कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन सुरूच, अभिजीत दिपकेंनी पोलिसांना विचारलं, 'पाणी बंद करण्याचा आदेश पंतप्रधानांनी दिलाय का?'

Published
वाचन वेळ: 6 मिनिटे

'शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यापर्यंत आपण जंतरमंतर सोडणार नाही.' अशी घोषणा कॉक्रोच जनता पार्टी (सीजेपी)चे प्रमुख अभिजीत दिपके यांनी केली आहे.

सीजेपीने एक्सवर दिलेल्या माहितीनुसार, शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीतील जंतरमंतर येथे आज 20 जून रोजी सीजेपीचे आंदोलन सुरू आहे.

संध्याकाळी आंदोलनाच्या ठिकाणी लाईट घालवण्यात आली असून माईकही बंद करण्यात आला. आंदोलकांना पिण्याचे पाणी मिळत नाहीये, असा आरोप दिपके यांनी केला आहे.

भिजीत दीपके यांनी एक्सवर एक व्हीडिओ पोस्ट केला आहे. त्या व्हीडिओत ते पोलीस कर्मचाऱ्यांना विचारताना दिसतात की, "पाणी बंद करण्याचा आणि लाईट बंद करण्याचा आदेश नेमका कुणी दिला?"

ते म्हणतात, "पंतप्रधानांनी पाणी आणि लाईट बंद करण्यास सांगितलं आहे का? गृहमंत्र्यांनी असा आदेश दिला आहे का? तुम्ही (पोलीस कर्मचारी) मला सांगा, मी त्यांच्याकडे विनंती करतो. तुमच्यावर कोणतीही अडचण येऊ देणार नाही."

आंदोलनस्थळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. चारही बाजूंनी पोलिस तैनात असून आत जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे.. त्यामुळे काही आंदोलक जंतरमंतरच्या बाहेरच घोषणा देताना दिसत आहेत.

आज शनिवारी अभिजीत दिपके यांनी जंतरमंतरवरील आंदोलनासाठी दिलेली परवानगी वाढवण्याची विनंती दिल्ली पोलिसांना केली. मात्र, घटनास्थळी उपस्थित असलेले बीबीसी प्रतिनिधी दिलनवाझ पाशा यांनी सांगितलं की, पोलिसांनी आंदोलनस्थळ रिकामं करण्यास सांगितलं आहे.

अभिजीत दीपके यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हीडिओमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, "मी सध्या जंतरमंतर येथे असून पोलीस मला अटक करण्यासाठी येत आहे."

या व्हीडिओत त्यांनी समर्थकांना आवाहन करत म्हटलं आहे की, "हा व्हीडिओ पाहणाऱ्या प्रत्येक तरुणाने आपआपल्या जिल्ह्यांत 'जेल भरो' आंदोलन सुरू करावे. कोणतीही परिस्थिती निर्माण झाली तरी हे आंदोलन थांबता कामा नये."

मात्र, हे आंदोलन पूर्णपणे शांततापूर्ण पद्धतीनेच व्हावे, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.

तसेच, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसंदर्भात सरकारने संवादाचे मार्ग खुले करावेत आणि चर्चेला सुरुवात करावी, अशी मागणीही दीपके यांनी केली आहे.

'सीजेपी इज बॅक' या एक्स हँडलवरून करण्यात आलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, "अभिजीत दीपके यांनी जंतर-मंतरवरील आंदोलनासाठी मिळालेल्या परवानगीची मुदत वाढवून देण्याची विनंती पोलिसांकडे केली आहे. तसेच, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर सरकारसोबत चर्चेचे मार्ग खुले करण्याचीही मागणी त्यांनी केली आहे."

शनिवारी सायंकाळी सुमारे साडेपाच वाजता करण्यात आलेल्या आणखी एका पोस्टमध्ये सीजेपीने म्हटलं की, "दिल्ली पोलीस एका शांततापूर्ण आंदोलनाला बेकायदेशीर ठरवण्याचा प्रयत्न करत आहेत. शांतता नेमकी कधीपासून बेकायदेशीर झाली, दिल्ली पोलीस?" असा सवालही त्यांनी या पोस्टमधून उपस्थित केलाय.

पुढे पोस्टमध्ये म्हटलं आहे की, "धर्मेंद्र प्रधान यांच्या कथित निष्काळजीपणामुळे ज्यांनी आपला जीव गमावला, त्यांना न्याय मिळेपर्यंत आम्ही येथून हलणार नाही."

यापूर्वी शनिवारी दिवसभरात करण्यात आलेल्या आणखी एका पोस्टमध्ये सीजेपीने दिल्लीतील नागरिकांना आवाहन करत म्हटलं की, "दिल्लीकरांनो, आता घराबाहेर पडण्याची वेळ आली आहे. सर्व विद्यार्थी, पालक आणि जागरूक नागरिकांनी आज (20 जून) सायंकाळी 6 वाजता जंतर-मंतर येथे एकत्र यावे आणि धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी एकच स्पष्ट मागणी करावी."

दरम्यान, देशभरात वाढलेल्या पेपरफुटीच्या घटना, परीक्षांमधील गोंधळ आणि निकालातील विलंब यामुळे लाखो विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याचा आरोप करत कॉक्रोच जनता पार्टी देशभरातील विविध ठिकाणी आंदोलन करत आहे.

दिल्लीत आंदोलन केल्यानंतर कॉक्रोच जनता पार्टीने पुण्यातील आंदोलनात लखनौ, अमृतसर, हैदराबाद आणि जयपूर येथेही आंदोलन करणार असल्याचं जाहीर केलं होतं. तसेच देशभरातील युवकांनी मोठ्या आंदोलनासाठी एकत्र यावे असे आवाहन केलं होतं.

जंतर मंतरवर सध्या काय परिस्थिती आहे?

दिलनवाझ पाशा, बीबीसी प्रतिनिधी, जंतर मंतरहुन

दिल्लीतील जंतर-मंतर येथे आज कॉकरोच जनता पार्टीतर्फे दुसरं मोठं आंदोलन आयोजित करण्यात आलं आहे.

मागील आंदोलनाच्या तुलनेत यावेळी गर्दी काहीशी कमी असली, तरीही मोठ्या संख्येने लोक आंदोलनस्थळी उपस्थित आहेत.

कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी मंचावरून केंद्र सरकारकडे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली. तसेच आंदोलनासाठी मुदतवाढ देण्याची विनंतीही त्यांनी दिल्ली पोलिसांकडे केली.

आंदोलनस्थळी उपस्थित असलेल्या काही आंदोलकांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत अशा प्रकारची आंदोलने सुरूच राहतील.

दरम्यान, पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनीही मंचावरून आपलं मत मांडलं. त्यांनी पर्यावरणाशी संबंधित विविध मुद्द्यांकडे लक्ष वेधले.

सध्या आंदोलनस्थळी शेकडो लोकांची गर्दी असून मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

सायंकाळी एका बाजूला मंचावरून आंदोलकांना आंदोलन सुरू ठेवण्याचं आवाहन केलं जात असल्याची स्थिती आहे, तर दुसरीकडे बाजूला पोलिसांकडून आंदोलकांना आंदोलनस्थळ रिकामं करण्यास सांगितलं जात आहे.

जयपूर येथील आंदोलनादरम्यान दिपकेंना झाली होती मारहाण

दरम्यान, सीजेपीकडून 15 जून रोजी जयपूर येथील शहीद स्मारकावर नीट पेपरफुटी, शिक्षण व्यवस्थेतील त्रुटी आणि बेरोजगारी यांसारख्या मुद्द्यांवर आंदोलन करण्यात आलं होतं.

याचदरम्यान काही व्यक्तींनी सीजेपीचे नेते अभिजीत दीपके यांच्यावर हल्ला केला. याबाबत पीटीआय या वृत्तसंस्थेने एक व्हीडिओ प्रकाशित केला होता.

या व्हीडिओमध्ये गर्दीतून जात असताना अभिजीत दिपके यांच्यावर हल्ला झाल्याचं दिसत आहे. यानंतर उपस्थित आंदोलकांनी हल्लेखोराचा पाठलाग करत त्याला मारहाण केल्याचंही दिसत आहे.

पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करून हल्लेखोरांना ताब्यात घेतले. मात्र, अभिजीत दीपके यांनी त्यांच्याविरोधात कठोर कारवाई न करण्याची भूमिका घेत त्यांना सोडून देण्याची विनंती केली होती.

मारहाणीवर प्रतिक्रिया देताना अभिजीत दिपके म्हणाले होते की, "शारीरिक हल्ले हे भीती आणि भ्याडपणाचे लक्षण आहेत. आम्ही शांततापूर्ण मार्गाने आमचा आवाज उठवणे सुरूच ठेवू. मी महात्मा गांधी आणि डॉ. आंबेडकरांचा अनुयायी आहे आणि शांतता व प्रेमाच्या जोरावर हा लढा लढत राहीन."

"धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिलाच पाहिजे," अशीही मागणी त्यांनी केली होती.

सीजेपीचं जंतर मंतरवरील पहिलं आंदोलन

कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाची सुरुवात जंतर मंतरवरूनच झाली होती. 6 जूनरोजी कॉक्रोच जनता पार्टीचे (सीजेपी) संस्थापक अभिजीत दिपके अमेरिकेतून दिल्लीत आले. त्यांनी सोशल मीडियावरून आपल्या भारतात येण्याबाबतची माहिती दिली होती.

दिल्ली पोलिसांनी कॉक्रोच जनता पार्टीला जंतर-मंतरवर आंदोलन करण्याची परवानगी दिली. त्यानुसार, 6 जूनरोजी 2-3 हजार समर्थकांच्या साथीने कॉक्रोच जनता पार्टीचं एकदिवसीय आंदोलन पार पडलं. या आंदोलनात पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुकदेखील सहभागी झाले होते.

आंदोलनात सहभागी झालेल्या समर्थकांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली. कॉक्रोच जनता पार्टीच्या या आंदोलनाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा झाली.

अशी सुरू झाली ही 'ऑनलाइन चळवळ'

भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी एक वक्तव्य केल्यानंतर त्याच्या विरोधात ही 'ऑनलाइन चळवळ' सुरू झाली होती.

न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी त्यांच्या त्या वक्तव्यात काही 'फेक डिग्री असणाऱ्या तरुणां'ची तुलना झुरळांबरोबर केली होती. याच वक्तव्यानंतर अभिजीत दीपके यांनी सोशल मीडियावर 'कॉकरोच जनता पार्टी'ची घोषणा केली. त्यानंतर त्यांच्या सोशल मीडिया खात्यांवर फॉलोअर्सचा अक्षरशः पूर आला.

मूळच्या छत्रपती संभाजीनगरच्या अभिजीत दिपके या तरुणाने अमेरिकेच्या बोस्टनमध्ये बसून कॉक्रोच जनता पार्टी नावाने एक वेबसाईट, इंस्टाग्राम हॅन्डल आणि एक्सचं खातं बनवलं. आणि बघता बघता संपूर्ण देशभर ही कॉक्रोच जनता पार्टी अल्पावधीतच चर्चेचा विषय ठरली.

इन्स्टाग्रामवर अवघ्या काही तासांतच त्यांनी भाजप, काँग्रेससह देशातील अनेक प्रमुख राजकीय पक्षांच्या फॉलोअर्सच्या संख्येलाही मागे टाकलं.

दरम्यान, कॉक्रोच जनता पार्टीच्या अधिकृत एक्स अकाउंटवर भारतात बंदी घालण्यात आली. @CJP_2029 हे एक्स खातंही बंद करण्यात आलं.

मात्र काही तासांतच ते नव्या खात्यासह पुन्हा एक्सवर सक्रिय झाले. एक्सने केलेल्या या कारवाईनंतर अभिजित दिपके यांनी 'कॉक्रोच इज बॅक' (@Cockroachisback) या नावाने एक नवीन अकाउंट सुरु केलं. याही अकाउंटला नेटकऱ्यांकडून भरपूर प्रतिसाद मिळाला. सध्या याच अकाउंटवरून कॉक्रोच जनता पार्टी आपली भूमिका मांडत असते.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.