'आर्थिक वादळ येतंय आणि आमचे पंतप्रधान इटलीमध्ये टॉफी वाटत आहेत'; राहुल गांधींची टीका, भाजपचे प्रत्युत्तर

इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी

फोटो स्रोत, x.com/GiorgiaMelon

फोटो कॅप्शन, इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी
Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 देशांच्या दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात इटलीमध्ये पोहोचले. तिथे त्यांनी इटलीच्या पंतप्रधान जियोर्जिया मेलोनी यांची भेट घेतली.

त्यानंतर इटलीनंतर पंतप्रधान जियोर्जिया मेलोनी यांनी एक्स या सोशल मीडियावर व्हीडिओ शेअर करत लिहिलं, या गिफ्टसाठी धन्यवाद. व्हीडिओमध्ये पंतप्रधान मोदी त्यांना टॉफी (चॉकलेट)चं एक पॅकेट देताना दिसत आहेत.

यावर काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एक्स या सोशल मीडियावर पोस्ट करून पंतप्रधान मोदींवर टीका केली.

"आर्थिक वादळ येतं आहे आणि आमचे पंतप्रधान इटलमध्ये टॉफी वाटत आहेत! शेतकरी, तरुण, महिला, मजूर आणि छोटे व्यापारी सर्वजण त्रस्त आहेत. पंतप्रधान हसून रील बनवत आहेत आणि भाजपावाले टाळ्या वाजवत आहेत. हे नेतृत्व नाही, तर नौटंकी आहे," असं राहुल गांधींनी लिहिलं आहे.

राहुल गांधी

फोटो स्रोत, ANI

याआधी इटलीच्या पंतप्रधान जियोर्जिया मेलोनी यांनी एक्स या सोशल मीडियावर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतचा त्यांचा एक फोटो शेअर करत लिहिलं, "वेलकम टू रोम, माय फ्रेंड!"

पंतप्रधान नरेंद्र मोदी याआधी जून 2024 मध्ये जी-7 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी इटलीला गेले होते.

'भारत आणि भारतात तयार झालेल्या प्रत्येक वस्तूबाबत इतका तिरस्कार का' पीयूष गोयल यांचं राहुल गांधींना प्रत्युत्तर

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी एक्सवर पोस्ट करत राहुल गांधींवर टीका केली आहे.

पीयूष गोयल यांनी एक्सवर लिहिलं आहे, "राहुल गांधी यांना भारत आणि भारतात तयार झालेल्या प्रत्येक वस्तूबद्दल इतका तिरस्कार का आहे? भारत आज मेड इन इंडिया आणि लोकल गोज ग्लोबलच्या माध्यमातून जगाचं विश्वासार्ह केंद्र बनला आहे. मात्र काँग्रेसला प्रत्येक भारतीय कामगिरीमध्ये समस्याच दिसते."

पियूष गोयल

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, पियूष गोयल

त्यांनी पुढे लिहिलं आहे, "ज्या जागतिक सन्मान, गुंतवणूक आणि विश्वासाची देश अनेक दशकं वाट पाहत होता, ते आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत साध्य करतो आहे. ही गोष्ट राहुल गांधी यांना सहन होत नाही."

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.