आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण आणि ॲना कोनिडेला होणार विभक्त

ॲना कोनिडेला आणि पवन कल्याण (फाइल फोटो)
फोटो कॅप्शन, ॲना कोनिडेला आणि पवन कल्याण (फाइल फोटो)
    • Author, गरिकापती उमाकांत
    • Role, बीबीसीसाठी
  • Published
  • वाचन वेळ: 4 मिनिटे

आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि अभिनेते पवन कल्याण आणि त्यांची पत्नी ॲना कोनिडेला (ॲना लेझनेव्हा) यांनी परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची अधिकृत घोषणा केल्याची माहिती जनसेनेच्या माध्यम विभागाने दिली आहे.

यापूर्वीही पवन कल्याण आणि ॲना कोनिडेला यांच्या घटस्फोटाच्या अनेक चर्चा झाल्या होत्या. परंतु, त्यावेळी जनसेनेने या बातम्यांचं खंडन केलं होतं. आता 9 नोव्हेंबर 2026 रोजी दोघांनी संयुक्त निवेदन जारी करून 13 वर्षांचं वैवाहिक नाते संपवत असल्याचं जाहीर केलं आहे.

ही माहिती जनसेनेच्या माध्यम विभागाने दिली आहे. नाव जाहीर न करण्याच्या अटीवर जनसेनेच्या काही नेत्यांनीही बीबीसीशी बोलताना या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

दोघांनीही परस्पर संमतीने वेगळे राहण्याचा निर्णय घेतल्याचं संयुक्त निवेदनात म्हटलं आहे.

मात्र, ॲना लेझनेव्हापासून वेगळं होत असल्याच्या संयुक्त निवेदनाशिवाय पवन कल्याण किंवा ॲना यांनी वैयक्तिकरीत्या यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरही याबाबत काहीही म्हटलेलं नाही. तसेच, चिरंजीवी कुटुंबाकडूनही अद्याप यावर कोणतंही निवेदन किंवा प्रतिक्रिया आलेली नाही.

चांगले मित्र म्हणून...

वैवाहिक नातं संपलं तरी आम्ही दोघेही कायम चांगले मित्र राहू, असं पवन कल्याण आणि ॲना कोनिडेला यांनी संयुक्त निवेदनात स्पष्ट केलं आहे.

एकमेकांचा आदर राखून आणि परस्पर संमतीने वेगळं होण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी या निवेदनात म्हटलं आहे.

Caption- पवन कल्याण (फाईल फोटो)
फोटो कॅप्शन, पवन कल्याण पत्नी ॲना कोनिडेला यांच्यासोबत (फाईल फोटो)

मुलांचे सुख आणि त्यांची जबाबदारी हेच आमच्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे. मुलांसाठी आम्ही नेहमीच कटिबद्ध राहू, असं पवन कल्याण आणि ॲना यांनी निवेदनात म्हटलं आहे.

आयुष्यातील या बदलाच्या काळात सर्वांनी समजूतदारपणा दाखवावा आणि आपल्या खासगी आयुष्याचा आदर करावा, अशी विनंती पवन कल्याण आणि ॲना यांनी केली आहे.

3 लग्नं आणि 4 मुलं!

पवन कल्याण यांनी आतापर्यंत कायदेशीररीत्या 3 विवाह केले आहेत.

पवन कल्याण यांचा पहिला विवाह 1997 मध्ये नंदिनी यांच्याशी झाला होता. 2008 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.

त्यानंतर 2009 मध्ये त्यांनी अभिनेत्री रेणू देसाई यांच्याशी विवाह केला. परंतु, 2012 मध्ये दोघेही वेगळे झाले. त्यांना अकिरा नंदन आणि आद्या अशी 2 मुले आहेत.

त्यानंतर 30 सप्टेंबर 2013 रोजी पवन कल्याण यांनी रशियाच्या ॲना लेझनेव्हा यांच्याशी विवाह केला. त्यांना 2 मुले आहेत.

पवन कल्याण यांना एकूण 4 मुले आहेत.

अचानक घेतलेला निर्णय

पवन कल्याण आणि ॲना कोनिडेला वेगळे होणार असल्याचे कोणतेही संकेत किंवा चर्चा अलीकडच्या काळात ऐकायला मिळाली नव्हती.

पत्नी म्हणून ॲना लेझनेव्हा अनेक अधिकृत कार्यक्रमांमध्ये पवन कल्याण यांच्यासोबत सहभागी झाल्या होत्या. आमदार म्हणून निवडून आल्यानंतर आणि उपमुख्यमंत्री झाल्यानंतरच्या सुरुवातीच्या काळात पवन कल्याण यांनी पत्नीसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेतली होती.

15 ऑगस्टला झालेल्या स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमातही ॲना लेझनेव्हा पवन कल्याण यांच्यासोबत सहभागी झाल्या होत्या. संपूर्ण कार्यक्रमात त्या पती पवन कल्याण यांच्यासोबत उपस्थित होत्या.

अलीकडेच ॲना यांनी तिरुमला येथे पायी चालत जाऊन केसही अर्पण केले होते.

मात्र, अशा अचानक विभक्त होण्याची घोषणा झाल्याने चित्रपट आणि राजकीय क्षेत्रात चर्चा सुरू झाली आहे.

कोण आहेत ॲना लेझनेव्हा?

Skip podcast promotion and continue reading
BBC News मराठी आत्ताच फॉलो करा WhatsApp कर
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

ॲना लेझनेव्हा यांचा जन्म 1980 मध्ये रशियात झाला. त्यांनी मॉडेल आणि अभिनेत्री म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती.

2011 मध्ये दिग्दर्शक जयंत सी. परांजी यांच्या 'तीनमार' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान ॲना यांची पवन कल्याण यांच्याशी पहिली भेट झाली, असं सांगितलं जातं. या चित्रपटात ॲना यांनी छोटीशी भूमिका केली होती. याच ओळखीचे पुढे प्रेमात रूपांतर झाले.

2 वर्षांनंतर, 30 सप्टेंबर 2013 रोजी हैदराबादमधील एर्रगड्डा येथील उप-निबंधक कार्यालयात दोघांचा नोंदणी पद्धतीने विवाह झाला.

ॲना लेझनेव्हा या पवन कल्याण यांच्या तिसऱ्या पत्नी आहेत.

पवन आणि ॲना यांना मार्क शंकर पवनोविच नावाचा मुलगा आणि पोलेना अंजना पवनोव्हा नावाची मुलगी आहे.

'मनी कंट्रोल'च्या वृत्तानुसार, ॲना यांना हॉटेल व्यवसायात विशेष रस आहे. सिंगापूरमध्ये त्यांची अनेक हॉटेल्स आहेत. तसेच, रशिया आणि सिंगापूरमध्ये त्यांची सुमारे 1800 कोटी रुपयांची मालमत्ता असल्याचेही या वृत्तात म्हटले आहे.

पवन कल्याण यांचे भाऊ चिरंजीवी यांच्या मूळ नावावरून दुसऱ्या मुलाचे नाव 'शंकर' ठेवण्यात आल्याचे चित्रपट पत्रकार सुरेश कोंडेटी यांनी सांगितलं.

आता 13 वर्षांच्या संसारानंतर पवन कल्याण आणि ॲना यांनी परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतल्याचे संयुक्त निवेदनातून जाहीर केलं आहे.

गेल्या वर्षी तिरुमला येथे केशदान

सिंगापूरमधील एका शाळेत लागलेल्या आगीतून पवन आणि ॲना यांचा मुलगा शंकर सुखरूप बचावले होते. त्यानंतर देवाचा नवस फेडण्यासाठी ॲना यांनी 13 एप्रिल 2025 रोजी तिरुमला येथे जाऊन केस अर्पण केले होते.

रशियन ऑर्थोडॉक्स ख्रिश्चन धर्माचे पालन करणाऱ्या ॲना यांनी तिरुमला येथे मंदिराच्या नियमांनुसार आवश्यक घोषणापत्रावर स्वाक्षरी केली आणि धार्मिक विधींमध्येही भाग घेतला.

पवन कल्याण यांच्याशी विवाह केल्यानंतर ॲना बहुतेक वेळा भारतीय पारंपरिक पेहरावातच दिसत होत्या.

4 महिन्यांपूर्वी पवन यांच्याबद्दल भावनिक पोस्ट

या वर्षी 12 जून रोजी ॲना यांनी पती पवन कल्याण यांच्याबद्दल सोशल मीडियावर भावनिक पोस्ट लिहिली होती.

आंध्र प्रदेशात युतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर ॲना यांनी इन्स्टाग्रामवर एक मोठी पोस्ट लिहिली होती. त्यासोबत त्यांनी पती पवन कल्याण आणि मुलांसोबतचे फोटोही शेअर केले होते. त्या वेळी पवन कल्याण उपमुख्यमंत्री झाले होते.

पवन कल्याण (फाईल फोटो)
फोटो कॅप्शन, पवन कल्याण (फाईल फोटो)

"पवन कल्याण आज आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री असले, तरी इथंपर्यंत पोहोचण्याचा त्यांचा प्रवास सोपा नव्हता. त्यांना अनेक पराभवांना सामोरं जावं लागलं. संपूर्ण जग आपल्याविरोधात आहे, असं वाटावं असे अनेक दिवस त्यांच्या आयुष्यात आले. अनेकांनी त्यांचा अपमान केला आणि त्यांची खिल्लीही उडवली."

"पवन बाहेर राजकीय लढा देत असताना मी घरी मुलांसाठी खंबीर राहण्याचा प्रयत्न करत होते. कधी कधी मला एकटं वाटायचं, तर काही दिवस भीतीही वाटायची. त्यामुळे पवन यांचं यश माझ्यासाठी खूप भावनिक होतं. त्यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, त्या दिवशी माझ्या डोळ्यांतून अश्रू आले. हे पंतप्रधान मोदी यांनीही पाहिलं होतं. ते आनंदाचे अश्रू होते," असं ॲना यांनी या पोस्टमध्ये म्हटलं होतं.

यासोबत त्यांनी 2024 मध्ये पवन कल्याण यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतानाचे फोटो आणि व्हीडिओही शेअर केले होते.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)