'मिस पुणे' ठरलेल्या त्विषा शर्मांच्या मृत्यूचं प्रकरण काय आहे? भोपाळ पोलिसांनी काय माहिती दिली?

फोटो स्रोत, Twisha's family
- Author, विष्णुकांत तिवारी
- Role, बीबीसी प्रतिनिधी
- Published
- वाचन वेळ: 6 मिनिटे
"हे प्रकरण हत्येचं नसून आत्महत्येचं असल्याचं स्पष्टपणे दिसतंय," असं भोपाळचे पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं.
12 मे 2026 च्या रात्री भोपाळच्या कटारा हिल्स परिसरातील एका घरात त्विषा शर्मा यांचा मृतदेह आढळला.
त्विषाच्या कुटुंबीयांनी हा मृत्यू हत्या असल्याचा आरोप केला आहे, तर तिच्या सासरच्या मंडळींचा दावा आहे की तिने आत्महत्या केली.
या प्रकरणात भोपाळ पोलिसांनी त्विषा यांचे पती समर्थ सिंह आणि सासू गिरीबाला सिंह यांच्याविरोधात हुंड्यासाठी छळ केल्याच्या आरोपांखाली गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास सहा सदस्यीय विशेष तपास पथक (SIT) करत आहे. गिरीबाला सिंह या निवृत्त न्यायाधीश आहेत.
दरम्यान, त्विषाच्या कुटुंबीयांनी हा मृत्यू हत्या असल्याचा आरोप कायम ठेवला आहे. त्यांनी पुराव्यांमध्ये फेरफार झाल्याचाही आरोप केला असून, शवविच्छेदन प्रक्रियेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. तपासावर काही प्रभावशाली व्यक्तींकडून दबाव आणला जात असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे.
त्विषा शर्मा यांच्या मृतदेहाचं पुन्हा पोस्टमॉर्टेम करण्यात यावं, अशी मागणी त्यांच्या कुटुंबीयांनी न्यायालयात केली होती. मात्र, भोपाळ न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावली.
प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयाने कटारा हिल्स पोलिसांना मृतदेह विघटन होऊ नये यासाठी तो सुसज्ज शवागारात सुरक्षित ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.
दरम्यान, राष्ट्रीय महिला आयोगानेही या प्रकरणाची स्वतःहून दखल घेतली आहे. आयोगाने मध्य प्रदेशचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालक यांना पत्र पाठवून सात दिवसांत या प्रकरणात झालेल्या कारवाईचा सविस्तर अहवाल सादर करण्यास सांगितलं आहे.
त्विषा शर्मा यांच्या पोस्टमॉर्टेम अहवालानुसार, त्यांचा मृत्यू "गुदमरल्यामुळे" झाला. मात्र, या अहवालात मृत्यूपूर्वी झालेल्या अनेक जखमांचाही उल्लेख आहे.
यावरून त्विषाच्या कुटुंबीयांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.
शर्मा कुटुंबीयांनी शेअर केलेल्या चॅट्समध्ये, त्विषाने पती आणि सासरच्या मंडळींकडून होत असलेल्या छळाचा वारंवार उल्लेख केल्याचं दिसून येतं. मात्र, सासरच्या मंडळींनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
पोलिसांनी आतापर्यंत काय सांगितलं?
भोपाळचे पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी बीबीसीला सांगितलं की, "हे अगदी स्पष्ट आहे की हे प्रकरण हत्येचं नसून आत्महत्येचं आहे."
पोलीस आयुक्तांनी हेही सांगितलं की, तिच्या सासरच्या मंडळींनी केलेल्या आरोपांनुसार, शवविच्छेदन अहवालात किंवा तपासात आतापर्यंत अमली पदार्थांच्या सेवनाचा कोणताही पुरावा आढळलेला नाही.
बीबीसीने त्विषा शर्मा यांचा पोस्टमॉर्टेम अहवाल पाहिला असून, त्यामध्ये त्यांचा मृत्यू गुदमरल्यामुळे झाल्याचं म्हटलं आहे.
या अहवालात शरीराच्या इतर भागांवर मृत्यूपूर्वी झालेल्या 'अनेक जखमांचा' देखील उल्लेख आहे. यामध्ये डाव्या हातावरील निळे डाग तसेच मनगट आणि दांडाजवळ लाल रंगाचे व्रण असल्याचाही उल्लेख आहे.

फोटो स्रोत, Twisha's family
प्रश्न उपस्थित होत आहेत
'गुदमरून झालेला मृत्यू म्हणजेच आत्महत्या' असं असलं, तरी त्विषा शर्मा यांच्या पोस्टमॉर्टेम अहवालातून हे स्पष्ट होत नाही. तसेच, मृत्यूपूर्वी त्यांचा कुणासोबत शारीरिक संघर्ष झाला होता का, हेही त्यातून स्पष्ट होत नाही.
आम्ही जेव्हा हाच प्रश्न भोपाळच्या पोलीस आयुक्तांना विचारला, तेव्हा ते म्हणाले, "आतापर्यंतचा आमचा तपास आणि शवविच्छेदन अहवालानुसार, हे आत्महत्येचंच प्रकरण आहे."
या अहवालात दिलेल्या माहितीनुसार, ज्या वस्तूमुळे गुदमरून मृत्यू झाला, ती वस्तू पोस्टमॉर्टेम करणाऱ्या पथकाला उपलब्ध करून देण्यात आलेली नव्हती.
या प्रकरणातील सगळ्यात मोठा वाद याच मुद्द्यावर आहे. त्विषा यांच्या कुटुंबीयांनी न्यायवैद्यक पुराव्यांच्या हाताळणीबाबत आणि तपासात निष्काळजीपणा झाल्याचा आरोप केला आहे.
भोपाळचे पोलीस आयुक्त संजय कुमार यांनीही हे मान्य केलं आहे की, आत्महत्येसाठी कथितरित्या वापरण्यात आलेलं साहित्य प्राथमिक शवविच्छेदनादरम्यान वैद्यकीय पथकाला उपलब्ध करून देण्यात आले नव्हतं. त्यांनी सांगितलं की, या त्रुटीची स्वतंत्र चौकशी केली जाईल.
दुसऱ्या पोस्टमॉर्टेमची मागणी फेटाळली
न्यायालयात शर्मा कुटुंबीयांची बाजू मांडणारे वकील अंकुर पांडे यांनी बीबीसीला सांगितलं, "आमचा अर्ज, पोलीस अहवाल आणि केस डायरी यांचे पुनरावलोकन केल्यानंतर माननीय न्यायालयाने दुसऱ्या शवविच्छेदनाची आमची विनंती फेटाळली आहे. मात्र, आम्ही उपस्थित केलेल्या प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाने त्विषाचा मृतदेह तात्काळ जतन करण्याचे आदेश दिले आहेत."
ते पुढे म्हणाले, "माननीय न्यायालयाने या प्रकरणातील फरार आरोपी समर्थ सिंह याला 23 तारखेला हजर राहण्यास सांगितलं आहे."
भोपाळ पोलिसांनी यादरम्यान त्विषा शर्मा यांचे पती समर्थ सिंह यांच्या विरोधात लुकआऊट नोटीस जारी केली आहे. भोपाळचे पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी सांगितलं की, एसआयटी या प्रकरणाचा 'सर्व बाजूंनी' तपास करत असून आरोपीचा शोध सुरू आहे.

फोटो स्रोत, Twisha's family
मध्य प्रदेश सरकारने केंद्र सरकारला या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची विनंती करणारं पत्र लिहिणार असल्याचं म्हटलं आहे.
मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी बुधवारी (20 मे) त्विषा शर्मा यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन याबाबत आश्वासन दिलं आहे.
त्विषा शर्मा यांचे पती आणि सासू यांना मंजूर झालेल्या अटकपूर्व जामिनाविरोधात न्यायालयात अपील करण्यात येणार असल्याची माहिती मध्य प्रदेश सरकारने दिली आहे.
त्विषा शर्मा यांचे वडील नवनिधी शर्मा यांनी बुधवारी निवृत्त सैनिकांच्या एका गटासह मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. कुटुंबीयांचं म्हणणं आहे की, भविष्यात न्यायालयाने दुसऱ्या शवविच्छेदनास परवानगी दिल्यास मृतदेह दिल्लीतील एम्स (AIIMS) येथे पाठवण्याचं आश्वासनही सरकारने दिलं आहे.
राष्ट्रीय महिला आयोगाने आरोपीच्या अटकेबाबत, फरार पती समर्थ सिंहच्या शोधाबाबत, पारपत्र जप्तीच्या सद्यस्थितीबाबत, सीसीटीव्ही फुटेज, कॉल रेकॉर्ड्स, इलेक्ट्रॉनिक आणि फॉरेन्सिक पुरावे तसेच शवविच्छेदन अहवालासंदर्भात माहिती मागवली आहे.
मृत्यूनंतर आठ दिवसांनी त्विषा यांचा मृतदेह भोपाळच्या एम्समध्ये आणण्यात आला
ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी त्विषा शर्मा यांचे पती समर्थ सिंह आणि सासू गिरीबाला सिंह यांच्या विरोधात हुंडा छळाशी संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला.
या प्रकरणात गिरीबाला सिंह यांना अटकपूर्व जामीन मंजूर झाला, परंतु समर्थ सिंह यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे.
या प्रकरणाचा तपास करणाऱ्या एसआयटीचे प्रमुख सहाय्यक पोलीस आयुक्त रजनीश कश्यप कौल यांनी बीबीसीला सांगितलं, "आम्ही न्यायालयात असा युक्तिवाद केला की, जर समर्थ सिंह यांना जामीन मंजूर केला, तर पुराव्यांमध्ये फेरफार होण्याची शक्यता आहे. त्यानंतर त्यांचा अर्ज फेटाळण्यात आला."
रजनीश कश्यप कौल यांच्या म्हणण्यानुसार, "त्विषाच्या सासरच्या मंडळींना कायदा आणि कायद्याच्या कार्यपद्धतीबाबत माहिती असूनही, पोलिसांना या घटनेची माहिती तात्काळ देण्यात आली नाही."
या घटनेला आठ दिवस उलटूनही समर्थ सिंह फरार आहेत. पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी दावा केला आहे की, आरोपीचा शोध घेण्यासाठी अनेक पथके कार्यरत आहेत आणि 10 हजार रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे.
दुसरीकडे, त्विषा शर्मा यांचे वडील नवनिधी शर्मा आणि भाऊ मेजर हर्षित शर्मा हे आत्महत्येचं प्रकरण नसून हत्येचंच प्रकरण असल्याचा दावा करत आहेत.

फोटो स्रोत, Twisha's family
बीबीसीशी बोलताना नवनिधी शर्मा यांनी सांगितलं, "आम्ही एका खूप मोठ्या व्यवस्थेशी लढत आहोत."
कुटुंबाचा आरोप आहे की, लग्नानंतर त्विषा यांना हुंडा आणि इतर मुद्द्यांवरून सतत त्रास दिला जात होता.
एफआयआरमधील आरोपांनुसार, त्यांचे पती समर्थ सिंह आणि सासू गिरीबाला सिंह यांनी तिच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.
त्विषा यांच्या कुटुंबीयांचं म्हणणं आहे की, 12 मेच्या रात्री मृत्यू होण्यापूर्वी त्विषा त्यांच्या सतत संपर्कात होती. त्यांच्या म्हणण्यानुसार, तिने रात्री सुमारे 09.41 वाजता तिच्या वडिलांना व्हॉट्सॲपवर फोन केला होता, परंतु संभाषणादरम्यान फोन अचानक बंद झाला.
मंगळवारी जारी केलेल्या एका प्रसिद्धीपत्रकात कुटुंबीयांनी म्हटलं आहे की, त्यांनी दिल्लीतील एम्स (AIIMS) येथे स्वतंत्र दुसऱ्या पोस्टमॉर्टेमसाठी न्यायालयात अर्ज केला आहे.
या पत्रकात कुटुंबीयांनी मृतदेहाचं विघटन झाल्यामुळे महत्त्वाचे न्यायवैद्यक पुरावे धोक्यात येऊ शकतात, अशी चिंताही व्यक्त केली होती.
त्विषानं जिंकलेला 'मिस पुणे'चा किताब
नोएडामध्ये जन्मलेल्या आणि वाढलेल्या त्विषा शर्मा यांनी विविध क्षेत्रांत काम करत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती.
इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या माहितीनुसार, 2009 ते 2012 या काळात किशोरवयातच त्यांनी मॉडेलिंग क्षेत्रात पाऊल ठेवले आणि पुढे 'मिस पुणे' हा किताबही पटकावला.
या यशानंतर त्यांच्यासाठी जाहिरात क्षेत्रासह प्रादेशिक चित्रपटसृष्टीचेही दरवाजे खुले झाले.
त्यांच्या मित्रांच्या मते, त्विषा अत्यंत मनमिळाऊ आणि महत्त्वाकांक्षी होत्या. त्यांच्या लिंक्डइन प्रोफाइलनुसार, त्या मार्केटिंग व्यावसायिक, कम्युनिकेशन तज्ज्ञ, अभिनेत्री, चित्रपट निर्माती आणि डिजिटल क्रिएटर म्हणून कार्यरत होत्या.
त्विषा शर्मा या पुण्यातील इंदिरा युनिव्हर्सिटीच्या माजी विद्यार्थिनी होत्या. 19 मे रोजी विद्यापीठात त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी प्रार्थना सभेसाठी त्यांचे मित्र आणि विद्यापीठातील कर्मचारी एकत्र आले होते.
इंदिरा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स (IGI) च्या अध्यक्षा डॉ. तरिता शंकर म्हणाल्या, "ती आमची विद्यार्थिनी होती. अतिशय प्रेमळ, मनमिळाऊ आणि अत्यंत कुशाग्र बुद्धीची. माझा तिच्याशी तसेच इतर विद्यार्थ्यांशी दररोज संवाद होत असे. इंदिरा विद्यापीठात घालवलेल्या त्या तीन वर्षांत ती माझ्या खूप जवळ आली होती. प्रत्येक कार्यक्रमात ती नेहमी आघाडीवर असायची, त्यामुळे आमचा सातत्याने संपर्क राहिला. तिच्यासारख्या उत्साहाने आणि चैतन्याने भरलेल्या मुली सहजच सर्वांचे लक्ष वेधून घेतात. त्यामुळे विद्यापीठात तिची एक वेगळी ओळख आणि स्थान निर्माण झाले होते. पण नेमके असे काय घडले, ज्यामुळे तिला आयुष्य संपवण्याचा निर्णय घ्यावा लागला? अशी कोणती परिस्थिती तिच्यासमोर उभी राहिली, की या जगाचा निरोप घेणे हाच एकमेव पर्याय तिला वाटला?"
मॉडेलिंगमध्ये रस असणाऱ्या त्विषानं 'मिस पुणे'ची स्पर्धा जिंकत किताबही पटकावला होता, अशी माहिती इंडियन एक्स्प्रेसनं वृत्तात दिलीय.
महत्त्वाची सूचना
औषधोपचार आणि थेरपीच्या मदतीने मानसिक आजारांवर उपचार शक्य आहेत. यासाठी तुम्ही मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेणं गरजेचं आहे. तुम्हाला किंवा एखाद्या परिचित व्यक्तीमध्ये अशा प्रकारच्या मानसिक आजारांची लक्षणं दिसल्यास या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधून मदत मिळवू शकता.
- हितगुज हेल्पलाईन, मुंबई - 022- 24131212
- सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालय -1800-599-0019 (13 भाषांमध्ये उपलब्ध)
- इंस्टिट्यूट ऑफ ह्यूमन बिहेवियर अँड एलाइड सायन्सेस - 9868396824, 9868396841, 011-22574820
- नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्स - 080 - 26995000
- विद्यासागर इंस्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड एलाइड सायन्सेस, 24X7 हेल्पलाइन-011 2980 2980
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.


















