टी-20 विश्वचषकात पाकिस्तानला हरवत भारताची विजयी सलामी, दीप्ती शर्माची गोलंदाजी ठरली टर्निंग पॉइंट

भारतीय टीम

फोटो स्रोत, Getty Images

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात टीम इंडियानं महिलांच्या ट्वेन्टी20 विश्वचषकात पाकिस्तानला हरवत विजयी सलामी दिली आहे.

इंग्लंडच्या बर्मिंगहॅममध्ये एजबॅस्टिन स्टेडियमवर झालेल्या सामन्यात भारतानं पाकिस्तानचा 64 धावांनी पराभव केला.

या सामन्यात भारतानं पाकिस्तानला 171 धावांचं आव्हान दिलं होतं. पण पाकिस्तानचा डाव 106 वर आटोपला.

दीप्ती शर्माची गोलंदाजी टर्निंग पॉईंट

आजच्या सामन्यात दीप्ती शर्माने 5 विकेट्स घेतल्या. दीप्ती शर्मा प्लेअर ऑफ द मॅच ठरली.

खरंतर पाकिस्तानच्या सलामीवीर मुनीबा अली आणि गुल फिरोझा यांनी 38 धावांची भागीदारी रचली होती. पण दीप्ती शर्मानं पाकिस्तानच्या टॉप ऑर्डरला खिंडार पाडलं.

तिनं आधी पाचव्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर फिरोजाला 12 धावांवर बाद केलं. तिनं मग सातव्या षटकात तिसऱ्या चेंडूवर आयशा झफरची विकेट काढली.

मग दीप्तीनं सतराव्या षटकात आलिया रियाझ आणि तस्मिया रुबाबलाही बाद केलं.

दीप्ती शर्मा (संग्रहित छायाचित्र)

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, दीप्ती शर्मा (संग्रहित छायाचित्र)

पाकिस्तानची सलामीवीर मुनीबा अली पाय रोवून खेळते आहे असं वाटू लागलं, तेव्हा दीप्तीनंच तिला धावचीत केलं.

भारताच्या सगळ्याच क्षेत्ररक्षकांनी लक्षणीय कामगिरी केली. स्मृती मंधानानं 2 उत्तम झेल टिपले. तिनं दीप्ती शर्माच्या गोलंदाजीवर आयशा झफरचा झेल टिपला आणि मग शफाली वर्माच्या गोलंदाजीवर पाकिस्तानची कर्णधार फातिमा सानाचा कॅच पकडला.

श्री चरणीनं सायरा जबीन, नतालिया परवेझ आणि रमीन शमीमची विकेट काढली. तर शफाली वर्मानं फातिमा सानाला माघारी धाडलं.

त्याआधी भारतानं प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 6 बाद 170 धावा केल्या.

स्मृती मंधानाचं अर्धशतक, हरमनप्रीतसोबत तिची भागीदारी आणि तळाला ऋचा घोषची फटकेबाजी यांच्या जोरावर भारतानं ही मजल मारली.

स्मृती मंधानानं घातला पाया

या सामन्यात शफाली वर्मा अवघ्या 6 धावांवर आणि जेमिमा रॉड्रिग्ज एकच धाव करून माघारी परतली. त्यामुळे भारताची अवस्था 2 बाद 18 अशी झाली होती.

तेव्हा स्मृतीनं कर्णधार हरमनप्रीतच्या साथीनं तिसऱ्या विकेटसाठी 91 धावांची भागीदारी रचली.

स्मृती मंधाना

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, स्मृती मंधाना

सलामीला आलेल्या स्मृतीनं एका अनुभवी फलंदाजाला साजेसा दबावाखाली उत्तम खेळ केला.

तिनं 44 चेंडूंमध्ये 68 धावा जमा केल्या आणि यादरम्यान 9 चौकार आणि 2 षटकारही ठोकरले. ट्वेन्टी20 क्रिकेटमधलं स्मृतीचं हे 34 वं अर्धशतक ठरलं.

हरमनप्रीतनं 35 चेंडूंमध्ये चार चौकारांसह 36 धावा करत एक बाजू सांभाळून धरली. हरमनप्रीत आणि स्मृतीच्या भागीदारीनं भारताच्या डावाला खऱ्या अर्थानं आकार दिला.

पाचव्या क्रमांकावर आलेल्या भारती फुलमाळीला एकच धाव करता आली.

पण त्यानंतर ऋचा घोष मैदानात उतरली आणि तिनं आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करत डावाचं पारडं भारताकडे झुकवलं.

ऋचानं अवघ्या 17 चेंडूंमध्ये 34 धावा केल्या. त्यात 5 चौकार आणि 1 षटकाराचाही समावेश होता.

पाकिस्तानकडून सादिया इक्बाल आणि कर्णधार फातिमा साना यांनी प्रत्येकी 2 विकेट्स काढल्या तर तस्मिया रुबाब आणि रामीन शमीम यांनी प्रत्येकी 1 विकेट काढली.

आता 17 जूनला होणाऱ्या लढतीत भारतासमोर नेदरलँड्सचं आव्हान असेल.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)