कुंथलगिरीच्या खव्याला 'या' कारणांमुळे मिळाला GI टॅग, जाणून घ्या त्याचं वैशिष्ट्य
धाराशिव जिल्ह्यातील कुंथलगिरीच्या डोंगरावर आहे एक भव्य जैन मंदिर. याच नावाने प्रसिद्ध आहे इथला अवीट चवीचा खवा.
इथं येणारे भाविक आणि पर्यटक गेल्या शंभर वर्षांपेक्षा अधिक काळापासून या खव्याची चव प्रसादाच्या रुपात चाखत आहेत.
धाराशीव जिल्ह्यातल्या दुष्काळी भागासाठी हा खवा केवळ प्रसाद नाही तर उपजीविकेचं एक मोठं साधन, परंपरा आणि अभिमानाचा विषय आहे.
या खव्याला जीआय टॅग मिळाला आहे. धाराशीवचा हा भाग दुष्काळी पट्टा म्हणून ओळखला जातो. त्यामुळे शेतीपेक्षा पशुपालन इथला मुख्य व्यवसाय आहे.
तसंच दूधापेक्षा खव्याला जास्त दर मिळत असल्यामुळे त्याचा व्यापार वाढत गेला. एवढा वाढला की विनोद जोगदंड यांच्या सारख्यांनी शिक्षकाची नोकरी सोडून या व्यवसायात उडी घेतली.
आज ते दररोज सुमारे अडीच लाख रुपयांचा खवा विकतात. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात खवा तयार करताना मोठ्या प्रमाणावर लाकूड जाळावं लागत होतं, ज्यामुळे परिसरातील पर्यावरणाचं नुकसान होत होतं.
त्यामुळे अनेक व्यापाऱ्यांनी पर्यायी ऊर्जास्रोतांचा वापर सुरू केला आहे. कुंथलगिरीच्या या मंदिरामुळे या खव्याला शतकापूर्वी पहिली ओळख मिळाली.
आता जीआय टॅगमुळे त्याला नवी प्रसिद्धी आणि बाजारपेठ मिळाली आहे. त्यामुळे ही परंपरा जपणाऱ्या हातांना सन्मानाने आणि अभिमानाने जगण्याची संधी मिळत आहे.
रिपोर्ट- मुस्तान मिर्झा, गणेश पोळ
शूट- किरण साकळे
एडिटिंग- नीलेश भोसले
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन






