You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
वाळवंट पुन्हा हिरवंगार होऊ शकतं का? त्यासाठी कोणत्या पद्धती वापरल्या जातात?
वाळवंट म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर गोबी किंवा सहाराचं प्रचंड विस्ताराचं भलंमोठं वाळवंट येऊ शकतं.
प्रत्यक्षात वाळवंटांमध्ये अतिशय विविधता असते. तिथे झाडं, वनस्पती, प्राणी आणि मानवी जीवनाचे वेगवेगळे स्तर आढळतात.
इजिप्तची राजधानी असलेलं कैरो हे जगातील सर्वात मोठं वाळवंटी शहर आहे. तिथे 2.3 कोटींहून अधिक लोक राहतात.
मात्र सर्वसाधारणपणे, वाळवंट हा अतिशय शुष्क प्रदेश असतो. तिथे पाण्याच्या कमतरतेमुळे बहुतांश जीवसृष्टीला अस्तित्व टिकणं कठीण होतं.
जगात वाळवंटी प्रदेश वाढत आहे. संयुक्त राष्ट्रसंघानुसार, दरवर्षी जवळपास 10 लाख चौ. किलोमीटर सुपीक जमीन नष्ट होते.
पृथ्वीवर सुपीक जमीन कमी होत चालली असताना, आपण आगळ्यावेगळ्या पद्धतींचा वापर करून पाणी उपलब्ध करून देऊ शकू आणि वाळवंटाचं रूपांतर अशा प्रदेशात करू शकू जिथे वनस्पती, झाडं वाढू शकतील, हे शक्य आहे का?
हवामानातील बदल
चीनमधील बीजिंग नॉर्मल विद्यापीठातील भूगोलाचे प्राध्यापक यान ली म्हणाले, "वाळवंटीकरण होण्याचा अर्थ आहे की कोणतीही नैसर्गिक जमीन, उदाहरणार्थ गवताळ मैदानी प्रदेश किंवा झाडं झुडुपं असणारा प्रदेश, हळूहळू अधिक शुष्क होत जातोय. नंतर त्याचं रूपांतर वाळवंटात होतं."
जूल चार्नी या वैज्ञानिकाला 1970 च्या दशकात आढळलं की या प्रक्रियेमध्ये मानवी हालचाली, कृतींची महत्त्वाची भूमिका असते.
यान ली यांनी बीबीसीच्या क्राऊडसायन्स या कार्यक्रमाला सांगितलं, "जेव्हा तुमच्याकडे खूप जास्त गुरंढोरं असतात, तेव्हा ते सगळं गवत खाऊन टाकतात. यामुळे गवत संपून जमीन उघडी पडते किंवा वाळूमध्ये रूपांतरित होते."
ज्यावेळेस असं होतं, तेव्हा अल्बीडो म्हणजे पृष्ठभागाची परावर्तनाची क्षमता बदलते. कारण उघडी वाळू खूप चमकदार असते. ती सूर्यप्रकाशाचा मोठा भाग परावर्तित करते.
जेव्हा जमीन उष्णता शोषून घेण्याऐवजी तिचं परावर्तन करते. तेव्हा त्याच्या वरची हवा तितकी तापत नाही. कमी आर्द्रतेचं वाफेत रूपांतर होतं. परिणामी कमी ढग तयार होतात. या सर्वांचा परिणाम असा होतो की तो प्रदेश आणखी कोरडा होतो.
ली यांनी विचार केला की याच्या उलटी गोष्ट करता येईल का. म्हणजे "जर आपण पृष्ठभागाचं अल्बीडो कमी केलं तर काय होईल? यामुळे पावसाचं प्रमाण वाढेल का?"
असं करण्यासाठी सोलर पॅनल ही एक चांगली पद्धत आहे. ते गडद रंगाचे असतात आणि गडद रंगाचा पृष्ठभाग उष्णता शोषून घेतो. त्यामुळे हवा तापते. आर्द्रता वर जाते आणि ढग तयार होतात, असं ते म्हणतात.
त्यांच्या टीमनं एक मॉडेल तयार केलं. त्यात हे पाहण्यात आलं की जर सहारा वाळवंटाचा 20 टक्के भाग गडद रंगांच्या सोलर पॅनल्सनी झाकण्यात आला, तर काय होईल.
या कामात त्यांनी विंड टर्बाइन म्हणजे पवन चक्क्यांच्या संभाव्य वापराचाही उल्लेख केला.
"जर आपल्याकडे पवन चक्क्या असतील, तर त्यामुळे पृष्ठभागाचा खडबडीतपणा बदलेल. अधिक घर्षणामुळे टर्बुलन्सद्वारे अधिक ऊर्जा वातावरणात बाहेर पडू शकते. या टर्बुलन्स किंवा अस्थिरतेमुळे हवामान तयार होतं आणि ढग तयार होतात," असं ली म्हणाले.
त्यांच्या मॉडेलनुसार, संपूर्ण सहारा वाळवंटातील सरासरी पाऊस दुप्पट होऊ शकतो.
मात्र अद्याप हे फक्त एक सिम्युलेशन आहे. यासाठी, जवळपास 20 लाख चौ. किलोमीटर क्षेत्रात लावण्यासाठी मोठ्या संख्येनं सोलर पॅनल आणि विंड टर्बाइनची आवश्यकता असेल. हा आकार जवळपास मेक्सिको किंवा इंडोनेशियाच्या क्षेत्रफळाएवढा आहे.
ली असंही म्हणाले की ही पद्धत फक्त सहारा वाळवंटासारख्या समुद्राजवळ असणाऱ्या ठिकाणी उपयुक्त ठरू शकते. तिथून दमट हवा आत आणली जाऊ शकते.
गोबी किंवा मध्य पूर्वेतील वाळवंटांसारखी अनेक वाळवंटं समुद्रापासून खूप दूर आहेत.
फॉग हार्वेस्टिंग
चिलीतील अटाकामा वाळवंटाला अनेकदा पृथ्वीवरील सर्वात कोरडा प्रदेश म्हटलं जातं. तिथे एका तंत्रज्ञानाद्वारे हवेतून पाणी काढलं जातं.
व्हर्जिनिया कार्टर, या चिलीच्या 'यूनिवर्सिदाद मेयर' या विद्यापीठात भूगोलशास्त्रज्ञ आणि सहाय्यक प्राध्यापक आहेत. याप्रकारची फॉग कलेक्शन सिस्टम तयार करण्यातील त्या तज्ज्ञ आहेत.
"चिलीमध्ये जवळपास 50 वर्षांपूर्वी फॉग हार्वेस्टिंग सुरू झाली होती. त्याचा उद्देश, वाळवंटात ढगांपासून पाणी मिळवण्याचा आहे," असं त्या म्हणाल्या.
धुक्यामध्ये पाणी पकडणं खूप सोपं आहे. खांबांच्या मध्ये एक जाळं टांगलं जातं. जेव्हा बाष्पयुक्त ढग या बारीक जाळीतून जातात, तेव्हा त्याचे थेंब बनतात. त्यानंतर पाईप आणि टँकमध्ये पाणी गोळा केलं जातं.
चिलीच्या उत्तर भागात दररोज प्रति चौ. मीटर सरासरी दोन लिटर पाणी मिळू शकतं. तर काही ठिकाणी हे प्रमाण सात लिटरपर्यंत असू शकतं, असं कार्टर म्हणतात.
मग, भविष्यात फॉग हार्वेस्टिंगद्वारे वाळवंट हिरवंगार करण्यास मदत होऊ शकते का?
कार्टर सांगतात की, हे शक्य आहे. त्यांची टीम सध्या अटाकामा वाळवंटात एका प्रकल्पावर काम करत राहिल्या. यामध्ये फॉग म्हणजे धुक्याच्या पाण्याचा वापर हायड्रोपोनिक्ससाठी केला जातो आहे. म्हणजे मातीऐवजी पोषक द्रावण असलेल्या पाण्यात वनस्पती वाढवणं.
मात्र यामध्ये काही उणीवादेखील आहेत. या पद्धतीनं मिळणाऱ्या पाण्याचं प्रमाण इतर तंत्रज्ञानानं मिळणाऱ्या पाण्यापेक्षा बरंच कमी असतं. यासाठी अशी जागा हवी जिथे धुकं असेल. सर्वसाधारणपणे अशी जागा समुद्राच्या जवळ असते.
समुद्राचं पाणी पिण्यायोग्य करणं
जागतिक पातळीवर समुद्राच्या पाण्याची पातळी वाढते आहे. अशावेळी थेट समुद्रातून पाणी घेणं उपयुक्त ठरू शकतं का?
समुद्राच्या पाण्याचा खारेपणा किंवा क्षार कमी करणं जरी बरंच प्रभावी असलं, तरीदेखील सध्याच्या पद्धतींमध्ये खूप ऊर्जा वापरली जाते. तसंच ते अनेकदा जीवाश्म इंधनावर अवलंबून असतात.
डर्बी विद्यापीठाचे प्राध्यापक क्रिस्तोफर सेनसम छोटे डीसॅलिनेशन युनिट विकसित करत आहेत. हे युनिट सौरऊर्जेवर आधारित आहेत.
यामध्ये आरशांचा वापर करून सूर्यप्रकाशाला पाईपांवर केंद्रित केलं जातं. यामुळे समुद्राचं पाणी उकळतं आणि त्यातून क्षार किंवा मीठ वेगळं होतं.
मात्र मानवी गरजा पूर्ण करण्यासाठी आणि वाळवंटाला हिरवंगार करण्यासाठी, या तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर करावा लागेल.
याला कोणत्याही पद्धतीनं करण्यात आलं, तरी यामध्ये मोठ्या प्रमाणात मीठ, क्षार शिल्लक राहतात. त्यामुळे अवतीभोवतीच्या पर्यावरणाची हानी होऊ शकते.
आपण हे करायला हवं का?
तत्त्वतः आपण समुद्राच्या पाण्यातील मीठ काढून त्याला गोडे पाणी करू शकतो, ढगांमधून पाणी मिळवू शकतो किंवा वाळवंटाचं हवामान बदलून त्याला हिरवंगार करू शकतो.
मात्र मुळात वाळवंट काही वाईट नसतात.
"वाळवंट ही पृथ्वीवरील नैसर्गिक जागा आहे. जर वाळवंट स्थिर असेल, तर ते ठीक आहे. आपण ते तसंच राहू देऊ शकतो," असं ली म्हणतात.
झिन्निया गोन्झालेझ कॅरान्झा, नॉटिंगहॅम विद्यापीठाच्या वनस्पती शास्त्रज्ञ (प्लांट सायंटिस्ट) आहेत.
त्या म्हणतात, "वाळवंटाला हिरवंगार बनवण्याऐवजी किंवा तिथे पाणी आणण्याचे प्रयत्न करण्याऐवजी, आपण तिथे अस्तित्वात असलेल्या सजीवसृष्टीचं रक्षण केलं पाहिजे."
वाळवंटाला हिरवंगार करण्याचे प्रयत्न, दीर्घकाळात पर्यावरण आणि तिथे राहणाऱ्या लोकांसाठी हानिकारक ठरू शकतात, असं त्या म्हणतात.
"वनस्पती किंवा झाडं लावून कदाचित आपल्याला काही काळासाठी चांगलं पीक घेता येईल. मात्र त्यासाठी खूप जास्त पाण्याची आवश्यकता असेल. आपण पाहिलं आहे की जर या पिकांसाठी जास्त पाण्याचा वापर केला, तर वाळवंटाजवळ राहणाऱ्या समुदायांनाच सर्वाधिक फटका बसतो," असं त्यांना वाटतं.
"मला वाटतं की, आपण वाळवंटाबद्दल समजून घेतलं पाहिजे, त्याचा आदर केला पाहिजे आणि त्याच्याशी जुळवून घेत काम करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, हेच सर्वात चांगलं आहे," असं त्या म्हणाल्या.
(बीबीसी वर्ल्ड सर्व्हिसवरील क्राउडसायन्सच्या एक भागावर आधारित)
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)