इस्लाम स्वीकारणाऱ्या महिलेला पतीने लग्नानंतर 5 दिवसांत दिला घटस्फोट; या महिलेसोबत नेमकं काय घडलं?

फोटो स्रोत, Jane
- Author, यूनुस मुल्ला आणि लॉरेन हर्स्ट
- Reporting from, नॉर्थ वेस्ट
- Published
- वाचन वेळ: 6 मिनिटे
इस्लाम धर्म स्वीकारल्यानंतर लग्न केलेल्या जेन (नाव बदललं आहे) यांना निकाहच्या अवघ्या पाच दिवसांनी एक मेसेज आला आणि ज्यामुळे त्यांचं संपूर्ण आयुष्यच बदलून गेलं.
त्यांच्या पतीने मेसेजमध्ये लिहिले होतं, "मी तुला तलाक देत आहे आणि तलाक दिला आहे."
जेन यांनी सांगितलं की, सुमारे 10 महिन्यांपूर्वी इस्लामिक विवाहासाठी असलेल्या 'मुझ' (Muzz) नामक इस्लामिक वेबसाइटवर त्यांची एका व्यक्तीशी ओळख झाली होती.
त्या व्यक्तीचे नाव ॲडम असून तो मँचेस्टरमध्ये राहतो, असे जेन यांना वाटत होते.
त्या म्हणाल्या, "माझ्यासाठी हे सगळं खूप कठीण आहे. मला वाटलं होतं की माझं लग्न होईल. पण त्याऐवजी माझ्या आयुष्यातील सर्वांत वाईट स्वप्न सुरू झालं."
"हे सगळं खूप विचित्र आहे. लैंगिक सुखासाठी लोक अशा प्रकारच्या गोष्टी का करतात, हेच मला कळत नाही."
जेनने सांगितलं की, प्रत्यक्ष भेटण्याचा निर्णय घेण्यापूर्वी दोघांनी सहा महिने ऑनलाइन चॅटिंग आणि व्हीडिओ कॉलद्वारे संवाद साधला होता.
बीबीसीशी बोलताना जेन म्हणाल्या, आमचं नातं खरे आणि प्रामाणिक आहे, असा मला विश्वास होता. त्यामुळे जेव्हा त्याने लग्नाची मागणी घातली तेव्हा तिला त्याच्या बोलण्यावर शंका आली नाही.
त्या म्हणतात, "त्याने मला विश्वास दिला की, तो माझ्यावर प्रेम करतो आणि त्याला त्याचं उर्वरित आयुष्य माझ्यासोबत घालवायचं आहे. त्यामुळे त्याचावर संशय घ्यायचं माझ्याकडे कोणतंही कारण नव्हतं."
मात्र, नंतर जेन यांना समजलं की ॲडमचं खरं नाव वेगळंच होतं आणि त्याचं आधीच लग्न झालं होतं.
दरम्यान, ॲडमच्या वकिलांनी जेन यांनी केलेले सर्व आरोप पूर्णपणे फेटाळून लावले आहेत.

दोन जून रोजी इस्लाम धर्म स्वीकारलेल्या जेन निकाह करण्यासाठी लँकेशायरमधील ब्रिअरफिल्ड येथे गेल्या होत्या. निकाह हा इस्लाममधील एक विवाहविधी आहे, जो इस्लामिक नियमांनुसार पार पाडला जातो.
मात्र, अशा प्रकारचा निकाह हा कायदेशीर विवाहापेक्षा वेगळा असून त्याला इंग्लंड आणि वेल्समध्ये कायदेशीर विवाहाचा दर्जा मिळालेला नाही.
जेन यांना आपल्या मूळ शहर ग्लासगोमध्ये मित्र आणि कुटुंबीयांच्या उपस्थितीत लग्न करायचं होतं. मात्र, त्यांच्या होणाऱ्या पतीने स्कॉटलंडमध्ये लग्न करण्यास आक्षेप घेतला होता.
आता जेन या गोष्टीकडे एक इशारा म्हणून पाहतात.
त्या सांगतात, "स्कॉटलंडमध्ये कायदेशीर विवाह आणि निकाह एकाच वेळी करण्याचा सल्ला देण्यात आला होता."
मात्र, त्यावर त्यांच्या पतीने आक्षेप घेतला. तो म्हणाला, 'त्यांना माझे ओळखपत्र पाहण्याची काय गरज आहे? निकाह ही अतिशय सोपी प्रक्रिया आहे आणि त्यासाठी माझे ओळखपत्र पाहण्याची अजिबात गरज नाही.'
"या गोष्टीमुळे तो खूप अस्वस्थ झाला होता."
जेन यांनी सांगितलं की, ब्रिअरफिल्डमध्ये दोन इमामांच्या उपस्थितीत निकाह पार पडला. दोन्ही इमामांनी विवाहातील साक्षीदाराची भूमिका पार पाडली. त्यानंतर पती-पत्नीने एका हॉटेलमध्ये दोन रात्री घालवल्या.
मात्र, लग्नाच्या अवघ्या पाच दिवसांनंतर जेन यांना एक मेसेज आला. त्यामध्ये त्यांचे नाते संपल्याचं त्यांना सांण्यात आलं.
हा प्रकार पाहून आपल्याला मोठा धक्का बसला आणि मी गोंधळून गेले होते, असं जेन यांनी सांगितलं. त्यांनी या निकाहला 'बनावट लग्न' म्हटलं आहे.

फोटो स्रोत, Jane
आपल्यासोबत घडलेला हा धक्कादायक प्रकार भावनिक आणि लैंगिक शोषणाच्या प्रकारात मोडतो, असे जेन यांचं म्हणणं आहे.
बीबीसीला मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित व्यक्ती कायदेशीर आणि धार्मिकरित्या अजूनही दुसऱ्या महिलेशी विवाहित आहे.
आपल्या वकिलांमार्फत दिलेल्या सविस्तर उत्तरात या व्यक्तीनं म्हटलं आहे की, हे आरोप त्याच्या विरोधात चालवल्या जात असलेल्या एका सुनियोजित मोहिमेचा भाग आहेत. या आरोपांचं खंडन करणारा कोणताही पुरावा आरोप करणाऱ्यांकडे नसून ते आरोप पूर्णपणे खोटे आहेत.
वकिलांनी बीबीसीला सांगितलं की, संबंधित व्यक्तीने जेन यांच्यापासून आपल्या आधीच्या लग्नाची माहिती लपवली नव्हती.
जेन यांच्यासोबत निकाह करताना सदर व्यक्तीने स्वतःचे ड्रायव्हिंग लायसन्स दाखवले होते. त्यामुळे, त्याने आपली ओळख लपवल्याची बाब खोटी असल्याचंही त्याच्या वकिलांनी म्हटलं.
निकाह लावणाऱ्या इमामांनी काय सांगितलं?
जेन यांना मशिदीकडून देण्यात आलेल्या इस्लामिक विवाह प्रमाणपत्राची एक प्रत बीबीसीने पाहिली आहे. या प्रमाणपत्रात अनेक महत्त्वाची माहिती नमूद केलेली नव्हती, तर काही माहिती चुकीची होती.
निकाह लावणारे इमाम मुफ्ती आदिल जमान म्हणाले की, हा विवाह दोन प्रौढ व्यक्तींनी परस्पर संमतीने केला होता आणि त्यावेळी दोघेही आनंदी दिसत होते. त्यामुळे अधिक चौकशी करणे ही आपली जबाबदारी आहे, असं त्यांना वाटलं नाही.
ते बीबीसीशी बोलताना म्हणाले, "जे काही घडलं त्यामुळे आम्हाला खूप दुःख झालं आहे."
ते पुढे म्हणाले, "सुरुवातीपासूनच सर्वांशी निष्पक्षपणे वागून त्यांना आवश्यक ती मदत करणे, हे आमचं उद्दिष्ट राहिलं आहे. शिवाय, ज्या गोष्टींची आम्हाला प्रत्यक्ष माहिती आहे, त्यापुरतंच आम्ही आमचं म्हणणं मांडलं आहे."
ओळख पडताळणी करताना काही चुका झाल्याचं त्यांनी मान्य केलं. मात्र, जेन यांनी ज्या व्यक्तीशी लग्न केलं, त्याची खरी ओळख शोधण्यात आपण मदत केली होती, असंही त्यांनी सांगितलं.
लँकेशायर कौन्सिल ऑफ मॉस्क्स या संस्थेनंही या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. लग्न मोडल्यानंतर दोन्ही बाजूंमध्ये समेट घडवून आणण्याच्या प्रयत्नांत ही संस्था सहभागी होती. निकाह लावणाऱ्या व्यक्तींनी आवश्यक ती पडताळणी करणं ही त्यांची जबाबदारी असल्याचं संस्थेनं म्हटलं आहे.

ग्रेटर मँचेस्टरमधील ओल्डहॅम येथे कार्यरत असलेला 'न्यू बिगिनिंग्ज' हा समूह इस्लाम धर्म स्वीकारणाऱ्या लोकांना विविध सेवा पुरवतो. मुस्लिम समाजातील काही लोक इतरांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करत असल्याची प्रकरणं समोर आल्याचं या समूहाने सांगितलं.
समूहाचे संस्थापक बिलाल ब्राउन म्हणाले, "आपल्या मुस्लिम समुदायात इतरांची फसवणूक करण्याच्या उद्देशाने फिरणारे काही लोक आहेत, याची आम्हाला माहिती आहे."
एखादे नाते किंवा लग्न अतिशय घाईघाईने ठरवले जात असेल किंवा त्यामध्ये कुटुंबातील इतर सदस्यांचा सहभाग नसेल, तर काहीतरी चुकीचे घडत असल्याचे हे स्पष्ट संकेत असू शकतात, असं त्यांनी सांगितलं.
अशा परिस्थितीत अशा परिस्थितीत इस्लाम धर्म स्वीकारणारे लोक फसवणुकीला विशेषतः बळी पडू शकतात, असंही त्यांनी नमूद केले.
लँकेशायरच्या माजी असिस्टंट पोलीस अँड क्राइम कमिश्नर सायमा अफजल यांनी बीबीसी नॉर्थ वेस्ट टुनाइटशी बोलताना सांगितलं की, इस्लामिक विवाहांना कायदेशीर मान्यता नसल्यामुळे काही महिलांसमोर अडचणी निर्माण होऊ शकतात.
त्या म्हणाल्या, "निकाहमधील या कायदेशीर त्रुटीबद्दल आपण अनेकदा ऐकतो. लोक म्हणतात की, एखाद्या व्यक्तीवर दोन लग्ने केल्याचा आरोप ठेवता येत नाही, कारण ब्रिटनमध्ये निकाहला कायदेशीर मान्यता नाही. मात्र, निकाहच्या कायदेशीर बाबी बाजूला ठेवल्या, तर या प्रकरणात संबंधित व्यक्तीचे वर्तन पाहणे महत्त्वाचे आहे. येथे एका महिलेला अंधारात ठेवणे, तिची फसवणूक करणे आणि तिला आपल्या जाळ्यात ओढणे, या गोष्टी घडल्या आहेत. हा फसवणुकीचाच प्रकार आहे."

2018 साली ब्रिटिश संसदेसमोर सादर करण्यात आलेल्या एका स्वतंत्र अहवालात असं आढळलं होतं की, मोठ्या संख्येने इस्लामिक विवाहांनंतर कायदेशीर विवाह केला जात नाही. त्यामुळे संबंधित व्यक्तींना कायदेशीर विवाहाद्वारे मिळणारे संरक्षण आणि हक्क मिळत नाहीत.
स्कॉटलंड पोलिसांनी सांगितलं की, या प्रकरणात स्कॉटलंडमध्ये कोणताही गुन्हेगारी प्रकार घडल्याचं निश्चित झालेलं नाही.
ग्रेटर मँचेस्टर पोलिसांनी जेन यांनी केलेल्या तक्रारीची चौकशी करण्यासाठी विनंती मिळाल्याचे स्पष्ट केले आहे.
दरम्यान, 'मुझ' या विवाहविषयक ॲपने संबंधित व्यक्तीला आपल्या प्लॅटफॉर्मवरून कायमस्वरूपी ब्लॉक केल्याचं सांगितलं आहे.
कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शहजाद युनूस म्हणाले, "आम्ही ॲप वापरणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ते विवाहित आहेत का, असा प्रश्न विचारतो. त्यांचे लग्न कायदेशीररित्या झाले आहे की इतर दुसऱ्या कोणत्या पद्धतीने, हेही विचारलं जातं."
"जर एखादी व्यक्ती विवाहित असेल, तर नोंदणी प्रक्रियेदरम्यानच आम्ही त्यांना ॲप वापरण्यापासून रोखतो."
कंपनीच्या नियमित पडताळणी प्रक्रियेअंतर्गत ईमेल, फोन नंबर, डिव्हाइस आणि सेल्फी तपासले जातात. मात्र, ओळखपत्राद्वारे पडताळणी करणे ऐच्छिक आहे, असं ते म्हणाले.
प्रोफाइलवर कोणत्या प्रकारची पडताळणी पूर्ण झाली आहे आणि कोणती बाकी आहे, याची माहिती दिली जाते.
जेन म्हणाल्या की, आपल्यासोबत घडलेल्या प्रकारातून इतर महिलांना अशाच प्रकारच्या परिस्थितीला सामोरे जाण्यापासून वाचवता यावे, अशी त्यांची इच्छा आहे.
"ही आपल्या समाजातली एक समस्या आहे. जर मी माझ्यासारख्या दुसऱ्या एखाद्या महिलेला अशा प्रकारच्या फसवणुकीपासून वाचवण्यासाठी मदत करून शकले, त तो माझ्यासाठी मोठा विजय असेल", असं त्या म्हणाल्या.
)बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

























