वडिलांचा टेलरिंगचा व्यवसाय, रोज 10 किलोमीटरची पायपीट; यवतमाळच्या तनुश्रीचा ज्युनिअर हॉकी टीमपर्यंतचा प्रवास

तनुश्री कडू

फोटो स्रोत, Bhagyashree Raut

फोटो कॅप्शन, तनुश्री कडू
    • Author, भाग्यश्री राऊत
    • Role, बीबीसी मराठीसाठी
  • Published
  • वाचन वेळ: 3 मिनिटे

"नातेवाईक म्हणायचे कशाला मुलीला एवढ्या दूर पाठवतोस. जग चांगलं नाही. पण, मी हार मानली नाही. माझ्या मुलींना मी चांगलं घडवणार अशी जिद्द होती. आज माझी मुलीचं सिलेक्शन झाल्याचं ऐकून मला इतका आनंद झाला की मी सांगू शकत नाही."

इंडियन ज्युनिअर हॉकी महिला टीममध्ये सिलेक्शन झालेल्या तनुश्री कडूचे वडील दिनेश कडू बीबीसी मराठीसोबत बोलत होते.

युनायटेड किंग्डममध्ये 5 ते 14 जुलैला हॉकीच्या मॅचेस होणार आहेत. त्यासाठी हॉकी इंडियानं 24 मुलींचा जुनीअर संघ घोषित केला आहे.

यामध्ये यवतमाळच्या तनुश्रीचं सिलेक्शन झालं आहे. ती यु. के.मध्ये खेळणार आहे. यानंतर हाच संघ ज्युनिअर एशिया कपमध्ये देखील खेळणार आहे.

तनुश्रीचा इथपर्यंतचा प्रवास नेमका कसा आहे? एका ग्रामीण भागतली मुलगी भारतीय ज्युनिअर हॉकी संघापर्यंत कशी पोहोचली? पाहुयात.

वडिलांचा व्यवसाय, तर लाकडाच्या पाट्यांचा घरात काढले दिवस

तनुश्री 20 वर्षांची असून तिचा जन्म यवतमाळ शहराजवळच्या लोहारा गावात झाला. तिचे वडील दिनेश कडू टेलरिंगचा व्यवसाय करतात, त्यावरच त्यांचं घर चालतं. घरी एकही एकर शेती नाही. तनुश्रीची मोठी बहीण बीएचएमएस करतेय.

तसं तनुश्रीचं कुटुंब मूळचं यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातलं. पण, तिचे वडील व्यवसायाच्या शोधात यवतमाळ शहराजवळच्या लोहारा गावात आलं आणि तिथेच स्थायिक झाले. 2023 पर्यंत ते संपूर्णपणे लाकडाच्या पाट्यांनी बनवलेल्या घरात राहत होते.

तनुश्री कुटुंबीयांसह

फोटो स्रोत, Bhagyashree Raut

फोटो कॅप्शन, तनुश्री कुटुंबीयांसह

तनुश्रीचे वडील सांगतात, "आमच्या घरची परिस्थिती खूप गरीबीची आहे. घरात पैसा राहत नव्हता तेव्हा तनुश्रीला म्हणायचो आपल्याकडे पैसा नाही तू एवढ्या दूर कशी जाशील. तेव्हा तिला राग यायचा. मी कसंही करेन. पण, मला हॉकीमध्येच पुढे जायचं. देशासाठी खेळायचं आहे अशी तिची जिद्द होती.

"मुलीच्या आनंदात आपला आनंद असं समजून मी रात्रंदिवस कपडे शिवले. पण, तिला प्रशिक्षणासाठी कमी पडू दिलं नाही. आज त्याचं फळ आम्हाला मिळालं. ती पहिल्यांदाच जेव्हा मॅच खेळली तेव्हाच तिनं घरी बक्षीस आणलं. मी तेव्हाच मनात ठरवलं होतं की आपल्या पोरीला आता काहीच कमी पडू द्यायचं नाही," असं तनुश्रीचे वडील दिनेश कडू सांगतात.

हॉकीची सुरुवात कशी झाली?

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

तनुश्री यवतमाळच्या अभ्यंकर कन्या शाळेत पाचवीपासून शिकायला जात होती. तेव्हापर्यंत तिला हॉकी काय असते हे माहिती सुद्धा नव्हतं. या शाळेत पाचव्या वर्गापासूनच मुलांना हॉकी शिकवली जाते. तिथं ती मुलांना खेळताना बघायची. एकदिवस तिनं सुद्धा हॉकी खेळायचं ठरवलं. ती हॉकी खेळायला लागली तर तिनं कधी मागे वळून बघितलंच नाही.

गावातून दररोज पाच किलोमीटर सायकलनं शाळेत जायचं, शाळा करायची आणि त्यानंतर ग्राऊंडवर प्रॅक्टीस करून घरी पाच किलोमीटर परत यायचं. असा तिचा दररोजचा प्रवास असायचा. ती न चुकता दररोज ग्राऊंडवर येऊन जिद्दीनं सराव करणारी एकमेव खेळाडू होती, असं तिचे शाळेतले कोच शाहीद सय्यद सांगतात.

पुढे ते म्हणतात, "ती अतिशय गरीब घरातून आलेली मुलगी आहे. पण, एकही दिवस ग्राऊंडला सुट्टी द्यायची नाही. तिची जिद्द पाहून तेव्हाच वाटलं की ही मुलगी एक दिवस भारतीय हॉकी संघात खेळेल. आता तिला भारतीय जुन्यिअर महिला हॉकी संघात खेळण्याची संधी मिळाली आहे. कधी कधी घरची आर्थिक परिस्तिती पाहून म्हणायची, दादा घरी पैसे नाहीत, पुढचं प्रशिक्षण आणि खेळ कसा होईल? त्यामुळे आम्ही तिला क्रीडा प्रबोधिनी पुण्याला पाठवायचा विचार केला आणि तिची निवड सुद्धा झाली."

यूनायटेड किंग्डममध्ये 5 ते 14 जुलैला हॉकीच्या मॅचेस होणार आहेत. त्यासाठी हॉकी इंडियानं 24 मुलींचा जुनीअर संघ घोषित केला आहे.

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, यूनायटेड किंग्डममध्ये 5 ते 14 जुलैला हॉकीच्या मॅचेस होणार आहेत. त्यासाठी हॉकी इंडियानं 24 मुलींचा जुनीअर संघ घोषित केला आहे.

तनुश्री फक्त खेळातच नाहीतर अभ्यासात देखील हुशार असल्याचं तिचे प्रशिक्षक सांगतात. ती प्रॅक्टीस करून रात्री घरी परतल्यावर आपला शाळेचा अभ्यास देखील करायची.

यवतमाळच्या शाळेतून दहावीपर्यंतचं शिक्षण झाल्यानंतर ती क्रिडा प्रबोधिनी पुण्याला शिकायला गेली. त्यानंतर तिनं मुंबईत देखील हॉकीचं आणखी चांगलं प्रशिक्षण घेतलं आणि आता तिची भारतीय महिला जुन्यिअर हॉकी संघात निवड झाली आहे.

याआधी तनुश्री पहिल्यांदा अंडर 14 मध्ये नॅशनल खेळली. त्यानंतर अंडर 17, 19 नॅशनल खेळली. ज्युनिअर, सबज्युनिअर नॅशनल खेळली. तसेच ती महाराष्ट्र हॉकी टीमची कर्णधार देखील होती.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.