You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मुंबईसह कोकणात पावसाची जोरदार हजेरी, मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साठलं
अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर राज्यात पावसाने दमदार हजेरी लावली. मुंबई शहरात काही ठिकाणी 300 मिमी पर्यंत पावसाची नोंद झाली आहे. शहरातील विविध भागांमध्ये 200 मिमी हून अधिक पावसाची नोंद झाल्याचे बृहन्मुंबई महानगर पालिकेने सांगितले.
पहिल्याच पावसानंतर मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साठल्याचं दिसत आहे.
महाराष्ट्रात आज 24 जून रोजी पावसाची मोठी तफावत दिसून आली आहे. पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या किनारपट्टी जिल्ह्यांमध्ये जोरदार ते अतिवृष्टीची नोंद झाली असताना, अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्ह्यात मात्र पाऊस अत्यंत मर्यादित राहिला आहे.
हवामान खात्याने (IMD) पुढील 3 तासांसाठी महत्त्वाचा इशारा जारी केला आहे. रायगड, रत्नागिरी आणि पालघर जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट देण्यात आला असून काही ठिकाणी मुसळधार ते अतीवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच मुंबई आणि ठाणे जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
पालघर जिल्ह्यात काही भागांत अतिवृष्टी झाली असून वसई येथे 293 मिमी इतका मुसळधार पाऊस नोंदवण्यात आला. पालघर कृषी क्षेत्रात 180 मिमी, तर विक्रमगड (24 मिमी) आणि वाडा (23 मिमी) येथे तुलनेने कमी पाऊस झाला.
रायगड जिल्ह्यातही जोरदार पावसाची नोंद झाली आहे. पेण येथे 160 मिमी, पनवेलमध्ये 147.2 मिमी, उरणमध्ये 135 मिमी, तर तळा (174 मिमी) आणि म्हसळा (173 मिमी) येथेही मुसळधार पाऊस झाला. मुरुड (85 मिमी), महाड (98 मिमी) आणि पोलादपूर (129 मिमी) या भागांतही चांगला पाऊस झाला आहे.
कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्येही जोरदार पावसाची नोंद झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात मंडणगड येथे 174 मिमी, दापोली 157 मिमी, लांजा 111 मिमी, तर संगमेश्वर 102 मिमी पावसाची नोंद झाली. सिंधुदुर्गमध्ये वैभववाडी (85 मिमी), कणकवली (82 मिमी) आणि दोडामार्ग (73 मिमी) येथे चांगला पाऊस झाला आहे.
तर दुसरीकडे अहिल्यानगर जिल्ह्यात पावसाचे चित्र अत्यंत निराशाजनक आहे. संगमनेर येथे 25 मिमी पाऊस झाला असला तरी बहुतांश तालुक्यांमध्ये पाऊस अत्यल्प राहिला. कर्जत आणि जामखेड येथे केवळ 1 मिमी, कोपरगाव 2 मिमी, तर अकोले (7 मिमी) आणि नेवासा (15 मिमी) येथेही कमी पावसाची नोंद झाली.
ठाणे जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस नोंदवण्यात आला असून ठाणे शहरात 60 मिमी, मुरबाड 56 मिमी, भिवंडी 55 मिमी, तर शहापूर 42 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
मुंबईत 23 जूनरोजी झालेल्या पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचले असून यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक खोळंबल्याचंही चित्र दिसून येत आहे. गेल्या चोवीस तासांत मुंबईत दोनशे मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस झाला आहे.
अंधेरी सबवे, हिंदमाता, सायन-माटुंगा या परिसरात पाणी तुंबले. शहरात अनेक ठिकाणी पाणी जमा झाल्याने लोकल सेवा आणि वाहतूक प्रभावित झाली आहे. भारतीय हवामान खात्याने मंगळवारी मुंबई आणि राज्यातील इतर भागात मान्सून आल्याची घोषणा केली.
मुंबईच्या प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात 24 ते 27 जून दरम्यान पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज असून उत्तर कोकणातील बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.
तसेच मध्य महाराष्ट्र, घाट विभाग आणि मराठवाड्यातील काही ठिकाणी पावसाची तीव्रता अधिक असण्याची शक्यता आहे. या संपूर्ण प्रदेशात विजांचा कडकडाट, मेघगर्जनेसह ताशी 40 ते 50 किमी वादळी वाऱ्यांची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.
दरम्यान, पॅसिफिक महासागरात फिलिपिन्सच्या समुद्रात टायफून म्हणजे मेखला हे चक्रीवादळ घोंघावतंय.
हे चक्रीवादळ उत्तरेला जपानकडे सरकण्याची शक्यता असल्याचं जपानच्या हवामानखात्यानं म्हटलं आहे.
या चक्रीवादळापासून भारताला कुठला धोका नाहीये, पण काहीवेळा या प्रदेशातल्या वादळांचा जेट स्ट्रीमवर आणि मान्सूनच्या प्रवाहावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे या वादळांवर नजर ठेवणं महत्त्वाचं ठरतं.
दरम्यान, राज्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची नोंद होत असली तरी, बहुतांश भागात हवामान कोरडे आहे. यावर्षी 6 जून रोजी कोकण प्रदेशात मान्सूनचे आगमन झाले.
साधारणपणे, मान्सून 15 ते 20 जूनच्या सुमारास राज्याच्या बहुतांश भागात पोहोचतो. परंतु, यावर्षी, जून महिना संपत आला तरी राज्यात समाधानकारक पातळीवर पावसाची नोंद झालेली नाही.
मात्र, 21 जूनपासून हवामानाचे स्वरूप बदलत असून, मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी परिस्थिती अनुकूल असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.