You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मुंबईत लोकलचा दरवाजा बंद करण्यावरून वाद, 22 वर्षीय तरुणाची चाकूनं हत्या; पोलिसांनी काय सांगितलं?
- Author, अल्पेश करकरे
- Role, बीबीसी मराठीसाठी
- Published
- वाचन वेळ: 4 मिनिटे
मुंबईत धावत्या लोकल ट्रेनमध्ये हत्येची घटना घडलीय. मयंक लोहार या 22 वर्षीय तरुणावर चाकूने हल्ला केला आणि त्यात मयंकचा मृत्यू झाला.
अंधेरी ते बोरीवली रेल्वेस्थानकांदरम्यान 23 जूनच्या रात्री 10 वाजण्याच्या सुमारास धावत्या लोकल ट्रेनमध्ये ही घटना घडली.
मुसळधार पाऊस सुरू असल्यानं लोकलच्या डब्याचा दरवाजा बंद करण्याच्या वादातून हत्या झाल्याची माहिती पोलिसांनी दिलीय.
रोशन सुवर्ण असं आरोपीचं नाव असून, तो 30 वर्षीय आहे. हत्या केल्यानंतर बोरिवली स्थानकावर फलाट क्रमांक 6 वर ट्रेन पूर्णपणे थांबण्यापूर्वीच रोशन गाडीतून उतरला आणि घटनास्थळावरून पळून गेला.
त्यानंतर, आज आज (24 जून) पोलिसांनी आरोपी रोशन सुवर्ण याला कुर्ल्यातून अटक केली.
आरोपी रोशन हा कुर्ल्याहून उत्तर प्रदेशला पळण्याच्या तयारीत होता. त्याचवेळी कुर्ला रेल्वेस्थानकात जीआरपी पोलिसांनी त्याला अटक केली, अशी माहिती बोरिवली जीआरपी पोलिसांनी दिली.
नेमकं काय घडलं?
23 जून 2026 रोजी चर्चगेट-नालासोपारा फास्ट लोकलमध्ये ही चाकूहल्ल्याची घटना घडली.
या घटनेती मृत्यूमुखी पडलेला मयंक लोहार आणि आरोपी रोशन सुवर्ण हे दोघेही अंधेरी स्थानकातून लोकलमध्ये चढले होते. ते प्रथम श्रेणीच्या एकाच डब्यातून प्रवास करत होते.
बाहेर मुसळधार पाऊस पडत होता. त्यामुळे लोकलचा दरावाजा बंद करण्यावरून या दोन्ही प्रवाशांमध्ये वाद झाला.
या वादामध्येच आरोपी रोशन सुवर्णने मयंक लोहार या तरूणावर चाकूने हल्ला केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री 11 वाजून 4 मिनिटांनी गाडी बोरिवली स्थानकावर दाखल झाली.
त्यानंतर 11 वाजून 12 मिनिटांनी आरपीएफ (RPF) आणि जीआरपी (GRP) चे कर्मचारी संबंधित डब्यात पोहोचले आणि त्यांनी जखमी मयंक लोहारला बाहेर काढून तातडीच्या वैद्यकीय उपचारांसाठी हलवण्यात आलं.
मात्र, 'इमर्जन्सी मेडिकल रूम' (EMR) मधील डॉक्टरांनी मयंक लोहारची तपासणी केली आणि तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केलं.
या घटनेचा तपास 'गव्हर्नमेंट रेल्वे पोलीस' (GRP) करत आहेत.
सीसीटीव्ही फुटेज आणि इतर संबंधित पुरावे त्वरित ताब्यात घेऊन तपास यंत्रणांकडे सोपवण्यात आले आहेत.
मयंकची मावशी आणि बहिणीने काय सांगितलं?
ट्रेनमध्ये मृत्यू झालेल्या मुलाची मावशी तुळशी सोनार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, "माझा भाचा मयंक ट्रेनमधून येत होता. तेव्हा ट्रेनमध्ये पाऊस आतमध्ये येतोय, दार बंद करा असं सर्वजण सांगत होते. मयंकने दरवाजा बंद केला. तर हा गुंड त्याला बोलला की, दार का बंद करतोय? यावरून त्याने शिव्या द्यायला सुरुवात केली आणि मग नंतर थेट चाकू त्याच्या पोटात घुसवला. त्यानंतर तो लगेचच खाली पडला आणि त्याचा मृत्यू झाला."
मयंकच्या बहिणीनं सांगितलं की, "कांदिवली ते बोरिवलीच्या दरम्यान कुठेतरी हे घडलंय. आम्हाला बारा-सव्वाबाराच्या सुमारास पोलिसांकडून कॉल आला."
"एखादा गुंड असं चाकू मारून हत्या करत असेल तर तेव्हा बाकी लोक काय करत होते? त्यांनाही कुणी मुलगा असेल, भाऊ असेल."
"हे काही इथंच संपणार नाहीये. आज हे माझ्या भावासोबत घडलंय. उद्या ते तुमच्याही भावासोबत घडेल."
माझ्या भावाला न्याय मिळायला हवा. त्या गुंडाला शिक्षा व्हायला हवी, असंही ती म्हणाली.
पोलिसांनी काय सांगितलं?
बोरीवली रेल्वेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता खुपरेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, "मुंबई लोकलमध्ये मंगळवारी (23 जून) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. चाकूहल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. मृताची ओळख मयंक लोहार अशी पटली आहे."
कांदिवली आणि बोरिवली स्थानकादरम्यान मुसळधार पाऊस सुरू होता. याच वेळी लोकलचा दरवाजा बंद करण्यावरून प्रवाशांमध्ये वाद झाला.
वेस्टर्न रेल्वे पोलिसांच्या माहितीनुसार, वादानंतर काही प्रवाशांनी आरोपीला मारहाण केली.
मारहाणीमुळे संतापलेल्या आरोपीने आपल्या बॅगमधून चाकू काढला आणि मयंक लोहार यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात मयंक यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपी लोकलमधून पळून गेला.
रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मयंक यांना पाहून प्रवाशांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. रेल्वे पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.
बोरीवली जीआरपी पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.
यंत्रणा पूर्णपणे सुरक्षित - रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी
रेल्वेचे पीआरओ विनीत अभिषेक यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं की, "ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. याबाबत माहिती मिळताच, आम्ही तातडीनं पीडित मुलाची मदत केली. रेल्वे स्टेशनवर आल्या आल्या तीन मिनिटांच्या आत आरपीएफ (RPF) आणि जीआरपी (GRP) चे जवान डब्यात पोहोचले आणि त्यांनी जखमी प्रवाशाला मदत केली. वैद्यकीय पथक, स्ट्रेचर आणि हमाल डब्यापर्यंत पोहोचले."
पुढे ते म्हणाले की, "मी प्रवाशांना सांगू इच्छितो की, आपली यंत्रणा पूर्णपणे सुरक्षित आहे. तुमचा प्रवास सुखद रहावा, यासाठी आम्ही शक्य ते सर्व प्रयत्न करत असतो. तुम्हाला कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागू नये, यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)