जखमी विद्यार्थ्यांची राहुल गांधी, जेपी नड्डांनी घेतली भेट, तर संजय राऊतांसह खासदार पोहोचले आंदोलन स्थळी

अभिजीत दिपकेंनी मागितली समर्थकांची माफी, सकाळपासून भर पावसात जंतर-मंतरवर समर्थक गोळा होण्यास सुरुवात
Published
वाचन वेळ: 6 मिनिटे

'कॉक्रोच जनता पार्टी'च्या समर्थकांनी सोमवारी संसदेवर मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला आणि पोलिसांनी त्याला ठिकठिकाणी रोखण्यासाठी प्रयत्न केले. सोमवारी दिवसभर चाललेल्या या आंदोलनात पोलिसांनी अनेक ठिकाणी लाठीचार्ज आणि अश्रूधुराचा वापर करून कारवाई केल्याचं पाहायला मिळालं.

प्रचंड संतापात असलेल्या तरुणाईच्या गर्दीला अटकाव करण्यासाठी पोलीस आणि सुरक्षा दल प्रयत्न करत होते. तर तरुण वारंवार मागे सरकल्यानंतर पुन्हा संसदेच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करत होते.

दिल्लीच्या मध्यवर्ती भागात पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी लाठीमार केला आणि अश्रुधूराचा वापर केला. अनेक आंदोलकांनी लाठीमारात जखमी झाल्याचा दावा केला.

त्याचबरोबर तरुणांनी केलेल्या हिंसेमध्ये पोलीसही जखमी झाल्याचं पोलिसांनी सांगितलं. पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी नियमानुसार कारवाई केल्याचं सांगितलं आहे.

दरम्यान, रिमझिम पाऊस असतानाही सकाळपासून जंतर मंतरवर पुन्हा समर्थक गोळा होत असल्याचं पाहायला मिळत आहे.

दरम्यान, मंगळवारी सकाळी जंतर मंतरकडे येणाऱ्या काही रस्त्यांवर पोलिसांनी प्रवेश बंद केल्याची तक्रार अभिजीत दिपके यांनी पोलिस अधिकाऱ्यांकडे केली.

यावेळी अभिजीत दिपके यांनी पोलिस अधिकाऱ्यांना याबाबत जाब विचारल्याचं पाहायला मिळालं. विद्यार्थ्यांना निर्घृणपणे मारूनही आता पुन्हा पोलिसांकडून का त्रास दिला जात आहे? अशी विचारणा अभिजीत यांनी केली.

जे.पी नड्डांशी चर्चा म्हणजे पूर्णपणे वेळ वाया गेला असल्याचं अभिजीत दिपकेनं एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना म्हटलं.

तिकडे आमच्या प्रतिनिधींना चर्चा करण्यासाठी बोलावलं होतं आणि इकडं मुलांना मारलं जात होतं. आता आमच्याकडून कोणीही सरकारशी चर्चा करायला जाणार नाही, चर्चा करायची असेल तर सरकारला इथं यावं लागेल", असं अभिजीत दिपके यांनी म्हटलं.

कोण-कोण कुठे पोहोचले?

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

शिवसेना उद्धव बाळासहेब ठाकरे पक्षाच्या खासदारांनी जंतर-मंतर याठिकाणी जाऊन आंदोलकांची भेट घेतली. अभिजीत दिपके आणि सोनम वांगचूक यांच्या आंदोलनाला राजकारणाच्या पलिकडे जाऊन पाठिंबा दिल्याचं संजय राऊत म्हणाले.

दिल्लीच्या रस्त्यांवर काल झालेला प्रकार हुकूमशाहीलाही लाजवणारा होता, असं संजय राऊत यांनी म्हटलं. नरेंद्र मोदी आणि अमित शाह तरुणांचं हे आंदोलन चिरडून टाकू शकणार नाहीत, असंही ते म्हणाले.

दरम्यान, केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांनी आरएमएल हॉस्पिटलमध्ये जाऊन जखमी आंदोलकांची भेट घेतली. तसंच याठिकाणी त्यांची डॉक्टरांची एक बैठक घेतल्याचंही पाहायला मिळालं.

त्याशिवाय विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही आरएमएल हॉस्पिटलमध्ये जाऊन जखमी आंदोलकांची भेट घेतली. जे काही घडलं त्यासाठी मोदींनी साधी माफीही मागितली नाही. विद्यार्थी शिक्षणाच्या मुद्द्यावर आंदोलन करत आहेत. पंतप्रधान यावर मौन का आहेत. त्यांनी विद्यार्थ्यांची माफी मागायला हवी, असं राहुल गांधी म्हणाले.

"देशातील तरुणांबरोबर वर्तन करण्याची ही पद्धत नाही. तरुणांना संधी शिल्लक नाहीत. सर्व दारं बंद आहेत, अशात स्पर्धा परीक्षा हाच पर्याय त्यांच्यासमोर राहतो. तरुण त्यांना भविष्यच शिल्लक राहिलं नसल्याचं म्हणत आहेत. धर्मेंद्र प्रधान, गृह मंत्री आणि पंतप्रधानांनीही राजीनामा द्यायला हवा."

मी माफी मागतो-दिपके

अभिजीत दिपके यांनी एक्सवर एक पोस्ट करत समर्थकांची माफी मागितली आहे.

"मी समर्थकांची, विशेषतः ज्या मुलींना पुरुष पोलीस अधिकाऱ्यांनी निर्घृणपणे मारहाण केली, त्यांची माफी मागतो. दिल्ली पोलिसांच्या अमानवीय कारवाईपासून तुमचं संरक्षण करण्यासाठी कदाचित आम्हाला आणखी चांगले प्रयत्न करता

20 हून अधिक विद्यार्थ्यांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या धर्मेंद्र प्रधानला वाचवण्यासाठी, सरकार आणखी अनेक तरुण विद्यार्थ्यांचे रक्त सांडायला तयार होते. जर तुम्ही जखमी असाल आणि हे पाहत असाल, तर कृपया मला DM (थेट मेसेज) करा. मला तुमच्याशी वैयक्तिकरित्या बोलायचे आहे आणि माफी मागायची आहे. आम्ही तुमच्या सर्वांसाठी लढत राहू," असं अभिजीत दिपकेनं म्हटलं आहे.

सुरक्षा दलांच्या कारवाईची मानवाधिकार संघटनांकडून दखल

भारतीय सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईची दखल 'ह्युमन्स राइट्स वॉच' या आंतराराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेनी घेतली आहे.

आपल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले, "भारताची राजधानी दिल्लीत अलीकडच्या काळातील सरकारविरोधातील सर्वात मोठ्या आंदोलनांपैकी एका आंदोलनावर सुरक्षा यंत्रणांनी कठोर कारवाई सुरू केली आहे."

"अधिकाऱ्यांनी पोलिसांना संयम बाळगण्याचे निर्देश द्यावेत, आंदोलनस्थळांच्या परिसरातील मोबाईल इंटरनेट सेवा तातडीने पूर्ववत करावी आणि लोकांना शांततापूर्ण पद्धतीने आंदोलन करण्याचा अधिकार सुरक्षित असल्याची खात्री द्यावी."

ह्युमन्स राइट्स वॉचचे निवेदन

फोटो स्रोत, HRW

फोटो कॅप्शन, ह्युमन्स राइट्स वॉचचे निवेदन

आंदोलनादरम्यान, सुरक्षा दलांकडून लाठीचा आणि अश्रुधुराचा वापर करण्यात आल्याचे आरोप होत आहेत याबाबत चौकशी करण्यात यावी असे ह्युमन्स राइट्स वॉचच्या डेप्युटी एशिया डायरेक्टर मीनाक्षी गांगुली यांनी म्हटले आहे.

कोणत्याही परिस्थितीत आंदोलन सुरू राहील - दिपके

शिक्षण व्यवस्थेत आमुलाग्र बदल आणि नीट पेपर फुटी प्रकरणाची जबाबदारी म्हणून केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत 'कॉक्रोच जनता पार्टी' (CJP) या आंदोलनातील हजारो समर्थकांनी सोमवारी संसदेकडं हा मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला होता.

दिवसभराच्या गोंधळानंतर पुन्हा रात्री अनेक आंदोलक जंतर मंतरवर परतले, अभिजीत दिपके यांनीही आंदोलन कोणत्याही परिस्थितीत सुरू राहणार असं म्हटलं आहे.

आता आज मंगळवारी संसदेच्या अधिवेशनामध्ये याचे पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

आंदोलक पुन्हा जंतर-मंतरवर?

पोलिसांनी केलेल्या कारवाईच्या जोरावर सायंकाळपर्यंत वेगवेगळ्या चौकांमध्ये असलेली आंदोलकांची गर्दी हटलेली पाहायला मिळाली होती. मात्र अभिजीत दिपके ज्या ट्रकमधून निघाले होते, तो ट्रक जंतर मंतरजवळ उभा होता आणि त्याठिकाणी आंदोलकही जमलेले पाहायला मिळाले.

दुसरीकडे जंतर-मंतरमध्ये आंदोलक ज्याठिकाणी पूर्वी आंदोलन करत होते त्याठिकाणचे स्टेज आणि इतर गोष्टी मात्र पूर्णपणे उद्ध्वस्त झालेल्या होत्या असं पाहायला मिळालं.

त्याठिकाणची अवस्था पाहता पुन्हा आंदोलकांना याठिकाणी आंदोलन करू शकतील असं वाटत नव्हतं. पण सायंकाळी शेवटी अनेक तरुण पुन्हा जंतर मंतर परिसरातच आंदोलन करत असल्याचं पाहायला मिळालं. रात्री उशिरापर्यंत याठिकाणी आंदोलक याठिकाणी होते असं पाहायला मिळालं.

कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन, 70 जण ताब्यात घेतल्याची पोलिसांची माहिती, जखमींबाबत काय म्हटलं?

फोटो स्रोत, Getty Images

अभिजीत दिपके यांच्यासह कॉक्रोच जनता पार्टीच्या सदस्यांनी आंदोलन अजूनही सुरू असून ते सुरुच राहणार असवल्याचं सांगितलं. पोलिसांच्या कारवाईत जखमी झालेल्या एका तरुणीची अभिजीत दिपके यांनी मध्यरात्रीनंतर रुग्णालयात जाऊन भेट घेतली. या तरुणीची स्थिती गंभीर असल्याचं त्यांनी ट्विट करून सांगितलं.

तर सीजेपीचे प्रवक्ते सौरभ दास यांनी आंदोलन सुरूच राहणार असल्याचं जंतर-मंतर याठिकाण पत्रकारांशी बोलताना म्हटलं. पण सोनम वांगचूक यांची प्रकृती खालावत आहे, त्यामुळं त्यांना वाचवणं गरजेचं असल्याचं त्यांनी म्हटलं.

वांगचूक उपोषणावर ठाम आहेत, ते सोडवणं गरजेचं आहे. वांगचूक यांना गमावलं तर ते मोठं पाप ठरेल, त्यामुळं त्यांना वाचवण्यासाठी काहीतरी विचार करणं गरजेचं असून काय करता येईल हे पाहावं लागेल, असंही सौरभ दास यांनी म्हटलं.

जखमींचा नेमका आकडा किती?

पोलिसांनी संसदेकडं निघालेल्या तरुणांना ठिकठिकाणी अडवत मागे सरकवण्याचा प्रयत्न केला. या सगळ्यामध्ये आंदोलक तरुण आणि पोलिसांमध्ये मोठ्या प्रमाणावर संघर्ष झाल्याचं सोमवारी पाहायला मिळालं.

बीबीसी मराठीच्या प्रतिनिधींनी या आंदोलनाचं वार्तांकन करत असताना हा संघर्ष अगदी जवळून पाहिल्याचं सांगितलं. विशिष्ट ठिकाणाहून पोलीस आंदोलकांना अश्रूधूर आणि लाठीचार्ज करत मागे ढकलत होते. पण पुन्हा काही क्षणांत मागे हटलेले तरुण त्याच आवेशात पुढं सरकण्याचा प्रयत्न करत होते आणि यातून सुरक्षारक्षक आणि आंदलोकांमध्ये संघर्ष झाल्याचं पाहायला मिळालं.

कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन, 70 जण ताब्यात घेतल्याची पोलिसांची माहिती, जखमींबाबत काय म्हटलं?

फोटो स्रोत, Getty Images

दिल्लीतील प्रामुख्याने जंतर मंतरच्या आसपासचा परिसर, तिथून संसदेकडं जाणारा संसद मार्ग, कॅनॉट प्लेस परिसर, रिगल सिनेमाच्या जवळचा भाग याठिकाणी झालेला हा संघर्ष बीबीसींच्या प्रतिनिधींनी पाहिला.

काही आंदोलक जखमी अवस्थेत जंतर-मंतरकडे परतले, तर काहींना त्यांच्या सहकाऱ्यांनी उचलून आणलं. दिल्लीच्या मध्यवर्ती भागातील काही ठिकाणी प्रशासनाने मोबाईल इंटरनेट सेवाही बंद केल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळं अनेकांना मेसेजिंग अॅप्स आणि सोशल मीडियाचा वापर करण्यात अडचणी आल्या.

पोलिसांनी यासंघर्षात 60 आंदोलक जखमी झाल्याचं म्हटलं आहे. पण बीबीसी मराठीच्या प्रतिनिधींनी जे पाहिलं त्यावरून प्रत्यक्षात जखमींची संख्या यापेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे.

70 जण ताब्यात?

दिवसभराच्या संपूर्ण घटनाक्रमानंतर दिल्ली पोलिसांनी रात्री एक प्रसिद्धी पत्रक जाहीर करत दिवसभरातील घटना आणि कारवाईबाबत माहिती दिली. यामध्ये आंदोलकांबरोबर पोलीसही जखमी झाल्याचं सांगण्यात आलं. तर 70 आंदोलकांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई केली जात असल्याचंही सांगण्यात आलंय.

"सीजेपीच्या आंदोलनादरम्यान आंदोलकांनी बेशिस्त, आक्रमक आणि हिंसक वर्तन केले. पोलिसांनी वारंवार इशारे देऊन तसेच कायदेशीर आदेशांचे पालन करण्यास सांगूनही आंदोलकांनी ते मानण्यास नकार दिला आणि लागू असलेल्या प्रतिबंधात्मक आदेशांचे जाणीवपूर्वक उल्लंघन केले. पोलिसांवर दगडफेक, बॅरिकेड्स तोडण्याचा प्रयत्न, गाड्यांची तोडफोड केली," असं पोलिसांनी म्हटलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या संघर्षात 118 हून अधिक पोलिस कर्मचारी जखमी झाले. तर जखमी आंदोलकांनी संख्या 60 असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.

कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन, 70 जण ताब्यात घेतल्याची पोलिसांची माहिती, जखमींबाबत काय म्हटलं?

फोटो स्रोत, Getty Images

या प्रकरणी सुमारे 70 आंदोलकांना ताब्यात घेण्यात आलं आहे. त्यांच्याविरोधात योग्य ती कायदेशीर कारवाई सुरू असून, भारतीय न्याय संहिता आणि इतर कायद्यांतील दंगल, शासकीय कर्मचाऱ्यांवर हल्ला, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान आणि आंदोलनादरम्यान घडलेल्या इतर गुन्ह्यांशी संबंधित कलमांनुसार एफआयआर नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं सांगण्यात आलं.

राजधानीत कायदा व सुव्यवस्था कायम राखणे आणि सर्व नागरिकांच्या सुरक्षिततेची खात्री करणे ही पोलिसांची प्राथमिक जबाबदारी आहे. कायद्याचे उल्लंघन करून हिंसक कारवायांमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक व्यक्तीविरोधात कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल, असं दिल्ली पोलिसांनी यात म्हटलं आहे.

वांगचूक म्हणाले, उपोषण सुरुच राहणार

दरम्यान सोनम वांगचूक सोमवारी म्हणाले, "शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या तरुणांशी ज्या क्रूरतेने वागले जात आहे, ते पाहून मी माझे उपोषण सुरू ठेवण्याचा निर्णय कायम ठेवला आहे. जोपर्यंत युवा नेत्यांना संसद भवनात जाऊन खासदारांना भेटण्याची किंवा मला इथे रुग्णालयात त्यांना भेटण्याची परवानगी मिळत नाही, तोपर्यंत मी उपोषण सुरूच ठेवेन."

"मला आशा आहे की, त्याआधीच सरकार शिक्षणमंत्र्यांची जबाबदारी निश्चित करेल. चिथावणी मिळूनही तरुणांनी ज्या प्रकारे शांतता राखली आहे, त्याने मी भारावून गेलो आहे. मी सरकार आणि पोलीस दलाला आवाहन करतो की, विद्यार्थ्यांना आज किंवा उद्या संसदेसमोर आपली गाऱ्हाणी मांडण्याची परवानगी देऊन हा प्रश्न सोडवावा."

"मला खात्री आहे की, हे तरुण आंदोलक उद्याही तसाच संयम आणि सहनशीलता दाखवतील, जसा संयम त्यांनी आतापर्यंत दाखवला आहे", असंही त्यांनी नमूद केलं.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.