You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
महाराष्ट्रातील नवापूरमध्ये बर्ड फ्लूचा उद्रेक; आतापर्यंत हजारो कोंबड्या केल्या नष्ट
नंदूरबार जिल्ह्यातील नवापूर शहर आणि परिसरात बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव वाढत आहे. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाने कठोर पावलं उचलली आहेत.
बर्ड फ्लूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने 'कलिंग' मोहीम युद्धपातळीवर सुरू करण्यात आली आहे.
प्रशासनाने मोठ्या प्रमाणात कोंबड्या नष्ट करण्याची मोहीम सुरू केली आहे. तसेच परिसरातील लोकांना कोंबडी आणि अंडी खाऊ नयेत, अशा सूचना दिल्या आहेत. संभाव्य धोका टाळण्यासाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
नंदूरबारच्या जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांनी बाधित भागाला प्रत्यक्ष भेट देत संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला आहे. पशुसंवर्धन विभागाने मागील 2 दिवसांत मोठ्या प्रमाणावर कारवाई केली आहे.
संसर्ग रोखण्यासाठी 1 किमी, 3 किमी आणि 5 किमी परिसर ठरवून तिथे उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. बर्ड फ्लूचा आवाका वाढू नये यासाठी प्रशासन पुरेपूर प्रयत्न करत असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांनी दिली.
त्या म्हणाल्या की, "30 एप्रिल रोजी बर्ड फ्लू आढळून आल्यापासून प्रशासन अलर्ट मोडवर आलं आहे. यासाठी राज्य शासनाकडून 150 कर्मचाऱ्यांची 25 रॅपिड रिस्पॉन्स टीम सध्या नवापूरमध्ये आहे. नवापूर येथील पोल्ट्री फार्म मालकांशी संवाद साधला. त्यांच्या समस्या आणि नुकसान भरपाईबाबत चर्चा केली."
दरम्यान, नवापूर येथील पशूसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. समीर काझी यांनी येथील कलिंग ऑपरेशनबद्दल माहिती दिली.
ते म्हणाले की, "गेल्या काही दिवसांपासून बर्ड फ्लूच्या प्रार्दुभावामुळे नवापूर परिसरात कलिंग ऑपरेशन सुरू केलं आहे. एक किमी परिसरातंर्गत जे काही फार्म्स येतात त्या फार्म्समधील कलिंग ऑपरेशन जवळपास आता संपत आलेलं आहे."
"या कलिंग ऑपरेशनमध्ये 2 लाखांपेक्षा जास्त पक्षी आपण कल म्हणजेच नष्ट केलेले आहेत. 8 लाखांपेक्षा जास्त अंडी नष्ट केलेले आहेत. पशुखाद्य पण आपण नष्ट केलेलं आहे."
पाळीव देशी कोंबड्याही नष्ट करणार
शासनाने पोल्ट्री व्यावसायिकांचे नुकसान लक्षात घेऊन त्यांना शासनाकडून मिळणारी नुकसानभरपाई तातडीने आणि पारदर्शकपणे वितरित करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
जिल्हाधिकारी सेठी यांनी 5 किमीचा बफर झोन निश्चित केला असून कोंबडी आणि अंडीसंबंधी कोणताही व्यवहार आणि त्यांचे आदान-प्रदान करण्यास बंदी घालण्यात आल्याचे सांगितले.
"हा फ्लू बाहेर पसरू नये यासाठी योग्य ती काळजी घेतली जात आहे. नाशिकची लॅबोरटरी टीम नमुने घेत आहे. त्याचबरोबर या परिसरात घरोघरी जाऊनही नागरिकांची तपासणी केली जात आहे. ज्यांच्यामध्ये लक्षणं दिसतील त्यांना औषधं दिली जातील," असंही त्यांनी स्पष्ट केलं.
डॉ. समीर काझी यांनी नवापूर परिसरातील देशी कोंबड्याही नष्ट करणार असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, "आता 1 किमी रेडियसमधील देशी कोंबड्या पण नष्ट करण्याचं काम सुरू केलं जाणार आहे."
"या रेडियसच्या आत येणारे पाळीव पक्षी कल करणार आहोत. देशी कोबंड्यांना प्रती पक्षी 150 रुपये अनुदान आणि प्रती अंडी 4 रुपये अनुदान दिले जाणार आहे."
या भागात आजपासून म्हणजे 6 मे पासून सर्व्हे सुरू करणार असून त्याचवेळी त्यांचे कलिंगही करणार आहोत. आणि लगेचच नुकसान भरपाईही देणार असल्याचं डॉ. काझी यांनी सांगितलं.
कलिंग म्हणजे काय?
कलिंग म्हणजे बर्ड फ्लू किंवा इतर संसर्गजन्य आजार पसरू नयेत यासाठी बाधित क्षेत्रातील कोंबड्या व इतर पक्ष्यांना सामूहिकरित्या मारून नष्ट करण्याची प्रक्रिया होय.
संसर्ग झालेले पाळीव पक्षी जसे की कोंबड्या किंवा बदक यांना सामूहिकरीत्या नष्ट करणे. त्याचबरोबर जे निरुपयोगी पक्षी आहेत त्यांना देखील विविध प्रकारे नष्ट केलं जातं.
केवळ अंडी उत्पादनासाठी असलेल्या पोल्ट्री फार्ममध्ये नर जातीच्या कोंबडीच्या पिल्लांना सुरुवातीलाच नष्ट केलं जातं.
दरम्यान, बर्ड फ्लूला रोखण्यासाठी आम्ही 100 टक्के प्रयत्न करत आहोत. नागरिकांनी सहकार्य करावं अशी विनंती जिल्हाधिकारी मिताली सेठी यांनी केली आहे.
सध्या बाधित क्षेत्रात कडक निर्बंध लागू करण्यात आले असून, नागरिकांनी अफवांपासून दूर राहून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
बर्ड फ्लू काय आहे?
'बर्ड फ्लू' हा आजार H5N1 या व्हायरसमुळे होतो. याला एव्हियन इनफ्लूएन्झा म्हणतात. मुख्यतः हा विषाणू बदकं, कोंबड्या आणि स्थलांतरित पक्ष्यांमध्ये आढळतो आणि तो संसर्गजन्य आहे.
अनेकदा स्थलांतरित पक्ष्यांमुळे संसर्ग पसरण्याचं क्षेत्रं वाढतं तो माणसांमध्येही पसरू शकतो.
1997मध्ये बर्ड फ्लूचं माणसांतल्या संसर्गाचं पहिलं प्रकरण आढळलं होतं. हाँगकाँगमधल्या पक्षी बाजारापासून याची सुरुवात झाली होती. आणि या विषाणूचा संसर्ग झालेल्या 60 टक्के लोकांचा तेव्हा मृत्यू झाला होता. पण हा बर्ड फ्लू माणसांमध्ये एका व्यक्तीकडून दुसऱ्याकडे सहजासहजी पसरू शकत नाही. जी लोकं एकमेकांच्या अगदी जवळच्या संपर्कात असतात, त्यांच्यातच याचा संसर्ग पसरल्याचं आढळून आलंय.
बर्ड फ्लूची माणसांतली लक्षणं काय?
भारतामध्ये अद्याप माणसांमध्ये बर्ड फ्लू झाल्याचं प्रकरण आढळलेलं नाही. पण हा विषाणूही मानवी शरीराच्या श्वसन यंत्रणेवर हल्ला करतो आणि यामुळे न्युमोनिया किंवा अक्युट रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम - ARDS होण्याची शक्यता असते. ताप - सर्दी, घसा खवखवणं, पोटात दुखणं, डायरिया ही याची लक्षणं असू शकतात.
बर्ड फ्लू होण्याचा धोका कोणाला आहे?
तुम्ही कोंबड्या - बदकं पाळली असतील, त्यांना हाताळत असाल, किंवा तुमचं पोल्ट्री फार्म आहे जिथे भरपूर कोंबड्या आहेत, किंवा मग कोंबड्यांच्या मांस विक्रीशी तुमचा जवळचा संबंध असेल तर तुम्हाला या संसर्गाची शक्यता आहे. म्हणूनच पक्षी हाताळताना रबर ग्लोव्ह्ज आणि मास्क, फेस शील्ड किंवा PPE चा वापर करावा.
तुम्ही कोंबड्या - बदकं पाळली असतील, त्यांना हाताळत असाल, किंवा तुमचं पोल्ट्री फार्म आहे जिथे भरपूर कोंबड्या आहेत, किंवा मग कोंबड्यांच्या मांस विक्रीशी तुमचा जवळचा संबंध असेल तर तुम्हाला या संसर्गाची शक्यता आहे. म्हणूनच पक्षी हाताळताना रबर ग्लोव्ह्ज आणि मास्क, फेस शील्ड किंवा PPE चा वापर करावा.
कोरोना काळातल्या खबरदारीच्या गोष्टी इथेही लागू होतात. वरचेवर हात धुवा, सॅनिटायजर वापरा, बाहेरचे हात चेहऱ्याला - नाका-तोंडाला लावू नका. आणि तुमच्या जवळपास पाळीव पक्षी, इतर पक्षी किंवा स्थलांतरित पक्षी मरून पडत असल्याचं आढळलं, तर यंत्रणेशी संपर्क साधा.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)