तुमच्या घरात किंवा वाहनामध्ये साप शिरला तर सर्वात आधी काय करायचं? जाणून घ्या

फोटो स्रोत, Getty Images
- Author, के सुबागुनम
- Role, बीबीसी तमिळ
- Published
- वाचन वेळ: 5 मिनिटे
हैदराबादमधील एका रेस्तरॉमध्ये गेल्या आठवड्यात फिश टँकच्या आत साप निघाल्याने एकच खळबळ उडाली. त्यानंतर सर्पमित्रांना बोलावून या सापाला सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं.
कडक उन्हाळ्यामुळे थंड जागेच्या शोधात हा साप इमारतीच्या आत आला असावा आणि त्यानं फिश टँकमध्ये आश्रय घेतला असावा असा अंदाज वर्तवला जात आहे.
अशाच प्रकारची एक घटना गेल्या जानेवारी महिन्यात मुंबईतही घडली होती. अंधेरी पश्चिमेकडील एका घराच्या तळमजल्यावर कोबरा (नाग) आढळून आला होता.
'टाइम्स ऑफ इंडिया'च्या वृत्तानुसार हा साप वॉशिंग मशीनच्या आत लपून बसला होता. त्यालाही तिथून सुखरुप बाहेर काढण्यात आलं.
सध्या घरांच्या भिंतींमधील फटी, कोपरे, वॉशिंग मशीन, दुचाकी आणि चारचाकी गाड्या, फिश टँक तसेच पडून असलेल्या सामानाच्या ढिगाऱ्यांखाली साप आढळण्याच्या घटना सातत्यानं समोर येत आहेत.
अचानक समोर साप पाहिल्यानंतर भीती वाटणं अत्यंत स्वाभाविक आहे. त्यामुळंच अशाप्रकारच्या परिस्थितीसाठी निसर्ग आणि प्राण्यांबाबत माहिती असावी. अशा वेळी नेमकं काय करावं हे आपल्याला माहिती असायला हवं.
साप नेमके अशा ठिकाणी का लपतात? आणि ते दिसल्यास नेमकी काय पावलं उचलावीत? हे जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे.
साप मानवी वस्तीत का शिरतात?
या वर्षाच्या सुरुवातीला 'वाइल्डलाइफ अँड नेचर कन्झर्वेशन ट्रस्ट'च्या संशोधकांनी एक अभ्यास अहवाल प्रसिद्ध केला आहे.
या अभ्यासादरम्यान त्यांनी 2022 ते 2024 या दोन वर्षांत उत्तर कोईम्बतूरमधून साप रेस्क्यू केलेल्या 2318 घटनांचं सखोल विश्लेषण केलं आहे.
या अभ्यासानुसार, साप प्रामुख्यानं कचऱ्याचे ढीग, घरांच्या खोल्या, स्टोरेज शेड, मशीन आणि सुरक्षितपणे लपता येईल अशा जागांच्या शोधात असतात.
मानवी वस्तीत घुसण्यामागे सापांचा उद्देश कोणावर हल्ला करणे हा कधीच नसतो. साप लोकांवर हल्ला करण्याच्या उद्देशाने निवासी भागांत येत नाहीत, असं वन्यजीव तज्ज्ञ सांगतात.
उलट ते सहसा राहण्यासाठी सुरक्षित जागा, अन्न, गारवा आणि अनुकूल तापमानाच्या शोधात अशा ठिकाणी नकळत अडकतात.
विशेषतः कडक उन्हाळा, मान्सूनचा पाऊस आणि जंगलं किंवा त्यांचे नैसर्गिक अधिवास नष्ट होणं अशा कारणांमुळं आजकाल घरांमध्ये साप निघण्याचे प्रमाण खूप वाढले आहे.
नेमक्या याच कारणामुळे साप अनेकदा गाड्यांच्या खाली, फिश टँकच्या जवळ, पार्किंगच्या ठिकाणी, लाकडाच्या ढिगाऱ्यांखाली, फ्रिजच्या मागे आणि घरांच्या अंधाऱ्या किंवा अडगळीच्या कोपऱ्यांमध्ये आढळून येतात, असं सर्पतज्ज्ञ (हर्पेटोलॉजिस्ट) सांगतात
वन्यजीव प्रेमी आणि सर्पमित्र सॅमसन किरुबाकरण यांच्या मते, साप सामान्यतः मानवाशी होणारा संघर्ष टाळणं पसंत करतात.

फोटो स्रोत, Getty Images
सापांना अशा लपलेल्या जागा आवडतात जिथे ते कोणाच्याही नजरेत न पडता राहू शकतात, असं वन्यजीव संशोधक सांगतात.
मात्र, सॅमसन किरुबाकरण असंही सांगतात की, सापांचे नैसर्गिक अधिवास कमी होत चालले आहेत आणि मानवी वस्त्यांमध्ये त्यांना लपण्यासाठी पुरेशा जागा सहज मिळत आहेत. यामुळंच आता सापांचा मानवी वस्त्यांमधील वावर पूर्वीपेक्षा वाढला आहे.
"बऱ्याच काळापासून एकाच ठिकाणी उभी असलेली वाहने, फिश टँक आणि त्याच्या आजूबाजूचे थंड वातावरण, सावली आणि सुरक्षित आडोसा देणारे स्टोरेज शेड, अस्ताव्यस्त पडलेली बांधकाम सामग्री असलेले बांधकामाचे ठिकाण, नारळाचा कचरा, इतर कचऱ्याचे ढीग अशा जागा त्यांच्या लपण्यासाठी एकदम सोयीच्या असतात," असंही ते म्हणाले.
त्यांच्या मते, "साप या जागांचा शोध घेतात कारण तिथे त्यांना अनुकूल वातावरण मिळते. अशा ठिकाणी त्यांना सहज शिकार मिळतात, सुरक्षित आडोसा आणि शरीरासाठी योग्य तापमानही मिळते."
संशोधनानुसार, उन्हाळ्याच्या दिवसांत साप थंड आणि सावलीच्या जागा शोधतात. तर हिवाळ्यात किंवा थंड हवामानात ते उबदार आणि आरामदायी ठिकाणांचा शोध घेतात.
सॅमसन यांच्या मते, अन्न, लपण्याची जागा आणि सुरक्षित निवारा यांसोबतच तापमानाची हीच अनुकूल परिस्थिती सापांना मानवी वस्त्यांकडे आकर्षित करते.
वाहनात साप शिरल्यास काय करावे?
वाहनामध्ये साप शिरला तर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे अजिबात घाबरू नका आणि शांत राहा.
तज्ज्ञ सांगतात की, सापांना जेव्हा स्वतःवर संकट आल्यासारखं वाटतं किंवा कोणी त्यांना त्रास देतं तेव्हाच ते स्वसंरक्षणासाठी दंश करतात. अभ्यासातून असंही समोर आलं आहे की, साप कधीही स्वतः येऊन माणसांवर हल्ला करत नाहीत.
अनेकदा भीतीपोटी किंवा अतिउत्साहात लोक धोक्याचा अंदाज न घेता त्यांना पकडण्याचा किंवा मारण्याचा प्रयत्न करतात.

फोटो स्रोत, Getty Images
सॅमसन किरुबाकरण यांच्या मते, "अशी परिस्थिती उद्भवल्यास सर्वात आधी सापापासून सुरक्षित अंतरावर उभे राहणे गरजेचे आहे. याशिवाय सापाला कधीही स्पर्श करण्याचा किंवा त्याला पकडण्याचा प्रयत्न करू नका."
अगदी बिनविषारी सापसुद्धा धोका जाणवल्यास स्वसंरक्षणासाठी चावा घेऊ शकतात. कोणतीही माहिती किंवा प्रशिक्षण नसताना असं धाडस करणं म्हणजे स्वतःहून संकटाला आमंत्रण देण्यासारखं असल्याचं ते म्हणाले.
"रेस्क्यू ऑपरेशन दरम्यान संयम आणि शांत राहणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे अशा वेळी तज्ज्ञ सर्पमित्रांना बोलावावे किंवा त्वरित वनविभागाला याची माहिती द्यावी. तसेच ज्या ठिकाणी साप आहे ती जागा तातडीने सुरक्षित करून तिथे कोणीही जाणार नाही याची खात्री करावी," असा सल्लाही ते देतात.
साप वाहनांच्या आत का शिरतात?
वाहनांमध्ये अशा अनेक गोष्टी उपलब्ध असतात ज्यांच्या शोधात साप असतात. पहिली गोष्ट म्हणजे वाहनांचा खालचा भाग त्यांना सावली आणि अंधार देतो.
कडक उन्हाळ्यामध्ये कारच्या खालील जमीन आजूबाजूच्या इतर जागांच्या तुलनेत थोडी थंड असते. म्हणूनच तीव्र उष्णतेपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी ही जागा सापांसाठी अत्यंत अनुकूल ठरते.
दुसरे मुख्य कारण म्हणजे, अनेक दिवस एकाच जागी पार्क करून ठेवलेल्या वाहनांमुळे सापांना इतर शिकारी प्राण्यांची आणि माणसांची भीती राहत नाही.
सॅमसन किरुबाकरण सांगतात की, "एखाद्या व्यक्तीने सापाला पाहिले तर तो लगेचच जवळ असलेल्या वाहनाच्या आत शिरण्याचा प्रयत्न करतो. टायर आणि इंजिनच्या आजूबाजूच्या अरुंद जागा त्यांच्यासाठी सुरक्षित लपण्याचे ठिकाण बनतात त्यामुळं ते स्वतःचा बचाव करू शकतात."

फोटो स्रोत, Getty Images
त्यांच्या मते, केवळ आडोसाच नाही तर उंदरांच्या शिकारीसाठीही साप वाहनांमध्ये शिरतात.
उंदीर, बेडूक आणि पाली हे सापांचे आवडते खाद्य आहे. अनेक दिवस एकाच जागी पार्क केलेली वाहनं, पार्किंग किंवा अंधारी गोदामे ही उंदरांच्या लपण्याची मुख्य ठिकाणे असतात.
त्यामुळे जिथे शिकार तिथे साप. साप आपल्या शिकारीचा पाठलाग करत गाड्या, मशिन्स आणि पार्किंग क्षेत्रात प्रवेश करतात.
कोईम्बतूरच्या 'वाइल्डलाइफ अँड नेचर कन्झर्वेशन ट्रस्ट'च्या संशोधनातूनही हीच बाब समोर आली आहे.
हवामान बदलले की साप बाहेर पडण्याचे आणि त्यांच्या रेस्क्यूचे प्रमाण खूप वाढते.
अशा दिवसांत स्वतःचा जीव वाचवण्यासाठी साप मानवाने तयार केलेल्या अडगळीच्या जागा किंवा इलेक्ट्रॉनिक मशिन्सच्या आसपासचा परिसर आपल्या निवासासाठी निवडतात असे या अभ्यासात स्पष्ट झाले आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)


























