'माझ्यासाठी राखून ठेवलेल्या कबरीत दुसऱ्याच व्यक्तीला पुरलं', नेमकं काय घडलं?

मेरी लेन सांगतात की, या चुकीमुळे त्यांना 'रात्री झोपही लागत नाही'.
फोटो कॅप्शन, मेरी लेन सांगतात की, या चुकीमुळे त्यांना 'रात्री झोपही लागत नाही'.
    • Author, सारा-मे बुचिएरी
    • Role, डीपिंग सेंट जेम्स येथून
  • Published
  • वाचन वेळ: 4 मिनिटे

एका महिलेनं स्वतःसाठी पैसे भरून आरक्षित केलेल्या कबरीत चुकून दुसऱ्याच व्यक्तीला पुरण्यात आलं. नंतर त्या व्यक्तीचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. परंतु, या घटनेनंतर आता त्या महिलेला ती 'कबर पूर्वीसारखी वाटत नाही'.

69 वर्षीय मेरी लेन यांनी लिंकनशायरमधील डीपिंग सेंट जेम्स स्मशानभूमीत आपल्या दिवंगत आई-वडिलांच्या कबरीच्या मागे स्वतःसाठी जागा आधीच राखून ठेवली होती. परंतु, या चुकीच्या प्रकारामुळे त्यांना खूप वाईट वाटत आहे. या प्रकरणात स्थानिक ग्रामपरिषदेनं (पॅरिश कौन्सिल) ज्या पद्धतीने ही चूक हाताळली, त्यामुळे त्या निराश झाल्या आहेत.

ही चूक दुरुस्त करण्यासाठी, या वर्षाच्या सुरुवातीला न्याय मंत्रालयाने लेन यांच्या कबरीत पुरलेल्या व्यक्तीचा मृतदेह बाहेर काढण्यास परवानगी दिली.

डीपिंग सेंट जेम्स कौन्सिलने आपल्याकडून चूक झाल्याचे मान्य केलं आहे. या चुकीमुळे दोन्ही कुटुंबांना जो त्रास सहन करावा लागला, त्याबद्दल कौन्सिलने माफीही मागितली आहे. तसेच, कबरीची ती जागा पुन्हा मेरी लेन यांना देण्यात आल्याचेही कौन्सिलने सांगितलं.

Caption- या घटनेनंतर आता आई-वडिलांच्या कबरीवर नेहमीप्रमाणे जाणंही आपल्याला शक्य होत नसल्याचं लेन सांगतात.
फोटो कॅप्शन, या घटनेनंतर आता आई-वडिलांच्या कबरीवर नेहमीप्रमाणे जाणंही आपल्याला शक्य होत नसल्याचं लेन सांगतात.

मेरी लेन यांनी सांगितलं की, 2013 मध्ये त्यांनी आपल्या आईच्या कबरीमागे स्वतःला पुरण्यासाठी जागा राखून ठेवण्याचा हक्क विकत घेतला होता. बीबीसीने पाहिलेल्या डीपिंग सेंट जेम्स पॅरिश कौन्सिलच्या कागदपत्रातूनही या गोष्टीला दुजोरा मिळाला आहे.

"माझ्या आई-वडिलांच्या जवळच माझीही कबर असावी, म्हणून मी ही जागा विकत घेतली होती," असं मेरी लेन म्हणाल्या.

"मला माझ्या जवळच्या माणसांसोबतच राहता येणार नसेल, तर इथे पुरलं जाण्याला काहीच अर्थ नाही."

2023 च्या सुरुवातीला मेरी लेन स्मशानभूमीत गेल्या असता, त्यांनी स्वतःसाठी राखून ठेवलेल्या कबरीत दुसऱ्याच व्यक्तीला पुरल्याचं त्यांना दिसलं.

"खरं सांगायचं तर, मी तिथेच उभी राहिले. मला काय करावं हेच सुचत नव्हतं," असं त्यांनी आठवण सांगताना म्हटलं.

"माझ्या कबरीत एका अनोळखी व्यक्तीला पुरण्यात आलं होतं."

मेरी लेन यांनी सांगितलं की, त्या व्यक्तीचा मृतदेह दुसरीकडे हलवण्यासाठी परवानगी मागण्यास त्यांना 3 वर्षांहून अधिक काळ लागला. परंतु, आई-वडिलांच्या कबरीजवळ दुसरी जागा उपलब्ध नसल्यामुळे त्यांच्याकडे 'दुसरा कोणता पर्यायही नव्हता'.

इंग्लंडमध्ये धार्मिक विधींनुसार पवित्र न केलेल्या जमिनीत पुरलेला मृतदेह बाहेर काढण्यासाठी न्याय मंत्रालयाची परवानगी घ्यावी लागते. त्यासाठी सहसा मृत व्यक्तीच्या जवळच्या नातेवाईकांची संमतीही गरजेची असते.

न्याय मंत्रालयाने डीपिंग सेंट जेम्स पॅरिश कौन्सिलला पाठवलेल्या पत्रात, मृत व्यक्तीच्या जवळच्या नातेवाईकांची संमती नसतानाही मृतदेह बाहेर काढण्यास परवानगी देण्यात आली. मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांनी याला 'धार्मिक आणि नैतिक' कारणांवरून विरोधही केला होता.

ही 'चूक दुरुस्त करण्यासाठी' दुसरा कोणताही मार्ग उपलब्ध नसल्यामुळे मृतदेह बाहेर काढण्यास परवानगी दिल्याचं मंत्रालयाने स्पष्ट केलं.

मृतदेह बाहेर काढण्यात आलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्याचा बीबीसीने प्रयत्न केला आहे.

Caption- मेरी लेन यांचे पती एरिक लेन यांनी स्मशानभूमीचा कारभार पॅरिश कौन्सिल योग्य प्रकारे सांभाळू शकेल का, याबद्दल चिंता व्यक्त केली आहे.
फोटो कॅप्शन, मेरी लेन यांचे पती एरिक लेन यांनी स्मशानभूमीचा कारभार पॅरिश कौन्सिल योग्य प्रकारे सांभाळू शकेल का, याबद्दल चिंता व्यक्त केली आहे.
Skip podcast promotion and continue reading
BBC News मराठी आत्ताच फॉलो करा WhatsApp कर
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

मेरी लेन यांचे 77 वर्षीय पती एरिक लेन यांनी सांगितलं की, या संपूर्ण प्रकरणाचा त्यांच्या पत्नीवर 'खूप वाईट परिणाम' झाला आहे.

त्यांच्या मते, अशी चूक टाळण्यासाठी पॅरिश कौन्सिल योग्य नोंदी ठेवू शकली नाही. भविष्यात पुन्हा अशीच चूक होऊ शकते, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.

बीबीसीने पॅरिश कौन्सिलला या आरोपाबाबत विचारणा केली. तसेच, भविष्यात अशा चुका होऊ नयेत यासाठी काय उपाययोजना केल्या आहेत, अशीही विचारणा केली. परंतु, कौन्सिलकडून यावर कोणतेही उत्तर मिळालेले नाही.

आता मेरी लेन यांना 'स्मशानभूमीत जायला आवडत नाही', असं त्यांचे पती एरिक यांनी सांगितलं.

"या जागेशी आता खूप कटुता आणि वाईट आठवणी जोडल्या गेल्या आहेत. हे सगळं कधी विसरता येईल की नाही, हेही मला माहीत नाही," असं ते म्हणाले.

मेरी लेन यांनी चुकून त्यांच्या प्लॉटमध्ये पुरण्यात आलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांबद्दल सहानुभूती व्यक्त केली. या घटनेमुळे त्या कुटुंबालाही किती त्रास सहन करावा लागला असेल, याची आपल्याला जाणीव असल्याचेही त्या म्हणाल्या.

"मला त्या कुटुंबीयांना भेटायचं होतं," असं त्या म्हणाल्या.

"मी पॅरिश कौन्सिलला त्या कुटुंबीयांची भेट घडवून आणण्याची अनेकदा विनंती केली, पण प्रत्येक वेळी त्यांनी नकार दिला," असं त्या म्हणाल्या.

Caption- एरिक आणि मेरी लेन यांना भीती आहे की, भविष्यात पुन्हा अशी चूक घडू शकते.
फोटो कॅप्शन, एरिक आणि मेरी लेन यांना भीती आहे की, भविष्यात पुन्हा अशी चूक घडू शकते.

त्या म्हणाल्या, "आता स्मशानभूमीत जाणंही मला अस्वस्थ करतं. पूर्वी आम्ही जितक्या वेळा तिथे जायचो, तितक्या वेळा आता जात नाही."

या प्रकरणाबाबत अजूनही त्यांच्या मनात अनेक प्रश्न असल्याचं त्यांनी सांगितलं.

"यासाठी 3 वर्षे आणि 3 महिने लागायला नको होते. यासाठी आम्हाला इतका संघर्षही करावा लागायला नको होता," असं त्या म्हणाल्या.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)