IPL 2026 फायनल : आरसीबीला विजयासाठी 156 धावांचं आव्हान, चेस मास्टर कोहलीचे अर्धशतक

Published
वाचन वेळ: 4 मिनिटे

गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात आयपीएल 2026 च्या विजेतेपदासाठीचा अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरू आहे.

आरसीबीनं टॉस जिंकत जीटीला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. गुजरातनं आरसीबीला विजयासाठी 156 धावांचं आव्हान दिलं आहे..

प्रथम फलंदाजी करताना गुजरात टायटन्सच्या फलंदाजांना फारशी चांगली कामगिरी करता आली नाही.

गुजरातच्या वॉशिंग्टन सुंदरच्या नाबाद 50 धावा वगळता दुसऱ्या कोणत्याही फलंदाजाला चांगली कामगिरी करता आली नाही.

आरसीबीच्या रखीस डारनं 3 तर भुवनेश्वर आणि हेजलवूडनं प्रत्येकी 2 विकेट घेतल्या.

गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू दोन्ही संघांनी यापूर्वी एकदा आयपीएलचं विजेतेपद मिळवलं आहे.

गुजरातची फलंदाजी

फायनल सामन्यामध्ये गुजरातची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. संपूर्ण स्पर्धेत फलंदाजीने वाहवा मिळवलेल्या गुजरात टायटन्सची सलामीची जोडी स्वस्तात परतली.

तिसऱ्याच ओव्हरमध्ये शुभमन गिलला हेझलवूडनं बाद केलं. आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदारनं त्याचा उत्तम झेल घेतला.

त्याच्या पाठोपाठ साई सुदर्शनला भुवनेश्वरनं जितेश शर्माच्या हाती झेलबाद करत आरसीबीला दुसरा धक्का दिला. त्यानं 12 धावा केल्या.

तिसऱ्या क्रमांकावर आलेला निशांत सिंधू रसीख डारच्या गोलंदाजीवर पडीक्कलला झेल देऊन बसला. त्यानं संघासाठी 20 धावा केल्या.

या तीन विकेटनंतर सर्वाधिक मदार असलेल्या जोस बटलरला कृणाल पांड्यानं एका चेंडूवर चकवलं आणि जितेश शर्मानं अत्यंत चपळाईनं स्टंपिंग करत त्याला 19 धावांवर बाद केलं.

त्यामुळं आरसीबीची अवस्था 4 बाद 73 अशी झाली.

त्यानंतर अर्शद खानला बाद करत हेझलवूडनं त्याची दुसरी आणि संघासाठी पाचवी विकेट घेतली. त्यावेळी गुजरातची अवस्था 5 बाद 99 धावा अशी झाली होती.

त्यानंतर अखेरच्या ओव्हरमध्ये फटकेबाजीसाठी ओळखला जाणार राहुल तेवतियाही अवध्या 7 धावा करून परतला. रसीख डारनं त्याला बाद करत दुसरी विकेट घेतली.

त्यानंतर जेसन होल्डरला भुवनेश्वरनं आणि राशिद खानला रसीख डारनं बाद केलं. त्या दोघांनीही 7-7 धावाच केल्या.

गुजरातकडून वॉशिंग्टन सुंदरनं एकाकी झुंज देत नाबाद अर्धशतकी खेळी केली. त्याजोरावर गुजरातनं आरसीबीला विजयासाठी 156 धावांचं आव्हान दिलं.

आरसीबीची फलंदाजी

आरसीबीसाठी कोहलीचे महत्त्व

आरसीबीनं 156 धावांच्या आव्हानाचा सामना करण्याची सुरुवात त्यांच्या नेहमीच्या आक्रमक शैलीत केली.

विराट कोहलीसह सलामीला आलेल्या व्यंकटेश अय्यरनं सुरुवातीपासूनच चांगली फटकेबाजी केल्याचं पाहायला मिळालं.

व्यंकटेश अय्यरनं पहिल्या चेंडूपासून फटकेबाजीचा प्रयत्न केला. त्यानं काही चांगले फटकेही लगावले. पण त्याला मोठी धावसंख्या करता आली नसली तरी त्यानं 16 चेंडूत 32 धावा करत संघाची धावांची गती चांगलीच वाढवून ठेवली.

पाचव्या ओव्हरमध्ये सिराजनं अय्यरला जाळ्यात अडकवलं आणि रबाडाच्या हाती तो झेलबाद झाला.

त्यानंतर आलेला देवदत्त पडिक्कल अवघे चार चेंडू खेळून एका रनवर बाद झाला. रबाडानं अर्शद खानच्या हातून त्याला परत पाठवलं.

दुसऱ्या बाजूनं विराट कोहलीनं मात्र मोर्चा सांभाळलेला पाहायला मिळाला. त्यानं गुजरात टायटन्सच्या गोलंदाजांची धुलाई सुरू ठेवली होती.

त्यानंतर आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदारनं काही फटके मारले, पण तोही 15 धावा करून बाद झाला. रशीद खाननं त्याला बाद केलं.

त्यानंतर त्याचओव्हरमध्ये राशिद खाननं कृणाल पांड्याला बाद करत आरसीबीला चौथा धक्का दिला. त्यामुळं एका पाठोपाठ मिळालेल्या विकेटमुळं जीटीनं पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला.

आरसीबी इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर

रजत पाटीदारच्या नेतृत्वातील आरसीबीचा संघ आज इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर आहे. त्यांनी अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सला हरवले, तर ते चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि मुंबई इंडियन्स (MI) यांच्यानंतर आयपीएल विजेतेपद यशस्वीपणे राखणारा तिसरा संघ ठरतील.

दुसरीकडं, गेल्या पाच वर्षांत तिसऱ्यांदा अंतिम सामना खेळणाऱ्या गुजरात टायटन्सला, स्पर्धेतला चौथा सर्वात यशस्वी संघ बनण्याची संधी मिळेल.

अंतिम सामन्यात गुजरातसमोरील सर्वात मोठं आव्हान भुवनेश्वर कुमार आणि जोश हेझलवूड यांच्या नव्या चेंडूने होणाऱ्या गोलंदाजीचा सामना करणे हे असेल.

शुभमन गिल आणि साई सुदर्शन या सलामीच्या जोडीने सुरुवातीचा दबाव यशस्वीपणे पेलला, तर नंतर त्यांची फलंदाजी सोपी होईल. त्यांनी राजस्थानविरुद्ध असेच करून दाखवले होते.

अंतिम सामन्यापूर्वी आरसीबीला तीन दिवसांची विश्रांती मिळाली आहे. अनेक तज्ज्ञांच्या मते, ही स्पर्धेतील सर्वात मजबूत फलंदाजी फळी आहे. आरसीबीने या हंगामात नऊ वेळा 200 पेक्षा जास्त धावा केल्या असून दोनदा 200 पेक्षा जास्त धावांचे लक्ष्य यशस्वीपणे पूर्ण केले आहे.

विशेष म्हणजे, स्पर्धेतील सर्वाधिक धावा करणाऱ्या पहिल्या 10 फलंदाजांमध्ये संघातील केवळ विराट कोहलीचा समावेश आहे.

हा सामना अशा मैदानावर खेळला जात आहे, जिथे दोन्ही संघांच्या सुवर्ण आठवणी जोडलेल्या आहेत. गुजरात टायटन्सने 2022 मध्ये इथंच पहिलं आयपीएल विजेतेपद पटकावलं, तर आरसीबीनं गेल्या वर्षी याच मैदानावर विजेतेपदाची प्रदीर्घ प्रतीक्षा संपवली होती.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)