13 वर्षं, 763 डुबक्या आणि एकच आशा... त्सुनामीत हरवलेल्या पत्नीला पुन्हा भेटण्याची

त्सुनामीच्या बळींचा शोध घेणाऱ्या पाणबुड्यांना पाहिल्यानंतर, वयाच्या पन्नाशीत यासुओ ताकामात्सू यांनी पाणबुडीचे (डायव्हिंगचे) प्रशिक्षण घेतले.
फोटो कॅप्शन, त्सुनामीच्या बळींचा शोध घेणाऱ्या पाणबुड्यांना पाहिल्यानंतर, वयाच्या पन्नाशीत यासुओ ताकामात्सू यांनी पाणबुडीचे (डायव्हिंगचे) प्रशिक्षण घेतले.
    • Author, बेक्का जॉन्स
    • Role, ग्लोबल जर्नालिझम
  • Published
  • वाचन वेळ: 5 मिनिटे

यासुओ ताकामात्सू यांचा आता हा नित्यक्रमच झालेला आहे. ते दर महिन्याला दोनदा, जपानच्या ईशान्येकडील मियागी प्रांतातील ओनागावा बंदरातून एका छोट्या मासेमारी बोटीवर स्वार होतात आणि समुद्रात काही किलोमीटर आत जातात.

गेल्या 13 वर्षांहून अधिक काळापासून ते हाच नित्यक्रम पाळत आलेले आहेत. आपला फेस मास्क, एअर टँक आणि वेट बेल्ट परिधान करणं आणि खोल समुद्रात जाणं, ही गोष्ट आता त्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनली आहे.

बोट किनाऱ्यापासून पुरेशी दूर गेल्यावर, ते खाली असलेल्या थंड पाण्यात सूर मारतात.

प्रत्येक वेळी पाण्यात सूर मारताना, ते एकप्रकारे पुन्हा त्याच महासागराकडे वळत असतात, ज्या महासागरानं त्यांच्या अत्यंत प्रिय व्यक्तीला त्यांच्यापासून हिरावून घेतलं होतं.

यासुओ ताकामात्सू यांच्या पत्नी युको आता हयात नाहीत.

त्सुनामी

2011 मध्ये जपानच्या ईशान्य किनारपट्टीवर त्सुनामी धडकली होती. या त्सुनामीनं वाटेत येईल ते सगळं काही उद्ध्वस्त करत पुढे वाटचाल केली होती.

त्यावेळी युको ज्या बँकेत काम करत होत्या, ती बँकदेखील याच महाकाय त्सुनामीच्या भक्ष्यस्थानी पडली होती. युकोदेखील बँकेच्या छतावर असताना याच पाण्यासोबत वाहून गेल्या.

त्सुनामीची ती प्रचंड लाट किनाऱ्यापासून जवळपास 10 किलोमीटर आतपर्यंत घुसलेली होती. यावरून तिच्या भव्यतेचा अंदाज येऊ शकतो.

त्या दिवशी सकाळी यासुओ यांनीच युको यांना कामाच्या ठिकाणी सोडलेलं होतं.

गाडीतील त्या छोट्याशा प्रवासादरम्यान, रात्रीच्या जेवणात काय खायचं, याबद्दल त्यांनी चर्चा केली होती.

त्सुनामीचा इशारा देणारे सायरन वाजायला सुरुवात झाल्यावर, युको आणि त्याच्या 12 सहकाऱ्यांनी इमारतीचं छत गाठलं.

जपानच्या ईशान्य किनारपट्टीजवळ झालेल्या 9.0 ते 9.1 तीव्रतेच्या पाण्याखालील प्रचंड भूकंपामुळे ही त्सुनामी आली.
फोटो कॅप्शन, जपानच्या ईशान्य किनारपट्टीजवळ झालेल्या 9.0 ते 9.1 तीव्रतेच्या पाण्याखालील प्रचंड भूकंपामुळे ही त्सुनामी आली.

तिथून त्यांनी आपल्या पतीला एक टेक्स्ट मेसेज पाठवला, "तू सुरक्षित आहेस ना? मला घरी जायचं आहे."

तो टेक्स्ट मेसेज पाहिल्यावर यासुओ यांना वाटलं की त्यांची पत्नी सुरक्षित आहे.

पण दुसऱ्या दिवशी, जेव्हा ते महानगरपालिकेच्या रुग्णालयात, जिथं वाचलेले लोक आश्रय घेत होते तिथं गेले, तेव्हा त्यांना त्यांची पत्नी कुठेच आढळली नाही.

"मला सांगण्यात आलं की त्सुनामी तिला वाहून घेऊन गेली होती," ते सांगतात.

"त्यानंतर मी उभाही राहू शकलो नाही. जणू काही माझीच सगळी ताकद वाहून गेली होती."

यासूओ, युको आणि त्यांची मुलं एका फॅमिली फोटोमध्ये. दोन्ही मुले शाळेत होती आणि त्या आपत्तीतून वाचली.
फोटो कॅप्शन, यासूओ, युको आणि त्यांची मुलं एका फॅमिली फोटोमध्ये. दोन्ही मुले शाळेत होती आणि त्या आपत्तीतून वाचली.

त्यानंतरच्या काही दिवसांत आणि आठवड्यांमध्ये जसजसं पाणी ओसरू लागलं, तसतसं जपानच्या किनारपट्टीवर हजारो मृतदेह सापडू लागले.

पण युको यांच्यासारखे अनेक बळी बेपत्ताच राहिले.

यासुओ तब्बल दोन वर्षे जपानी कोस्ट गार्डच्या पाणबुड्यांना मृतदेह शोधताना आणि लोकांच्या वस्तू व आठवणींच्या खुणा पाण्याबाहेर काढताना पाहत राहिले.

त्यानंतर त्यांनी एक निर्णय घेतला.

"मी पाणबुडीचं प्रशिक्षण घेतलं. मला वाटलं की, जोपर्यंत मी डायव्हिंग करत राहीन, तोपर्यंत कदाचित कधीतरी मी तिला भेटूच शकेन," ते म्हणतात.

यासुओ यांनी डायव्हिंग सुरूच ठेवलं. वयाच्या पन्नाशीच्या उत्तरार्धापासून ते साठीच्या दशकापर्यंत त्यांनी 760 हून अधिक वेळा डायव्हिंग केलं आहे.

2014 मधील आपल्या सुरुवातीच्या एका डायव्हदरम्यान यासुओ ताकामात्सू.
फोटो कॅप्शन, 2014 मधील आपल्या सुरुवातीच्या एका डायव्हदरम्यान यासुओ ताकामात्सू.

'ती कदाचित आसपासच कुठेतरी आहे'

जपानमध्ये मृत व्यक्तींचं अस्तित्व दैनंदिन विधींमधून मान्य केलं जातं आणि मृत्यूनंतरही त्या आपल्या आयुष्याचाच भाग असतात, अशी श्रद्धा आहे.

'कुयो' (Kuyō) या बौद्ध परंपरेत, दिवंगत प्रियजनांना शांती आणि कल्याण लाभावं, यासाठी समाधी किंवा वेदीसमोर प्रार्थना करणं आणि नैवेद्य अर्पण करणं यांसारख्या विधींचा समावेश असतो.

मात्र, युको यांचं पार्थिव कधीच सापडलं नसल्यामुळे, यासुओ यांना अशा प्रकारे विधी करण्यासाठी त्यांच्या समाधीस्थळाला भेट देता आलेली नाही.

त्याऐवजी, सुरुवातीला केवळ शोध घेण्याच्या उद्देशानं सुरू झालेली ही कृतीच आता त्यांच्यासाठी एक विधी बनलेली आहे. ही विधी युको यांच्या आठवणींशी आणि त्यांच्याशी असलेल्या नात्याशी जोडणारी एक महत्त्वाची प्रक्रिया ठरली आहे.

"वारंवार समुद्रात डुबकी मारताना मला असं वाटू लागलं की ती कदाचित आसपासच कुठेतरी आहे," यासुओ सांगतात.

2014 मध्ये डायव्हिंग करताना यासुओ
फोटो कॅप्शन, 2014 मध्ये डायव्हिंग करताना यासुओ
Skip podcast promotion and continue reading
BBC News मराठी आत्ताच फॉलो करा WhatsApp कर
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

"हे समाधीस्थळाला भेट देण्यापेक्षा थोडं वेगळं आहे. कारण, ती तिथं समाधीमध्ये नाहीये. हे एखाद्या भेटीसाठी तिच्याकडे जाण्यासारखंच मला वाटतं."

यासुओ यांच्या या श्रद्धेची आपत्तीमुळे कसोटी लागली आहे.

समुद्राच्या तळाशी असताना, जेव्हा त्यांना अनेक वर्षांच्या नैसर्गिक आपत्तींमुळे झालेला विध्वंस दिसतो, तेव्हा त्यांना दुःख होतं.

"त्या ढिगाऱ्याकडे पाहताना मला वाटतं, 'या सगळ्यातून ती नक्कीच परत वर येऊ शकली नसेल.' आणि जेव्हा असा विचार मनात येतो, तेव्हा मला रडू येईल असं वाटतं."

तरीही, यासुओ समुद्राबद्दल द्वेष करत नाही. काळाच्या ओघात त्यांनी हे स्वीकारलं आहे की नैसर्गिक आपत्ती या अपरिहार्य असतात आणि त्या मानवाच्या नियंत्रणाबाहेर असतात.

"माझ्या मनात त्याबद्दल काही द्वेष वगैरे नाही. त्या वेळी तिथं त्सुनामी आली होती आणि समुद्र खवळलेला होता. पण दुसरीकडे पाहिलं तर, समुद्रातूनच अनेक प्रकारचे चविष्ट मासे व इतर गोष्टी मिळवता येतात. शिवाय, तिथलं दृश्यही अतिशय सुंदर असतं."

वारंवार नैसर्गिक आपत्तींचा सामना करणाऱ्या लोकांची जी वृत्ती असते, तिचंच प्रतिबिंब यासुओ यांच्या वागण्यातून दिसून येतं.

2026 मध्ये डायव्ह करण्यापूर्वीचे यासुओ
फोटो कॅप्शन, 2026 मध्ये डायव्ह करण्यापूर्वीचे यासुओ

तोहोकू भागातील पॅसिफिक किनारपट्टीवर, म्हणजेच जिथं यासुको राहतात, तिथं त्सुनामी आणि भूकंप होणं ही काही दुर्मिळ गोष्ट नाहीये.

निसर्गाची प्रचंड शक्ती आणि त्या नैसर्गिक पर्यावरणाचाच एक भाग असलेले मानवाचे अस्तित्व यांची जाणीव करून देणारी मंदिरं आणि आपत्तीनंतरचे अवशेष तिथं जागोजागी पाहायला मिळतात.

समुद्रात डुबकी मारण्यासाठी म्हणजेच डायव्हिंगसाठी जाताना आणि परतताना यासुओ यांच्या चेहऱ्यावर हास्य असतं. अशावेळी ते एखाद्या उत्साही सवंगड्यासारखे असतात.

जेव्हा ते युकोबद्दल बोलतात, तेव्हा त्यांच्या आवाजात एक प्रकारचा मिश्किलपणा असतो.

"जर आमची भेट झालीच, तर मला वाटतं की ती कदाचित मला सर्वात आधी असंच म्हणेल की, 'तू म्हातारा झाला आहेस'."

पण समुद्राच्या तळाशी घेतलेली ती डुबकी त्यांच्यासाठी आत्मचिंतनाची वेळ असते.

पाण्याच्या पृष्ठभागाखाली 50 मीटर खोलीवर, ते विनाशाच्या अनेक चक्रांनंतर तयार झालेल्या, पाण्याखालील विस्कळीत भूभागावरून पोहत असतात.

"तिथं पाण्याखाली विविध प्रकारची भूरूपं आहेत. काही पर्वतांसारखी आहेत. तुम्ही त्यांच्यावरून तरंगत जाऊ शकता आणि वरून त्यांच्याकडे पाहू शकता," ते सांगतात.

"त्यामुळे खरोखरच एखाद्या पक्ष्याप्रमाणे आकाशात उडाल्याचा भास होतो."

यासुओ आणि युको यांचा लग्नातील फोटो
फोटो कॅप्शन, यासुओ आणि युको यांचा लग्नातील फोटो

युको यांना भेटण्यापूर्वीपासूनच यासुओ या समुद्राच्या सानिध्यात लहानाचे मोठे झाले. ते याच पाण्यात पोहायला आणि मासे पकडायला शिकले. त्यांना आठवतं तेव्हापासून या समुद्रानंच त्यांचं आयुष्य घडवलेलं आहे.

आता, जेव्हा ते पाण्याच्या पृष्ठभागाखालील अवशेष पाहतात, तेव्हा त्यांना ते निसर्गाच्या सतत चालणाऱ्या परिवर्तनाच्या चक्राचाच एक भाग वाटतात.

"तिथं काही गाड्या आहेत ज्या अर्ध्या चिरडलेल्या अवस्थेत दिसतात, तर काही वस्तू अशा आहेत ज्यांचं रूपांतर कृत्रिम प्रवाळ-खडकांमध्ये (artificial reefs) झालेलं आहे. तिथं मासे येतात आणि त्यांच्याकडून अंडीही घातली जातात."

पंधरा वर्षे उलटूनही, यासुको यांच्यासोबत अजूनही ती शोकभावना कायम आहे, आणि तो समुद्रही.

ही त्याची 763 वी 'डाइव्ह' होती. लवकरच, युको यांच्या सानिध्यात रमण्यासाठी ते पुन्हा एकदा पाण्यात उतरतील.

(हा लेख बीबीसी वर्ल्ड सर्व्हिसवरील 'हार्ट अँड सोल' (Heart and Soul) या कार्यक्रमाच्या एका भागावर आधारित आहे. या भागाची निर्मिती 'मेसेज हर्ड' (Message Heard) आणि हिरोमी तानोउए (Hiromi Tanoue) यांनी केली आहे.)

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)