You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कॉक्रोच जनता पार्टीची चर्चा आता विदेशातील माध्यमांतही, नेमकं काय म्हणतंय जग?
सामान्यतः भारतात राजकीय पक्ष आंदोलनातून तयार होतात. परंतु, कॉकरोच जनता पार्टीचा (सीजेपी) जन्म मात्र 16 मे रोजी सोशल मीडियावर अचानक झाला होता. याची सुरुवात उपहासात्मक ऑनलाइन मोहिमेच्या रूपात झाली होती.
15 मे रोजी एका खटल्याच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी याबाबत एक भाष्य केलं होतं. ते म्हणाले होते की, "समाजात आधीच व्यवस्थेवर हल्ला करणारे काही परजीवी आहेत."
"तुम्हालाही त्यांच्यात सामील व्हायचं आहे का? काही तरुणांना रोजगार मिळत नाही किंवा करिअरमध्ये जागा मिळवू न शकल्याने ते कॉक्रोचसारखे (झुरळ) सगळीकडे पसरतात."
सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या या वक्तव्यावर मोठ्याप्रमाणात टीका झाली. या टीकेनंतर त्यांनी स्पष्टीकरण दिलं. आपलं वक्तव्य चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आलं असं त्यांनी म्हटलं.
ते म्हणाले, "15 मे रोजी एका निरर्थक प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान केलेल्या माझ्या वक्तव्याचा प्रसारमाध्यमांतील एका गटाने चुकीचा अर्थ लावला, हे पाहून मला वाईट वाटलं."
"माझी टीका अशा लोकांवर होती, जे बनावट किंवा खोट्या पदव्यांच्या आधारावर वकिलीसारख्या क्षेत्रांत आले आहेत. असे लोक प्रसारमाध्यमं, सोशल मीडिया आणि इतर प्रतिष्ठित क्षेत्रांतही शिरले आहेत. त्यामुळे ते परजीवीसारखे आहेत."
पण तोपर्यंत 'कॉक्रोच' हा शब्द भारतातील राजकीय चर्चेचा भाग बनला होता. 16 मे रोजी 30 वर्षीय अभिजीत दिपके यांनी एक्सवर एक गुगल फॉर्म शेअर करून लोकांना कॉक्रोच जनता पार्टीत नोंदणी करण्याचं आवाहन केलं.
अवघ्या काही तासांत अभिजीत यांना 5 हजारांहून अधिक नोंदणी मिळाल्या. इंटरनेटवर सुरू झालेला हा विनोद हळूहळू लोकांचा असंतोष, विनोद आणि राजकीय निराशा व्यक्त करणाऱ्या एका अनौपचारिक संस्थेत बदलला.
अभिजीत सध्या अमेरिकेतील बोस्टन युनिव्हर्सिटीमध्ये पब्लिक रिलेशन्समध्ये मास्टर्स करत आहेत. त्यांनी त्यांच्या पक्षाबद्दल सांगितलं, "कॉक्रोच हा तरुणांच्या नाराजीचा आवाज आहे. सरन्यायाधीशांनी तरुणांना कॉक्रोच आणि परजीवी म्हटल्याच्या वक्तव्याविरोधात ही भावना आहे."
"भारतासारख्या लोकशाही देशात हे मान्य होऊ शकत नाही. कारण सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश हे संविधान आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे रक्षक मानले जातात. टीकेमुळे तरुणांचा अपमान झाला आहे."
इन्स्टाग्रामवर 'जगातील सर्वात मोठा पक्ष' भाजपला मागे टाकलं
पाहता पाहता भारतात सोशल मीडियावर कॉक्रोच जनता पार्टीचे लाखो फॉलोअर्स झाले. इन्स्टाग्रामवर तर या पक्षाचे जवळपास 2 कोटी फॉलोअर्स झाले आहेत, सत्ताधारी भाजपच्या फॉलोअर्सपेक्षा ते दुप्पट आहेत.
सोशल मीडियावर सुरू झालेल्या कॉक्रोच पार्टीची चर्चा आता सामान्य लोकांमध्येही होऊ लागली आहे. इतकंच नाही, तर आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्येही याची जोरदार चर्चा होत आहे.
ब्रिटनमधील द गार्डियन या न्यूज वेबसाइटने 21 मे रोजी कॉक्रोच जनता पार्टीवर सविस्तर वृत्त प्रकाशित केलं.
द गार्डियनने वृत्तात म्हटलं आहे की, "लाखो भारतीय तरुण आपली निराशा आणि संताप व्यक्त करण्यासाठीचे माध्यम म्हणून कॉक्रोच जनता पार्टीकडे पाहत आहेत. कॉक्रोच हे निवडणूक चिन्ह असलेल्या या विनोदी आणि उपरोधिक पक्षाने भारतीय सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे."
"भ्रष्टाचार, बेरोजगारी आणि राजकीय अराजकता यांची खिल्ली उडवणारे मीम्स आणि छोटे व्हीडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात आहेत. कठीण परिस्थितीतही जिवंत राहणाऱ्या कॉक्रोचला आता अनेक जण उपरोधिकपणे संघर्ष आणि टिकून राहण्याचं प्रतीक मानत आहेत. हे ऑनलाइन आंदोलन खूप वेगाने वाढलं आहे."
सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके द गार्डियनशी बोलताना म्हणाले की, "हे सगळं मुद्दाम घडलेलं नाही. पण लोकांचा प्रतिसाद तरुणांमधील वाढती निराशा दाखवतो. आजचे तरुण खूप निराश झाले आहेत. त्यांच्याकडे आपलं मत मांडण्यासाठी योग्य व्यासपीठ नाही आणि ते सरकारवर प्रचंड नाराज आहेत."
द गार्डियनने लिहिलं आहे की, दिपके याआधी आम आदमी पक्षासोबत काम करत होते. हा पक्ष 2012 मध्ये भ्रष्टाचारविरोधी आंदोलनातून पुढे आला होता.
दिपके म्हणाले, आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की, "5 वर्षांपूर्वीपर्यंत मोदी किंवा सरकारविरोधात उघडपणे बोलायला लोक तयार नव्हते. पण आता परिस्थिती बदलत आहे."
लोकांचा एवढा पाठिंबा का?
कतार येथील अल जझीराने आपल्या वृत्तात म्हटलं आहे की, "सीजेपीच्या मोहिमेला काही मोठ्या राजकीय नेत्यांचाही पाठिंबा मिळत आहे. यामध्ये पश्चिम बंगालमधील टीएमसीच्या खासदार महुआ मोईत्रा आणि कीर्ती आझाद यांचा समावेश आहे. याचवर्षी केंद्र सरकारच्या सेवेतून निवृत्त झालेले अधिकारी आशिष जोशी यांनी देखील सोशल मीडियावर याबद्दल वाचल्यानंतर पक्षात नोंदणी केली आहे."
आशिष जोशी यांनी अल जझीराशी बोलताना सांगितलं की, "गेल्या 10 वर्षांत देशात भीतीचं वातावरण निर्माण झाल आहे. लोक उघडपणे बोलायला घाबरतात. देशात इतका द्वेष भरला आहे की, सीजेपी लोकांना ताज्या हवेसारखी वाटत आहे. तरुणांची तुलना झुरळाशी करण्यात आली, पण झुरळ हा खूप जिद्दी जीव आहे. तो कोणत्याही परिस्थितीत जिवंत राहतो."
अल जझीराने आपल्या वृत्तात म्हटलं आहे की, "अलीकडच्या काळात दक्षिण आशिया हे जेन-झी आंदोलनाचे प्रमुख केंद्र बनले आहे. तरुणांच्या आंदोलनामुळे श्रीलंका, नेपाळ आणि बांगलादेशमधील सरकारं पडली."
"जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला भारत देश देखील अनेक समस्यांशी झुंजत आहे. अर्थव्यवस्था वाढत असली तरी बेरोजगारी, महागाई आणि असमानता वाढली आहे. भारतात दरवर्षी 80 लाखांहून अधिक विद्यार्थी पदवीधर होतात, पण त्यांच्यात बेरोजगारीचं प्रमाण 29.1 टक्के आहे."
ब्रिटिश न्यूज एजन्सी रॉयटर्सने आपल्या वृत्तामध्ये म्हटलं आहे की, जेन-झी तरुणांच्या चिंता मांडणारा अवघ्या पाच दिवसांचा हा गट भारतात झपाट्याने व्हायरल झाला आहे.
रॉयटर्सने लिहिलं की, "इन्स्टाग्रामवर सीजेपीचे फॉलोअर्स सत्ताधारी भाजपपेक्षाही जास्त झाले आहेत. सीजेपी राजकारण, महागाई आणि बेरोजगारीसारख्या मुद्द्यांवर विनोदी आणि उपरोधिक पद्धतीने चर्चा करत आहे."
"स्वतःला जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष म्हणवणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाजपचे इन्स्टाग्रामवर 90 लाखांपेक्षा कमी फॉलोअर्स आहेत, तर सीजेपीचे जवळपास 2 कोटी फॉलोअर्स झाले आहेत."
रॉयटर्सने पुढे म्हटलं की, "सीजेपीच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर ग्राफिक्स आणि व्हीडिओ पोस्ट केले जातात. यात माध्यमांच्या स्वातंत्र्यापासून ते संसद आणि मंत्रिमंडळातील अर्ध्या जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यापर्यंतच्या मुद्द्यांवर चर्चा केली जाते."
"नुकताच नीट परीक्षेचा पेपर फुटल्यामुळे परीक्षा रद्द करण्याचा मुद्दाही सीजेपीने उचलून धरला होता. या प्रकरणामुळे सुमारे 23 लाख विद्यार्थी प्रभावित झाले होते."
तरुणांमध्ये वाढती अस्वस्थता
रॉयटर्सने म्हटलं आहे की, "भारतातील तरुणांमधील अस्वस्थता या आठवड्यात प्रकाशित झालेल्या डेलॉइटच्या ग्लोबल सर्व्हेमध्येही दिसून आली. या सर्वेक्षणानुसार 1995 ते 2007 दरम्यान जन्मलेल्या जेन-झी तरुणांवर बेरोजगारी आणि वाढत्या महागाईचा मोठा परिणाम झाला आहे."
सर्वेक्षणानुसार, "जेन-झीमध्ये आर्थिक ताण-तणाव जास्त आहे. मोठ्या संख्येने युवक घर खरेदीतील अडचणी आणि आर्थिक असुरक्षिततेबद्दल बोलत आहेत."
भारत हा जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहे. इथे जगातील सर्वात मोठी युवा लोकसंख्या देखील आहे. देशाच्या 1.42 अब्ज लोकसंख्येपैकी सुमारे 65 टक्के लोक 35 वर्षांखालील आहेत.
सरकारी आकडेवारीनुसार, 2025 मध्ये 15 वर्षे आणि त्याहून अधिक वयोगटातील लोकांमध्ये बेरोजगारी दर 3.1 टक्के होता. परंतु, 15 ते 29 वयोगटातील तरुणांमध्ये हा दर त्यापेक्षा जास्त म्हणजे 9.9 टक्क्यांपर्यंत होता. शहरांमध्ये बेरोजगारी 13.6 टक्के, तर ग्रामीण भागात 8.3 टक्के नोंदवली गेली आहे.
यूएईमधील खलीज टाइम्स या न्यूज वेबसाइटनेही सीजेपीवर वृत्त प्रकाशित केलं आहे. या वृत्तात त्यांनी म्हटलं आहे की, "या आंदोलनाचं नाव राजकीय पक्षासारखं असलं तरी सध्या तरी सीजेपी निवडणूक लढवेल असं दिसत नाही.
"भारत पुढचा नेपाळ किंवा बांगलादेश बनेल का?" या प्रश्नावर सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी त्यांच्या खात्यावर पिन केलेल्या पोस्टमध्ये 'नाही' असं उत्तर दिलं आहे."
त्यांनी लिहिलं की, "मी हे अगदी स्पष्ट करू इच्छितो की, अशी तुलना करून भारतातील जेन-झींचा अपमान करू नका किंवा त्यांना कमी लेखू नका. भारतातील युवक परिवर्तन घडवण्यासाठी असंवैधानिक मार्गाचा अवलंब करणार नाहीत."
त्यांनी लिहिलं, "या देशातील युवक समजूतदार, जागरूक आणि राजकीयदृष्ट्या सजग आहेत. त्यांना आपल्या घटनात्मक अधिकारांची जाणीव आहे आणि ते आपली नाराजी शांततापूर्ण व लोकशाही मार्गाने व्यक्त करतील."
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.