वैभव सूर्यवंशीची श्रीलंकन खेळाडूसोबत धक्काबुक्की; ICC च्या नियमांनुसार चूक कोणाची?

Published
वाचन वेळ: 4 मिनिटे

भारतीय क्रिकेटचा युवा सुपरस्टार वैभव सूर्यवंशी सध्या चुकीच्या कारणामुळे चर्चेत आला आहे.

सोमवारी (15 मे) श्रीलंका-अ संघाकडून सुपर ओव्हरमध्ये भारत-अ संघाचा पराभव झाला. त्यानंतर वैभव सूर्यवंशीचा एका श्रीलंकन खेळाडूसोबत मैदानावर जोरदार वाद झाला आणि दोघांमध्ये धक्काबुक्कीही झाली.

दाम्बुला येथे खेळल्या केलेल्या या रोमांचक सामन्याच्या शेवटी वैभव सूर्यवंशी आणि श्रीलंकेचा खेळाडू विशेन हलाम्बागे यांच्यात मैदानावरच वाद झाला.

यावेळी मैदानावरील वातावरण खूप तणावपूर्ण झाले होते. श्रीलंका-अ संघाचा यष्टिरक्षक निरोशन डिकवेलाने मध्ये पडत दोन्ही खेळाडूंना शांत केलं आणि त्यांना एकमेकांपासून दूर केलं.

आता सर्वांचं लक्ष मॅच रेफरी प्रदीप जयप्रगाश यांच्या निर्णयाकडे आहे. ते या दोन्ही खेळाडूंवर कारवाई करतात की, केवळ ताकीद देऊन सोडून देतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

नियम काय सांगतात?

आयसीसीच्या आचारसंहितेतील कलम 2.12 नुसार, आंतरराष्ट्रीय सामन्यादरम्यान एखाद्या खेळाडूने, सपोर्ट स्टाफने, पंच, सामना रेफरी किंवा प्रेक्षकांसह कोणत्याही व्यक्तीसोबत अयोग्य शारीरिक संपर्क करणे हा नियमाचा भंग मानला जातो.

या नियमांनुसार, "क्रिकेटमध्ये कोणत्याही प्रकारचा अयोग्य शारीरिक संपर्क करण्यास मनाई आहे. एखादा खेळाडू जाणूनबुजून, निष्काळजीपणे किंवा गाफीलपणे दुसऱ्या खेळाडूला किंवा पंचांना धडक दिल्यास, धावत जाऊन त्यांना धडकल्यास किंवा खांद्याने धक्का दिल्यास, ते नियमांचे उल्लंघन मानले जाईल."

नियमभंगाचे गांभीर्य ठरवताना काही गोष्टींचा विचार केला जातो. (i) यात घटना नेमकी कशी घडली, संपर्क मुद्दाम झाला की चुकून, तो टाळता आला असता का, (ii) धक्का किती जोरात लागला, (iii) त्यामुळे संबंधित व्यक्तीला दुखापत झाली का आणि (iv) ज्या व्यक्तीशी संपर्क झाला तो कोण होता, याचा समावेश असतो.

थरारक सामन्यात 'भारत-अ'चा पराभव

दाम्बुला येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारत-अ ने पहिल्यांदा फलंदाजी करत 49.2 षटकांत 265 धावा केल्या. प्रत्युत्तरात श्रीलंका-अ नेही 50 षटकांत 265 धावा केल्या.

सुपर ओव्हरमध्ये श्रीलंकेने 16 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताला केवळ 9 धावाच करता आल्या. त्यामुळे श्रीलंकेने हा सामना जिंकला.

पदार्पणाचा सामना खेळणाऱ्या श्रीलंकेच्या वेगवान गोलंदाज कुगाथास मथुलनने उत्कृष्ट गोलंदाजी केली. त्याने वैभव सूर्यवंशी आणि सूर्यांश शेडगे यांना मोठे फटके मारण्याची संधीच दिली नाही आणि श्रीलंका-अ संघाला विजय मिळवून दिला.

याआधी भारत-अने दमदार पुनरागमन करत सामन्यातील आपले आव्हान कायम ठेवले होते.

143 धावांत 7 विकेट गमावल्यामुळे संघ अडचणीत असताना सूर्यांश शेडगे आणि विपराज निगम यांनी आठव्या विकेटसाठी 104 धावांची महत्त्वाची भागीदारी केली. त्यांच्या खेळीमुळे भारत 265 धावांपर्यंत पोहोचला आणि सामना रंगतदार झाला.

प्रत्युत्तरात श्रीलंका संघाकडून सदीरा समरविक्रमाने संयमी 93 धावांची खेळी केली. त्यामुळे श्रीलंकेचा संघ संपूर्ण धावांचा पाठलाग करताना मजबूत स्थितीत राहिला.

परंतु, शेवटच्या टप्प्यात अर्शद खानच्या शानदार गोलंदाजीमुळे भारत-अ ने सामन्यात जोरदार पुनरागमन केले. त्याने अखेरच्या षटकात उत्कृष्ट मारा करत सामना अतिशय रोमांचक बनवला आणि श्रीलंका-अ संघाला पराभवाच्या उंबरठ्यावर आणलं.

यानंतर मैदानावरील तणाव आणखी वाढला. खेळाडूंचा रागही उघडपणे दिसून आला आणि वातावरण तापलं. अखेर सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवत श्रीलंका-अ संघाने 2 गुण मिळवले. त्यामुळे त्यांचे अंतिम फेरीतील स्थान जवळपास निश्चित मानले जात आहे.

या तिरंगी मालिकेत भारत-अ संघाचा 3 सामन्यांतील हा दुसरा पराभव ठरला आहे. याआधी अफगाणिस्तानविरुद्धच्या पावसामुळे व्यत्यय आलेल्या सामन्यात भारत-अ संघाला डीएलएस नियमानुसार 4 धावांनी पराभव पत्करावा लागला होता.

तिलक वर्माच्या नेतृत्वाखालील भारत-अ संघाने या स्पर्धेची सुरुवात श्रीलंका-अ विरुद्धच्या कमी धावसंख्येच्या चुरशीच्या सामन्यात विजय मिळवत केली होती.

या वादावर तज्ज्ञ काय म्हणतात?

सामन्यानंतर माजी क्रिकेटपटू आणि तज्ज्ञांकडून वैभव सूर्यवंशीबाबत संमिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.

भारताचा माजी फिरकीपटू आर. अश्विनने एक्सवर लिहिलं की, "या सामन्यांमध्ये आयपीएलसारखे भरपूर कॅमेरे नसतात. सुपर ओव्हरमधील नो-बॉलचा निर्णय वादग्रस्त होता.

त्याचबरोबर सुपर ओव्हरमध्ये फलंदाजीसाठी येण्यास श्रीलंका-अ संघाने केलेल्या विलंबामुळे भारत-अ संघाचे खेळाडू खूप नाराज होते."

"भारतीय संघाचा राग किंवा त्यांची नाराजी समजण्यासारखी आहे. श्रीलंकेने जे केलं, ते प्रतिस्पर्धी संघावर मानसिक दबाव टाकण्याच्या रणनीतीचा म्हणजेच माइंड गेम्सचा एक भाग होता."

दरम्यान, क्रीडा पत्रकार बोरिया मजूमदार यांनी एक्सवर लिहिलं, "वैभव सचिनपेक्षा आणखी खूप लहान आहे. त्याने महान खेळाडूंकडून शिकायला हवं. मैदानावर रागावर नियंत्रण ठेवणं महत्त्वाचं असतं, कारण राग आल्यावर माणूस भान हरपून जातो."

"मला खात्री आहे की, आजच्या या घटनेतून तो काहीतरी शिकेल. चुका प्रत्येकाकडून होतात आणि तोही त्याला अपवाद नाही. त्या चुका सुधारत पुढे जाणं, हाच यशाचा मार्ग आहे."

ज्येष्ठ पत्रकार कुशान सरकार यांनी एक्सवर लिहिलं, "वैभव अवघ्या 15 वर्षांचा आहे. तो आपल्या क्रिकेट प्रवासात अनेक गोष्टी शिकेल. त्यामुळे त्याला थोडी संधी द्यायला हवी.

हे विसरू नका की, वैभव परत जात असताना श्रीलंकेच्या गोलंदाजाने त्याला डिवचलं होतं, हेही विसरून चालणार नाही. काहीतरी बोलल्यामुळेच तो पुन्हा मागे वळला होता."

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे कलेक्शन