सिझेरियननंतरही पोट सुटलेलंच दिसतं? डॉक्टरांनी दूर केला मोठा गैरसमज

सिझेरियननंतरही पोट सुटलेलंच दिसतं? डॉक्टरांनी दूर केले मोठे गैरसमज

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक छायाचित्र
  • Published
  • वाचन वेळ: 8 मिनिटे

सिझेरियन (C-section) झाल्यानंतर अनेक महिलांना प्रसूतीनंतर काही महिने उलटून गेल्यानंतरही पोटाचा खालचा भाग पुढे आलेला किंवा फुगलेला दिसतो. त्यामुळे "सिझेरियनमुळेच पोट कायमच सुटतं" अशी समजूत अनेकांमध्ये आढळते.

सोशल मीडियावर 'सी-सेक्शन पाऊच' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या बदलाबद्दल अनेक चर्चा होत असल्या तरी त्यामागचं वास्तव थोडं वेगळं आहे. तज्ज्ञांच्या मते, हा बदल केवळ शस्त्रक्रियेमुळे होत नाही, तर गर्भधारणेदरम्यान शरीरात झालेल्या बदलांचाही त्यात मोठा वाटा असतो.

गर्भधारणेदरम्यान वाढत्या गर्भासाठी पोटाचे स्नायू, त्वचा आणि संयोजी ऊती मोठ्या प्रमाणात ताणल्या जातात. प्रसूतीनंतर हे सर्व भाग पूर्ववत होण्यासाठी शरीराला बराच काळ लागतो. काही महिलांमध्ये स्नायूंची ताकद कमी होणं, पोटाच्या स्नायूंमध्ये फट निर्माण होणं, त्वचा सैल होणं किंवा वजन वाढणं यामुळे पोट अधिक उठून दिसू शकते.

त्यामुळे प्रसूतीनंतर पोटाचा आकार पूर्वीसारखा लगेच न दिसणं हा अनेकदा शरीराच्या नैसर्गिक प्रक्रियेचा भाग असतो. मग सिझेरियननंतर पोट पुढे राहण्यामागची नेमकी कारणं कोणती आणि कोणती लक्षणं दुर्लक्ष करू नयेत, हे जाणून घेऊया.

'सी-सेक्शन पाऊच' का दिसतो? कोणत्या गोष्टी कारणीभूत असतात?

प्रसूतीनंतर दिसणाऱ्या पोटाच्या फुगवट्यामागे अनेक कारणं असू शकतात. गर्भधारणेदरम्यान पोटाचे स्नायू आणि संयोजी ऊतींवर (कनेक्टिंग टिश्यूज) येणाऱ्या ताणामुळे काही महिलांमध्ये पोटाच्या सरळ स्नायूंमध्ये अंतर निर्माण होतं.

या स्थितीला डायस्टॅसिस रेक्टी असं म्हटलं जातं. याशिवाय वाढलेलं वजन, त्वचेचा सैलपणा, हार्मोन्समधील बदल, द्रव साचणे आणि प्रसूतीनंतरच्या काळात कमी झालेली शारीरिक हालचाल यांचाही परिणाम पोटाच्या आकारावर होऊ शकतो.

सिझेरियननंतर जखम भरून येताना तयार होणाऱ्या ऊतींमुळे खालच्या पोटाजवळ एक छोटाशी घडी किंवा उठाव दिसू शकतो. त्यामुळे अनेकदा महिलांना शस्त्रक्रियेमुळेच पोट बाहेर आलं असं वाटतं. मात्र बहुतांश वेळा हा बदल शरीराच्या बरं होण्याच्या प्रक्रियेचा भाग असतो.

प्रसूतीनंतरची पोटाच्या स्नायूंची पुनर्बांधणी ही काही आठवड्यांत पूर्ण होत नाही; स्नायू, त्वचा आणि ऊतींना पूर्वस्थितीत येण्यासाठी अनेक महिने लागू शकतात.

त्यामुळे संयम ठेवणं, संतुलित आहार घेणं आणि तज्ज्ञांच्या सल्ल्याने व्यायाम करणं महत्त्वाचं ठरतं. मात्र वेदना, असामान्य वाटणारी सूज, ताप किंवा गाठ दिसत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.

सुटलेलं पोट

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक छायाचित्र

सिझेरियनमुळे पोटाचा भाग असा पुढे आलेला दिसतो काय? याबद्दल आम्ही डॉ. नेहा अभिजीत पवार यांच्याकडून माहिती घेतली. त्या मुंबईतल्या कोकिलाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयात गायनॅकॉलॉजी कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहेत.

त्या म्हणाल्या, "तथाकथित 'सी-सेक्शन पाऊच' दिसण्यामागचं मुख्य कारण म्हणजे गर्भधारणेदरम्यान शरीरात होणारे बदल हे आहे. गर्भधारणेच्या काळात पोटाची भिंत (abdominal wall) लक्षणीय प्रमाणात ताणली जाते आणि पोटाचे स्नायू एकमेकांपासून दूर जाऊ शकतात. सिझेरियनसाठी दिलेला छेद आणि त्यानंतर तयार होणारा व्रण (scar) ऊती भरून येताना एक छोटासा फोल्ड निर्माण करू शकतो, ज्यामुळे खालचा पोटाचा भाग अधिक उठून दिसू शकतो."

त्या पुढे सांगतात, "मात्र, यामागे केवळ शस्त्रक्रिया कारणीभूत नसते. शरीराची ठेवण, त्वचेची लवचिकता, व्रण भरून येण्याची प्रक्रिया आणि स्नायूंची ताकद या सर्व घटकांचा मिळून अंतिम स्वरूपावर परिणाम होतो. त्यामुळे पोटाचा आकार किंवा दिसणारा फुगवटा हा केवळ सिझेरियनमुळेच ठरतो असं म्हणणं योग्य नाही."

सिझेरियननंतर पोट पुढे राहण्यामागची प्रमुख कारणं कोणती?

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक छायाचित्र

सिझेरियननंतर पोट पुढे राहण्यामागची प्रमुख कारणं कोणती?

  • पोटाच्या भिंतीवर (Abdominal Wall) आलेला ताण
  • कोअर (पोट व कंबरेभोवतालचे) स्नायू कमकुवत होणं
  • पोटाच्या सरळ स्नायूंमध्ये फट पडणे (डायस्टॅसिस रेक्टी)
  • शरीरात अतिरिक्त चरबी साठणं
  • त्वचा सैल होणं
  • शरीरात पाणी साठणं आणि हार्मोन्समधील बदल
  • प्रसूतीनंतरच्या पुन्हा पूर्वीच्या अवस्थेत येण्याच्या काळात शारीरिक हालचाल कमी होणं

बहुतेक प्रकरणांमध्ये पोट पुढे दिसणं हे शस्त्रक्रियेतील काही समस्या असल्याचं लक्षण नसतं. उलट, हा शरीराच्या नैसर्गिक बरे होण्याच्या आणि प्रसूतीनंतरच्या क्षती भरून काढण्याच्या प्रक्रियेचा एक भाग असतो.

सिझेरियननंतर पोटाला पूर्णपणे पूर्ववत होण्यासाठी किती वेळ लागतो?

याबद्दल सांगताना डॉ. नेहा पवार म्हणाल्या, "सिझेरियन (सी-सेक्शन) शस्त्रक्रियेनंतर सुरुवातीची जखम भरून येण्यासाठी साधारणपणे 6 ते 8 आठवडे लागतात. मात्र पोटाच्या भिंतीची संपूर्ण पुनर्बांधणी (रिकव्हरी) होण्यासाठी 6 महिने ते एक वर्ष किंवा त्याहून अधिक कालावधी लागू शकतो. स्नायूंची ताकद परत येणे, संयोजी ऊतींची (connective tissue) दुरुस्ती होणे आणि त्वचा पुन्हा घट्ट होणे ही प्रक्रिया हळूहळू घडते. आहार, शारीरिक हालचाल, स्तनपान, एकूण आरोग्य आणि किती वेळा गर्भधारणा झाली आहे यांसारख्या घटकांवर रिकव्हरी अवलंबून असते. महिलांनी शरीराला पुरेसा वेळ द्यावा आणि स्वतःच्या रिकव्हरीची इतरांशी तुलना करू नये."

सिझेरियननंतर पोटाला पूर्णपणे पूर्ववत होण्यासाठी किती वेळ लागतो?

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक छायाचित्र

डायस्टॅसिस रेक्टी म्हणजे काय?

डायस्टॅसिस रेक्टी (Diastasis Recti) ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये गर्भधारणेदरम्यान संयोजी ऊती (connective tissue) ताणल्या गेल्यामुळे पोटाचे दोन सरळ स्नायू (rectus abdominis muscles) एकमेकांपासून दूर जातात. ही प्रसूतीनंतर आढळणारी एक सामान्य समस्या आहे आणि ती नैसर्गिक प्रसूती तसेच सिझेरियन या दोन्ही प्रकारच्या प्रसूतीनंतर होऊ शकते. कारण यामागे प्रसूतीची पद्धत नव्हे, तर गर्भधारणा हेच मुख्य कारण असतं.

डॉ. नेहा पवार सांगतात, "या स्थितीत महिलांना पोट फुगल्यासारखं दिसणं, कोअर स्नायूंची ताकद कमी होणं किंवा पाठीत अस्वस्थता जाणवणं अशी लक्षणं दिसू शकतात. अनेक प्रकरणांमध्ये ही समस्या प्रसूतीनंतरच्या पहिल्या वर्षात नैसर्गिकरित्या सुधारते. मात्र स्नायूंमधील अंतर दीर्घकाळ टिकून राहिल्यास तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली फिजिओथेरपी आणि कोअर स्नायू बळकट करण्यासाठी केलेले विशिष्ट व्यायाम फायदेशीर ठरू शकतात."

पोटाची सामान्य स्थिती आणि डायस्टॅसिस रेक्टीमध्ये झालेला बदल

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, पोटाची सामान्य स्थिती आणि डायस्टॅसिस रेक्टीमध्ये झालेला बदल

या डायस्टॅसिस रेक्टीची तपासणी घरीच करता येते का किंवा त्याचं निरीक्षण करता येतं असा प्रश्न आम्ही तज्ज्ञांना विचारला. मुंबई सेंट्रल इथल्या वोकहार्ट हॉस्पिटल्समध्ये प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. रिचा भारद्वाज यांनी त्याची माहिती दिली.

डॉ. रिचा म्हणाल्या, "महिला याची घरी साधी स्वतः तपासणी करू शकतात, मात्र ती तज्ज्ञांच्या तपासणीचा पर्याय ठरू शकत नाही. स्त्रीरोगतज्ज्ञ किंवा महिलांच्या आरोग्यात विशेष प्राविण्य असणारे फिजिओथेरपिस्ट स्नायूंमधील फट किती आहे, कोअर स्नायूंची कार्यक्षमता कशी आहे याचे अचूक मूल्यमापन करून योग्य पुनर्वसन कार्यक्रम सुचवू शकतात. विशेषतः पोटाचा फुगलेला आकार दीर्घकाळ कायम असेल, वेदना होत असतील किंवा दैनंदिन कामांवर परिणाम होत असेल, तर तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे."

सी-सेक्शन शस्त्रक्रियेनंतर व्यायामाला सुरुवात कधी करता येते?

सी-सेक्शननंतरच्या सर्व स्थिती पूर्ववत होण्यासाठी कोणते व्यायाम सर्वाधिक उपयुक्त आहेत आणि सुरुवातीला कोणते व्यायाम टाळावेत? हा प्रश्न नेहमी विचारला जातो.

डॉ. रिचा भारद्वाज सांगतात, "सुरुवातीच्या काळात हलके श्वसनाचे व्यायाम, पेल्विक फ्लोअर व्यायाम, डीप कोअर ॲक्टिव्हेशन आणि हळूहळू चालणे हे सर्वाधिक उपयुक्त ठरतात. यामुळे भरून येणाऱ्या ऊतींवर अतिरिक्त ताण न देता स्नायूंचे कार्य पुन्हा सुधारण्यास मदत होते. सुरुवातीच्या काळात जोरदार धावणे, जड वजन उचलणे, तीव्र पोटाचे व्यायाम, सिट-अप्स, क्रंचेस आणि प्लँक्स टाळावेत. विशेषतः डायस्टॅसिस रेक्टी असल्यास हे व्यायाम पोटाच्या भिंतीवर दाब वाढवून भरून येण्याची प्रक्रिया मंदावू शकतात."

सिझेरियननंतर व्यायामाला सुरुवात करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, सिझेरियननंतर व्यायामाला सुरुवात करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.

या व्यायामात कोणता प्रकार जास्त फायदेशीर ठरतो याबद्दल पनवेल येथील बॅलेन्सिया फिजिओथेरपी सेंटर येथील डॉ. प्रियंका धारगळकर सांगतात, "सुरुवातीच्या रिकव्हरीच्या काळात डायाफ्रामॅटिक ब्रीदिंग (पोटातून श्वास घेण्याचे व्यायाम), पेल्विक फ्लोअर स्नायू सक्रिय करणं, कोअर स्नायूंना सौम्यपणे बळकट करणारे व्यायाम आणि चालणं यांवर भर द्यावा. त्यानंतर हळूहळू दैनंदिन हालचालींसाठी उपयुक्त ताकद वाढवणारे व्यायाम आणि पिलाटेसकडे प्रगती करता येते."

त्या पुढं सांगतात, "मात्र सुरुवातीच्या काळात पोटाच्या भिंतीवर जास्त ताण येईल असे व्यायाम टाळावेत. यामध्ये पारंपरिक सिट-अप्स, क्रंचेस, अतितीव्र प्लँक्स, जड वजन उचलणे किंवा उच्च-प्रभाव (high-impact) असलेले व्यायाम यांचा समावेश होतो. योग्य प्रमाणात जखम भरून येईपर्यंत आणि कोअर स्नायूंवर चांगलं नियंत्रण येईपर्यंत असे व्यायाम टाळणं आवश्यक असतं."

या काळात पेल्व्हिक फ्लोअरचे व्यायाम करावेत का?

पेल्व्हिक फ्लोअरच्या व्यायामांबद्दल डॉ. प्रियंका धारगळकर म्हणाल्या, "पेल्व्हिक फ्लोअरचे स्नायू, पोटातील खोलवरचे स्नायू (deep abdominal muscles), डायाफ्राम आणि पाठीचे स्नायू हे एकत्रितपणे एका कार्यक्षम युनिटप्रमाणे काम करतात. पेल्व्हिक फ्लोअरची ताकद आणि स्नायूंमधील समन्वय सुधारल्यास कोअरला पूर्वीचं स्थैर्य पुन्हा मिळण्यास मदत होते. त्यामुळे पोटाच्या कार्यक्षमतेत सुधारणा होते, शरीराची ठेवण (posture) चांगली राहते आणि एकूणच प्रसूतीनंतरच्या रिकव्हरीला मदत मिळते."

"मात्र, पुनर्वसनाचा (rehabilitation) भर केवळ पोटाचा आकार किंवा दिसणं सुधारण्यावर नसून शरीराच्या कार्यक्षमतेत सुधारणा करण्यावर असायला हवा."

पेल्व्हिक फ्लोअरचे व्यायाम

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, पेल्व्हिक फ्लोअरचे व्यायाम

सी-सेक्शन शस्त्रक्रियेच्या जखमेच्या व्रणामुळे हालचालीत अडथळा येतो का? पट्टा लावून उपयोग होतो?

सिझेरियन झाल्यावर बहुतांश महिला आपण तात्काळ पूर्वीसारख्या दिसलो पाहिजे अशी अपेक्षा ठेवतात. त्यांना लवकरात लवकर पुन्हा आहे तसं व्हायचं असतं. पण त्यासाठी वेळ देणं फार गरजेचं आहे.

अनेक महिला खूप लवकर तीव्र व्यायाम सुरू करतात, पोटाचे व्यायाम चुकीच्या पद्धतीनं करतात, स्तनपान सुरू असताना अतिशय कडक डाएट करतात किंवा सोशल मीडियावरील इतर महिलांशी स्वतःची तुलना करतात.

काहीजणी फक्त पोटाचे बेल्ट वापरण्यावर भर देतात, पण कोअर स्नायू बळकट करण्याकडे दुर्लक्ष करतात. गर्भधारणा आणि शस्त्रक्रियेनंतरची पुनर्प्राप्ती ही संयम, संतुलित आहार, टप्प्याटप्प्याने वाढणारी शारीरिक हालचाल आणि पुरेशी विश्रांती यांवर अवलंबून असते.

सिझेरियन शस्त्रक्रिया करताना जिथं छेद दिलेला असतो तिथली जागा भरून येणं आवश्यक असतं.

शस्त्रक्रीयेच्या जखमेचा व्रण

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, शस्त्रक्रीयेच्या जखमेचा व्रण

डॉ. रिचा भारद्वाज सांगतात, "सी-सेक्शनची जखम भरून येताना व्रणयुक्त ऊती (Scar Tissue) नैसर्गिकरित्या तयार होतात. काही महिलांमध्ये या ऊती घट्ट होऊन हालचालींवर मर्यादा आणू शकतात किंवा काही हालचाली करताना ताण किंवा अस्वस्थता जाणवू शकते. जखम पूर्णपणे भरून आल्यानंतर आणि डॉक्टरांनी परवानगी दिल्यानंतर प्रशिक्षित फिजिओथेरपिस्टकडून करण्यात येणाऱ्या स्कार मोबिलायझेशन तंत्रामुळे ऊतींची लवचिकता सुधारण्यास, अस्वस्थता कमी करण्यास आणि हालचाल अधिक सहज होण्यास मदत मिळू शकते. जखम पूर्णपणे भरून येण्यापूर्वी तिची मालिश किंवा छेडछाड करू नये."

अनेक महिला या शस्त्रक्रियेनंतर पोटाला पट्टा लावतात पण त्यामुळे पोटावरील चरबी कमी होते का, त्याची खरंच किती मदत होते हे त्यांना माहिती नसतं.

सी-सेक्शन शस्त्रक्रीया प्रातिनिधिक छायाचित्र

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक छायाचित्र

डॉ. भारद्वाज सांगतात, "प्रसूतीनंतर वापरले जाणारे ॲब्डॉमिनल बाइंडर किंवा बेल्ट, विशेषतः सी-सेक्शननंतरच्या पहिल्या काही आठवड्यांत, तात्पुरता आधार देऊन अधिक आरामदायी वाटण्यास मदत करू शकतात. चालणे, खोकणे किंवा दैनंदिन कामे करताना महिलांना अधिक आधार मिळाल्याची भावना निर्माण होते. मात्र, हे बेल्ट पोटाचे वेगळे झालेले स्नायू पुन्हा जोडत नाहीत किंवा कायमस्वरूपी पोटावरील चरबी कमी करत नाहीत. त्यांचा वापर केवळ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, योग्य पद्धतीने करावा आणि त्यासोबत नियमित व्यायाम व पुनर्वसन कार्यक्रमही आवश्यक आहे. दीर्घकालीन उपाय म्हणून केवळ बेल्टवर अवलंबून राहू नये."

सिझेरियनबाबतचे सामान्य गैरसमज त्यांची उत्तरं

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

प्रश्न – सिझेरियननंतरच्या पोटाबाबत कोणते सामान्य गैरसमज दूर केले पाहिजेत?

डॉ. नेहा पवार – एक सामान्य गैरसमज म्हणजे सिझेरियनमुळे कायमचं मोठं पोट राहतं. प्रत्यक्षात, गर्भधारणेदरम्यान शरीरात झालेल्या बदलांचा त्यात अधिक वाटा असतो.

काही लोकांना असेही वाटते की प्रसूतीनंतर लगेच जोरदार व्यायाम सुरू केल्यास लवकर रिकव्हरी होते. पण खूप लवकर व्यायाम सुरू केल्याने उलट भरून येण्याची प्रक्रिया मंदावू शकते. सुरक्षित आणि टप्प्याटप्प्याने केलेले पुनर्वसन (rehabilitation) हा अधिक आरोग्यदायी मार्ग आहे.

प्रश्न – हर्निया, तीव्र वेदना किंवा असामान्य सूज यांसारख्या कोणत्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये?

डॉ. नेहा पवार – सतत राहणारी किंवा वाढत जाणारी वेदना, जखमेभोवती वाढणारा लालसरपणा, ताप, दुर्गंधीयुक्त स्त्राव, लक्षणीय सूज किंवा जखमेतून रक्तस्त्राव होत असल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. खोकल्याने किंवा जोर लावल्यावर अधिक स्पष्ट दिसणारा फुगवटा (bulge) हर्नियाचे लक्षण असू शकते.

महिलांनी तीव्र पोटदुखी, सततचा बधिरपणा (numbness) किंवा वेदनेसह येणारी सूज याकडेही दुर्लक्ष करू नये. लवकर तपासणी केल्याने गुंतागुंत ओळखता येते, वेळेवर उपचार करता येतात आणि अधिक गंभीर समस्या टाळता येतात.

प्रश्न – वजन, संप्रेरके (हॉर्मोन्स), स्तनपान आणि वय यांचा पोटाच्या रिकव्हरीमध्ये काय वाटा असतो?

डॉ. नेहा पवार – प्रसूतीनंतरच्या रिकव्हरीवर अनेक घटक परिणाम करतात. अतिरिक्त वजन असल्यास जखम भरून येण्यास अधिक वेळ लागू शकतो, तर संप्रेरकांतील बदल संयोजी ऊतींच्या दुरुस्तीवर परिणाम करू शकतात. स्तनपानामुळे काही महिलांमध्ये वजन हळूहळू कमी होण्यास मदत होऊ शकते, पण याचे परिणाम प्रत्येकामध्ये वेगवेगळे असतात.

वाढत्या वयानुसार त्वचेची लवचिकता कमी होऊ शकते आणि स्नायू पूर्ववत होण्याची प्रक्रिया अधिक मंदावू शकते, त्यामुळे पोटातील बदल अधिक ठळकपणे दिसू शकतात. अनुवंशिकता, आहार, झोप, शारीरिक हालचाल आणि आधीच्या गर्भधारणा हे घटकही महत्त्वाची भूमिका बजावतात. प्रत्येक महिलेची रिकव्हरी वेगळी असते आणि आदर्श परिणामांची अपेक्षा करणे वास्तववादी किंवा वैद्यकीयदृष्ट्या योग्य नाही.

बाळ आणि आई

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक छायाचित्र

जीवनशैलीमध्ये कोणताही महत्त्वाचा बदल करायचा असेल, आहारात बदल करायचा असेल, औषधे घ्यायची असतील तर तसेच शारीरिक व्यायामाची सुरुवात करायची असेल तर डॉक्टरांचा आणि योग्य प्रशिक्षकांची मदत घेणं आवश्यक आहे.

आपल्या शरीराची तसेच लक्षणांची योग्य तपासणी डॉक्टरांकडून करुन घेऊन त्यांच्या सल्ल्यानेच जीवनशैलीत बदल करणं योग्य आहे. डॉक्टरांना न दाखवता स्वतःच उपचार करणे धोकादायक ठरू शकते.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)