'उठो... किडनॅपर आ गये' : CJP दिल्ली आंदोलनात मी काय पाहिलं? - ब्लॉग

'उठो... किडनॅपर आ गये' : CJP दिल्ली आंदोलनात मी काय पाहिलं? - ब्लॉग
    • Author, छाया काविरे
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
  • Published
  • वाचन वेळ: 4 मिनिटे

'उठो, किडनॅपर आ गये... किडनॅपर आ गये!', जिवाच्या आकांताने आसामहून आलेला एक तरुण सगळ्यांना झोपेतून उठवत होता. त्याच्या आवाजाने स्टेजखाली झोपलेला मयूर भांबावून जागा झाला.

मयूर सांगतो, "मी सकाळी उठून पाहतोय तर माझ्या आजूबाजूला 300-400 पोलीस आणि सुरक्षारक्षक होते."

दिल्लीच्या जंतर मंतरवर कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनात ज्या दिवशी सोनम वांगचूक यांना हटवलं (18 जुलै) तेव्हा मी रिपोर्टिंग करत असताना मयूर हे सांगत होता.

देशभरातून आंदोलनात आलेले तरुण-तरुणी, पालक यांची स्थिती, अनुभव जाणून घेण्यासाठी दिवस मावळेपर्यंत मी आंदोलनात फिरत होते.

मराठी मीडिया दिल्लीत आपल्यापर्यंत पोहोचलाय हे पाहून महाराष्ट्रातून आलेले अनेक तरुण-तरुणी भेटत होते. भरभरून बोलत होते. त्यातलाच एक चंद्रपूरचा 32 वर्षीय मयूर मालखेडे.

मयूर सांगत होता, "सकाळची 7 ची वेळ होती. आंदोलनातील काही तरुण फ्रेश व्हायला गेले होते, तर रात्रभर घोषणा आणि गाण्यांमुळे थकलेले काही आंदोलक गाढ झोपेत होते".

"पोलिसांसोबत काही बाऊन्सरही होते. त्यांनी बॅरिकेड्स सरकवून ॲम्ब्युलन्स आत घेतली. आम्ही बोलण्यासाठी गेलो तेव्हा पोलिसांनी माझ्यासोबतच्या 5 स्वयंसेवकांची कॉलर पकडून त्यांना ढकललं", असंही मयुरने नमूद केलं.

मयूर हे सांगत असतानाच बऱ्याच वेळेपासून जवळ येऊन थांबलेला 25-26 वयाचा एक तरुण म्हणाला, "वांगचूक सरांना काही इशाराही करता येऊ नये, म्हणून त्यांनी सफेद चादर लावली होती."

आमचं बोलणं सुरू होतं. दुपारच्या उन्हामुळे घामाने भिजलेल्या आमच्या दिशेने सुखःद वाटणारी हवा आली. 35-40 वयोगटातील तो व्यक्ती हातपंखा घेऊन आम्हाला हवा घालत होता.

तो मायेने म्हणाला, "मॅडम, ग्लुकोज नहीं तो लिंबू पाणी पिते रहो, नहीं तो डिहायड्रेशन होगा."

पुढे गेल्यावर एका तरुणाने विचारलं, "ताई, जेवण केलं का तुम्ही?" हा तरुण होता चाळीसगावचा 27 वर्षीय सम्राट सोनवणे. सम्राट आंदोलनाच्या नियोजनाच्या टीममधला एक.

'मुझे मारो...मुझे मारो'

अभिजीत दिपकेवर शाईफेक झाली तेव्हा सम्राट अभिजीतच्या जवळच होता.

तो म्हणाला, "एक महिला गर्दीतून उठून पुढे आली, अभिजीतवर शाई फेकली आणि मोठ्याने 'मारो मुझे, मारो' असं ओरडू लागली."

कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन
फोटो कॅप्शन, कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन

सम्राटशी बोलत असतानाच तिथे जवळच एक घोळका जमला. आंदोलनावर आणि तिथल्या गाण्यांवर एक जण टीका करत होता, तर एक आंदोलक त्याला उत्तर देत होता. तितक्यात पोलिसांनी येऊन वाद घालणाऱ्यांना तिथून निघून जाण्यास सांगितलं.

मी जंतर-मंतरच्या पहिल्या गेटने बाहेर पडले. सायंकाळचे 4 वाजले होते. माझ्या पुढे एक जण हातात स्पीकर घेऊन मागे वळून खुन्नस देत चालला होता.

आधी मला वाटलं माझ्याकडेच रागाने बघतोय की काय. मात्र, नंतर त्याने बाईक काढली आणि गेटसमोर येऊन जोरात 'जय श्रीराम'च्या घोषणा देऊ लागला.

आंदोलनात सहभागी झालेल्या मुली
फोटो कॅप्शन, आंदोलनात सहभागी झालेल्या मुली

मग लगेच तिथे उपस्थित आंदोलकांनी 'जय भीम'चा नारा दिला. काही काळ तणाव निर्माण झाला, पण पोलीस तिथे पोहोचताच बाईकस्वार निघून गेले आणि आंदोलक पुन्हा स्टेजच्या दिशेने परतले.

आंदोलनात महिलांचे प्रमाण कमी आहे का?

या आंदोलनात सुरुवातीला एक प्रश्न वारंवार विचारला जात होता की, आंदोलनात महिलांचे प्रमाण कमी का आहे?

मात्र, गेल्या 3 दिवसांत मी देशभरातून विशेषतः महाराष्ट्राच्या गावखेड्यातून आलेल्या अनेक तरुणी पाहिल्या.

कुणी घरच्यांशी भांडून, तर कुणी ठामपणे सांगून आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.

जंतर मंतर येथील आंदोलन
फोटो कॅप्शन, जंतर मंतर येथील आंदोलन

या तरुणी त्यांच्यासोबतच्या ग्रुपचं नेतृत्व करत होत्या. कोणाच्या हातात डफ होता, तर कुणी गाण्यांनी आणि घोषणांनी वातावरण निर्मिती करत होत्या. आपल्या करिअरबद्दल, जबाबदाऱ्यांबद्दल त्यांना स्पष्टता होती आणि शैक्षणिक व्यवस्थेबद्दल संतापही होता.

अकलूजची वैष्णवी खिलारे म्हणाली, "कोणी आत्महत्या केली तर 'आपलं काय?' असं समजून आपण गप्प बसू नये. उद्या ही वेळ आपल्यावरही येऊ शकते."

नागपूरची एक तरुणी म्हणाली, "आंदोलनात काय होईल याची घरच्यांना काळजी वाटतेच, पण माझ्या भविष्याचीही त्यांना चिंता आहे. म्हणूनच माझे वडील स्वतःहून म्हणाले, की तू या आंदोलनात नक्की जायला हवं."

तर, भंडाऱ्याहून आलेली एक तरुणी म्हणाली, "असंच सुरू राहिलं, तर शिक्षणावरून विश्वासच उडून जाईल."

'आमच्या परिसरातल्या 5 जणांनी आत्महत्या केली'

सायंकाळचे 7 वाजले होते. या तरुणींशी बोलणं सुरू असतानाच एक फोन आला, 'ताई, आम्ही जंतर मंतरच्या गेटवर आहोत. आता आपण बोलू शकतो'.

या आंदोलनासाठी नाशिकहून अनिकेत आणि संदीप गोसावी हे दोघे उच्चशिक्षित भाऊही आले होते. ते आपल्या लहान भावाच्या आठवणी घेऊन आले होते.

जंतर मंतर आंदोलन
फोटो कॅप्शन, जंतर मंतर आंदोलन

अनिकेत आपल्या लहान भावाचे, यशचे फोटो दाखवत सांगत होता, "यश 21 वर्षांचा. त्याने 'नीट'ची परीक्षा दिली होती. 'आन्सर की'नुसार त्याला चांगले मार्क्स मिळाले होते. यंदा एमबीबीएसचं स्वप्न पूर्ण होणार, या आशेने तो सुट्ट्या एन्जॉय करत होता. पण पेपरफुटीची बातमी आली, ती परीक्षा रद्द झाली आणि तो डिप्रेशनमध्ये गेला."

"पुन्हा परीक्षेची तारीख आली- 21 जून. पण त्याच्या आदल्याच दिवशी यशने आपलं जीवन संपवलं."

अंधार पडायला सुरुवात झाली होती.

अनिकेतने पुढे जड अंतःकरणाने सांगितलं की, 'नीट'मुळे त्यांच्या परिसरातल्या आणखी 5 मुलांनी आत्महत्या केली आहे.

अनिकेत आणि संदीप व्यवस्थेच्या बळी ठरलेल्या आपल्या भावासोबत जे झालं ते आता थांबावं या आशेने बोलत असतानाच, मागून घोषणा ऐकू आली...

"जय.. जय..

जय.. जय..

जय भीम..

जय भीम..

जय भीम!"

महत्त्वाची सूचना

औषधोपचार आणि थेरपीच्या मदतीने मानसिक आजारांवर उपचार शक्य आहेत. यासाठी तुम्ही मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेणं गरजेचं आहे. तुम्हाला किंवा एखाद्या परिचित व्यक्तीमध्ये अशा प्रकारच्या मानसिक आजारांची लक्षणं दिसल्यास या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधून मदत मिळवू शकता.

  • हितगुज हेल्पलाईन, मुंबई - 022- 24131212
  • सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालय -1800-599-0019 (13 भाषांमध्ये उपलब्ध)
  • इंस्टिट्यूट ऑफ ह्यूमन बिहेवियर अँड एलाइड सायन्सेस - 9868396824, 9868396841, 011-22574820
  • नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्स - 080 - 26995000
  • विद्यासागर इंस्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड एलाइड सायन्सेस, 24X7 हेल्पलाइन-011 2980 2980

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)