'पावसाअभावी सोयाबीन पूर्णपणे वाळून चाललीय, त्यामुळे तिच्यावर ट्रॅक्टर फिरवतोय'

फोटो स्रोत, Sanjib Roy
"पावसाअभावी आमची पूर्ण सोयाबीन पूर्णपणे वाळून चाललीय. तिला एक शेंगही नाही आणि येण्याचीही अपेक्षा नाही. त्यामुळे आम्ही तिच्यावर ट्रॅक्टरने पाळी हाणत आहे."
बीडच्या सांडस चिंचोली येथील शेतकरी माऊली कदम यांनी 3 एकर सोयाबीन पिकावर 13 सप्टेंबर रोजी ट्रॅक्टर फिरवला.
राज्यातील 20 जिल्ह्यांमध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झालीय. 86 तालुक्यांमध्ये 30 पेक्षा अधिक दिवसांचा पावसाचा खंड पडलाय. यामुळे काही ठिकाणी शेतातील पिकं करपायला लागलीय, तर काही ठिकाणी पिकांनी माना टाकायला सुरुवात केलीय.
जी परिस्थिती बीडमध्ये, तशीच छत्रपती संभाजीनगरमध्येही.
इथल्या पैठण तालुक्यातील रहाटगाव गावात आमची भेट शेतकरी लक्ष्मण गोरे यांच्याशी झाली.
कपाशीच्या शेतात उभं राहून ते सांगायला लागले, "जूनमध्ये थोडे शितोडे आले, त्याच्यावर लागवड केली आम्ही. तरी काही आमच्या हातात नाही आलं. आम्ही दोन खुरपण्या, वखर-पाळी घातली, पण परेशान आहे, कारण पाणी नाही प्यायला आणि रान सारं करपायला झालं."
"मूग गेला, सरकी गेली. सोयाबीनबी गेली. आता काय राहिलं आमच्या हाताला. आता एकच राहिलं, कुठंतरी कामधंदा करणं," लक्ष्मण पुढे म्हणाले.
मूगाचं पीक जनावरांना खाण्यासाठी
लक्ष्मण याच्या शेतात फिरताना पावसाअभावी वाळून चाललेली तूर, मूग, कपाशी ही पिकं दिसतात. पिकांची ही अशी परिस्थिती पाहून शेतात पायही ठेवावा वाटत नाही, असं लक्ष्मण सांगतात.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्याच एका शेतात जनावरं चरताना दिसली. आम्ही चालत त्या शेताकडे गेलो, तर तिथं मूगाची लागवड केली होती. पण, महिन्याभरापासून पाऊस नसल्यामुळे मूगाला एक शेंगही आली नव्हती.
त्यामुळे जे पीक या शेतात आतापर्यंत मोठं झालं होतं, ते जनावरांना खाण्यासाठी सोडून दिल्याचं इथल्या शेतकऱ्यानं आम्हाला सांगितलं.

फोटो स्रोत, Kiran Sakale
पैठण तालुक्यात आमची भेट वसंत जाधव यांच्याशी झाली. ते डावरवाडी गावचे शेतकरी.
ते म्हणाले, "माझ्याकडे शेतात मोसंबी आहे. पम यंदा मोसंबीला काही नाही. पाण्यामुळे मोसंबी गळून जाऊ राहिली खाली. त्याला पाणीच नाही. विहिरीला पाणी होतं, ते समधं आटलं."
पाचोडचे अंकुश नेमाणे हे सोयाबीन उत्पादक शेतकरी. त्यांच्या शेतातील 9 एकर सोयाबीन पिवळी पडायला लागलीय.
अंकुश म्हणाले, "आता हे सोयाबीनचं पीक पोसणारच नाही, तर दाणे यायचा काय संबंध. आता याचा डायरेक्ट भुसाच होणार आहे."
'एकरी खर्च 25,000'
कपाशीच्या शेतात आमची पैठणमधील काही शेतकऱ्यांशी चर्चा सुरू होती.
कपाशीच्या पिकासाठी एकरी खर्च 20 ते 25 हजार रुपये येत असल्याचं त्यातल्या एका तरुण शेतकऱ्यानं सांगितलं.
"सरकारकडून एकच अपेक्षा आहे की, सरकारनं लवकरात लवकर दुष्काळ जाहीर करुन हेक्टरी 50 हजार रुपये मदत करावी," असं तो पुढे म्हणाला.

फोटो स्रोत, Kiran Sakale
मराठवाड्यात या खरिप हंगामात 1 जूनपासून 16 सप्टेंबरपर्यंत सरासरीच्या 67% इतका पाऊस पडला असून 33 % पावसाची तूट आहे.
मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यात सर्वाधिक 49 %, तर परभणीत 45 % पावसाची तूट आहे.
सुनिल वानखेडे हे छत्रपती संभाजीनगर विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक आहेत.
ते सांगतात, "30-32 दिवसांपासून ते 37 दिवसांपर्यंतचा पावसाचा खंड आहे. इतका मोठा खंड पडलाय, त्याच्यामुळे खरिपाची जी पिके आहेत सोयाबीन, मका, कपाशी यांच्यावर त्याचा विपरित परिणाम झालाय."
20 जिल्ह्यांवर दुष्काळाचं सावट
राज्यातील 20 जिल्ह्यांमध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.
या 20 जिल्ह्यांमध्ये, सिंधुदुर्ग, सांगली, सोलापूर, अहिल्यानगर, धाराशिव, लातूर, बीड, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर,गडचिरोली आणि नंदुरबार यांचा समावेश आहे.
राज्यातील या 20 जिल्ह्यांतील 86 तालुक्यांत 30 दिवसांपर्यंत पावसाचा खंड पडलाय.
यात उत्तर महाराष्ट्रातील 31, पश्चिम महाराष्ट्र 17, मराठवाडा 16, तर विदर्भातील 22 तालुक्यांचा समावेश आहे.

फोटो स्रोत, Kiran Sakale
पावसाअभावी झालेल्या पीक नुकसानीचं सर्वेक्षण करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काही दिवसांपूर्वी दिलीय.
राज्यात 5 ऑक्टोबरपासून दुष्काळी स्थितीचे पंचनामे सुरू करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत.
राज्यातील पाऊस आणि पिकांच्या परिस्थितीचा आढावा घेणारी बैठक नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

फोटो स्रोत, Kiran Sakale
या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, "कुठल्या तालुक्यात काय परिस्थिती आहे. पावसाचा खंड किती आहे, या संदर्भातली सगळी माहिती आम्ही घेतलेली आहे. या संदर्भात ज्या काही टंचाईच्या व दुष्काळाच्या उपाययोजना कराव्या लागतात, त्याची तयारी आपण सुरू केलेली आहे. शेतकऱ्यांना संपूर्ण जी मदत पुढच्या काळामधी केली पाहिजे, ती करण्याची तयारी राज्य शासनाची आहे."
पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या आकडेवारीनुसार, राज्यात ऐन पावसाळ्यात, सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात 286 गावं आणि 1182 वाड्यांमध्ये 307 टँकर्सद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे.
पावसानं आणखी ओढ दिल्यास महाराष्ट्रावरील दुष्काळाचं सावट अधिक गडद होणार आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)






















