'बॉयफ्रेंड भाड्यानं मिळेल', कॉफी डेटसाठी 499, सिनेमासाठी 1249 रुपये; असं सांगणाऱ्या जाहिरातींचं वास्तव काय आहे?

फोटो स्रोत, x.com/SajjanarVC_IPS/
- Author, अमरेंद्र यार्लगड्डा
- Role, बीबीसी प्रतिनिधी
- Published
- वाचन वेळ: 5 मिनिटे
"तुम्हाला बॉयफ्रेंड हवा आहे का? आम्ही एखाद्या व्यक्तीची व्यवस्था करून देऊ. त्यासाठीचं शुल्क ती व्यक्ती तुमच्यासोबत किती वेळ घालवणार आहे, तिला कोणतं काम करावं लागणार आहे आणि तुम्हाला त्या व्यक्तीबरोबर किती वेळ घालवायचा आहे यावर अवलंबून असेल", अशा जाहिराती सोशल मीडियावर केल्या जात आहेत.
हैदराबाद पोलिसांच्या म्हणण्यानुसार, या जाहिराती महिलांची फसवणूक करण्यासाठी तयार करण्यात आल्या आहेत.
"विशेषतः महिला आणि तरुण मुलींना लक्ष्य करून सायबर फसवणूक करणाऱ्यांनी एक नवीन डेटिंग नेटवर्क तयार केलं आहे," असा इशारा हैदराबादचे पोलीस आयुक्त व्ही. सी. सज्जनार यांनी दिला.
"एकटेपणाचा त्रास होतोय का? कॉफी प्यायला किंवा चित्रपट पाहायला एखादा देखणा तरुण हवा आहे का? तेही 50 टक्के सवलतीत," अशा ओळी असलेली सोशल मीडियावर दिसणारी रंगीत जाहिरात पोस्टर्स ही ऑनलाइन फसवणूक असल्याचं त्यांनी सांगितलं.
मात्र, हैदराबादस्थित मानसशास्त्रज्ञ अनिता आरे यांनी बीबीसीला सांगितलं की, काही लोक किशोरवयीन मुलांमधील आकर्षण आणि भावनांचा गैरफायदा घेऊन फसवणूक करत आहेत.
त्या जाहिरातींमध्ये काय आहे?
सज्जनार यांनी सांगितलं की, त्यांच्या देखरेखीमध्ये सोशल मीडिया खात्यांवर अशा जाहिरातींची संख्या वाढल्याचं आढळलं आहे.
या संदर्भात त्यांनी पाहिलेल्या काही जाहिरातींची माहिती सज्जनार यांनी त्यांच्या 'एक्स' पेजवर शेअर केली होती. या जाहिरातींमध्ये दोन महत्त्वाची वैशिष्ट्यं दिसून येतात. ती म्हणजे,
- एकत्र घालवायचा वेळ
- त्यासाठीची शुल्काची माहिती
पोलिसांनी सांगितलं की, प्रत्येक सेवेचं स्वतंत्र शुल्क असल्याचं या जाहिरातींमध्ये नमूद करण्यात आलं होतं.

फोटो स्रोत, x.com/SajjanarVC_IPS
याबद्दल बोलताना हैदराबादचे पोलीस आयुक्त व्ही. सी. सज्जनार म्हणाले, " एका तासासाठी कॉफी आणि गप्पा मारण्याचं शुल्क 499 रुपये, चित्रपटासाठी डेटचं शुल्क 1,249 रुपये, शॉपिंग डेटसाठी 1,499 रुपये आणि कार्यक्रम किंवा लग्नाला सोबत जाण्यासाठी 1,999 रुपये आकारले जातील, असं या जाहिरातीत नमूद केलं आहे."
ते पुढे म्हणाले, "पूर्ण दिवसाच्या (10 तास) पॅकेजसाठी 4,499 रुपयांचं स्वतंत्र शुल्कपत्रकही प्रकाशित करण्यात आलं आहे."
या जाहिरातींमध्ये बॉयफ्रेंड सेवा मागणाऱ्या महिलांनी थेट मेसेज पाठवावेत, त्यांची माहिती गोपनीय ठेवली जाईल, असंही म्हटलं गेलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
या जाहिरातींमध्ये दाखवलेले तरुण खरे नसून त्यांचे फोटो कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) मदतीने तयार केलेले दिसतात, असं तपासात समोर आल्याचं सज्जनार यांनी सांगितलं.
"महिलांची माहिती मिळाल्यानंतर बुकिंगची पुष्टी केली जाते, सुरक्षा ठेव (सिक्युरिटी डिपॉझिट) घेतली जाते, वॉलेट ट्रान्झॅक्शन किंवा QR कोडद्वारे आगाऊ पैसे घेतले जातात. त्यानंतर संबंधित खाती गोठवली जातात आणि फसवणूक करणारे गायब होतात," असं त्यांनी स्पष्ट केलं.
'भाड्याने प्रियकर' मिळण्याच्या रूपातील फसवणुकीचं जाळं
सायबर गुन्ह्यांविषयी पोलीस आणि सरकार कितीही जनजागृती करत असले तरी फसवणुकीचे नवनवे प्रकार समोर येतच आहेत.
सायबर गुन्ह्यांमध्ये कॉल सेंटर घोटाळे, बनावट गुंतवणूक (ट्रेडिंग) योजना, डिजिटल अटक (डिजिटल अरेस्ट) फसवणूक आणि डेटिंग अॅप्सद्वारे होणारी फसवणूक अशा अनेक प्रकारांचा समावेश आहे.
आता हैदराबाद पोलिसांनी Rent Boyfriend या नावाखाली सुरू असलेली आणखी एक नवीन सायबर फसवणूक उघडकीस आणली आहे.
या फसवणुकीचे बळी ठरलेल्या, विशेषतः तरुण महिलांनी, अद्याप थेट पोलिसांकडे तक्रार केलेली नाही. मात्र, या नव्या प्रकारच्या फसवणुकीबाबत आपण आत्ताच सावध झालो नाही, तर भविष्यात याचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे, असं पोलीस आयुक्त सज्जनार यांनी बीबीसीला सांगितलं.
"पोलिसांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर देखरेख ठेवली असता, अशा प्रकारची फसवणूक सुरू असल्याचं समोर आलं. ही फसवणूक नुकतीच सुरू झाल्याचं दिसतं. ती कोण चालवत आहे आणि त्यामागे कोण आहे, याचा आम्ही तपास करत आहोत. ही टोळी इतर राज्यांतून कार्यरत असल्याचं दिसतं," सज्जनार म्हणाले.

फोटो स्रोत, NCRB.GOV.IN
हैदराबाद सायबर क्राइम शाखा या फसव्या जाहिरातींची चौकशी करत असून दोषींवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असं सांगण्यात आलं.
याशिवाय, इंटरनेटवरील आश्वासनं आणि जाहिरातींवर विश्वास ठेवून एखाद्या व्यक्तीला प्रत्यक्ष भेटायला गेल्यास, प्रेमाच्या नावाखाली खोट्या आश्वासनांद्वारे नातं निर्माण करण्याचा बहाणा करून फसवणूक केली जाऊ शकते, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे.
"सरोगेट बॉयफ्रेंड सेवा घेण्यासाठी संपर्क करणाऱ्या महिलांचे मोबाईल क्रमांक आणि वैयक्तिक फोटो वापरून त्यांना अश्लील सामग्रीशी जोडण्याची आणि त्याद्वारे ब्लॅकमेल करण्याची शक्यताही आहे," असा इशारा सज्जनार यांनी दिला.
तसंच, जर कोणी अशा सायबर गुन्ह्याचा बळी ठरलं असेल किंवा संशयास्पद पोस्ट पाहिली असेल, तर त्यांनी तात्काळ 1930 या सायबरक्राइम हेल्पलाइनवर किंवा सायबरक्राइमच्या वेबसाइटवर तक्रार नोंदवावी, असा सल्लाही त्यांनी दिला.
दरवर्षी वाढत चाललेले सायबर गुन्हे
भारतात सायबर गुन्ह्यांचं प्रमाण दरवर्षी वाढत आहे. नॅशनल क्राइम रेकॉर्ड्स ब्युरोने (NCRB) प्रसिद्ध केलेल्या 2024 च्या अहवालानुसार, 2022 मध्ये देशात 65,893 सायबर गुन्ह्यांची नोंद झाली होती. 2023 मध्ये ही संख्या वाढून 86,420 झाली. पुढे 2024 मध्ये 1,01,928 सायबर गुन्ह्यांची नोंद झाल्याचं अहवालांमध्ये नमूद आहे.
यापैकी 18,615 प्रकरणं महिलांना लक्ष्य करून केलेल्या हल्ल्यांशी संबंधित होती. सायबर ब्लॅकमेलिंगची एकूण 601 प्रकरणं नोंदवण्यात आली. त्यापैकी 370 प्रकरणं विशेषतः महिलांविरुद्धच्या गुन्ह्यांशी संबंधित होती.
'पालकांच्या दृष्टिकोनात बदल होण्याची गरज'
मानसशास्त्रज्ञ अनिता आरे यांचं म्हणणं आहे की, मुलं मोठी होऊन किशोरवयात प्रवेश करत असताना त्यांना दिल्या जाणाऱ्या सल्ल्यात आणि पालकांच्या वागणुकीत बदल होणं आवश्यक आहे.
"मुलं तरुण वयात लैंगिक आकर्षण वाटणं ही सामान्य गोष्ट आहे. तसेच, आपल्या मित्रमैत्रिणींना गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड आहेत, त्यामुळे 'आपणही तसं असायला हवं' या विचारामुळे अशा जाहिरातींमध्ये त्यांना रस वाटण्याची शक्यता असते," त्या म्हणाल्या.
"घरात 'ती आपलीच मुलं आहेत' असं म्हणत पालक अनेकदा नकारात्मक शब्द वापरतात. पण त्यांचे दोष दाखवण्यापूर्वी पालकांनी त्यांच्या चांगल्या गुणांचं आणि सकारात्मक वैशिष्ट्यांचं प्रथम कौतुक करायला हवं," असं अनिता म्हणतात.
तसंच, घराबाहेरील लोक किंवा पैशासाठी त्यांच्यासोबत संबंध ठेवणारे लोक तरुण महिलांना सतत कौतुक करून, कोणतीही टीका न करता आपल्या जाळ्यात ओढू शकतात आणि त्यामुळे त्यांची फसवणूक होऊ शकते, असा इशाराही त्यांनी दिला.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

























