सआदत हसन मंटोवर 'पतन झालेल्या लोकांवर कथा करतो' असा आरोप का होत असे?

फोटो स्रोत, BBC Hindi
- Author, तुषार कुलकर्णी
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
- वाचन वेळ: 6 मिनिटे
"…the scent of bitter almonds always reminded him of the unrequited love..." —Gabriel Garcia Marquez
त्याचं संपूर्ण साहित्यच कधीही पूर्ण न होऊ शकलेल्या प्रेमातूनच तयार झालंय. पण त्याचं प्रेम कधीही कोण्या एकट्या दुकट्या व्यक्तीवर नव्हतं. त्याचं प्रेम होतं त्या दोन पायाच्या प्राण्यावर, ज्याला माणूस म्हटलं जातं.
'माझं मानवतेवर प्रेम आहे', असं म्हणून केवळ एखाद्या संकल्पनेला घट्ट धरून बसणारा तो नव्हता तर त्याचं हाडामासांच्या लोकांवर प्रेम होतं.
जसं जसं तो त्यांच्यावर अधिक अधिक प्रेम करत गेला तसं तसं त्याच्या पदरी निराशाच पडत गेली अन् रक्तबंबाळ हृदय एका हातात घेऊन तो लिहित गेला.
सआदत हसन मंटोचा वेगळा परिचय करून देण्याची गरज निदान भारत आणि पाकिस्तान या दोन देशांना तरी नाही. 'मंटो' हे नाव घेतलं तरी पुष्कळ आहे.
42 वर्षांच्या आयुष्यात त्याने 250 हून अधिक कथा लिहिल्या, 100 हून अधिक नाटकं, व्यक्तीचित्रणं, लेख लिहिले. त्यानं किती चित्रपटांच्या कथा लिहिल्या हे मोजणं देखील कठीण आहे. कारण त्या काळात चित्रपटाचे कथा लेखक एखाद्या स्टुडिओसाठी महिन्याला पगार घेऊन स्क्रिप्ट लिहित असत.
अशा मंटोचं संपूर्ण साहित्य तर वाचणं कठीण आहे, पण बलराज मेनरा आणि शरद दत्त या मंटोच्या मित्रांनी त्याचे निवडक साहित्य भारतीय वाचकांसमोर सादर केले आहे. 'दस्तावेज'च्या 5 खंडातून मंटोच्या प्रतिभेचं दर्शन आपल्याला घडतं. ते वाचून मी मंटोचं साहित्य कसं आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न केला.
ज्यांना संपूर्ण मंटो वाचायचा आहे त्यांच्यासाठी रेखता डॉट कॉमवर त्याचे साहित्य उपलब्ध आहेत.
मंटोच्या विपुल साहित्यावर नजर टाकली तर निश्चितच असं वाटतं की इतक्या कमी कालावधीत मंटोनी हे साहित्य कसं लिहिलं असेल?
मंटो केवळ पतन झालेल्या लोकांवर कथा करतो का?
मंटोच्या कथा म्हटलं की, पटकन डोळ्यासमोर येतं ते म्हणजे शरीर विक्रेय करणाऱ्या महिला, त्यांचे दलाल, दारुडे, चोर इत्यादींवर लिहिलेल्या कथा.
'मंटो केवळ पतन झालेल्या लोकांवर कथा करतो' हा आरोप त्याच्यावर पूर्वीपासूनच झाला आहे. पण जसं आपण त्याच्या कथा वाचतो तेव्हा लक्षात येतं की, केवळ त्या लोकांचं विश्व दाखवण्यापुरत्याच त्या कथा मर्यादित नाही. तर त्या लोकांमध्ये आपल्या इतकीच कदाचित आपल्याहूनही अधिक माणुसकी आहे हेच शोधण्याचा प्रयत्न तो करत असतो.
समाजाच्या निती मूल्यांच्या चौकटीत बसत नसले, तरी ती देखील माणसं आहेत. त्यांना राग, लोभ, प्रेम, मत्सर या सर्व भावना आहेत ज्या आपल्याला आहेत.
केवळ कुणाच्या पोटा-पाण्याचा मार्ग काय आहे त्याच्यावरून त्याचं माणूसपण ठरवता येईल का हा प्रश्न उराशी घेऊन तो या प्रांतात भटकत राहतो.
या त्याच्या भटकंतीतूनच मग 'दस रूपये' सारखी कथा जन्माला येते. ज्यामध्ये आपला दिवस चांगला गेला, आपल्याला ग्राहकाने नीट वागवलं म्हणून एक किशोरवयीन वेश्या तिला मिळालेले पैसे परत करते.

फोटो स्रोत, BBC Hindi
तर आपल्याला डावललं गेल्याच्या अपमानातून 'हतक'सारखी गोष्ट जन्माला येते. पण अशा एकूण कथा किती असतील, फार तर फार 20.
मंटोने तर 250 हून अधिक कथा लिहिल्या आहेत. म्हणजे त्याच्या एकूण साहित्याच्याच नाही तर केवळ कथेच्या संख्येच्या 10 टक्केच आहे.
मंटोनी विविध विषयांवर आणि समाजातील विविध स्तरांतील लोकांवर कथा लिहिल्या आहेत.
आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या चांगल्या वाईट गोष्टी तो पाहत गेला आणि त्यातून माणसाच्या जगण्यातील गूढ तो उकलत गेला. माणसाच्या जगण्यातील, विचार करण्यातील विसंगतीचं त्याला आकर्षण होतं असंच म्हणता येईल, त्यातून त्याने अनेक गोष्टी लिहिल्या.
याचं उदाहरण म्हणजे 'पैरन' ही कथा. आपली तथाकथित गर्लफ्रेंड ही आपल्यासाठी 'अनलकी' आहे हे माहीत असूनही कथेचा नायक तिला सोडायला तयार नसतो. तो हे का करतो हे तुम्हीच वाचून शोधा, कारण हे सांगणं म्हणजे स्पॉयलर दिल्यासारखे होईल.
मंटोच्या आयुष्याचे दोन भाग
मंटोने विनोदी कथा पण लिहिल्या आहेत. अगदी आताच्या काळातील 'अतिथी तुम कब जाओगे' या चित्रपटासारखी असलेली 'तरक्कीपसंद' ही कथा घ्या.
स्वतःला 'तरक्कीपसंद' म्हणवून घेणारा लेखक एका दुसऱ्या लेखकाच्या घरी सहकुटुंब तळ ठोकून कसा बसतो याची ही कथा आहे.
नवरा-बायकोच्या भांडणातून तयार झालेली 'अक्ल दाढ' घ्या किंवा 'फोजा हराम दा', ही कथा घ्या. या कथा निखळ विनोदी आहेत. इतर अनेक कथा अशा आहेत ज्यामध्ये विनोद सापडेल, पण त्याला कधी एखादा ट्विस्ट देऊन ती शोकांतिका होऊन जाईल याचा नेम नसतो.
मंटोच्या आयुष्याचे दोन भाग आहेत. एक भारतातील आणि दुसरा फाळणीनंतर पाकिस्तानात गेल्यावर. याबाबत तो म्हणतो 'पहले मैं हिंदुस्तान का सबसे बडा अफसानानिगार था, अब मैं पाकिस्तान का सबसे बडा अफसानानिगार हूं'.
भारतात असताना तो मुंबईत फिल्म स्टुडिओत नोकरी करायचा, एका साप्ताहिकाचा तो संपादकही होता. 1940 पासून ते स्वातंत्र्यापर्यंत शहरात घडलेल्या हिंदू-मुस्लीम दंगली या देखील त्याच्या कथेचा विषय होत्या.
धर्माचं लेबल लागलं की तोच माणूस काही क्षणात कसा बदलतो हे त्याच्या काही कथांमध्ये दिसतं तर धर्माच्या नावाखाली दंगे करणारा हातात तलवार घेतलेल्या व्यक्तीचं क्षणार्धात कसं माणसात रूपांतर होतं हे देखील त्याच्या कथांचे विषय आहेत.
फाळणीनंतर लिहिलेल्या कथा अधिक मॅच्युअर म्हणता येतील अशा आहेत. याचं सर्वांत उत्तम उदाहरण म्हणजे टोबा टेक सिंग. (या कथेवर आधारित चित्रपट देखील येऊन गेला आहे. ज्यात पंकज कपूरची प्रमुख भूमिका आहे.)

फोटो स्रोत, Rajkamal Prakashan
जशी भारत आणि पाकिस्तानच्या कैद्यांमधील अदलाबदल झाली तशी पागलखान्यातील रुग्णांची अदलाबदल करा, असं सरकारी फर्मान निघतं आणि त्यातून कथा आकार घेते.
ही कथा थेट कशावरही भाष्य करत नाही. तरीदेखील आपल्याला विचार करायला भाग पाडते. ठंडा गोश्त, खोल दो या कथा देखील फाळणीनंतरच्याच आहेत. मानवी मनाचे अनेक पदर या कथांतून आपल्याला दिसत जातात.
मंटोनी भरपूर नाटके लिहिली आहेत. मंटोनी काही काळासाठी दिल्लीत आकाशवाणीसाठी काम केलं होतं. त्यावेळी त्याने रेडिओसाठी खूप सारी नाटकं लिहिली. त्यामध्ये आओ.. बहस करे, आओ.. चोरी करे….अशी 10 नाटकं आहेत.
10-10 च्या संचात इतरही सीरिज आहेत. जसं की, क्लिओपात्रा की मौत, नेपोलियन की मौत. एखाद्या मोठ्या व्यक्तीच्या मृत्यूचा शेवटचा तास याबाबत आहेत. हतक या कथेचं नाट्य रूपांतर आहे.
आओ…. सीरिजची मंटोची ही नाटकं वाचली तर वाटतं की कथा लिहिणारा आणि ही नाटकं लिहिणारा एकच मंटो आहे का.
जितक्या त्या धीरगंभीर त्या कथा आहेत त्याच्या अगदी उलट ही नाटकं आहेत. निखळ मनोरंजन करणारी, हसवणारी. पण या नाटकांबद्दल तो म्हणतो या नाटकांनी लोकांना हसवलं असेल, पण माझ्या ओठांवर एक हलकंही हसू उमटलं नाही. हे केवळ आपण पोटाची खळगी भरण्यासाठी लिहिलेलं आहे असं तो सांगतो.
मंटोवरील खटले
अश्लीलतेचा आरोप करत मंटोवर खटले लादले गेले, दंड लावला गेला.
मंटोवर स्वातंत्र्याआधी इंग्रज सरकारकडून आणि स्वातंत्र्यानंतर पाकिस्तान सरकारकडून खटले भरण्यात आले होते.
खालच्या कोर्टात त्याच्यावर दंड लादला जात असे आणि वरच्या कोर्टात गेला की तिथून तो सही सलामत सुटत असे. पण या खटल्यांमध्ये त्याचं आर्थिक आणि मानसिक नुकसान बरंच झालं.
त्याच्यावर आरोप होता तो 'फहशनिगारी' म्हणजेच अश्लीलतेचा. स्वातंत्र्यापूर्वी तर आपल्यावर हे आरोप झालेच पण ज्या स्वतंत्र पाकिस्तानची आपण स्वप्नं पाहिली होती ती या खटल्यांमुळे भंगल्याचं दुःख त्याच्या लिखाणात काही ठिकाणी पाहायला मिळतं.

फोटो स्रोत, BBC World Service
मंटोची ठंडा गोश्त किंवा धुआँ सारखी कथा लिहिण्या पाठीमागची काय भूमिका होती यावर मंटोनी वेळोवेळी भाष्य केलं आहे.
कोणताही माणूस नेमकं तसं का वागतो, त्याचं माणूसपण कशात आहेत, त्याच्या औदार्यात आहे, त्याच्या संकुचितपणात आहे, त्याच्या प्रेमात आहेत की त्याच्या हेव्या दाव्यात आहे की हे सारेच गुण-अवगुण वेगवेगळ्या वेळी एकाच माणसात प्रकट होतात हे पाहण्याची त्याची सवय आहे आणि यातूनच त्याच्या कथा जन्म घेत जातात असं वाटतं.
मंटोनी लिहिलेली व्यक्ती चित्रणं
मंटोनी अनेक व्यक्तीचित्रणं लिहिली आहेत. त्यात लक्षवेधी व्यक्ती चित्रण आहे ते म्हणजे मोहम्मद अली जीनांचे. स्वातंत्र्याआधी जीना हे मुंबईत राहत होते. त्यांच्याकडे नोकरी करणाऱ्या ड्रायव्हरकडून माहिती घेऊन मंटोने जीनांचे व्यक्ती चित्रण रेखाटले आहे. त्यांचे राजकारण कसे आहे यावर या व्यक्तीचित्रणाचा जोर नाही तर ते एक व्यक्ती म्हणून कसे आहेत, नोकरांशी कसे वागतात याबाबत मंटोने लिहिले आहे.
1940 मधले बॉलिवूड कसं होतं? तेव्हा 'बॉलिवूड' म्हणून हिंदी चित्रपटसृष्टीचं बहुतेक बारसं पण नसेल झालं. पण तेव्हाचे स्टुडिओ, त्यांचं कामकाज कसं चालत होतं हे मंटोनी रेखाटलेल्या व्यक्तीचित्रणांच्या आधारे आपल्याला कळतं. अशोक कुमार, नर्गिस, के. आसिफ यांच्या व्यक्तीचित्रणातून मंटोने तो काळ पुन्हा आपल्यासमोर उभा केलाय.

फोटो स्रोत, BBC World Service
मंटो 'मुसव्विर' नावाच्या साप्ताहिकाचा संपादक देखील होता त्याचा मुख्य विषयच फिल्मी गॉसिप होता. त्यामुळे या प्रकारावर मंटोचा हात कसा बसलेला असेल याची आपल्याला कल्पना येऊ शकते.
मंटोनी पुण्याच्या प्रभात स्टुडिओतही काम केलं आहे. त्यामुळे व्ही. शांताराम यांचाही उल्लेख त्याच्या अनेक लेखातून होतो. आपल्या जवळच्या मित्रांचेही सिक्रेट तो बेधडक सांगून टाकतो आणि पुन्हा नंतर म्हणतो की ते नाराज होतील पण नंतर पाहून घेता येईल.
हे सर्व लिहिताना त्याचं आपण कथाकार आधी आहोत आणि इतर गोष्टी नंतर हे भान कधीच विसरलं जात नाही. त्यामुळे कथेसाठी लागणारं सर्व मटेरियल तो आपल्याजवळ घेऊन बसतो आणि आपल्या वाचकांवर रितं करत जातो. त्याच्या पोतडीत असलेल्या या गोष्टी कधी संपत नाही. म्हणूनच तो म्हणतो 'लतिफेसे लतिफा निकलता है.'

फोटो स्रोत, BBC World Service
वयाच्या 40 व्या वर्षापर्यंतच त्याचे दोन डजनहून अधिक कथासंग्रह प्रकाशित झाले होते. भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशात अमाप प्रसिद्धी मिळाली होती पण त्यामुळे त्याची गरिबी दूर झाली नाही. 'जेव्हा खिशात पैसा असतो तेव्हा मी टांग्यात बसतो नाही तर पायी चालत जातो', असं तो सांगतो. पण त्याच वेळी हे देखील म्हणतो की ज्या देशांमध्ये अनेक लोकांना खायला देखील पुरेसं मिळत नाही त्या ठिकाणी आपल्याकडे अमूक नाही अशी तक्रार करणं योग्य नाही.
मंटोचे लिखाण वाचलं की त्याला होत असलेल्या दुःखाची जाणीव सतत होत राहते. त्याचं लिखाण हेच त्याच्या त्या शाश्वत पण अपूर्ण राहिलेल्या प्रेमाची साक्ष देत राहील.
ज्या लोकांवर प्रेम केलं, ज्या लोकांसाठी आपण आपलं सर्वस्व देऊन त्यांची कलेतून सेवा केली त्यांच्याकडून परत काही मिळण्याची अपेक्षा न ठेवता तो पुन्हा तितक्याच ताकदीने उभा राहत गेला.
कलाकारांमध्ये दिसणारा दुर्दम्य आशावाद त्याच्याकडे होता. या आशावादाच्याच जोरावर त्याला वाटायचं की मानवाचं भविष्य उज्ज्वल आहे. तसं जर नसतं त्याने आपल्या कथेतील (ठंडा गोश्त) मधील एक पात्र ईशरसिंह – जो दंग्यामध्ये सहा खून करतो- त्याला मंटोने आपला कथासंग्रह अर्पित नसता केला. तो समर्पणात म्हणतो, 'ईशरसिंह के नाम जो हैवान बनकर भी अपनी इंसानियत न खो सका.'
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)
























