घरातच मुलासारखं वाढलं अस्वल; जोडप्यानं दत्तक घेतलेल्या 'हर्क्युलस'ची भन्नाट गोष्ट

फोटो स्रोत, Getty Images
- Author, प्रतिनिधी
- Role, बीबीसी न्यूज मुंडो
- वाचन वेळ: 5 मिनिटे
जेव्हापासून हर्क्युलस हा अँडी आणि मॅगी रॉबिनच्या शेरीफमुइर येथील घरी आला, तेव्हापासून हे तिघेही एकमेकांपासून कधीच दूर गेले नाहीत. डनब्लेन शहराजवळ असलेल्या त्या घरात त्यांच्यामध्ये खूप घट्ट नातं तयार झालं.
ते दिवसाची सुरुवात स्वयंपाकघरात एकत्र नाश्ता करून करायचे. कंडेन्स्ड मिल्क, साखर एकत्रित करून केलेली कॉफी, अंडी आणि सॉसेज असा त्यांचा नाश्ता असायचा.
त्यानंतर ते दिवसभर खेळणं, ट्रेनिंग घेणं किंवा केवळ एकमेकांसोबत वेळ घालवणं अशा गोष्टी करायच्या.
ते तिघेही एका कुटुंबासारखे राहत होते, पण त्यांचं हे कुटुंब खूप वेगळं आणि विशेष असं होतं.
कारण हर्क्युलस, लोक त्याला 'हर्क' नावाने ओळखत असत. तो माणूस नव्हता तर तो होता एक अस्वल.
होय, तो एक ग्रिझली अस्वल म्हणजेच राखाडी अस्वल होता. अँडी आणि मॅगी यांनी त्याला तो फक्त नऊ महिन्यांचा असताना दत्तक घेतलं होतं. मोठा झाल्यानंतर हर्क्युलसची उंची 2.5 मीटरपेक्षा जास्त झाली आणि त्याचं वजन 190 किलोहून जास्त झालं होतं.
हर्क्युलसवर मुलासारखं प्रेम
मॅगी यांना लहानपणापासूनच प्राण्यांची खूप आवड होती. त्या स्कॉटलंडमधील एका फार्मवर वाढल्या होत्या आणि त्यांचं पहिलं प्रेम घोडे होतं. लहानपणीच त्या घोडेस्वारी शिकल्या होत्या आणि शो जंपिंग स्पर्धांमध्ये (उडी मारण्याची स्पर्धा) त्यांनी अनेक बक्षीसंही जिंकली होती.
त्यांचा पती अँडी हे एक लाकूडतोड कामगार आणि कुस्तीपटू होते. मॅगीपेक्षा ते 15 वर्षांनी मोठे होते. जेव्हा अँडी यांनी अस्वलाच्या पिल्लाला दत्तक घेण्याचा प्रस्ताव ठेवला, तेव्हा मॅगी यांनी क्षणाचाही विचार न करता होकार देऊन टाकला.
"मला आजही आठवतंय, अँडीने पहिल्यांदा मला विचारलं होतं, 'मी अस्वलाचं पिल्लू पाळण्याचा विचार करतोय, तुला काय वाटतं?' पुढे आमचं आयुष्य इतकं खास होईल, आणि हर्क्युलससोबत आमचं इतकं जादुई नातं तयार होईल, याची मी कधी कल्पनाही केली नव्हती," असं मॅगी यांनी बीबीसीला सांगितलं.
अँडी यांना ही कल्पना कॅनडामध्ये सुचली होती. तिथे त्यांना 'टेड द टेरिबल' नावाच्या ग्रिझली अस्वलासोबत कुस्ती लढण्यासाठी 1 हजार डॉलर्सची ऑफर देण्यात आली होती. त्या अस्वलासोबतच्या लढतीमुळे अँडी इतके प्रभावित झाले की, त्यांनाही स्वतःचं एक अस्वल असावं असं वाटू लागलं.

फोटो स्रोत, Getty Images
त्यांच्या कुटुंबीयांना आणि मित्रांना ही कल्पना फारच वेडी आणि अव्यवहार्य वाटत होती, आणि त्यामागचं कारणही तसंच होतं. पण तरीही अँडी आणि मॅगी यांनी आपला निर्णय काही बदलला नाही. शेवटी स्कॉटलंडमधील एका प्राणिसंग्रहालयात त्यांना हवं असलेलं अस्वलाचं पिल्लू मिळालं.
अस्वलाच्या पिल्लासाठी त्यांनी आवश्यक ती सर्व तयारी पूर्ण केली. त्यानंतर 31 ऑगस्ट 1975 रोजी 67 डॉलर्स भरून त्यांनी त्या अस्वलाच्या पिल्लाला अधिकृतपणे दत्तक घेतलं.
त्यांनी त्या अस्वलाचं नाव 'हर्क्युलस' ठेवलं. प्राणिसंग्रहालयात आईसोबत राहिलेल्या त्याच्या दोन भावांची नावं 'अॅटलस' आणि 'सॅमसन' होती.
त्यांनी हर्क्युलसची निवड केली, कारण आपल्या दोन भावांच्या तुलनेत तो जास्त शांत आणि प्रेमळ होता. तसेच त्याचं आपल्या आईवरही खूप प्रेम होतं.
तरीही हर्क्युलस जेव्हा त्यांच्या घरी आला, तेव्हा तो खूपच रानटी, जंगली स्वभावाचा होता. त्यामुळे मॅगी यांना त्याला हात लावण्यासाठी तब्बल 2 महिने लागले. पण नंतर हर्क्युलस मॅगीसाठी अगदी स्वतःच्या मुलासारखाच झाला.
"लहान मूल असो किंवा एखादा प्राणी, सुरुवातीला ते निरागस असतात. त्यांचा कधी कोणी विश्वासघात केलेला नसतो किंवा त्यांना दुखावलेलं नसतं. त्यांचं ते निरागसपण टिकवून ठेवणं आपल्या हातात असतं."
भरकटलेलं आयुष्य
त्यांचं एकत्र राहणं खूप छान पद्धतीने सुरू होतं. हर्क्युलस अँडीसोबत कुस्तीच्या शोमध्ये काम करायचे आणि इतर कामांमध्येही त्याला मदत करायचा.
हर्क्युलस अँडी आणि मॅगी चालवत असलेल्या पबमध्येही नेहमी जायचा. तो ग्राहकांच्या गर्दीतून अगदी आरामात फिरायचा.
इतकंच नाही, तर त्याला दारूचीही सवय लागली होती. अँडीप्रमाणेच त्यालाही भरपूर लिंबूपाणी आणि थोडी बिअर मिसळून बनवलेलं पेय खूप आवडायचं.
हर्क्युलसचा मोठा आणि धडकी भरवणारा आकार पाहून लोकांना भीती वाटायची, पण त्याचा स्वभाव मात्र खूप प्रेमळ आणि निरुपद्रवी होता. त्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच तो आवडायचा आणि परिसरात तो एक सेलिब्रिटीच बनला होता.
"डनब्लेनच्या सामाजिक आयुष्याचा तो एक महत्त्वाचा भाग बनला होता," असं मॅगी सांगतात.
आणि याच लोकप्रियतेमुळे 1980च्या उन्हाळ्यात हर्क्युलसला एका प्रसिद्ध टॉयलेट पेपर ब्रँडच्या जाहिरातीसाठी काम मिळालं. ही जाहिरात वेस्टर्न हेब्रिड्स येथे शूट करण्यात आली होती.
शूटिंग सुरू होण्यापूर्वी अँडी हर्क्युलससोबत स्कॉटलंडमधील त्या बेटांच्या थंड पाण्यात पोहण्यासाठी गेले होते.

फोटो स्रोत, Getty Images
नेहमीप्रमाणे हर्क्युलसच्या गळ्यात दोरी बांधलेली होती आणि ते दोघे पाण्यात उतरले. पण थंडीमुळे दोरी आकुंचन पावली असावी, त्यामुळे गाठ सैल झाली आणि हर्क्युलसला समजलंच नाही की, त्याचा अँडी यांच्यासोबतचा संपर्क तुटला आहे. तो तसाच पुढे पोहत राहिला.
हा प्रसंग काही क्षणांतच मोठ्या शोकांतिकेत बदलला. हर्क्युलस सतत पोहत राहिला आणि थोड्याच वेळात तो दिसेनासा झाला.
रिकामेपणाची जाणीव
हर्क्युलसला शोधण्यासाठी तब्बल 24 दिवस लागले. त्यासाठी जमिनीवर आणि हवाई शोधमोहीम राबवण्यात आली होती, ज्यात शेकडो स्वयंसेवक सहभागी झाले होते.
हर्कच्या शोधमोहीमेवर प्रसारमाध्यमांचंही बारकाईने लक्ष होतं. त्याच्याबद्दल कोणतीही नवीन माहिती मिळाली की, ती लगेच लोकांपर्यंत पोहोचवली जात होती.
शेवटी जेव्हा हर्क्युलस दिसला, तेव्हा त्याची अवस्था खूपच वाईट झाली होती. "तो जणू फक्त कातडी उरलेला रिकामा देह वाटत होता," असं मॅगी आठवून सांगतात. "तो खूप अशक्त झाला होता."
त्याचं अर्ध्याहून अधिक वजन कमी झालं होतं.
"त्या रात्री आणि दुसऱ्या दिवशी सकाळी बेटावरील लोकांनी आपल्या गायींचं दूध काढून हर्क्युलससाठी 50 लिटरपेक्षा जास्त दूध आणलं. त्यामुळंच शेवटी हर्क्युलस पुन्हा सावरू शकला," असं मॅगी यांनी बीबीसीला सांगितलं.

फोटो स्रोत, Getty Images
हर्कला खूप काळजीपूर्वक घरी आणण्यात आलं. त्यानंतर तो हळूहळू बरा होऊ लागला.
या अनपेक्षित घटनेनंतर हर्क्युलसची लोकप्रियता खूप वाढली. तो आंतरराष्ट्रीय स्टार झाला.
प्रत्येकालाच हर्क्युलसच्या कहाणीचा भाग व्हायचं होतं. तो अमेरिका, जपान अशा अनेक देशांमध्ये गेला. तिथे त्याची भेट मार्गारेट थॅचर आणि बॉब होप यांसारख्या प्रसिद्ध व्यक्तींशी झाली.
हर्क्युलस अनेक मनोरंजन कार्यक्रमांमध्येही दिसला. इतकंच नव्हे, तर तो ऑक्टोपसी या जेम्स बॉन्डच्या चित्रपटातही झळकला.
आजाराशी झुंज
2000 च्या आसपास हर्कची तब्येत खालावू लागली. त्याच्या पाठीला गंभीर दुखापत झाली होती, त्यामुळे त्याचे मागचे पाय लुळे पडले होते.
खूप मेहनत घेऊन अँडी यांनी हर्कला पुन्हा बरं केलं.
"अँडी दररोज हर्क्युलसला पोहायला घेऊन जायचा. तो स्वतःही स्विमिंग पुलाच्या कडेला सतत पुढे-मागे चालत राहायचा. इतकं चालायचा की त्याच्या बुटाचे तळही झिजून जायचे," असं मॅगी सांगतात.

फोटो स्रोत, Getty Images
काही काळासाठी त्याची तब्येत सुधारली होती. पण नंतर ती पुन्हा खालावली.
डॉक्टरांना त्याच्या पाठीवर मोठी गाठ आढळून आली होती. त्यानंतर हर्क्युलसला वाचवणं शक्य झालं नाही. अखेर फेब्रुवारी 2001 मध्ये, सुमारे 25 वर्षांचा असताना, कुटुंबाचा लाडका सदस्य आणि अँडी यांचा साथीदार असलेला हर्क्युलस मरण पावला.
अँडी यांचं 2019 मध्ये, वयाच्या 84व्या वर्षी निधन झालं.
दोघांनाही उइस्ट येथे एकमेकांच्या शेजारी दफन करण्यात आलं आहे. ज्या ठिकाणी हर्क्युललवा हरवला होता त्याच्याजवळ हे ठिकाण आहे.
त्या ठिकाणी अँडी यांच्या समाधीचं चिन्ह असलेली एक पट्टी (फलक) आहे. तसेच हर्क्युलसच्या जागी त्याच्या खऱ्या आकाराचं एक शिल्पही ठेवलेलं आहे.
"मी इथे भेट द्यायला येते, तेव्हा मला आपोआप हसू येतं. मी खूप आठवणी काढते. हे एक खूप सुंदर ठिकाण आहे," असं मॅगी सांगतात.
"अँडी आणि हर्क्युलस यांचं नातं खूपच विशेष होतं. जर कुणी अस्वल होण्यासाठी योग्य असेल, तर ते अँडी होते. आणि जर कुणी माणसासारखं वागण्यासाठी योग्य होतं, तर तो हर्क्युलस होता," असं सांगितलं जातं.
"हर्क्युलसने सर्व अडचणींवर मात केली. त्याने दाखवलं की, प्रेम आणि मायेने काहीही साध्य करता येतं."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)


























