Jio IPO मध्ये शेअर्स मिळतील का? त्याची काही ट्रिक आहे का? जाणून घ्या शेअर्स वाटपाचे नियम

जिओ प्लॅटफॉर्म्सच्या आयपीओमधून कंपनी शेअर बाजारातून सुमारे 30 हजार 213 कोटी रुपये उभे करण्याची योजना आखत आहे.
फोटो कॅप्शन, जिओ प्लॅटफॉर्म्सच्या आयपीओमधून कंपनी शेअर बाजारातून सुमारे 30 हजार 213 कोटी रुपये उभे करण्याची योजना आखत आहे.
    • Author, टीम बीबीसी गुजराती
  • Published
  • वाचन वेळ: 5 मिनिटे

भारतीय शेअर बाजारात सध्या जिओ प्लॅटफॉर्म्सच्या 30 हजार 213 कोटी रुपयांच्या आयपीओची चर्चा सुरू आहे.

भारतात आतापर्यंत आलेला हा सर्वात मोठा आयपीओ आहे. बुधवारी (21 ऑक्टोबर) हा आयपीओ खुला झाल्यानंतर अवघ्या 100 मिनिटांत संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव असलेल्या शेअर्सची मागणी उपलब्ध शेअर्सपेक्षा जास्त झाली. हा एक विक्रम आहे.

बीएसईच्या आकडेवारीनुसार, गुरुवारी (22 ऑक्टोबर) आयपीओच्या दुसऱ्या दिवशी पहिल्या 2 तासांतच किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव असलेल्या शेअर्ससाठी पुरेसे अर्ज (सबस्क्राईब) आले होते.

जिओचा हा आयपीओ शुक्रवारपर्यंत (23 ऑक्टोबर) खुला राहणार आहे. ही बातमी लिहिली जात असताना या आयपीओसाठी उपलब्ध शेअर्सच्या चार पटीपेक्षा जास्त अर्ज आले होते. आयपीओमध्ये वेगवेगळ्या गटांत उपलब्ध शेअर्सपेक्षा जास्त अर्ज (ओव्हरसबस्क्राइब) आले, तर अर्ज करणाऱ्या प्रत्येक गुंतवणूकदाराला शेअर्स मिळतीलच असे नाही.

त्यामुळे प्रश्न पडतो की, आयपीओला उपलब्ध शेअर्सपेक्षा जास्त अर्ज आले, तर शेअर्सचं वाटप कसं केले जाते? आणि आयपीओमध्ये शेअर्स मिळण्यासाठी काही खास ट्रिक किंवा युक्ती आहे का?

IPO ला किती मागणी मिळाली?

गुरुवार दुपारपर्यंत जिओचा हा आयपीओ उपलब्ध शेअर्सच्या चारपटीपेक्षा जास्त भरला होता. यात मोठ्या संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (क्वालिफाइड इन्स्टिट्यूशनल बायर्स-क्यूआयबी) राखीव असलेल्या शेअर्सच्या तुलनेत 9.69 पट अर्ज आले होते. बिगर-संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या (नॉन-इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स) गटात 3.78 पट, तर किरकोळ गुंतवणूकदारांच्या (रिटेल इन्व्हेस्टर्स) गटात 1.25 पट अर्ज आले होते.

याशिवाय, रिलायन्स समूहाच्या कर्मचाऱ्यांसाठीही काही शेअर्स राखीव ठेवण्यात आले आहेत. या गटात उपलब्ध शेअर्सच्या 1.83 पट अर्ज आले होते. तर रिलायन्सच्या सध्याच्या शेअरधारकांसाठी राखीव असलेल्या शेअर्सच्या तुलनेत 2.90 पट अर्ज आले होते.

जिओ प्लॅटफॉर्म्सच्या आयपीओसाठी एका शेअरची किंमत 1,056 ते 1,119 रुपये ठेवण्यात आली आहे. एका लॉटमध्ये 12 शेअर्स आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त किंमत म्हणजेच 1,119 रुपये दराने एका लॉटसाठी 13,428 रुपये भरावे लागतील.

या आयपीओत 26 ऑक्टोबरला शेअर्सचे वाटप होण्याची शक्यता आहे. 27 ऑक्टोबरला ज्यांना शेअर्स मिळणार नाहीत, त्यांचे पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. तर 28 ऑक्टोबरला शेअर बाजारात या शेअर्सची नोंदणी (लिस्टिंग) होण्याची अपेक्षा आहे.

ज्यांना आयपीओमध्ये शेअर्स मिळणार नाहीत, ते लिस्टिंगच्या दिवशी दुय्यम बाजारातून हे शेअर्स खरेदी करू शकतात.

शेअर्सचं वाटप कसं केलं जाईल?

आयपीओला उपलब्ध शेअर्सपेक्षा जास्त अर्ज म्हणजेच मागणी आली (ओव्हरसबस्क्रिप्शन), तर शेअर्सचं वाटप सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाच्या (सेबी) नियमांनुसार केलं जातं. सेबी ही भारतीय शेअर बाजारावर देखरेख ठेवणारी आणि त्याचे नियम ठरवणारी संस्था आहे.

सेबीच्या माहितीपुस्तिकेनुसार, किरकोळ गुंतवणूकदारांच्या (रिटेल इन्व्हेस्टर्स-आरआय) गटात उपलब्ध शेअर्सइतके किंवा त्यापेक्षा कमी शेअर्ससाठी अर्ज आले, तर सर्व गुंतवणूकदारांना त्यांनी मागितलेल्या संख्येनुसार शेअर्सचे वाटप केले जातात.

Caption- मुकेश अंबानी यांची मुले, ईशा आणि आकाश अंबानी यांनी जिओच्या आयपीओसाठी आयोजित रोड शोचे नेतृत्व केलं.
फोटो कॅप्शन, मुकेश अंबानी यांची मुले, ईशा आणि आकाश अंबानी यांनी जिओच्या आयपीओसाठी आयोजित रोड शोचे नेतृत्व केलं.

परंतु, एखाद्या गटात उपलब्ध शेअर्सपेक्षा जास्त अर्ज आले, तर शेअर्सचं वाटप लॉटरी पद्धतीने किंवा अर्जाच्या प्रमाणानुसार म्हणजेच प्रो-राटा पद्धतीने केलं जातं.

लॉटरी पद्धतीमध्ये प्रत्येक पात्र गुंतवणूकदाराला शेअर्स मिळण्याची शक्यता समान असते. त्यामुळे या पद्धतीत कोणाला शेअर्स मिळतील, हे आधीच ठरवता येत नाही. शेअर्स मिळण्याची शक्यता वाढवण्यासाठी कोणतीही खात्रीशीर युक्ती किंवा पद्धत नाही.

शेअर्स मिळण्याची शक्यता कशी वाढेल?

किरकोळ (रिटेल) गुंतवणूकदारांच्या गटात कुटुंबातील वेगवेगळ्या सदस्यांच्या खात्यांतून अर्ज केल्यास, त्यापैकी एखाद्याला शेअर्स मिळण्याची शक्यता असते. काही जण मित्रांच्या किंवा ओळखीच्या व्यक्तींच्या डिमॅट खात्यांचा आणि पॅन क्रमांकाचा वापर करूनही अर्ज करतात.

याशिवाय, आयपीओसाठी अर्ज करताना भरलेली सर्व माहिती योग्य असल्याची खात्री करा.

शेअर बाजाराचे अभ्यासक मिलन मेहता सांगतात, "एखाद्या आयपीओची बाजारात खूप चर्चा सुरू असेल, कंपनीची कामगिरी चांगली असेल आणि ग्रे मार्केटमध्ये शेअर्सची खरेदी-विक्री जास्त किमतीला (प्रीमियम) होत असेल, तर त्या आयपीओसाठी उपलब्ध शेअर्सपेक्षा अनेक पटींनी जास्त अर्ज (ओव्हरसबस्क्रिप्शन) येऊ शकतात."

Caption- सप्टेंबरमध्ये एनएसईचा आयपीओ आला होता, परंतु शेअर बाजारात नोंदणी झाल्यानंतर गुंतवणूकदारांना फारसा फायदा झाला नव्हता.
फोटो कॅप्शन, सप्टेंबरमध्ये एनएसईचा आयपीओ आला होता, परंतु शेअर बाजारात नोंदणी झाल्यानंतर गुंतवणूकदारांना फारसा फायदा झाला नव्हता.

अशा वेळी 2 लाख रुपयांपेक्षा कमी रकमेच्या किरकोळ गुंतवणूकदारांच्या अर्जांना समान पद्धतीने विचारात घेतलं जातं, असं सांगत ते मोठ्या लॉटसाठी अर्ज न करण्याचा सल्ला देतात. त्यामुळे एकाच खात्यातून मोठा अर्ज करण्यापेक्षा वेगवेगळ्या खात्यांमधून अर्ज करणं अधिक योग्य ठरू शकतं.

याव्यतिरिक्त, आयपीओच्या शेवटच्या दिवशी बँक खात्याशी संबंधित अडचण किंवा तांत्रिक समस्या निर्माण झाल्यास अर्ज अडकू शकतो. त्यामुळे शेवटच्या दिवसापर्यंत थांबण्याऐवजी आधीच अर्ज करून घेण्याचा सल्ला दिला जातो.

अनेक कंपन्या त्यांच्या आधीपासूनच्या शेअरधारकांसाठी काही शेअर्स राखून ठेवतात. याला 'शेअरहोल्डर्स कॅटेगरी' म्हणजेच भागधारक श्रेणी म्हणतात. या गटातून अर्ज केल्यास शेअर्स मिळण्याची शक्यता वाढते. रिलायन्सनेही आपल्या आधीपासूनच्या शेअरधारकांसाठी 2 हजार 500 कोटी रुपयांचे शेअर्स राखून ठेवले आहेत.

याशिवाय, किरकोळ गुंतवणूकदार आणि आधीपासूनचे शेअरधारक अशा दोन्ही गटांतून अर्ज केल्यास शेअर्स मिळण्याची शक्यता वाढू शकते.

शेअर्स मिळवण्यासाठी कोणतीही युक्ती नसते

आयपीओला उपलब्ध शेअर्सपेक्षा जास्त अर्ज आले, तर शेअर्स मिळण्याची शक्यता वाढवण्याची कोणतीही सोपी युक्ती नाही. अनेक गुंतवणूकदारांना असं वाटतं की, आयपीओ सुरू होताच लवकर अर्ज केल्यास शेअर्स मिळण्याची शक्यता वाढते. पण हा चुकीचा समज आहे.

त्याचप्रमाणे, एकाच व्यक्तीने अनेक अर्ज केल्यास शेअर्स मिळण्याची शक्यता वाढते, हा समजही चुकीचा आहे.

Caption- अनेक लोक शेअर बाजारात आयपीओची नोंदणी झाल्यानंतर नफा कमावण्याच्या उद्देशाने वेगवेगळ्या खात्यांमधून अर्ज करतात.
फोटो कॅप्शन, अनेक लोक शेअर बाजारात आयपीओची नोंदणी झाल्यानंतर नफा कमावण्याच्या उद्देशाने वेगवेगळ्या खात्यांमधून अर्ज करतात.

कारण, एकाच गटात एकाच पॅन क्रमांकावरून अनेक अर्ज केले, तर पडताळणीच्या वेळी ते अर्ज बाद होऊ शकतात. त्यामुळे शेअर्स मिळण्याची शक्यता राहत नाही.

मेहता सांगतात, "अनेक लॉटसाठी अर्ज केल्यास शेअर्स मिळण्याची शक्यता वाढते, हा समजही चुकीचा आहे. किरकोळ गुंतवणूकदारांच्या गटात शेअर्सचं वाटप लॉटच्या संख्येनुसार नव्हे, तर अर्जानुसार केलं जातं. त्यामुळे मोठ्या लॉटसाठी अर्ज करूनही विशेष फायदा होत नाही."

साधारणपणे एकाच पॅन क्रमांकावरून अनेक अर्ज करणे, बँक खात्यात पुरेसे पैसे नसणे किंवा यूपीआय आयडीमध्ये चूक असणे, अशा कारणांमुळे आयपीओचे अर्ज बाद होतात. त्यामुळे अर्ज करताना या चुका होणार नाहीत, याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे.

रिलायन्सच्या कर्मचाऱ्यांना सवलत

रॉयटर्सच्या वृत्तानुसार, जिओचे शेअर्स बाजारात नोंदवले गेल्यानंतर कंपनी देशातील चौथी सर्वात मोठी सूचीबद्ध कंपनी ठरेल. रिलायन्स इंडस्ट्रीज, भारती एअरटेल आणि एचडीएफसी बँक यांच्यानंतर तिचा क्रमांक असेल.

जिओ प्लॅटफॉर्म्सच्या आयपीओसाठी एका शेअरची किंमत (प्राइस ब्रँड) 1,065 ते 1,119 रुपये ठेवण्यात आली आहे. या आयपीओमध्ये एकूण 27 कोटी नवीन शेअर्स विक्रीसाठी आणले जाणार आहेत.

Caption- रिलायन्स समूहाचे संस्थापक धीरूभाई अंबानी यांनी 1977 मध्ये रिलायन्स टेक्स्टाइल इंडस्ट्रीजचा पहिला आयपीओ आणला होता.
फोटो कॅप्शन, रिलायन्स समूहाचे संस्थापक धीरूभाई अंबानी यांनी 1977 मध्ये रिलायन्स टेक्स्टाइल इंडस्ट्रीजचा पहिला आयपीओ आणला होता.

किरकोळ गुंतवणूकदारांना किमान 12 शेअर्सच्या एका लॉटसाठी अर्ज करावा लागेल. या एका लॉटची किंमत 13,428 रुपये आहे. गुंतवणूकदार जास्तीत जास्त 14 लॉट म्हणजेच 168 शेअर्ससाठी अर्ज करू शकतात. त्यासाठी 1,87,992 रुपये भरावे लागतील.

रिलायन्स समूहाच्या कर्मचाऱ्यांना मात्र प्रत्येक शेअरवर 54 रुपयांची सवलत दिली जाणार आहे.

पीटीआय वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, जिओने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी 500 कोटी रुपयांचे शेअर्स राखून ठेवले आहेत. तसेच, रिलायन्स इंडस्ट्रीजच्या पात्र शेअरधारकांसाठी 2500 कोटी रुपयांपर्यंतचे शेअर्स राखीव ठेवले आहेत.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)