आहे.
अधिकाऱ्यांनी याला उत्तर म्हणून वेळोवेळी अटक करणं, सूचना देणं, व्यवसाय बंद करणं आणि इतर विविध प्रकारच्या उपाययोजना करून प्रतिसाद दिला आहे.
या महिन्याच्या सुरुवातीला हिजाब सक्तीच्या मुद्द्यावर चर्चा करताना, पुराणमतवादी नेते आणि 'एक्सेडीएन्सी कौन्सिल'चे सदस्य गुलामअली हद्दाद-आदिल म्हणाले की, अमेरिका आणि इस्रायलसोबत इराणचे सुरू असलेले युद्ध पाहता, अधिकारी "सध्या या आघाडीवर पाहिजे तितकं लक्ष देऊ शकत नाहीत."
गुलामअली हद्दाद-आदिल हे इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांचे सासरे देखील आहेत.
देशातील आर्थिक संकटामुळे भडकलेल्या मोठ्या जनआंदोलनांना इराणी सुरक्षा दलांनी हिंसकपणे दडपल्यानंतर काही आठवड्यांतच, फेब्रुवारीच्या अखेरीस युद्धाला सुरुवात झाली, ज्यात हजारो लोक ठार झाले होते.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)


























