अभिषेक बॅनर्जींना मारहाण, अंगावर अंडी फेकली; टीएमसी खासदारांच्या आरोपावर भाजपने दिली 'ही' प्रतिक्रिया

फोटो स्रोत, ANI
तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि लोकसभेचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांना पश्चिम बंगालमधील सोनारपूरमध्ये मारहाण करण्यात आल्यांच आणि त्यांच्यावर अंडी फेकण्यात आल्याचं प्रकरण समोर आलं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निवडणुकीनंतर सोनारपूर परिसरात झालेल्या हिंसाचाराचा फटका बसलेल्या कुटुंबांना भेटण्यासाठी अभिषेक बॅनर्जी शनिवारी (30 मे) गेले होते. त्यावेळेस त्यांच्यावर हल्ला झाला.
अभिषेक बॅनर्जी यांनी या घटनेसाठी भाजपा जबाबदार असल्याचं म्हटलं आहे. तर राज्यातील भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री सुकांत मजूमदार या घटनेचा निषेध करत म्हणाले की 'पश्चिम बंगालच्या जनतेमध्ये टीएमसीविरोधात संताप आहे.'
टीएमसीनं या हल्ल्याचा एक व्हीडिओ पोस्ट केला होता. पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी हा व्हीडिओ शेअर करत एक्सवर लिहिलं, "राज्यकर्तेच मारेकरी झाले आहेत. मला भाजपाची लाज वाटते."
कोलकात्यातून प्रकाशित होणाऱ्या 'द टेलीग्राफ' या वृत्तपत्रानुसार, "अभिषेक बॅनर्जी यांच्यावर काही अज्ञात व्यक्तींनी दगड, बूट आणि अंडी फेकली. काहीजणांनी त्यांना मारहाण करण्याचा देखील प्रयत्न केला. यादरम्यान जमाव 'चोर-चोर' असं ओरडत होता."
या घटनेनंतर अभिषेक बॅनर्जी यांना पोलीस संरक्षणात तिथून सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं. अभिषेक बॅनर्जी यांनी त्यांच्यावर झालेल्या या जीवघेण्या हल्ल्याविरोधात न्यायालयात जाणार असल्याचं म्हटलं आहे.
तर टीएमसीसह विरोधी पक्षांनी या घटनेचा निषेध केला आहे.
एएनआय या वृत्तसंस्थेच्या व्हीडिओमध्ये स्पष्टपणे दिसतं आहे की अभिषेक बॅनर्जींना जमावानं घेरलं आहे आणि पोलीस कर्मचारी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत.
पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर 25 दिवसांनी तृणमूल काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीसांचा हा पहिलाच सार्वजनिक कार्यक्रम होता.
तर दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातील सोनारपूर नगरपालिकेतील विवेकानंदनगर भागातील वॉर्ड क्रमांक 9 मध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार झाला होता. त्यात संजू कर्मकार यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या कुटुंबाला भेटण्यासाठी अभिषेक बॅनर्जी गेले होते.

फोटो स्रोत, ANI
शनिवारीच (30 मे) राज्याच्या सीआयडीनं अभिषेक बॅनर्जी यांना 'बनावट स्वाक्षरी' प्रकरणात चौकशीसाठी समन्स बजावलं होतं.
या घटनेबद्दल भाजपाचे नेते सुकांत मजूमदार एएनआयला म्हणाले, "मी या घटनेचा निषेध करतो. मी लोकांना आवाहन करतो की त्यांनी कायदा हाती घेऊ नये. बंगालच्या जनतेमध्ये टीएमसी आणि अभिषेक बॅनर्जी यांच्याविरोधात संताप आहे. आपल्याला बंगालमध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. आपल्याला बंगालचं राजकारण हिंसाचारमुक्त करायचं आहे. मी जनतेला शांतता आणि कायदा व सुव्यवस्था राखण्याचं आवाहन करतो."
अभिषेक बॅनर्जी काय म्हणाले?
अभिषेक बॅनर्जी यांनी, काही लोकांना त्यांना 'मारायचे आहे' आणि हा हल्ला करणारा जमाव 'भाजप पुरस्कृत' होता, असे आरोप केले आहे.
"त्यांना मला मारायचे आहे. त्यांनी विटा, अंडी आणि दगडफेक केली. हे काय चाललंय ते मला सांगा. शिवाय आजूबाजूला उभे असलेले परिसरातील लोक आम्हाला भेटत आहेत आणि प्रेम आणि सन्मान देत आहेत," असंही ते म्हणाले.
"आमच्याकडे सर्व व्हीडिओ पुरावे आहेत. जवळच एक कम्युनिटी हॉल आहे. सकाळी 11 वाजेपासून दगडफेक करण्यासाठी गुंड ठिकाणी ठाण मांडून बसले होते. माझ्या चष्म्याची अवस्था बघा. त्यांनी माझ्या डोळ्यावर वीट मारून जखमी केलं आहे, मला डोळा उघडता येत नाहीये.
त्यांनी माझ्या पाठीवर, छातीवर, हातांवर आणि पायांवर मारहाण केली. मी हेल्मेट घातले होते, नसता माझे डोके फुटले असते. तुम्ही माझं शरीर खाली पाडू शकता, पण माझा निर्धार पक्का आहे. माझी जिद्द आणि उत्साह अजूनही कायम आहे हे शीर कधीही झुकणार नाही," असंही ते म्हणाले.

फोटो स्रोत, ANI
अभिषेक बॅनर्जी यांनी राज्य सरकारवर पुरेशी सुरक्षा व्यवस्था न पुरवल्याचा आरोप केला आहे.
"माझ्याबरोबर तैनात असलेले दोन सुरक्षा अधिकारी या घटनेबद्दल त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देत आहेत, तरीही इथे कुमक पोहोचत नाही. त्यामुळं हे स्पष्ट आहे की वरिष्ठ अधिकाऱ्यांची इच्छा ही संपूर्ण घटना अशीच चालू राहावी अशी आहे. म्हणूनच राज्य सरकारकडून ती थांबवण्यासाठी कोणताही प्रयत्न केला जात नाही," असंही ते म्हणाले.

फोटो स्रोत, ANI
"हे स्पष्ट आहे की जसा इथं एक मृत्यू झाला आहे, तसेच आणखी 2-4 मृत्यू झाले तरच त्यांना शांती मिळेल. त्यांना जे करायचे आहे ते करू द्या. आमच्याकडे सर्व काही रेकॉर्डवर आहे. आम्ही न्यायालयात जाऊ. मी हे प्रकरण लढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जाईन.
त्यांना मला मारायचे आहे. त्यांना मारू द्या. कदाचित माझा मृतदेह इथून जाईल, पण मी इथून जाणार नाही," असं त्यांनी म्हटलं.
जोपर्यंत कुमक येत नाही, तोपर्यंत मी संजूच्या वृद्ध आई-वडिलांना या अवस्थेत सोडणार नाही. मी माझ्या प्रतिनिधींना पुन्हा एकदा पोलिसांशी संपर्क साधायला सांगेन, असंही अभिषेक बॅनर्जींनी म्हटलं.
सीआयडीने पाठवले समन्स
दुसरीकडे, पश्चिम बंगाल सीआयडीनं शनिवारी अभिषेक बॅनर्जी यांना चौकशीसाठी हजर राहण्यास सांगणारी नोटीस पाठवली.
विधानसभा सचिवालयाला पाठवलेल्या एका पत्राच्या चौकशीच्या संदर्भात ही नोटीस जारी करण्यात आली आहे. त्यात विरोधी पक्षनेते म्हणून शोभनदेव चट्टोपाध्याय यांच्या समर्थनार्थ पक्षाच्या आमदारांच्या बनावट सह्या वापरल्याचा आरोप आहे.
पीटीआय वृत्तसंस्थेनुसार , ही नोटीस म्हणजे एक समन्स आहे. त्याअंतर्गत अभिषेक यांना सोमवारी दुपारी सीआयडीच्या भवानी भवन मुख्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
हे समन्स कालिघाट रोडवरील त्याच्या घरी देण्यात आले. या घटनेवर टीएमसी आणि इतर विरोधी पक्षांनी प्रतिक्रिया दिली आहे.
टीएमसीनं एक निवेदन जारी करत म्हटलं की, "आमचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांच्यावर झालेला आजचा हल्ला, या निर्लज्ज राजवटीत कायदा आणि सुव्यवस्था किती झपाट्याने बिघडली आहे याची आणखी एक आठवण करून देतो.
विरोधी पक्षाच्या विद्यमान खासदाराला दिवसाढवळ्या लक्ष्य केले जाऊ शकते, तर सामान्य नागरिकांसाठी काय आशा उरली आहे? ही भाजपची लोकशाही आहे का? पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या 'सुशासना'ची सतत प्रशंसा करतात, ते हेच आहे का?"

फोटो स्रोत, ANI
निवेदनात म्हटले आहे की, "हिंसाचार, दहशतीचं राजकारण आणि राजकीय गुंडगिरी ही भाजप राजवटीची वैशिष्ट्ये बनली आहेत. जबाबदार असलेल्यांना आज राजकीय संरक्षण मिळत असेल, पण ते जबाबदारीतून कायमचे सुटू शकत नाहीत. बंगाल पाहत आहे. भारत पाहत आहे. जग पाहत आहे."
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी या घटनेचा निषेध केला. "सोनारपूरमध्ये खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्यावर झालेल्या धक्कादायक हल्ल्याचा मी तीव्र शब्दांत निषेध करतो," असं ते म्हणाले.
त्यांनी X वर लिहिलं की, "ते राज्यातील निवडणुकीनंतरच्या हिंसाचाराने बाधित झालेल्या कुटुंबांना भेटायला गेले होते. प्रमुख विरोधी नेत्याला पुरेसे पोलीस संरक्षण न मिळणे, हे स्पष्टपणे दर्शवतं की भाजप सूड आणि दडपशाहीचे राजकारण करत आहे."
"राजकीय मतभेद हे कोणत्याही प्रकारच्या हिंसाचाराचे कारण असू शकत नाहीत," असं म्हणत खरगे यांनी पश्चिम बंगाल सरकार आणि केंद्र सरकारकडे सर्व विरोधी नेत्यांच्या सुरक्षेची खात्री करण्याची मागणी केली.
समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी या घटनेचा निषेध केला आहे.
त्यांनी X वर लिहिलं की, "अभिषेक बॅनर्जी यांच्यावर प्राणघातक हल्ला घडवून आणून, बंगालमधील गोंधळलेल्या भाजप सरकारने हे सिद्ध केले आहे की ते द्वेषपूर्ण, नकारात्मक आणि हिंसक राजकारण करण्याशिवाय दुसरे काहीही करू शकत नाहीत. अशा संवेदनशील वातावरणात पोलिसांच्या उपस्थितीचा अभाव एका मोठ्या कटाकडे बोट दाखवतो."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)


























