सोनिया गांधींनी पंतप्रधानपद का नाकारलं? राहुल गांधी का नाराज झालेले? पुस्तकात 2004 च्या सत्तानाट्याचा खुलासा

फोटो स्रोत, PRAKASH SINGH/AFP via Getty Images
"माझ्या मनातून अचानक शंकेचे शेवटचे अंशही दूर झाले. मी स्वतःला हे म्हणताना ऐकलं की 'सोनिया, स्वतःशी प्रामाणिक रहा. तुला हे नेहमीपासून माहीत होतं. फक्त ते सोडून दे.'" असं काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनी एक्सवरील एका पोस्टमध्ये त्यांच्या नव्या पुस्तक 'बिलॉन्गिंग: ए जर्नी ऑफ लव्ह' चा उल्लेख करत लिहिलं आहे.
त्यांनी त्यांच्या पुस्तकात त्या काळातील अनेक क्षणांची आठवण सांगितली आहे, त्याबद्दल बरीच चर्चा होत आहे.
खरं तर, 2004 मध्ये मनमोहन सिंह पंतप्रधान झाल्यानंतर देशाच्या राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल झाला होता.
त्या वेळी सोनिया गांधी काँग्रेसचं नेतृत्व करत होत्या आणि सोनिया गांधी देशाच्या पंतप्रधान होऊ शकतात, अशीही चर्चा सुरू होती.
त्या वेळी काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते त्यांना पंतप्रधान म्हणून पाहू इच्छित होते. दुसरीकडे, निवडणुकांनंतर सत्तेबाहेर गेलेली भाजप आणि त्यांचे अनेक नेते याचा विरोध करत होते.
"अंतरात्म्याच्या आवाजावर" हा निर्णय घेतला, असं सोनिया गांधी यांनी पंतप्रधानपद नाकारल्यानंतर त्यावेळीही सांगितलं होतं.
मात्र, मनमोहन सिंह पंतप्रधान झाल्यानंतरही यूपीएचं सरकार 10 जनपथ म्हणजेच सोनिया गांधी यांच्या निवासस्थानावरून चालत आहे, असा आरोप भाजप आणि त्यावेळच्या विरोधी पक्षातील अनेक नेते करत राहिले.
मनमोहन सिंह यांच्या नेतृत्वाखाली चालणाऱ्या यूपीए सरकारच्या काळात सोनिया गांधी यूपीएच्या अध्यक्षा होत्या.
त्या काळात सामाजिक आणि आर्थिक विकासाशी संबंधित कामं आणि धोरणांवर सल्ला देण्यासाठी राष्ट्रीय सल्लागार परिषदेची स्थापना करण्यात आली होती. त्याचं नेतृत्व सोनिया गांधी करत होत्या.
मात्र, सरकारच्या कामकाजात त्यांचा कोणताही हस्तक्षेप होता, ही बाब सोनिया गांधी यांनी स्पष्टपणे फेटाळून लावली आहे.
सोनिया गांधी यांनी त्यांच्या 'बिलॉन्गिंग: ए जर्नी ऑफ लव्ह' या पुस्तकात त्या काळातील सत्तेच्या अनेक समीकरणांवर भाष्य केलं आहे आणि त्यांना कधीही सरकारी फाइल दाखवण्यात आली नव्हती, असं म्हटलं आहे.
'फाइल मागवल्याचे आरोप खोटे'
सोनिया गांधी यांनी त्यांच्या आठवणींमध्ये म्हटलंय, युपीएच्या काळात सत्तेचं स्पष्ट विभाजन केलेलं होतं, त्यानुसार मनमोहन सिंह सरकार चालवत होते आणि सोनिया गांधी काँग्रेसचं नेतृत्व करत होत्या.
काँग्रेस पार्लमेंट्री पार्टीच्या (सीपीपी) अध्यक्षा सोनिया गांधी यांनी 'बिलॉन्गिंग: ए जर्नी ऑफ लव्ह' मधील त्यांच्या आठवणींमध्ये सांगितलंय की, युनायटेड प्रोग्रेसिव्ह अलायन्सच्या (युपीए) काळात त्यांना कधीही सरकारी फाइल दाखवण्यात आली नव्हती.
त्यांनी सांगितलं की, सरकार स्थापन करण्याबाबत त्यांनी आपले 'इनपुट' दिले होते, जेणेकरून अनेक वर्षांपासून पक्षाची सेवा करणाऱ्यांचा विचार केला जाऊ शकेल.
मात्र, पीएमओमधून फाइल मागवल्याचे जे आरोप करण्यात आले होते, ते "वाईट हेतूनं केलेले आणि पूर्णपणे खोटे" होते, असं त्यांचं म्हणणं आहे.

फोटो स्रोत, RAVEENDRAN/AFP via Getty Images
त्यांनी पुस्तकात हेही सांगितलं आहे की, त्यांनी आपली मुलं राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वाड्रा यांच्यासोबत 2004 च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या काही महिन्यांपूर्वीच ठरवलं होतं की त्या कधीही पंतप्रधान होणार नाहीत. मुलांनी सुरक्षेच्या कारणास्तव यावर भर दिला होता.
सोनिया गांधी यांनी लिहिलं, "निवडणुकीच्या काही महिन्यांपूर्वी मी आणि माझ्या मुलांनी माझ्या पंतप्रधान होण्याबद्दल चर्चा केली होती. त्यांपैकी एकानं मला थेट विचारलं की, जर आमचा पक्ष जिंकला तर मी हे पद स्वीकारेन का. मी म्हणाले 'अजिबात नाही.' मी जवळजवळ रागानंच असं म्हटलं होतं."
"त्यांनी यावर आणखी जोर दिला, 'तुम्हाला याची पक्की खात्री आहे का?' तेव्हा मी ठामपणे म्हटलं की 'मी पूर्णपणे स्पष्ट आहे. ना राहुलला आणि ना प्रियंकाला मला पंतप्रधान व्हावं असं वाटत होतं. त्यांनी त्यांच्या आजीची हत्या आणि त्यांच्या वडिलांची झालेली निर्दयी हत्या यांचा धक्का सहन केला होता. त्यांच्या मनात, त्या पदावर असणं हे प्रत्यक्षात वाढलेल्या धोक्याशी जोडलेलं होतं. त्यांना दिलासा वाटत होता आणि मलाही हलकं वाटत होतं, कारण या प्रश्नावर मी पहिल्यांदाच माझं मत स्पष्टपणे व्यक्त केलं होतं.'"
सोनिया गांधी यांनी लिहिलं आहे, "संपूर्ण निवडणुकीदरम्यान जेव्हा मला सार्वजनिकरीत्या हा प्रश्न विचारला जायचा की पंतप्रधान कोण होणार, तेव्हा मी कोणतंही ठाम उत्तर देत नसे. मला फक्त आतून माहीत होतं की, मागील काँग्रेस सरकारांचा वारसा पुढे नेणारी अशी व्यक्ती असावी, जिला सरकारमध्ये काम करण्याचा दीर्घ अनुभव आहे आणि जिच्या प्रामाणिकतेची निष्कलंक नोंद आहे."
2004 लोकसभा निवडणुकीचे निकाल आल्यानंतर काय झालं?
सोनिया गांधी यांनी जुलै 2003 मध्ये शिमलामध्ये झालेल्या काँग्रेसच्या एका तणावपूर्ण वातावरणात झालेल्या बैठकीबद्दलही लिहिलं आहे.
त्या वेळी इतर सहयोगी पक्षांसोबत आघाडी करण्याबाबत पक्षाच्या आत मतभेद होते. या काळात त्यांनी स्वतःला या चर्चेबाहेर असल्याचं अनुभवलं.
त्या लिहितात, "मी विचारलं की ते कशाबद्दल चर्चा करत आहेत. मग थोड्या संकोचानं मला उत्तर मिळालं की ते निवडणुकांमध्ये पक्षाचं नेतृत्व कोण करणार याबद्दल चर्चा करत होते."
तेव्हा आश्चर्यचकित झालेल्या सोनिया गांधी म्हणतात की त्यांना 'दुःख' झालं की त्यांच्या पक्षातील सहकाऱ्यांनी त्यांना बाहेरची व्यक्ती समजलं होतं आणि काँग्रेस अध्यक्षा म्हणून त्या निवडणूक प्रचाराचं नेतृत्व करतील, असा संदेश दिला.
मात्र, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने निवडणुकांमध्ये भाजपला मोठा धक्का दिला. 2004 च्या निवडणुकांमध्ये भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएच्या पराभवानं अनेकांना धक्का बसला होता. विशेषतः आपल्याला सत्तेबाहेर जावं लागेल, अशा निकालाची भाजपला अपेक्षा नव्हती.

फोटो स्रोत, PRAKASH SINGH/AFP via Getty Images
त्या वेळी एनडीए सरकारनं 'इंडिया शायनिंग' आणि 'फील गुड' या घोषणा केल्या होत्या. याच घोषणांच्या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुका नियोजित वेळेच्या सुमारे 6 महिने आधी घेण्यात आल्या होत्या आणि भाजपनं हा मोठा डाव खेळला होता.
तो डाव पूर्णपणे फसला, पण आता परीक्षा काँग्रेस आणि पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांची होती. एकीकडे भाजप सोनिया गांधी त्या मूळच्या परदेशी असल्याचा मुद्दा उपस्थित करत होती, तर दुसरीकडे सोनिया गांधी यांनी काँग्रेसचं नेतृत्व स्वीकारल्यानंतर पक्ष पहिल्यांदाच केंद्रातील सत्तेच्या जवळ पोहोचला होता.
2004 च्या लोकसभा निवडणुकीचे निकाल आल्यानंतरच्या परिस्थितीबद्दल सोनिया गांधी त्यांच्या पुस्तकात लिहितात, "आता मी संभ्रमात होते. माझ्या नकारामुळे दुःखी आणि निराश होणाऱ्या पक्ष कार्यकर्त्यांबद्दल, आणि आम्हाला मत देणाऱ्या लोकांबद्दलही. माझ्या भावना क्षणोक्षणी बदलत होत्या. एका क्षणी मी स्पष्ट होते, तर पुढच्याच क्षणी गोंधळले."
"आघाडीच्या नेत्यांसोबत एक बैठक ठरली होती. ते दुसऱ्या दिवशी दुपारी माझ्या घरी येणार होते. त्यांनी माझ्या सहयोगी नेत्यांना खात्री दिली होती की, ते मला पद स्वीकारण्यासाठी राजी करतील. दुसऱ्या दिवशी माझ्या घराच्या सर्वात मागच्या भागात असलेल्या राजीव यांच्या कॉन्फरन्स रूममध्ये आघाडीतील काही नेत्यांसोबत बैठक सुरू होती. ते मला त्यांच्या प्रस्तावाला सहमती देण्यासाठी सांगत होते. चर्चा संपताच मी धैर्य गोळा करून माझं मत मांडलं."
"त्यांच्यात खळबळ उडाली. ते उभे राहून माझ्याकडे आले. मीसुद्धा उभी राहिले. त्यांनी मला घेरलं. त्यापैकी एकानं म्हटलं, 'आम्ही हे मान्य करणार नाही.' दुसऱ्याने म्हटलं, 'मॅडम, तुम्ही हा निर्णय घेऊ शकत नाही.'"
"त्यांचा सूर तीव्र होता, जवळजवळ रागानं भरलेला. 'आम्ही हे मान्य करणार नाही.' मी हादरले. मला वाटलं की माझ्यावर कुणीतरी वर्चस्व गाजवत आहे. मी हळू आवाजात पुटपुटले, 'ठीक आहे.' जमलेले नेते माझं बोलणं पूर्ण होण्याची वाटही पाहत नव्हते आणि ते एकामागून एक मला शुभेच्छा देऊ लागलेले."
"'त्या तयार झाल्या आहेत, त्या तयार झाल्या आहेत,' कुणीतरी म्हणालं. मी फक्त तिथंच उभी राहिले, सुन्न. पुढं काहीच बोलू शकले नाही. नेते समाधानी होऊन निघून गेले."

फोटो स्रोत, SEBASTIAN D'SOUZA/AFP via Getty Images
सोनिया गांधी यांनी त्यांच्या पुस्तकात यानंतर राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या प्रतिक्रियेचाही उल्लेख केला आहे.
सोनिया गांधी लिहितात, "राहुल गर्जला, 'तू हो म्हणाली?' मी उत्तर दिलं, 'ते माझं ऐकणार नाहीत. मला हे करायचं नाही, तुला माहीत आहे की मला हे करायचं नाही. माझ्यावर दबाव टाकला जात होता.' त्यानं विचारलं, 'तुझ्यावर दबाव टाकला जात होता आणि आमचं काय?' तो रागानं निघून गेला."
सोनिया गांधी यांनी लिहिलं, "प्रियंका म्हणाली, 'बघ आई, तू याबाबत नेहमीच स्पष्ट राहिली आहेस. यामध्ये जबरदस्तीनं काही करू नको. तू जे ठरवलं आहे, तेच कर.' तिचे डोळे लाल झाले होते आणि मलाही रडू येत होतं."

फोटो स्रोत, RAVEENDRAN/AFP via Getty Images
सोनिया गांधी यांनी लिहिलं, "माझ्या मनात वारंवार ही गोष्ट येत होती की माझ्या कृतींचे दूरगामी परिणाम होतील, फक्त माझ्या पक्षासाठीच नाही, तर संपूर्ण भारतासाठी. आपल्याला मजबूत आणि सक्षम सरकारची गरज होती, जेणेकरून भारताला विभागणाऱ्या राजकारणापासून दूर ठेवता येईल. कोणत्याही गोष्टीपेक्षा जास्त, आपल्याला विकास आणि प्रगतीची गरज होती."
"मी राजकारणात आले कारण माझा विश्वास होता की, आरएसएस आणि त्याच्या अनेक कट्टर गटांनी चालवलेली भाजप जर सत्तेत आली, तर ती समुदायांमधील संघर्षाला प्रोत्साहन देईल आणि संविधान नष्ट करेल."
सोनिया गांधी लिहितात, "मला चांगलंच माहीत होतं की जर मी मान्य केलं, तर ते जो गदारोळ घालत आहेत आणि निवडणूक प्रचारादरम्यान जो प्रचार करत आहेत, तो कमी होणार नाही. भाजप आणि तिचे सहयोगी नक्कीच माझ्या 'मुळची परदेशी' असल्याचा मुद्दा उपस्थित करतील. ते भावना भडकवतील आणि अशी उलथापालथ घडवून आणतील, जी भूतकाळातील आणि भविष्यातील प्रत्येक चांगल्या गोष्टीवर पडदा टाकेल. मी पंतप्रधानपद स्वीकारण्यासाठी कशी तयार होऊ शकले असते? नाही, कधीच नाही."
प्रणब मुखर्जींबद्दल काय लिहिलं?
माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी आणि त्यांची मुलगी शर्मिष्ठा मुखर्जी यांनी यापूर्वीही असे संकेत दिले होते की गांधी कुटुंब त्यांना पंतप्रधान बनवण्याबाबत संकोच करत होतं, जरी ते यूपीए मंत्रिमंडळातील सर्वात वरिष्ठ मंत्री होते.

फोटो स्रोत, PRAKASH SINGH/AFP via Getty Images
सोनिया गांधी यांनी त्यांच्या पुस्तकात सांगितलं आहे की, 2010 मध्ये यूपीए पुन्हा सत्तेत आल्यानंतर एक वर्षाने मुखर्जी यांनी त्यांना पंतप्रधान बदलण्याचा सल्ला दिला होता.
त्यांनी पुस्तकात लिहिलं, "त्यांनी मला हा सल्ला देऊन आश्चर्यचकित केलं की, कदाचित आता सर्वोच्च पदावर बदल करण्याची वेळ आली आहे. मी याचा अर्थ पंतप्रधान बनण्याच्या त्यांच्या दीर्घकाळापासूनच्या इच्छेचा संकेत असा लावला. मी हळूच विषय बदलला. ते निराश झाले असतील, तरी त्यांच्या मनात माझ्याविषयी काही नाराजी होती, असं कधी त्यांनी जाणवू दिलं नाही."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

























