प्रणित मोरेसह इतरांवर अश्लील आणि आक्षेपार्ह कंटेंट प्रकरणी गुन्हा दाखल, महिला आयोगानंही घेतली दखल

आक्षेपार्ह मजकूर प्रकरणी कॉमेडियन प्रणित मोरेसह इतरांवर गुन्हा, महिला आयोगाचीही नोटीस

फोटो स्रोत, Video Grab/FACEBOOK/Pranit More Official

Published
वाचन वेळ: 4 मिनिटे

ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर अश्लील आणि आक्षेपार्ह कंटेंट प्रसारित केल्याप्रकरणी स्टँड-अप कॉमेडियन प्रणित मोरे, हिमांशू जांगडा, डॉ. सेजल पवार आणि इतरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुरुवारी (11 जून) महाराष्ट्र सायबर सेलने हा गुन्हा दाखल केला आहे.

राष्ट्रीय महिला आयोगाने देखील स्वतःहून (सु-मोटो) या प्रकरणाची दखल घेत प्रणित मोरे आणि हिंमांशू जांगडा समन्स बजावले आहे.

प्रणित मोरेच्या गुरुग्राममध्ये आयोजित एका कार्यक्रमाशी संबंधित काही व्हीडिओ आणि क्लिप्स यूट्यूब, इन्स्टाग्राम तसेच इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रसारित करण्यात आले होते. याच प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकं प्रकरण काय?

या वादाची सुरुवात प्रणित मोरेच्या कार्यक्रमादरम्यान हिमांशू जांगडाने सांगितलेल्या एका प्रसंगामुळे झाली. त्याने एका मुलीसोबतच्या डेटचा अनुभव सांगितला होता.

त्याने चिकन बिर्याणीच्या एका प्लेटवर 370 रुपये खर्च केल्याचे म्हटलं होतं. त्यानंतर त्याची वसुली किंवा बिर्याणीवर खर्च केलेल्या पैशांच्या बदल्यात तिच्याकडून 'सेक्शुअल फेव्हर'ची अपेक्षा केली होती, असे जांगडा याने सांगितलं होतं.

याचं अतिशय सविस्तर वर्णन त्यानं केलं होतं, आणि त्यावर प्रणित मोरेसह उपस्थितांमध्ये हशा पिकलेला पाहायला मिळालं.

यानंतर डॉ. सेजल पवारने वैद्यकीय शिक्षणादरम्यान मृतदेहांशी संबंधित काही अनुभव सांगितल्याचे व्हीडिओही व्हायरल झाले होते. त्यानंतर हा वाद आणखी वाढला होता.

सेजल पवारने पुरुष मृतदेहांच्या खासगी अवयवांबाबत अश्लील आणि आक्षेपार्ह भाष्य केलं होतं. या कार्यक्रमात झालेल्या आक्षेपार्ह वक्तव्यांवरून देशभरातून प्रतिक्रिया उमटल्या.

या प्रकरणानंतर हिमांशू जांगडाला त्याच्या कंपनीने कामावरून काढून टाकलं. दुसरीकडे डॉ. सेजल पवारने केलेल्या वक्तव्याची चौकशी करण्याचे आदेश केईएम हॉस्पिटलने दिले आहेत.

केईएमनेही नेमली चौकशीसाठी समिती

केईएम हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज प्रशासनाने सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या कार्यक्रमात सेजल पवारने केलेल्या वक्तव्यांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

ही चौकशी केईएमच्या 2 कर्मचाऱ्यांच्या समितीकडून केली जाणार आहे, अशी माहिती केईएम प्रशासनाने दिली आहे.

या संपूर्ण वादाच्या केंद्रस्थानी प्रणित मोरे हा राहिला आहे. प्रेक्षकांशी झालेल्या संवादातील व्हायरल क्लिप्समुळे त्याच्यावर सातत्याने टीका होत असते. वाढत्या वादाच्या पार्श्वभूमीवर त्याने आपलं इन्स्टाग्राम अकाऊंटही बंद केलं आहे.

सायबर सेलकडून तपास सुरू

ऑनलाइन प्लॅटफॉर्म आणि सोशल मीडियावर कथित अश्लील व आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्याप्रकरणी स्टँड-अप कॉमेडियन प्रणित मोरे, हिमांशू जांगडा, डॉ. सेजल पवार आणि या प्रकरणात सहभागी असलेल्या इतर व्यक्तींविरोधात कारवाई करण्यात आल्याचे महाराष्ट्र सायबर सेल पोलिसांनी म्हटले आहे.

मुंबईतील महाराष्ट्र सायबर पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आला असून, भारतीय न्याय संहिता (बीएनएस) 2023 मधील कलम 75 (1) (आयव्ही), 75 (3), 294 आणि 353(2) तसेच माहिती तंत्रज्ञान (आयटी) कायदा 2000 मधील संबंधित तरतुदींनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा तपास सध्या सुरू असून, तपासात जे कोणी दोषी किंवा सहभागी आढळतील त्यांच्यावर कायद्यानुसार योग्य ती कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी म्हटले आहे.

राष्ट्रीय महिला आयोगाने स्वतःहून घेतली दखल

राष्ट्रीय महिला आयोगाने या संपूर्ण प्रकरणाची स्वतःहून दखल घेत प्रणित मोरे आणि हिमांशू जांगडा यांना समन्स बजावले आहे. गुरुग्राम येथील एका स्टँड-अप कॉमेडी शोमध्ये महिलांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे ही कारवाई करण्यात आली आहे.

प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन आयोगाने प्रणित मोरे आणि हिमांशू जांगडा यांना सुनावणीसाठी नोटीस पाठवली आहे. या प्रकरणाची सुनावणी 22 जून 2026 रोजी दुपारी 4 वाजता आयोगासमोर होणार आहे.

या शोमध्ये केलेल्या वक्तव्यांमधून महिलांवर दबाव टाकणे किंवा त्यांच्या इच्छेविरुद्ध वागण्याचे समर्थन केल्याचा संदेश जात होता, असं आयोगानं म्हटलं आहे.

प्रणित मोरेसह इतरांवर गुन्हा, महिला आयोगाचीही नोटीस

फोटो स्रोत, Video Grab/FACEBOOK/Pranit More Official

आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी हरियाणा पोलिसांना तातडीने कारवाई करण्यास सांगितले आहे. या प्रकरणात काय कारवाई करण्यात आली याचा अहवाल 7 दिवसांत देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

व्हीडिओतील कंटेंटबद्दल (मजकूर) चिंता व्यक्त करत आयोगानं म्हटलं आहे की, महिलांच्या संमतीचा, सन्मानाचा आणि त्यांच्या स्वतःच्या शरीरावरील अधिकाराचा अनादर करणाऱ्या वर्तनाचे समर्थन करणं चुकीचे आहे. यामुळे समाजात महिलांविषयी चुकीचा संदेश जाऊ शकतो.

माझं वक्तव्य चुकीचंच, माफी मागते-डॉ. सेजल पवार

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

दरम्यान, पुरुष मृतदेहांबाबत केलेल्या वक्तव्यांमुळे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात टीका झाल्यानंतर डॉ. सेजल पवारने माफी मागितली आहे. एका व्हीडिओच्या माध्यमातून 'मी खूप चुकीचं वक्तव्य केलं' असं तिने म्हटलं आहे.

व्हीडिओत सेजल पवार म्हणाली की, "मी सर्वांची मनापासून माफी मागते. माझ्याकडून खूप चुकीचं वक्तव्य झालं. त्याबद्दल मला खूप वाईट वाटतंय. मी असं काही तरी बोलेन, असा विचारही मी कधी केला नव्हता."

आपण केलेलं वक्तव्य अयोग्य होतं, अशी कबुली देत त्याबद्दल तिने खेदही व्यक्त केला.

सध्या व्हायरल होत असलेली ही क्लिप दोन महिन्यांपूर्वी रेकॉर्ड करण्यात आली होती. सेजल पवार म्हणाली, "दोन महिन्यांपूर्वीची ही क्लिप इतका मोठा वाद निर्माण करेल, याची मला अजिबात कल्पना नव्हती. मी माझ्या वक्तव्याचं समर्थन करणार नाही. ही माझी चूक होती, याची मला जाणीव आहे."

चुकीच्या वक्तव्यांवर सोशल मीडियावरील लोकांनी टीका करणे योग्यच आहे. भविष्यात अशा प्रकारच्या वक्तव्यांशी आपलं नाव जोडले जाऊ नये, याची काळजी घेईन, असेही तिने म्हटलं.

"माझ्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील, तर त्याबद्दल मी मनापासून माफी मागते."

त्या संवादादरम्यान मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी मृतदेहांचा नेहमी आदर केला आहे. मात्र, मी केलेलं एक विशिष्ट वक्तव्य चुकीचं होतं आणि ते बोलायला नको होतं. भविष्यात सार्वजनिक ठिकाणी बोलताना अधिक काळजी घेईन, असंही तिनं स्पष्ट केलं.

प्रणित मोरेसह इतरांवर गुन्हा, महिला आयोगाचीही नोटीस

फोटो स्रोत, Getty Images

याच प्रकरणावरून वेगवेगळ्या स्टँडअप कॉमिक्स आणि कलाकारांनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत.

कुशा कपिलाने एक व्हीडिओ पोस्ट केला आहे. आपण कोणत्या गोष्टी पब्लिश करतो त्याची जबाबदारी क्रिएटर्सची असल्याचं तिने म्हटलंय. 'अशा प्रकारचा मजकूर अपलोड करणं ही विचारपूर्वक निवड असून याकडे कॉमेडी म्हणून दुर्लक्ष करण्यात येऊ नये.' असं तिने म्हटलंय.

रौनक रजानीने म्हटलंय, "ज्या देशात आजही महिलांविरोधातले गुन्हे इतके सर्रास होतात, तिथे अशा प्रकारच्या गोष्टी नॉर्मल कशा समजल्या जाऊ शकतात?...आपल्या सगळ्यांकडेच अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, पण आपण हाही विचार करायला हवा की आपल्या प्रभावाचे, इन्फ्लुएन्सचे प्रत्यक्ष आयुष्यात परिणाम होऊ शकतात."

अभिनेता आणि स्टँडअप कॉमिक वीर दासनेही यावर भाष्य करत लिहिलंय, "एखाद्या व्यक्तीला कोणत्या प्रकरणी त्याच्यावर FIR झालेली चालेल, यावरून त्याच्याबद्दल बरंच काही कळतं."

तर इन्फ्लुएन्सर डॉली सिंगनेही तिच्या इन्स्टा अकाउंटवर पोस्ट केलंय ,'जर तुम्ही समंजस, खुल्या मनाचे, महिलांचा आदर करणारे (फेमिनिस्ट म्हणणं अतिशयोक्ती ठरेल) असल्यासारखे सेटवर आणि एकूणच मीडियात वागता, तर किमान तशीच प्रतिमा कायम ठेवण्यासाठीचं नाटक चारचौघांत परफॉर्म करताना आणि इन्स्टाग्रामवरही करा.'

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)