सतलज : 'ज्यांच्यावर चित्रपट, त्यांचंच नाव काढायला सांगत होते'; सिनेमा OTT वरून हटवल्यानंतर दिलजीत काय म्हणाला?

फोटो स्रोत, Getty Images
मानवाधिकार कार्यकर्ते जसवंत सिंह खालडा यांच्या आयुष्यावर आधारित दिलजीत दोसांजच्या 'सतलज' या चित्रपटाचा 3 जुलै रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म झी-5 वर प्रदर्शित झाला होता. मात्र, 5 जुलै रोजी हा चित्रपट प्लॅटफॉर्मवरून हटवण्यात आला.
यासंदर्भात झी-5 ने आपल्या अधिकृत एक्स (X) हँडलवर निवेदन जारी करत म्हटलं, "सतलजचा प्रवास सध्या थांबला असला, तरी त्याने सुरू केलेली चर्चा अजूनही सुरू आहे. तुम्ही दिलेल्या भरभरून प्रेमाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. लवकरच हा चित्रपट पुन्हा तुमच्यासमोर आणण्याची आम्हाला आशा आहे."
या चित्रपटातील प्रमुख अभिनेता दिलजीत दोसांज यानेही एक्सवर प्रतिक्रिया देत लिहिलंय, "आता हा चित्रपट थांबणार नाही. खालडा साहेबांचा आवाज कुणीही दाबू शकत नाही."
ओटीटीवर चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर दिग्दर्शक हनी त्रेहन यांनी म्हटलं होतं, "या चित्रपटात कोणतीही काटछाट (संकलन) करण्यात आलेले नाही आणि त्याच्या मूळ स्वरूपाशी कोणतीही तडजोड केलेली नाही."
या चित्रपटाचं मूळ नाव 'पंजाब 95' होतं. विविध कारणांमुळे त्याचं प्रदर्शन बराच काळ रखडलं होतं.
या चित्रपटाचा आंतरराष्ट्रीय स्तरावर 7 फेब्रुवारी 2025 रोजी प्रदर्शित होणार असल्याची घोषणा करण्यात आली होती आणि त्याचा टीझरही प्रसिद्ध करण्यात आला होता. मात्र, त्यानंतर पुन्हा एकदा चित्रपटाचं प्रदर्शन पुढे ढकलण्यात आलं.
या चित्रपटात दिलजीत दोसांज, अर्जुन रामपाल, सुविंदर विक्की, जगजीत संधू आणि गीतिका विद्या ओहल्यान यांनी विविध भूमिका साकारल्या आहेत.
झी-5 च्या निवेदनात काय म्हटलं आहे?
रविवार, 5 जुलै रोजी रात्री 8.30 वाजता झी-5 च्या अधिकृत एक्स खात्यावर एक निवेदन प्रसिद्ध करण्यात आलं.
झी-5 ने चित्रपट पाहणाऱ्या, त्याचं सदस्यत्व घेणाऱ्या आणि त्याला पाठिंबा देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे आभार मानले.
निवेदनात म्हटलं आहे, "सतलज प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षकांकडून मोठं प्रेम आणि पाठिंबा मिळाला आहे. आम्ही 'सतलज' आणि त्यामागील सर्व क्रिएटिव्ह गोष्टींसोबत ठामपणे उभे आहोत."

फोटो स्रोत, @ZEE5India
पुढे झी-5 ने म्हटलं आहे, "पुढील आदेश येईपर्यंत 'सतलज' भारतात उपलब्ध असणार नाही. हा चित्रपट शक्य तितक्या लवकर पुन्हा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व योग्य पर्यायांवर काम केलं जाईल."
चित्रपटाचं प्रदर्शन वारंवार का पुढे ढकललं गेलं?
मार्च 2025 मध्ये बीबीसी पंजाबीने चित्रपटाच्या प्रदर्शनातील विलंबाबाबत दिग्दर्शक हनी त्रेहन यांच्याशी संवाद साधला होता.
हनी त्रेहन यांनी बीबीसीला सांगितलं होतं की, "केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाने (CBFC) सुरुवातीला चित्रपटात 21 कट लावण्याचे निर्देश दिले होते. मात्र, पुढे हे प्रकरण वाढत गेलं आणि कट्सची संख्या 120 हून अधिक झाली. हे माझ्या आकलनापलीकडचं आहे. अनेक कट्ससाठी कोणतंही कारणही सांगण्यात आलं नव्हतं."
त्यावेळी त्यांनी असंही सांगितलं होतं, "हा जसवंत सिंह खालडा यांचा चरित्रपट आहे आणि मला त्यांचंच नाव काढून टाकायला सांगितलं जात आहे. म्हणजे त्यांचं नाव घेणंच गुन्हा आहे, असाच त्याचा अर्थ होतो. अशा मागण्या मान्य करणं शक्य नाही."

फोटो स्रोत, Getty Images
ते पुढे म्हणाले, "ज्यांना या चित्रपटाबाबत आक्षेप आहे, त्यांनी माझ्याशी येऊन चर्चा करावी. त्यांचा आक्षेप रास्त असेल, तर तो मान्य करण्यास मी पूर्णपणे तयार आहे. मी शांतताप्रिय आणि कायद्याचं पालन करणारा नागरिक आहे."
त्यांनी पुढे असंही म्हटलं, "ज्यांना आक्षेप आहे, त्यांच्याविरोधात न्यायालयात लढण्यास मी तयार आहे. पण जर मला न्यायालयात जाण्याची संधीच दिली जाणार नसेल, तर मी काय करू?"
जसवंत सिंह खालडा कोण होते?
6 सप्टेंबर 1995 रोजी जसवंत सिंह खालडा यांचं अमृतसरमधील कबीर पार्क येथील त्यांच्या घरातून अपहरण करण्यात आलं. त्यानंतर ते कधीही घरी परतले नाहीत.
न्यायालयात सीबीआयने सादर केलेल्या माहितीनुसार, जसवंत सिंह खालडा हे मानवाधिकार कार्यकर्ते होते आणि शिरोमणी अकाली दलाच्या मानवाधिकार विभागाचे सरचिटणीस म्हणूनही त्यांनी काम केलं होतं.
सीबीआयच्या माहितीनुसार, 1980 आणि 1990 च्या दशकात पंजाबमध्ये अतिरेकी हिंसाचाराबरोबरच पोलिस अत्याचार, कोठडीत मृत्यू आणि कथित बनावट चकमकींच्या घटनांबाबत सातत्याने चर्चा होत होती.

फोटो स्रोत, KHALRA MISSION ORGANISATION/FB
जसवंत सिंह खालडा यांनी जून 1984 ते डिसेंबर 1994 या कालावधीत अमृतसर, मजीठा आणि तरनतारण येथील तीन स्मशानभूमींमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आलेल्या अज्ञात मृतदेहांची माहिती सार्वजनिक केली होती.
त्यांचा दावा होता की, हे बेवारस मृतदेह पोलिसांच्या बेकायदेशीर कारवायांचे पुरावे आहेत.
या दाव्याला बळ देणारी बाब म्हणजे, या मृतदेहांपैकी बहुतेक मृतदेह पोलिसांनीच स्मशानभूमीत आणल्याची नोंद होती.
सीबीआयच्या अहवालानुसार, जसवंत सिंह खालडा यांनी या कथित घटनांविरोधात आवाज उठवला होता.
अहवालात म्हटलं आहे, "हे स्थानिक पोलिसांना पसंत पडलं नाही आणि त्यांनी त्यांचं अपहरण करण्याचा कट रचला. या गुन्हेगारी कटाचा भाग म्हणून 6 सप्टेंबर 1995 रोजी कबीर पार्क येथील त्यांच्या घरातून त्यांचं अपहरण करण्यात आलं."
अहवालानुसार, "त्यांना बेकायदेशीरपणे ताब्यात ठेवण्यात आलं, त्यानंतर त्यांची हत्या करण्यात आली आणि त्यांचा मृतदेह हरिके परिसरातील एका कालव्यात फेकून देण्यात आला."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)


























