ओमानच्या किनाऱ्याजवळ भारतीय ध्वज असलेले जहाज पडले बंद, यशस्वी मोहिमेनंतर 14 कर्मचाऱ्यांची सुटका

फोटो स्रोत, MEA
ओमानमधील भारतीय दूतावासाने एक्सवरील पोस्टमध्ये सांगितले आहे की, ओमानच्या किनाऱ्याजवळ भारतीय ध्वज असलेल्या जहाजाचे इंजिन बंद पडल्यानंतर त्यावरील सर्व 14 भारतीय कर्मचाऱ्यांची यशस्वी सुटका करण्यात आली आहे.
ओमानमधील भारतीय दूतावासाने एक्सवर म्हटले आहे की, "भारतीय ध्वज असलेल्या एमएसव्ही विराट-1चे बचाव अभियान यशस्वीपणे पूर्ण झाले आहे. सर्व 14 कर्मचाऱ्यांची सुटका करण्यात आली आहे आणि ते सध्या जबल अली-9 या जहाजातून मुंबईकडे जात आहेत. सर्व कर्मचारी सुरक्षित असून त्यांची प्रकृती चांगली आहे."
याआधी, रविवारी दुपारी भारतीय दूतावासाने एक्सवर लिहिले होते, "ओमानच्या किनाऱ्याजवळ भारतीय ध्वज असलेल्या विराट-1 या जहाजाशी संबंधित एका घटनेची माहिती मिशनला मिळाली आहे. जहाजावर 14 भारतीय कर्मचारी होते. त्यापैकी 11 जणांची सुटका करण्यात आली आहे."
काही वेळानंतर भारतीय दूतावासाने आणखी एका पोस्टमध्ये म्हटले, "सातत्यपूर्ण आणि प्रभावी बचाव मोहिमेद्वारे एमएसव्ही विराट-1वरील 14 कर्मचाऱ्यांपैकी 11 जणांची सुटका करण्यात आली आहे. त्यांना एमव्ही जबल अली-9 या जहाजावर सुरक्षितपणे हलवण्यात आले आहे."
"उर्वरित कर्मचाऱ्यांच्या सुटकेचे अभियानही सुरू असून ते लवकरच पूर्ण होण्याची अपेक्षा आहे."
काही वेळानंतर भारतीय दूतावासाने लिहिले, "सातत्यपूर्ण आणि यशस्वी बचाव मोहिमेद्वारे एमएसव्ही विराट-1 वरील 14 कर्मचाऱ्यांपैकी 11 जणांची सुटका करण्यात आली आहे. त्यांना एमव्ही जबल अली-9 या जहाजावर सुरक्षितपणे पोहोचवण्यात आले आहे."
"उर्वरित कर्मचाऱ्यांच्या सुटकेचे अभियानही सुरू असून ते लवकरच पूर्ण होण्याची अपेक्षा आहे."
त्यानंतर दूतावासाने सांगितले की सर्वांची सुटका करण्यात आली आहे.
इंजिनात बिघाड झाल्याने जहाज बंद
याआधी, दूतावासानं आणखी एक पोस्ट टाकत माहिती दिली होती की, जहाजाच्या इंजिनात बिघाड झाला होता.
दूतावासानं लिहिलं होतं की, "मिळालेल्या माहितीनुसार, जहाजातील इंजिनात बिघाड झाला होता. त्यानंतर जहाजावरील सर्व खलाशांना सुरक्षितपणे एका लाईफराफ्ट (रेस्क्यू बोट)वर पाठवण्यात आलं."
"सध्या ओमानचे अधिकारी आणि जवळपास असलेल्या जहाजांच्या मदतीनं बचाव मोहीम सुरू आहे."
याआधी ओमानच्या समुद्रकिनाऱ्याजवळ अमेरिकेच्या नौदलानं केलेल्या हल्ल्यात 3 भारतीयांचा मृत्यू झाला होता.
त्यासंदर्भात भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांच्याशी चर्चा केली होती.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)


























