You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
वैभव सूर्यवंशीला दुसऱ्या टी-20 सामन्यातही स्थान नाहीच; 'हे' दोन खेळाडू करतायेत पदार्पण
भारत आणि आयर्लंड यांच्यातील टी-20 मालिकेतील दुसरा आणि अखेरचा सामना खेळला जात आहे. या सामन्यातही वैभव सूर्यवंशीला टीम इंडियाकडून पदार्पणाची संधी मिळालेली नाही.
रविवारच्या (28 जून) सामन्यात भारताच्या संघाकडून दोन खेळाडू पदार्पण करत आहेत. यामध्ये गोलंदाज प्रिन्स यादव आणि अष्टपैलू सूर्यांश शेडगे यांचा समावेश आहे.
भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
मागील सामन्यात भारताचा युवा आक्रमक फलंदाज वैभव सूर्यवंशीला संघात स्थान न दिल्याने अनेक क्रिकेट चाहत्यांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली होती. दोन्ही देशांमधील पहिल्या सामन्यात भारताला 34 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. मात्र, अनेक क्रिकेट तज्ज्ञांनी कर्णधार श्रेयस अय्यरच्या या निर्णयाचे समर्थन केले होते.
आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात वैभवला टी-20 मध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली नव्हती. त्यानंतर भारतीय संघाच्या अंतिम 11 खेळाडूंच्या (प्लेईंग इलेव्हन) निवडीवर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते.
सोशल मीडियावर भारतीय संघाला मोठ्या टीकेला तोंड द्यावं लागलं. युजर्स म्हणाले की वैभवचा अंतिम 11 खेळाडूंमध्ये (प्लेईंग इलेव्हन) समावेश न करणं संघाला महागात पडलं.
पहिल्या सामन्यात वैभवला न घेण्याबद्दल कर्णधारानं दिलं होतं 'हे' कारण
आयर्लंड आणि भारत यांच्यात 26 जून 2026 ला सामना झाला होता. आयर्लंडनं एखाद्या आंतरराष्ट्रीय सामन्यात भारतीय संघाचा पराभव करण्याची ही पहिलीच वेळ होती.
या सामन्यात भारतीय संघ 183 धावांचा पाठलाग करताना फक्त 148 धावांवरच बाद झाला.
या सामन्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यरनं पराभवासाठी फलंदाजी नाहीतर गोलंदाजी कारणीभूत असल्याचं सांगितलं.
अय्यर म्हणाला होता, "सुरुवातीला आमचे गोलंदाज चांगली गोलंदाजी करत होते. मात्र मधल्या षटकांमध्ये आम्ही आमच्या योजनेनुसार गोलंदाजी करू शकलो नाही. त्यामुळे प्रतिस्पर्धी संघातील फलंदाजांना मैदानात समोरच्या बाजूला चेंडू फटकावण्याची संधी मिळाली. त्या बाजूला बाऊंड्री कमी अंतरावर होती."
"गोलंदाजांनी ज्याप्रकारे सुरुवात केली होती त्यानुसार 140 धावांचं लक्ष्य योग्य राहिलं असतं, असं मला वाटलं होतं. मात्र कर्णधार म्हणून ही एक चांगली सुरुवात होती," असं तो हसत म्हणाला.
वैभव सूर्यवंशीला खेळवण्याबद्दल विचारण्यात आलेल्या प्रश्नावर तो म्हणाला, "दुर्दैवानं नाही. तो एक जबरदस्त खेळाडू आहे. मात्र आमच्या संघात असे अनेक खेळाडू आहेत ज्यांनी संघासाठी चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळेच आम्ही त्यांच्यावर विश्वास दाखवत आहोत. योग्य वेळी त्यालादेखील संधी मिळेल."
आर. अश्विन काय म्हणाला होता?
माजी भारतीय क्रिकेटपटू, आर अश्विन यानंदेखील वैभव सूर्यवंशीला आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात अतिम संघात स्थान न देण्याच्या निर्णयाला पाठिंबा दिला होता.
तो म्हणाला होता, क्रिकेट संघात एखाद्या 'विशिष्ट व्यक्ती'ला स्थान नसतं.
आर अश्विन 'ऐश की बात' या त्याच्या युट्युब चॅनलवर म्हणाला होता की, "वैभव सूर्यवंशी खूप चांगला खेळाडू आहे. आम्ही अनेकवेळा कौतुकदेखील केलं आहे. मात्र हा क्रिकेटचा संघ आहे. एखाद्या व्यक्तीसाठी संघ तयार होत नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. गौतम गंभीरनं म्हटलं आहे की संघाला प्राधान्य दिलं पाहिजे, सुपरस्टार कल्चर असणार नाही."
तो म्हणाला होता की, "मला माहित आहे की सुपरस्टार खेळसाठी महत्त्वाचे असतात. त्यांच्यामुळे खेळाची विक्री करणं सोपं होतं. मात्र अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन यांनी काय चूक केली आहे ज्यामुळे त्यांना संघातून वगळून वैभव सूर्यवंशीला संघात स्थान दिलं जावं."
तो पुढे म्हणाला होता की, "संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा एकत्र सलामीवीर म्हणून खेळले आहेत. संजूनं विश्वचषकातदेखील खूप चांगली कामगिरी केली. जर या दोघांपैकी एकाला संघातून वगळून वैभव सूर्यवंशीला खेळवण्यात आलं, तर सांघिक खेळ म्हणण्यास काय अर्थ राहील?"
तो म्हणाला होता की, "अनेकदा संघाबाहेर बसून सामना पाहण्याचंही महत्त्व असतं. त्याला संघाबाहेर बसू द्या, संघाची सेवा करू द्या, पाणी पाजू द्या. त्यातून त्याला बरंच काही शिकता येईल."
अर्थात ज्येष्ठ पत्रकार विक्रम चंद्रा यांना वाटतं की 'कोणाला तरी वाईट वाटेल' म्हणून संघातील सर्वात रोमांचक खेळाडूला बाहेर बसवणं, हे योग्य कारण नाही.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)