You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
JEE अॅडव्हान्स : पुण्याची आरोही देशपांडे देशात मुलींमध्ये पहिली, 'अशी' होती तिची अभ्यासाची स्ट्रॅटेजी
- Author, प्राची प्रतिभा शिरीष
- Role, बीबीसी मराठीसाठी
- Published
- वाचन वेळ: 4 मिनिटे
जेईईची परीक्षा झाल्यापासून आरोही देशपांडेचा दिवस उशीरा सुरु होत आहे. उठल्यानंतर ती 'लॉर्ड ऑफ द रिंग्ज'ची ट्रायोलॉजी वाचते किंवा सिनेमा पाहते.
आरोहीच्या आयुष्यात हा निवांतपणा जवळपास 4 वर्षांनंतर आला आहे. पण, सोमवारपासून (1 जून) हा निवांतपणाही मिळेनासा झाला आहे. याला कारणीभूत ठरले आहेत नातेवाईक आणि ओळखीच्या लोकांनी केलेले अभिनंदनासाठीचे फोन.
आरोही देशपांडे यंदा जेईई अॅडव्हान्समध्ये देशात मुलींमध्ये पहिली आली आहे आणि एकूण क्रमांकांमध्ये 77वी.
जेईई अॅडव्हान्समध्ये तिने 360 पैकी 280 मार्क मिळवले आहेत. पण, फक्त अॅडव्हान्समध्येच नाही तर जेईई मेन्समध्ये देखील तिने चांगली कामगिरी करत 99.996 पर्सेंन्टाईल मार्क मिळवले होते तर बारावीमध्ये 97.8 टक्के तर 10 मध्ये 96.7 टक्के मार्क मिळवले आहेत.
आरोहीचा हा प्रवास सुरु झाला तो इयत्ता नववीमध्ये असताना. पुण्यातल्या लोकसेवा ई-स्कूलमध्ये शिकत असताना इयत्ता 9 वी मध्ये तिने इंजिनिअरिंगमध्ये करिअर करायचं असं ठरवलं. याला पार्श्वभूमी होती ती कुटुंबातल्या इंजिनिअर्सच्या संख्येची.
आरोही सांगते, "मला गणित आवडायचं. तसंच माझ्या कुटुंबात बरेच इंजिनिअर्स आहेत. त्यांच्याकडे पाहून मला वाटलं की, आपण इंजिनिअरिंग करावं. त्यानंतर मी तयारीला सुरुवात केली. तोपर्यंत असं काही निश्चित ध्येय ठरवलं नव्हतं"
तिच्या या निर्णयानंतर तिचं संपूर्ण कुटुंबच तिच्या या ध्येयाच्या पूर्ततेसाठी तयारीला लागलं. यातला पहिला टप्पा होता पुणे सोडण्याचा निर्णय घेण्याचा.
तिचे वडील प्रसाद देशपांडे बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले, "कोव्हिडच्या काळात ती इयत्ता सातवी-आठवीमध्ये असताना आम्हाला काही ऑनलाईन लेक्चर सापडले. ते पाहत असताना लक्षात आलं की त्यापैकी बहुतांश प्राध्यापक हे राजस्थानमधील कोटामधले आहेत. हे लक्षात घेऊन मग आम्ही कोटाबाबत माहिती मिळवायला सुरुवात केली."
यानंतर संपूर्ण कुटुंबानेच कोटामध्ये स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. आरोहीचे वडील आयटीमध्ये तर आई सिव्हील आणि एन्व्हायरमेंटल इंजिनिअर म्हणून काम करते.
दोघांनीही कोव्हिडनंतरच्या काळात वर्क फ्रॉम होमचा पर्याय स्वीकारला. आरोही, तिचा धाकटा भाऊ आणि आई-वडील असं संपूर्ण कुटुंब कोटा येथे स्थायिक झालं. आरोहीचं नववीपासूनचं शिक्षणही तिथेच सुरु झालं.
कंपनीत कामासाठी आई-वडिलांना जावं लागायचं, त्यासाठीचं नियोजनही त्यांनी केलं. कोटातली चार वर्ष फारशा ओळखी नसल्याने जवळपास कुटुंबाभोवती केंद्रित झालं होतं. तिच्या अभ्यासाच्या नियोजनानुसार तिच्या वडिलांना महिन्यातून काही दिवस हैदराबाद आणि आईला गुरुग्रामला जावं लागायचं, त्याचंही वेळापत्रक ठरवून घेतलं होतं. या पार्श्वभूमीसह आरोहीच्या जेईईच्या तयारीला सुरुवात झाली.
अर्थात कोटाला जाण्याचा निर्णय सोपा नव्हता, असं आरोही सांगते. ती म्हणाली, "माझी आजी पुण्यात होती. तसंच माझे मित्र-मैत्रीणी सुद्धा तिथे होते. त्या सगळ्यांना सोडून जाताना वाईट वाटलं. पण नंतर मात्र मी अभ्यासावर लक्ष केंद्रित केलं."
अभ्यास सुरु झाला तसं दररोजचं वेळापत्रकही तयार झालं. अर्थात त्यासाठी काही नियोजनबद्ध पद्धतीने दररोज इतके तास अभ्यास वगैरे करत नसल्याचंही आरोही सांगते, "मी साधारण दररोजचा जो अभ्यास असेल तो पूर्ण करायचा इतकंच ठरवत होते. त्याला जेवढा वेळ लागेल तो पूर्णपणे द्यायचा हे माझं ठरलं होतं. मग कधी त्याला सहा तास लागायचे तर कधी सात. ते पूर्ण केल्याशिवाय मी थांबायचे नाही."
सुरुवातीचा काळ तिला रविवारचा निवांतपणा मिळत होता. मात्र नंतर तिने तो वेळही निवांतपणे वापरणं कमी केल्याचं तिचे पालक सांगतात. शाळेत पेंटींग, वाचन या सह इतर अनेक गोष्टी करण्याची आवड असणाऱ्या आरोहीने शेवटचे काही महिने मात्र सगळं थांबवून फक्त अभ्यासाकडे लक्ष केंद्रित केल्याचं तिचे वडील सांगतात.
अभ्यास करतानाही तिला अनेकदा यश अपयशाचा सामना करावा लागत होता. अनेकदा मॉक टेस्टमध्ये स्कोअर कमी यायचा.
आरोही सांगते, "कधी कधी पेपर अवघड असायचा तर कधी मी चुका करायचे. मग नेमकं काय चुकलं आहे ते पाहून त्याकडे जास्त लक्ष द्यायचे."
याच काळात पालकांचा पाठिंबा महत्वाचा ठरल्याचं तिचे वडील प्रसाद देशपांडे नोंदवतात. ते सांगतात, "सगळं मुलांवर सोडलं तर त्यांना जास्त ताण येतो. त्यामुळे आम्ही कुटुंब म्हणून तिला गरज असेल तेव्हा पाठिंबा देत होतो."
जेईई अॅडव्हान्सची परीक्षा झाली तेव्हा आरोहीला आपल्याला इतकं यश मिळेल याचा मात्र अंदाज नव्हता. ती सांगते, "मी माझ्याकडून जेवढं चागलं केलं तेवढं केलं. पण अजून चांगलं करता आलं असतं, असं मला वाटत होतं."
परीक्षा झाल्यावर मिळालेल्या 'अॅन्सर की' वरुन तिने मार्कांचा अंदाज आणि नेमकं काय चुकलं असू शकेल याचा आढावा घेतला होता. मात्र, इतके मार्क पडतील याचा अंदाज तेव्हाही आला नसल्याचं ती सांगते.
"माझ्या शिक्षकांना मला चांगले मार्क पडतील आणि चांगला रँक मिळेल याची खात्री होती. ते सांगायचे की तुझा रँक शंभरच्या आत असेल. मला विश्वास नव्हता"
77 रँक मिळणं, ही गोष्ट अपेक्षेपेक्षा जास्त असल्याचं ती सांगते. अर्थात आपला रँक 77 वा आहे त्यापेक्षा आणखी पुढे कोणी मुलगी असती तर जास्त आनंद झाला असता हेही ती प्रांजळपणे कबूल करते. यंदाच्या परीक्षेत अनेक मुलींनी जेईई मध्ये चांगली कामगिरी केल्याचं मात्र ती आवर्जून नोंदवते.
तिचं कुटुंब आता हैदराबादला रहायला गेलं आहे. आरोहीला आता आयआयटी मुंबईमध्ये प्रवेश घेत कॉम्प्युटर इंजिनिअरिंग करण्याची इच्छा आहे. हा महत्वाचा टप्पा असला तरी ही सुरुवात असल्याची जाणीव तिचे पालक तिला करून देत आहेत.
तिच्या लहान भावाचीही जेईईची तयारी सुरु झाली आहे. दुसरीकडे इंजिनिअरिंग झाल्यावर तिला देशासाठी काही करण्याचं स्वप्न आहे. त्यालाही दिशा देण्याचं काम तिचे पालक करत आहेत. सध्या मात्र आरोही गेले अनेक दिवस न भेटलेल्या नातेवाईंकांच्या भेटीगाठी, सिनेमा आणि पुस्तकं यात रमून गेली आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)