अमेरिका-इराण यांच्यातील चर्चेला सुरुवात, आतापर्यंत काय घडलं?

स्वित्झर्लंडमध्ये अमेरिका आणि इराण यांच्यातील चर्चेला सुरुवात झाली आहे. या चर्चेसाठी पाकिस्तान आणि कतारचे नेते मध्यस्थ म्हणून उपस्थित आहेत.
ही चर्चा स्वित्झर्लंडमधील पर्यटनस्थळ बर्गेनस्टॉक या ठिकाणी होत आहे.
अमेरिकेच्या प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हेन्स करत आहेत. त्यांच्यासोबत अमेरिकेचे मध्यपूर्वेतील विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ आणि अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे जावई जेरेड कुश्नर यांचाही समावेश आहे.
इराणच्या प्रतिनिधी मंडळात संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बगर गालिबाफ आणि परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांचा समावेश आहे. यापूर्वी इस्लामाबादमध्ये झालेल्या चर्चेतही त्यांनी आपल्या देशाचे प्रतिनिधित्व केले होते.
बीबीसी उर्दूच्या वृत्तानुसार, पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि फील्ड मार्शल आसिम मुनीर यांनी रविवारी सकाळी जेडी व्हान्स आणि त्यांच्या प्रतिनिधी मंडळाची भेट घेतली.
बीबीसी फारसी सेवेनुसार, इराणी प्रतिनिधी मंडळाची प्रमुख मोहम्मद बगर गालिबाफ यांनी कतारच्या पंतप्रधानांची भेट घेतली असून इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी स्वित्झर्लंडच्या परराष्ट्र मंत्र्यांसोबत बैठक घेतली आहे.
बीबीसी फारसी सेवेनुसार, इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, या चर्चेत इराण, अमेरिका, कतार आणि पाकिस्तान या चारही देशांचे नेते सहभागी होत आहेत.
होर्मुझच्या सामुद्रधुनीबद्दल दोन्ही पक्षांनी काय म्हटलं?
याआधी, इराणने इस्रायलच्या लेबनॉनमधील हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर होर्मुझ सामुद्रधुनी बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे जाहीर केलं होतं. तर अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हेन्स यांनी मात्र ही सामुद्रधुनी खुली आहे असं सांगितलं होतं.
याआधी, इराणी लष्कराने असं सांगितले होतं लेबनॉनमध्ये इस्रायलचे हल्ले सुरूच असल्याने ही कारवाई करण्यात आली. तसेच, या हल्ल्यांमुळे शस्त्रसंधी कराराचे उल्लंघन होत असल्याचा आरोप अमेरिकेवर आणि इस्रायलवर करण्यात आला.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)


























