'मुंडन केलं, देवदर्शनासाठी निघाला होता', NEET प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी नाशकातून 'असं' घेतलं ताब्यात

नाशिक आरोपी

फोटो स्रोत, Pravin Thackeray

    • Author, प्रवीण ठाकरे
    • Role, बीबीसी मराठीसाठी
  • वाचन वेळ: 3 मिनिटे

देशातील 22 लाख 39 हजार विद्यार्थ्यांचं भविष्य ठरवणारी यंदाची NEET परीक्षा रद्द करण्यात आली आहे.

पेपरफुटीचे आरोप होत असताना नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) ही परीक्षा रद्द केली असून लवकरच नव्या परीक्षेची तारीख जाहीर करणार असल्याचंही सांगितले आहे.

या प्रकरणात पोलिसांनी नाशिकमधून शुभम खैरनार (वय-30 वर्ष) या संशयिताला ताब्यात घेतले आहे.

NEET परीक्षेचा पेपर नाशिकमधून टेलिग्राम ग्रुपवर फॉरवर्ड करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

दरम्यान, मंगळवारी सायंकाळी नाशिक पोलिसांनी आरोपीला CBI च्या ताब्यात दिलं. CBI चं पथक शुभमला घेऊन रवाना झालं असून बुधवारी सकाळी त्याला दिल्लीला नेलं जाईल.

नाशिकचे पोलीस उपायुक्त, किरणकुमार चव्हाण.

फोटो स्रोत, UGC

फोटो कॅप्शन, नाशिकचे पोलीस उपायुक्त, किरणकुमार चव्हाण.

पहिला प्रश्नपत्रिकेचा संच इथूनच एका टेलिग्राम ग्रुपवर पाठवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, या प्रकरणात आपल्या मुलाचा या प्रकरणाशी संबंध नाही. तो निर्दोष सुटेल असे शुभमचे वडील डॉ. मधुकर खैरनार यांनी म्हटले आहे.

पोलिसांनी काय माहिती दिली?

नाशिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार "प्रश्नपत्रिका फुटल्यानंतर तिची पहिली कॉपी नाशिकमधून समोर आली होती. नाशिकमधून लीक झालेला हा प्रश्नपत्रिकेचा संच हरियाणात पोहोचला.

"तिथे या लीक झालेल्या पेपरचे 10 संच तयार करण्यात आले होते. त्यानंतर NEET ची प्रश्नपत्रिका हरियाणातून बिहार, आंध्र प्रदेश आणि जम्मू-काश्मीरपर्यंत सहज पोहोचली," असे पोलिसांनी सांगितले.

पेपर लीकनंतर नीट परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयामुळं विद्यार्थी संघटनांनी भोपाळमध्ये परीक्षांमधील अनियमितता प्रकरणी आंदोलन केलं.

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, पेपर लीकनंतर नीट परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयामुळं विद्यार्थी संघटनांनी भोपाळमध्ये परीक्षांमधील अनियमितता प्रकरणी आंदोलन केलं.

नाशिक पोलिसांच्या माहितीनुसार, "देशभरातून एकूण 16 आरोपींना ताब्यात घेण्यात आलं आहे. त्यापैकी एक संशयित शुभम खैरनार याला नाशिकमधून ताब्यात घेण्यात आलं.

"राजस्थान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आम्ही त्याला ताब्यात घेतलं. तो सीहोर येथील सत्यसाई युनिव्हर्सिटीत BAMS च्या अंतिम वर्षात शिक्षण घेत होता."

राजस्थान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नाशिक पोलिसांनी संशयिताचा शोध घेतला.

'देवदर्शनासाठी निघाला होता आरोपी'

पोलीसांनी सांगितलं की, "आमच्याकडे नाव होतं, पण पत्ता आणि इतर माहिती नव्हती. काही तांत्रिक माहिती मिळाल्यानंतर आम्ही आरोपीचा शोध सुरू केला.

"त्याने कपडे बदलले होते आणि मुंडन केलं होतं. तो देवदर्शनासाठी जात असताना त्याला ताब्यात घेण्यात आलं आणि त्याची चौकशी करण्यात आली."

त्याने पेहराव बदलला असला तरी त्याला ओळखून पोलिसांनी संशयिताला नाशिकमधून ताब्यात घेतले.

CBI च्या स्पेशल टास्क फोर्सचं एक पथक त्याला ताब्यात घेण्यासाठी नाशिककडे रवाना झालं आहे.

संशयिताच्या वडिलांनी काय सांगितलं?

या प्रकरणात आपला मुलगा निर्दोष आहे असं शुभमचे वडील डॉ. मधुकर खैरनार यांनी सांगितलं.

"गेल्या सहा महिन्यापासून तो नाशिकमध्ये BAMS ची प्रॅक्टिस करत आहे. त्याचा या प्रकरणाशी संबंध नसेल.

"त्याचे या प्रकरणात नाव येत असेल तर त्याची चौकशी व्हावी," अशी प्रतिक्रिया शुभम खैरनार याचे वडील डॉ.मधुकर खैरनार यांनी दिली.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.