You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मृत्यूनंतर आपल्याबद्दल कसं बोललं जाईल याचा विचार करणे हे आपल्या आणि समाजाच्या हिताचे कसे असते?
- Author, मॉली गॉर्मन
- Published
- वाचन वेळ: 9 मिनिटे
आपण आपल्या मृत्यूनंतर मागे काय सोडून जात आहोत, याबद्दल विचार केल्यामुळे आपल्या मानसिक आरोग्यात सुधारणा होऊ शकते आणि आपल्या आपलं जीवन अधिक अर्थपूर्ण करण्यास मदत होऊ शकते - अगदी आपण अजून तरुण असलो तरी, असं संशोधनातून दिसून आलं आहे.
बेथ हंटर यांच्या वडिलांना अल्झायमर आजार झाल्याचं निदान झालं. त्यावेळेस त्यांनी वडिलांनी विचारलं की त्या त्यांच्याबरोबरच्या संभाषण रेकॉर्ड करू शकतात का? म्हणजे पुढील काळात त्यांना ते पुन्हा ऐकता येईल.
मात्र त्यांच्या वडिलांनी याला नकार दिला. हंटर म्हणतात की त्यांच्या नात्याबद्दल गंभीर, भावनिक संभाषण करू, असं वाटणारे ते व्यक्ती नव्हते.
त्यांनी त्यांच्या आजाराच्या निदानाला थेट स्वीकारलं नाही किंवा त्याचा सामना केला नाही किंवा ते त्यांच्या मृत्यूबद्दल बोलले नाहीत. त्याऐवजी त्यांनी त्यांच्या युद्धकथा लिहिण्यास प्राधान्य दिलं. त्यांनी आधी त्या हातानं लिहिल्या आणि मग त्या टाइप करण्यासाठी कोणाला तरी कामावर ठेवलं. त्यांच्या मृत्यूनंतर मागे ठेवून जाण्यासाठी ही सर्वात मौल्यवान गोष्ट असल्याचं त्यांना वाटलं.
वेळेची मर्यादा जाणवत असलेल्या वृद्ध किंवा ज्येष्ठ लोकांना जाण्यापूर्वी त्यांचा वारसा मागे ठेवण्याची निकड अधिक वाटू शकते. मात्र काही विद्वानांना वाटतं की वारसा मागे ठेवण्याची प्रेरणा आयुष्याच्या सुरुवातीच्या टप्प्यातच सुरू होऊ शकते आणि कदाचित ती तेव्हाच सुरू व्हायला हवी.
वारसा ठेवून जाण्याची इच्छा आणि आरोग्य
संशोधनांतून असं दिसून येतं की आपल्या मृत्यूनंतर पुढील पिढ्यांसाठी वारसा म्हणून काहीतरी ठेवून जाण्याच्या आपल्या जन्मजात मानवी इच्छेला अधिक योग्यप्रकारे समजून घेतल्यास त्यातून आपलं मानसिक आरोग्य सुधारण्याचे नवीन मार्ग समोर येऊ शकतात.
"बहुतांश लोक याबद्दल विचारच करत नाहीत," असं हंटर म्हणाल्या. त्या अमेरिकेतील ओहियोतील बॉलिंग ग्रीन स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये सहायोगी प्राध्यापक आहेत. तसंच कर्करोगातून बरं झालेले लोक वारशाबाबत काय विचार करतात याच्या तज्ज्ञ आहेत.
मात्र वारसा वेगवेगळ्या प्रकारे प्रकट होऊ शकतो. ती एक अगदी अचेतन स्वरुपातील कृतीदेखील असू शकते. "प्रत्येकजण वारसा सोडून जातो. तुम्हाला ते माहीत असो की नसो," असं हंटर म्हणतात. हा वारसा म्हणजे फक्त मृत्यूपत्राद्वारे दिलेली संपत्ती किंवा मालमत्ता किंवा संगीत किंवा लेखन यासारख्या शाश्वत कला नसतात.
त्याऐवजी काही संशोधक वारशाचं वर्गीकरण 3 मुख्य श्रेणींमध्ये करतात. या तिन्ही श्रेणींचा अंतर्भाव एकमेकांत होताना देखील दिसतो. या 3 श्रेणी म्हणजे, जैविक वारसा, भौतिक वारसा आणि आपल्या मूल्यांचा वारसा.
जैविक वारसा म्हणजे जो आपण आपलं शरीर आणि अनुवांशिकतेतून सोडतो. भौतिक वारसा म्हणजे आपली संपत्ती आणि मालमत्ता. तर मूल्यांचा वारसा म्हणजे आपली श्रद्धा, संस्कृती आणि वारसा.
शारीरिक वारसा
अनेकांसाठी जैविक वारशाचं सर्वांत स्पष्ट रूप म्हणजे आपल्या मुलांच्या किंवा अपत्यांच्या माध्यमातून आपली जनुकं पुढील पिढीसाठी सोडून जाणं. मात्र आपली जनुकीय वंशावळ आणि वारसा या दोन वेगवेगळ्या गोष्टी असू शकतात. जनुकीय वंशावळ, जी जनुकांद्वारे आपल्या पूर्वजांशी असलेल्या संबंधाचा संदर्भ देते. तर वारसा म्हणजे आपल्या मृत्यूनंतरही टिकून राहणारा आपला प्रभाव.
जैविक वारसा सोडून जाण्यामध्ये आपण ज्यात जगतो त्या आपल्या शरीराचा त्याग करणं किंवा दान करणं यांचा समावेश असू शकतो. जवळपास 17 कोटी अमेरिकन लोकांनी अवयव दानासाठी नोंदणी केलेली आहे. अर्थात दर 1,000 लोकांपैकी फक्त 3 जणांचाच मृत्यू अशा स्थितीत होतो की ज्यात यशस्वीरीत्या अवयव दान करता येतं.
काही जणांची तर विज्ञानासाठी त्यांचं संपूर्ण शरीरच दान करण्याची इच्छा असते. म्हणजेच त्यांच्या शरीराचा वापर वैद्यकीय शाखेच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी किंवा नवीन क्लिनिकल प्रक्रियांचा विकास करणं यासारख्या संशोधनपर बाबींसाठी केला जाणार असतो. अमेरिकेत 2021 मध्ये 26,000 हून अधिक जणांनी देहदान केलं होतं.
बेल्जियममध्ये अलीकडेच एका संशोधन करण्यात आलं. त्यात देहदानाची नोंदणी केलेल्या 100 हून अधिक लोकांवर अभ्यास करण्यात आला. यात असं दिसून आलं की 57 टक्के लोकांच्या बाबतीत देहदान करण्यामागे विज्ञानामध्ये योगदान देण्याची इच्छा ही मुख्य प्रेरणा होती. तर इतर प्रेरणा म्हणजे परोपकार आणि वैद्यकीय सेवेबद्दलची कृतज्ञता होती.
मात्र यातील लक्षात घेण्यासारखी विशेष बाब म्हणजे, 16 टक्के लोकांनी त्यांच्या मृत्यूला एक अर्थ मिळवून देणं ही त्यांची देहदानामागची प्रेरणा असल्याचं सांगितलं.
'एक विलक्षण देहदान'
अनुवांशिक आजार किंवा आरोग्याच्या समस्या, आजारपणं असलेल्यांच्या बाबतीतदेखील हे खरं आहे. सुझन पॉटर या समाज सेविका होत्या. त्यांना अनेक आजार होते. त्या विविध दीर्घकालीन आजारांनी, आरोग्याच्या समस्यांनी त्रस्त होत्या. त्यात कर्करोग, मधुमेह आणि संधिवात यासारखे आजार होते.
त्यांनी अमेरिकेतील कोलोरॅडोमधील 'व्हिजिबल ह्युमन प्रोजेक्ट'ला त्यांचं शरीर दान केलं. तरुणांना अधिक चांगले डॉक्टर होण्यास मदत व्हावी म्हणून त्यांनी तसं केलं. त्यांचं प्रकरण हे विलक्षण, असामान्य आहे.
कारण त्यांनी त्यांच्या शरीराचे 27,000 तुकडे केले जाण्यापूर्वी त्यांचं शरीर उणे (-) 9.4 अंश सेल्सिअस (15 अंश फॅरेनहाईट) तापमानावर गोठवण्याची परवानगी दिली होती. त्यांच्या प्रत्येक तुकड्याचा फोटो घेऊन, त्याचे थर रचून आणि एक 'आभासी मृतदेह' बनवण्यात आला. हे एक 3डी उपकरण आहे ज्यामुळे विद्यार्थ्यांना आभासी पद्धतीनं शरीराचं विच्छेदन करता येतं.
कर्करोगातून बऱ्या झालेल्या महिलांवर हंटर यांनी केलेल्या एका अभ्यासात त्यात सहभागी झालेल्यांना वारशाबाबत एक आशा होती. ती म्हणजे त्यांच्या वारशातून कुटुंबातील सदस्य, आरोग्याबाबतच्या सकारात्मक सवयींचा आणि कर्करोगाची तपासणीचा अवलंब करतील. कर्करोगाचं निदान झाल्यानंतर मृत्यूच्या शक्यतेला किंवा संभाव्यतेला सामोरं जाणाऱ्या महिलांसाठी 'आपली छाप सोडून जाणे' महत्त्वाचं होतं, असं हंटर म्हणतात.
वारशाचं जे महत्त्व आहे त्याचा वैद्यकीय संशोधनावरदेखील व्यापक स्वरुपाचा परिणाम होऊ शकतो. कारण त्यामुळे अधिक रुग्णांना वैद्यकीय (क्लिनिकल) चाचण्यांमध्ये भाग घेण्याची प्रेरणा मिळू शकते, असं हंटर यांना वाटतं.
जे मरणासन्न अवस्थेत किंवा लवकरच मृत्यू येण्याच्या स्थितीत असतात त्यांना वारशाबद्दल विचार केल्यास दिलासादेखील मिळू शकतो.
जे लोक त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात किंवा मृत्यूच्या जवळ असल्यामुळे त्यांची काळजी घेतली जात असते, अशांसाठी काही हॉस्पिटल्स आणि शेवटच्या आजारपणाची काळजी घेणारं केंद्र किंवा सेवा 'वारशासाठीचे उपक्रम' आयोजित करतात.
म्हणजे रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबाला सर्वात अर्थपूर्ण वाटेल अशाप्रकारे आयुष्याचा शेवट होण्यास मदत होईल. यामध्ये जर्नल किंवा स्क्रॅपबुक, प्रिय व्यक्तीसाठी कार्ड, एखादा कलेशी संबंधित प्रकल्प किंवा 'नैतिक इच्छापत्र' यांचा समावेश असू शकतो. हा एक कायदेशीर नसलेला दस्तावेज असतो. ज्यात लोक पुढील पिढीला किंवा कुटुंबाला द्यावयाचे त्यांचे विचार, मूल्यं आणि सल्ला लिहून ठेवतात.
असाध्य आजारानं ग्रस्त असलेले प्रौढ आणि मुलं यांच्यावरील संशोधनातून असं दिसून आलं की याप्रकारच्या 'वारशाशी संबंधित उपक्रमां'मुळे त्यांचं नैराश्य आणि चिंता कमी होण्यास मदत होऊ शकते. आयुष्याच्या शेवटच्या महिन्यांमधील दु:खाला तोंड देण्याच्या प्रक्रियेतदेखील यामुळे मदत होऊ शकते.
मूल्यांचा वारसा
परोपकार, मालमत्ता वारशानं देणं किंवा मृत्यूपत्राद्वारे देणं किंवा मौल्यवान वस्तू वारसा म्हणून देणं हे सर्व भौतिक वारशाचे प्रकार आहेत. फोटो, जर्नल किंवा इतर वस्तू वंशपरंरागतरित्या देणं किंवा वारसा हक्कानं दिल्या जाणाऱ्या वस्तू मौल्यवान कौटुंबिक इतिहास पुढे चालवण्याचा, एका पिढीकडून पुढच्या पिढीला देण्याचा एक मार्ग म्हणून जपल्या जाऊ शकतात. उदाहरणार्थ, स्वत:च्या नावानं इमारत दान करणं, या गोष्टीचा देखील समाजावर ठसा उमटतो.
मात्र संशोधनातून असं दिसून आलं आहे की लोकांना वारसा म्हणून मूल्यं आणि श्रद्धा या गोष्टी पुढील पिढीला सर्वात जास्त द्यायच्या असतात. म्हणजेच दयाळूपणा आणि इतरांना मदत करण्याचं महत्त्व.
विविध वयोगटातील आणि आरोग्य स्थितीतील 38 महिलांच्या कथांचा एक सखोल अभ्यास करण्यात आला. या अभ्यासातून असं आढळलं की या अभ्यासात सहभागी झालेल्यांना त्यांचे अनुभव आणि मूल्यं पुढील पिढीला देण्याची तीव्र इच्छा होती.
त्यामुळे सर्वसामान्यपणे ते त्यांच्या वर्तणूक, धर्म किंवा अध्यात्मिकतेतून नैतिक उदाहरण घालून हे करण्याचा प्रयत्न करतात. तसंच ते त्यांच्या कथा, कौटुंबिक इतिहास किंवा त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचे टप्पे लिहिण्याचा किंवा टेप रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न करतात. बहुतेक हे आत्मचरित्राच्या स्वरुपात लिहिण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.
मूल्यांचा वारसा सोडून जाण्याचे अनेक फायदे असल्याचं दिसून येतं. अमेरिकेतील संशोधकांच्या एका गटानं 65 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या प्रौढांच्या एका समूहाची मुलाखत घेतली. या लोकांनी 'मूल्यांच्या वारशा'चा एक दस्तावेज तयार केला होता.
संशोधकांना असं आढळून आलं की, यामुळे या अभ्यासात सहभागी झालेल्या लोकांना मानसिक शांतता मिळाली, त्यांचा भूतकाळ स्वीकारणं शक्य झालं आणि त्यांना सर्वात महत्त्वाच्या वाटणाऱ्या गोष्टी सांगता आल्या किंवा व्यक्त करता आल्या. त्यातून त्यांना पुढील आयुष्य जगण्याची प्रेरणादेखील मिळाली.
अभ्यासात सहभागी झालेल्या अनेकांनी मूल्यांचा वारसा मागे ठेवण्याच्या कृतीचं वर्णन एक 'मूर्त स्वरुपाची भेट' असं केलं. तर एका व्यक्तीनं सांगितलं की ही प्रक्रिया "तुम्ही कोणत्या गोष्टीतून सहीसलामत वाचला आहात, तुम्ही कोणत्या अडथळ्यांना तोंड दिलं आहे, तुम्ही त्यांचा सामना कसा केला आणि त्यांना तोंड देताना तुम्हाला कोणत्या विचारसरणीची मदत झाली, या गोष्टींची आठवण करून देते."
तुमच्या वारशाबद्दल विचार करणं तुमच्यासाठी चांगलं असू शकतं
मानवानं हजारो वर्षांपासून वारशाबद्दल विचार केला आहे. मात्र विद्वान, संशोधक फक्त 75 वर्षांपासून या संकल्पनेवर संशोधन करत आहेत.
जर्मन मनोविश्लेषक (सायकोॲनालिस्ट) एरिक एरिकसन यांनी 1950 मध्ये 'जनरेटिव्हिटी' ही संज्ञा तयार केली. याचं वर्णन त्यांनी असं केलं की एखादी व्यक्ती इतरांच्या हितामध्ये, कल्याणामध्ये, विशेषकरून येणाऱ्या पिढ्यांना फायदा मिळवून देण्यासाठी किती प्रमाणात रस घेते.
त्यांनी जनरेटिव्हिटीचा समावेश त्यांच्या मनोसामाजिक विकासाच्या आठ टप्प्यांपैकी सातवा टप्पा म्हणून केला. त्यांनी नमूद केलं की मध्यमयवीन लोकांसाठी हे एक महत्त्वाचं काम आहे.
एरिकसन यांनी असं गृहित धरलं किंवा मांडलं की जर एखादी व्यक्ती जनरेटिव्हिटी साध्य करण्यात अयशस्वी ठरली, तर त्याचा त्यांच्या पुढील आयुष्याच्या मार्गक्रमणावर परिणाम होऊ शकतो. किंबहुना त्यांचं आरोग्यदेखील बिघडू शकतं.
इतर संशोधक, विद्वानांनी या सिद्धांताचा विस्तार केला आहे आणि त्यासाठी पुरावे उपलब्ध करून दिले आहेत. अर्थात काहींनी असंही सुचवलं आहे की प्रौढांसाठी मध्यम वयात जनरेटिव्हिटी साध्य करणं हे एक आव्हान नाही. मात्र त्याला एक आयुष्यभराची प्रक्रिया मानली पाहिजे.
मृत्यूच्या भीतीवर मात करण्याचा उपाय
अर्थात, माणसाला वारसा मागे सोडून जाण्यास प्रवृत्त करणारी आणखी एक प्रेरणा आहे. ती म्हणजे मृत्यूची भीती.
"त्यामुळे लोकांना प्रश्न पडतो की शेवटी आपण सर्व जर मरणारच असू तर मग जीवनाचा अर्थ काय?" असं किम्बर्ली वेड-बेन्झोनी म्हणतात. त्या अमेरिकेतील उत्तर कॅरोलिनामधील ड्युक विद्यापीठातील फुक्वा स्कूल ऑफ बिझनेसमध्ये मॅनेजमेंट अँड ऑर्गनायझेशन्सच्या प्राध्यापक आहेत.
"वारसा मागे ठेवण्याच्या प्रेरणेच्या मानसशास्त्राच्या मुळाशी मृत्यू हेच कारण आहे. जेव्हा आपल्याला मृत्यूची आठवण करून दिली जाते, तेव्हा आपल्याला वाटतं की आपल्याला मरायचं नाही. आपल्याला जगायचं आहे," असं त्या पुढे म्हणाल्या.
वारशाबद्दल विचार केल्यामुळे लोकांना 'मृत्यू्बद्दल चिंता' वाटण्याच्या स्थितीतून 'मृत्यूबद्दलच्या चिंतना'च्या स्थितीत जाण्यास मदत होऊ शकते, असा युक्तिवाद त्या करतात.
इतर सिद्धांतकार किंवा विचारवंतांना वाटतं की लोकांना जेव्हा अशा भीतीचा (मृत्यूची भीती) अनुभव येतो, तेव्हा त्यांच्यामध्ये अशी इच्छादेखील निर्माण होते की त्यांच्या आयुष्याला काहीतरी अर्थ आहे, त्यांचं आयुष्यदेखील अर्थपूर्ण, महत्त्वाचं आहे.
जेसी बेरिंग न्यूझीलंडमधील ओटागो विद्यापीठात मानसशास्त्राचे प्राध्यापक आहेत.
ते म्हणतात, "वारसा सोडून जाण्यामागची प्रेरणा ही सुसंगत कथा सांगण्याच्या आपल्या गरजेचाच एक भाग आहे. आपण स्वत:कडे एखाद्या नायकाच्या प्रवासातील मुख्य पात्र म्हणून पाहतो... आणि या कथेतील बोध किंवा मिळणारा धडा म्हणजे त्यातून मिळणारा शेवटचा निष्कर्ष किंवा महत्त्वाची शिकवण, आपण 'प्रेक्षकां'पर्यंत म्हणजेच पुढील पिढीपर्यंत पोहोचवतो."
वारसा मागे ठेवण्याबद्दलचा आपला हा मोह किंवा आकर्षण एक महत्त्वाची गोष्ट सांगतं. ते म्हणजे मानवाची जडणघडणच अशाप्रकारे झाली आहे की त्याला इतरांच्या मतांची, इतरांना काय वाटेल याची खूप अधिक काळजी वाटते. "अगदी मृत्यूबद्दल विचार करताना किंवा त्यानंतरही आपली या चिंतेमधून सुटका होऊ शकत नाही," असं बेरिंग म्हणतात.
ही सर्वमान्य बाब आहे की मानवाला आयुष्यभर इतरांबरोबरच्या संपर्क किंवा नातेसंबंधांची आवश्यकता असते. यामुळे आपलं आरोग्य सुधारतं आणि तो आनंदाचा एक महत्त्वाचा स्रोत असतो. त्यामुळेच प्रेम मिळवण्याच्या आणि समूहाचा भाग असण्याच्या आपल्या मानवी गरजेचाच वारसा हा कदाचित एक 'कृत्रिम विस्तार' असू शकतो.
स्वत:चा वारसा मागे ठेवणं
या विषयावर मोठ्या प्रमाणात संशोधन होऊनदेखील, मृत्यूनंतर आपल्याला चांगल्या गोष्टींसाठी लक्षात ठेवलं जावं, असं आपल्याला का वाटतं हे अजूनही एक कोडंच आहे.
"कारण...जाणीव टिकून राहण्यासाठी मेंदूची आवश्यकता असते, असं जर तुम्हाला वाटत असेल तर मृत्यूनंतर आपली प्रतिष्ठा, स्थान जाणून घेणं किंवा त्याचा आनंद घेणं हे आपल्याला मानसिकदृष्ट्या शक्य होणार नाही," असं बेरिंग म्हणतात.
आपण मेल्यावर आपल्याबद्दल काय विचार केला जाईल, आपल्याबद्दल लोकांचं काय मत असेल, या विचारात आयुष्यभर मग्न राहिल्यामुळे कदाचित "आपण वर्तमानातील आताच्या क्षणांचा आनंद घेण्यापासून आणि आताच्या अनुभवांचा रस घेण्याच्या आतील भावनेपासून वंचित राहू शकतो," असा युक्तिवाद बेरिंग करतात.
"मला वाटतं की 'आपल्याला कसं लक्षात ठेवलं जाईल' या गर्भित भीतीमुळे जर आपण काही विशिष्ट नैतिक भूमिका घेण्यास कचरलो, तर महत्त्वाचे निर्णय घेताना आपल्या मनात शंका निर्माण होऊ शकते," असं ते म्हणाले.
हे खरं आहे की आपण सोडून गेलेल्या आपल्या वारशांवर आपलं नियंत्रण नसतं, असं वेड-बेन्झोनी म्हणतात.
"ज्यांना तो वारसा मिळतो, ज्यांच्याकडे तो हस्तांतरित होतो त्यांच्याकडेच त्याचं नियंत्रण असतं आणि तेच त्याचा अर्थही लावतात," असं त्या म्हणाल्या.
मात्र आपण कोणता वारसा सोडून जाणार आहोत याबद्दल विचार केल्यामुळे त्या व्यक्तीला जिवंतपणी स्वत:ला आणि त्याच्या अवतीभोवतीच्या लोकांना जे फायदे होतात, ते यामुळे कमी होत नाहीत.
वारशातून मिळतं एक 'प्रतिकात्मक अमरत्व'
खरं तर, वेड-बेन्झोनी आणि त्यांचे सहकारी सुचवतात की आपण आपल्या पश्चात कोणता वारसा सोडून जाणार आहोत याबद्दल आपण शक्य तितक्या लवकर विचार केला पाहिजे. तसंच आपण आपण आपल्या आयुष्यभर 'वारशाविषयीच्या आपल्या महत्त्वाकांक्षा, आकांक्षा' लिहूनही ठेवायला हव्यात.
जेव्हा लोक ते कोणता वारसा सोडून जाणार याबद्दल विचार करतात, "तेव्हा ते भावी पिढ्यांच्या हितांचं ठरेल अशाप्रकारे वागण्याची शक्यता अधिक असते, असं आम्हाला सातत्यानं दिसून आलं आहे," असं वेड-बेन्झोनी म्हणतात.
आयुष्यभर वारसा निर्माण करण्याबाबत विचार केल्यामुळे लोकांना जे मागे ठेवून जायचं असतं अशा मूल्यांशी, अर्थाशी सुसंगत असलेले निर्णय घेणं शक्य होतं. यामुळे समाजाच्या हिताच्या कृती करण्यास लोकांना प्रोत्साहन मिळतं.
उदाहरणार्थ, पर्यावरणविषयक चळवळीत भाग घेणं किंवा परोपकारासाठी, सेवाभावी कामासाठी किंवा वैद्यकीय संशोधनासाठी अधिक संपत्ती दान करणं. त्याचबरोबर उद्योजक, व्यावसायिक नफा कमावण्याच्या पलीकडे जाऊन समाजासाठी सकारात्मक योगदान देणारे व्यवसाय उभारण्याचा विचार करू शकतात, असं वेड-बेन्झोनी म्हणतात.
संशोधकाना वाटतं की याचे दुहेरी फायदे आहेत. एक म्हणजे आपण जिवंत असताना त्यातून आपल्याला प्रेरणा मिळते आणि जीवनाला अर्थ मिळतो. दुसरं म्हणजे आपल्या मृत्यूनंतर देखील त्यातून आपल्याला 'प्रतीकात्मक अमरत्व' मिळतं. त्यामुळे आपण प्रत्यक्षात म्हणजे शारीरिकदृष्ट्या जरी अस्तित्वात नसलो तरीदेखील भविष्यातही आपलं अस्तित्व टिकून राहतं.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)