इराणची क्षेपणास्त्रे लंडन, पॅरिससारख्या युरोपमधील शहरांपर्यंत पोहोचू शकतात का?

इराण
    • Author, निक एरिक्सन
    • Role, बीबीसी वर्ल्ड सर्विस
  • Published
  • वाचन वेळ: 5 मिनिटे

इराणनं दिएगो गार्सिया या बेटावरील अमेरिका आणि युकेच्या संयुक्त लष्करी तळाच्या दिशेनं लांब पल्ल्याची बॅलेस्टिक क्षेपणास्त्रं डागली होती. मध्य पूर्व भागात सुरू असलेल्या संघर्षातला हा एक मोठा टप्पा असल्याचं आता समोर येत आहे.

हा हल्ला ठरलेल्या लक्ष्यापर्यंत पोहोचला नव्हता. पण हे युद्ध सुरू झाल्यापासून पहिल्यांदाच अशा प्रकारच्या एवढ्या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्राचा वापर करण्यात आला होता, असं इस्रायलच्या लष्करी दलानं म्हटलं आहे.

इराणच्या माध्यमांनी परदेशी माध्यमांच्या बातम्यांच्या हवाल्यानं हे वृत्त दिलं आहे. तर इराणनं अद्याप त्यांनी क्षेपणास्त्रं हल्ला केल्याचं अधिकृतपणे सांगितलेलं नाही.

या अपयशी हल्ल्याचे नेमके काय परिणाम होऊ शकतात? याबाबत तज्ज्ञ अभ्यास करत आहेत. त्यात भविष्यात बर्लिन, पॅरिस आणि लंडन अशा युरोपातील राजधानीच्या शहरांना लक्ष्य केलं जाऊ शकतं का? याबाबतही चर्चा केली जात आहे.

दरम्यान, इराणकडं लंडनपर्यंत पोहोचू शकणारी लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रं असल्याच्या इस्रायलच्या दाव्याबाबत कोणतीही अधिकत माहिती सध्या तरी उपलब्घ नसल्याचं युकेच्या एका मंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.

बीबीसी न्यूज पर्शियनचे प्रतिनिधी घोंचेह हबिबियाझाद यांच्या मते, इराणच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमावर दीर्घकाळापासून आंतरराष्ट्रीय समुदायाची नजर आहे.

"इराणनं कायमच त्यांचा क्षेपणास्त्र कार्यक्रम हा स्वसंरक्षणासाठी आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या धोरणावर आधारित असल्याचं म्हटलं आहे. पण टीकाकारांच्या मते, त्यांची लांब पल्ल्याची मारा करण्याची क्षमता पाहता, भविष्यात प्रादेशिक सुरक्षेची समीकरणं बदलू शकतात.

इराणची अण्वस्त्रं निर्मितीची इच्छा असून त्यासाठी त्यांची तयारी असल्यानं याबाबत आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंता व्यक्त करण्यात येत होती. यावर चर्चा सुरू झाली आणि या चर्चेच्या आणखी काही फेऱ्या शिल्लक असतानाच इस्रायल आणि अमेरिकेनं इराणवर हल्ला केला.

चागोस बेट (ज्याचा दिएगो गार्सिया हा एक भाग आहे) हे इराणपासून अंदाजे 3800 किलोमीटर अंतरावर आहेत.

इराणनं त्यांच्या क्षेपणास्त्रांची क्षमता स्वतःच ठरवत मर्यादा घालून घेतल्या होत्या. पण काही अभ्यासकांच्या मते आता या मर्यादो ओलांडल्या आहेत.
फोटो कॅप्शन, इराणनं त्यांच्या क्षेपणास्त्रांची क्षमता स्वतःच ठरवत मर्यादा घालून घेतल्या होत्या. पण काही अभ्यासकांच्या मते आता या मर्यादो ओलांडल्या आहेत.

द वॉल स्ट्रीट जर्नल आण सीएनएननं अमेरिकेच्या अधिकाऱ्यांच्या हवाल्यानं बॅलेस्टिक क्षेपणास्त्र डागल्याबाबत वृत्त दिलं होतं. पण ते क्षेपणास्त्रं लक्ष्यापर्यंत पोहोचू शकली नाही, असं स्पष्ट करण्यात आलं.

या दोन क्षेपणास्त्रांपैकी एक हवेत उड्डाणादरम्यान निकामी झालं, तर दुसरं अमेरिकेच्या युद्धनौकेकडून पाडण्यात आलं. बीबीसीच्या माहितीनुसार हे वृत्त खरं होतं.

यानंतर लगेचच इस्रायलच्या संरक्षण दलानं युरोप, आशिया आणि आफ्रिकेतील अनेक शहरांना धोका निर्माण झाल्याचा दावा केला.तसंच इराण अशा क्षमतेची क्षेपणास्त्रं विकसित करण्याचा विचार करत असल्याचं गेल्या वर्षीच समोर आणलं होतं, असंही त्यांच्याकडून सांगण्यात आलं.

आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्रं?

इस्रायलच्या संरक्षण दलाचे चीफ ऑफ स्टाफ लेफ्टनंट जनरल एयाल झमीर यांनी या बेटांच्या दिशेनं क्षेपणास्त्र डागण्यात आल्यानंतर सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करत इशारा दिला.

"इराणने 4000 किमी पल्ल्याची दोन-टप्प्यातली आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्र डागली. ही क्षेपणास्त्रं इस्रायलवर हल्ला करण्यासाठी नव्हती. तर, त्यांचा पल्ला युरोपातील काही देशांच्या राजधानींपर्यंत आहे. बर्लिन, पॅरिस आणि रोम ही सर्व शहरं थेट धोक्याच्या कक्षेत आहेत," असं ते म्हणाले.

ब्रिटनच्या जॉइंट फोर्सेस कमांडचे माजी प्रमुख आणि संरक्षण तज्ज्ञ, जनरल सर रिचर्ड बॅरन्स यांच्यासह इतर तज्ज्ञांनी बीबीसीला सांगितलं की, या घटनेमुळं इराणच्या क्षेपणास्त्र साठ्याचं आणि क्षमतांचं नव्यानं मूल्यांकन करणं भाग पडणार आहे.

"इराणच्या क्षेपणास्त्रांची क्षमता 2000 किमी आहे, असं आम्हाला पूर्वी वाटत होतं. पण दिएगो गार्सिया 3800 किलोमीटर दूर आहे," असं त्यांनी म्हटलं.

होर्मुझ
Skip podcast promotion and continue reading
BBC News मराठी आत्ताच फॉलो करा WhatsApp कर
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

इराणनं आतापर्यंत त्यांनी बॅलेस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रमावर स्वतःच मर्यादा घातल्याचा दावा केला आहे. तसंच त्यांची क्षमता किंवा क्षेपणास्त्रांचा पल्ला 1240 मैल म्हणजे 2000 किमी एवढा मर्यादीत असल्याचंही त्यांच्याकडून सांगण्यात आलं होतं.

याचाच अर्थ म्हणजे, इस्रायल इराणच्या क्षेपणास्त्रांच्या टप्प्यात होतं, पण युरोप नव्हतं.

अलीकडील हल्ल्यात ठार झालेले अयातुल्ला अली खामेनी 2021 मध्ये म्हणाले होते की, हा एक राजकीय निर्णय होता. क्षेपणास्त्र उत्पादनातील तांत्रिक अडथळ्यांमुळे तो घेण्यात आला होता, असं नाही. लष्करी नेते आणि इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (आयआरसी) यांच्या विरोधाला न जुमानता हा निर्णय घेण्यात आला होता, असंही ते म्हणाले होते.

इस्रायलविरुद्ध धोक्याची स्थिती कायम ठेवणं हा त्यांचा उद्देश होता. पण युरोपला त्यातून धोका नव्हता, कारण ते इराणचं लक्ष्य नव्हतंच.

मात्र, गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये, इराणच्या एका खासदारानं सरकारी वाहिनीवर बोलताना, आयआरजीसीने एका आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली असल्याचं सांगितलं होतं. पण त्याच्या क्षमतेबद्दल काहीही माहिती देण्यात आली नव्हती.

क्षेपणास्त्राचा पल्ला

याबरोबरच इराणनं अंतराळ कार्यक्रमाच्या माध्यमातून आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्रं तयार करता येईल असं तंत्रज्ञान विकसित केलं असल्याचा आरोपही अमेरिकेच्या अधिकाऱ्यांकडून बऱ्याच काळापासून केला जात आहे.

'टाइम्स ऑफ इस्रायल'च्या वृत्तानुसार, गरज पडल्यास इराण या तंत्रज्ञानाचा वापर करू शकतं.

काही विश्लेषकांनीही याला दुजोरा दिला आहे. लंडनमधील रॉयल युनायटेड सर्व्हिसेस इन्स्टिट्यूटच्या माजी महासंचालिका डॉ. कॅरिन वॉन हिप्पेल यांनी बीबीसी न्यूजबरोबर बोलताना म्हटलं की, "क्षेपणास्त्रं दिएगो गार्सियापर्यंत पोहोचू शकतात असं गृहीत धरलं तर, इराणही 10000 किलोमीटरपर्यंतच्या पल्ल्याची आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे विकसित करत आहे. पण अद्याप लष्करी कारवाईत त्यांचा वापर झालेला दिसला नाही."

याचाच अर्थ म्हणजे, इराणमधून डागलेली अशा प्रकारची क्षेपणास्त्रं अमेरिकेच्या मुख्य भूभागापर्यंत पोहोचण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

लंडनसारखी शहरं या क्षेपणास्त्राच्या थेट पल्ल्यात लगेचच येऊ शकतात का? यावर चर्चा सुरू आहे.
फोटो कॅप्शन, लंडनसारखी शहरं या क्षेपणास्त्राच्या थेट पल्ल्यात लगेचच येऊ शकतात का? यावर चर्चा सुरू आहे.

अभ्यासकांच्या मते, हिंद महासागराच्या दिशेनं करण्यात आलेला हा हल्ला इराणनं स्वतःवर घालून घेतलेल्या मर्यादा ओलांडल्या असल्याचं दाखवतो.

पण ही क्षेपणास्त्रं आधीच रोखले नसती तरीही ती नियोजित लक्ष्यांपर्यंत पोहोचली असती की नाही याबद्दल शंका असल्याचंही काहींचं म्हणणं आहे.

"इराण ब्रिटनला लक्ष्य करत असल्याचे किंवा त्यांची तशी इच्छा असल्याची काहीही ठोस माहिती नसल्याचं," ब्रिटिश गृहनिर्माण मंत्री स्टीव्ह रीड यांनी बीबीसीला सांगितले.

त्यामुळं मुख्य प्रश्न हा आहे की, इराणनं खरंच दूर पल्ल्याचे हल्ले करण्यासाठी आवश्यक असलेलं तंत्रज्ञान यशस्वीरित्या मिळवलं आहे का? कारण यात एवढ्या अंतरावरून क्षेपणास्त्रांवर नियंत्रण ठेवण्याची आणि त्यांना दिशा दाखवण्याचीही क्षमता गरजेची आहे.

याचा मानसिक दृष्टीनंही विचार करायला हवा.

काहींच्या मते, इराणचा या लक्ष्यांवर हल्ला करण्याचा हेतू कधीच नव्हता, तर इराण इशारा देऊ इच्छित होता.

इराण

इस्रायलच्या लष्करी गुप्तचर संस्थेचे माजी अधिकारी आणि तेल अवीव-स्थित राष्ट्रीय सुरक्षा अभ्यास संस्थेचे माजी अधिकारी डॅनी सिट्रिनोविच यांनी लंडनच्या 'द इंडिपेंडेंट' वृत्तपत्राशी बोलताना म्हटलं की, "ते उद्या लंडन किंवा पॅरिसवर हल्ला करण्याचा विचार करतील असं नाही. तर ही त्यांच्यासाठी बळ आणखी वाढवण्याची एक बाब आहे. त्यामुळं त्यांची प्रत्युत्तर देण्याची क्षमता आणखी वाढेल. "

हिंद महासागरात या आठवड्यात घडलेल्या घटनांवर इस्रायलनं दिलेला प्रतिसाद हा एक प्रकारे एकत्र येण्यासाठीचं आवाहन असेल, असंही त्याकडे पाहता येईल.

युरोपमधील नाटोचे माजी उपकमांडर जनरल सर रिचर्ड शिरिफ यांच्या मते, "इस्रायल नक्कीच तसं म्हणेल, कारण युद्धाची व्याप्ती वाढवणं आणि अमेरिका तसंच इस्रायलसोबत शक्य तितक्या इतर देशांना त्यात सामील करून घेणे हे त्यांच्या हिताचं आहे."

"आपण याला विरोध केला पाहिजे. हे ट्रम्प यांचं युद्ध असून त्याचा स्पष्ट शेवट किंवा विशिष्ट रणनीती दिसत नसून ते एखाद्या दलदली सारखं होत चाललं आहे. सहा महिन्यांपूर्वी आण्विक क्षमता पूर्णपणे नष्ट करण्यात आली होती, असं सांगण्यात आलं होतं. या बाबतीत वॉशिंग्टनकडून येणाऱ्या कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवता येणार नाही," असंही ते म्हणाले.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन