'आईच मला मुद्दाम वर्षानुवर्षं आजारी पाडत होती'; डॉक्टरांनी उघड केलं सत्य

7 वर्षांची निना ब्लॉम

फोटो स्रोत, Courtesy of Nina Blom

फोटो कॅप्शन, 7 वर्षांची निना ब्लॉम
    • Author, इंडिया राकुसेन
    • Author, राडेक बॉशेटी
    • Role, बीबीसी आउटलुक
  • Published
  • वाचन वेळ: 7 मिनिटे

1970 आणि 80 च्या दशकात नेदरलँड्समध्ये वाढलेली निना ब्लॉम इतर सामान्य मुलांसारखीच जगत होती. तिला संगीत, गाणं आणि नृत्याची आवड होती. आपल्या बहिणीसोबत घराच्या माळ्यावर खेळण्यात तिचे दिवस आनंदात जात होते. आजही त्या आठवणी तिच्या मनात आहेत.

परंतु, असे आनंदाचे क्षण तिच्या आयुष्यात फारच कमी होते.

निनाला क्वचितच घराबाहेर जाण्याची परवानगी दिली जायची. ती 8 वर्षांची असताना तिच्या आईने तिला ती खूप गंभीर आजारी आहे, असं पटवून दिलं होतं. तिला वारंवार तपासण्या आणि उपचारांसाठी 6 वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये तब्बल 15 वेळा नेण्यात आलं.

हळूहळू आईने तिला व्हीलचेअर वापरायला लावली. ती स्नायूंच्या असाध्य आजाराने ग्रस्त असून लवकरच मरणार असल्याचे सांगितलं.

वर्षानुवर्षे अनेक डॉक्टरांनी निनाची तपासणी केली, परंतु नेमका आजार काय आहे, हे कोणालाच समजू शकलं नाही. अखेर एका जागरूक डॉक्टरांनी तिच्या आयुष्यातील सर्व वेगवेगळ्या गोष्टी जोडून पाहिल्या आणि तिच्या 'आजारा'मागचं खरं आणि धक्कादायक कारण शोधून काढलं.

ते कारण म्हणजे तिची स्वतःची आई.

पेडियाट्रिक कंडिशन फॉल्सिफिकेशन याला फॅब्रिकेटेड ऑर इंड्यूस्ड इलनेस (एफआयआय) किंवा मंचहाउझेन सिंड्रोम बाय प्रॉक्सी असंही म्हणतात. हा लहान मुलांवर अत्याचार करण्याचा एक प्रकार आहे.

यात मुलाची काळजी घेणारी व्यक्ती, बहुतेक वेळा पालक, मुलाचा आजार वाढवून सांगतात, खोटा आजार असल्याचं दाखवतात किंवा मुद्दाम म्हणजेच हेतुपुरस्सर मुलाला आजारी पाडतात. मात्र, असं का केलं जातं, याचं नेमकं कारण अद्यापही स्पष्ट झालेलं नाही.

पहिल्यांदा रुग्णालयात दाखल

निना 8 वर्षांची असताना तिला वारंवार पोटदुखीचा त्रास होऊ लागला आणि तिचं वजनही खूप कमी झालं.

जेव्हा तिला रुग्णालयात दाखल केलं, तेव्हा तिला सफरचंदाचा ज्यूस आणि सूप दिलं गेलं. आश्चर्य म्हणजे, त्यानंतर तिला बरं वाटू लागलं.

"डॉक्टर सांगायचे, 'निना आता बरी आहे... तिला आता घरी घेऊन जाऊ शकता.'"

पण निनाची आई पुन्हा तिला रुग्णालयात घेऊन जायची. निनाला कोणताही त्रास होत नसला तरी ती तिला डॉक्टरांना 'पोट अजूनही दुखतंय' असंच सांगायला भाग पाडायची.

लहानपणी निना इतर मुलांसारखी आनंदाने खेळायची.

फोटो स्रोत, Courtesy of Nina Blom

फोटो कॅप्शन, लहानपणी निना इतर मुलांसारखी आनंदाने खेळायची.

पुढची अनेक वर्षे हेच वारंवार घडत राहिलं.

एकदा कुटुंबीयांसोबत सहलीवर असताना पोहून आल्यावर निनाने अंग दुखत असल्याची तक्रार केली. तेवढ्यावरूनच तिच्या आईने तिला स्नायूंचा आजार झाला आहे, असा निष्कर्ष काढला आणि पुन्हा तिला लगेचच रुग्णालयात नेलं.

निनाने याला विरोध केला, तेव्हा तिची आई म्हणाली, "मला मूर्ख बनवू नकोस. तुला वेदना होत आहेत, आणि डॉक्टरांनाही तू हेच सांगणार आहेस."

निनासाठी हे सगळं खूप गोंधळात टाकणारं होतं.

ती म्हणते, "मला खूप अपराध्यासारखं वाटायचं. कारण मी कॅन्सरसारख्या गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या मुलांसोबत रुग्णालयात पडून होते. मला मनातून वाटायचं, 'मला तर काहीच झालेलं नाही.'"

ती रुग्णालयात असताना तिच्या शेजारच्या बेडवर असलेल्या एका मुलाचा मृत्यू झाला. त्यामुळे निनाच्या मनातील अपराधीपणाची भावना आणखी वाढली.

'ती निर्दयी होती'

निनावर अनेक वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या. यामध्ये बोन मॅरो बायोप्सीसारख्या वेदनादायक तपासण्यांचाही समावेश होता. पण इतकं सगळं करूनही डॉक्टरांना तिच्यामध्ये कोणताही आजार आढळून आला नाही.

निनाची आई नेहमीच तिच्यासोबत असायची. निना हसताना दिसली की तिला राग यायचा आणि ती तिला शिक्षा करायची.

चार आठवडे रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर डॉक्टरांनी अखेर निनाला घरी पाठवलं. पण घरी पोहोचताच तिच्या आईने तिला व्हीलचेअरवर बसवलं, तिची शाळा बंद केली आणि घरात लावलेल्या बेडवरच दिवसभर पडून राहायला भाग पाडलं.

3 वर्षांची निना ब्लॉम आपल्या आईसोबत.

फोटो स्रोत, Courtesy of Nina Blom

फोटो कॅप्शन, 3 वर्षांची निना ब्लॉम आपल्या आईसोबत.

त्यानंतर निनाचं मित्र-मैत्रिणींना भेटणंही बंद केलं गेलं. तिला आवडणारं संगीत ऐकणंही तिच्या बंद करून टाकलं. वेळ घालवण्यासाठी निना विणकाम करू लागली. पण त्यामुळे तिचे हात दुखू लागले.

यावर तिच्या आईने तिला मोठा आजार झाला आहे, असा दावा केला आणि तिच्या दोन्ही हातांभोवती घट्ट पट्ट्या बांधल्या.

त्या पट्ट्या इतक्या घट्ट बांधल्या होत्या की, निनाचे हात आणि बोटं बधीर झाली होती. हे पाहून तिची आई मात्र आनंदी असल्यासारखी दिसत होती. निना म्हणते, "माझ्या आईला यात आनंद मिळताना पाहणं माझ्यासाठी खूप भयंकर होतं."

'तू आता मरणार आहेस'

जसजशी वर्षे गेली तिच्या आईच्या गोष्टीही बदलत गेल्या. एकदा तिने निनाला धमकी दिली, "तुला खरंच काही त्रास नाही आणि हे सगळं तूच खोटं सांगत आहेस, असं मला कळलं तर मी तुला मारेन."

यामुळे निना अधिकाधिक गोंधळून गेली. ती म्हणते, यात मी 'स्वतःलाच हरवून' बसले होते.

सातत्याने अंथरुणावर पडून राहिल्यामुळे आणि हातांवर घट्ट पट्ट्या बांधलेल्या असल्यामुळे निनाच्या शरीराची ताकद हळूहळू कमी झाली. अखेरीस डॉक्टरांनी तिला फिजिओथेरपीसाठी पुनर्वसन केंद्रात (रिहॅबिलिटेशन क्लिनिक) पाठवलं.

तिथे ती पुन्हा चालायला शिकली. त्याच उपचार केंद्रात रुग्ण असलेल्या एका मुलाच्या प्रेमातही ती पडली.

जेव्हा जेव्हा हे कुटुंब घर बदलायचं, तेव्हा निनाला नवीन डॉक्टरांकडे नेलं जायचं.

फोटो स्रोत, Courtesy of Nina Blom

फोटो कॅप्शन, जेव्हा जेव्हा हे कुटुंब घर बदलायचं, तेव्हा निनाला नवीन डॉक्टरांकडे नेलं जायचं.

अनेक वर्षांनंतर पहिल्यांदाच तिला पुन्हा आनंदी वाटू लागलं.

पुनर्वसन केंद्राने तिला आठवड्याच्या शेवटी घरी जाण्याची परवानगी दिल्यानंतर तिच्या आईने पुन्हा तिच्यावर नियंत्रण मिळवलं. तिने निनाला पुन्हा हातांवर वेदनादायक पट्ट्या बांधायला लावल्या आणि अंथरुणातून उठण्यासही मनाई केली.

तिच्या आईने निनाला हृदयाचा आजार असल्याचं सांगितलं. एक दिवस तर ती म्हणाली, "तू आता मरणार आहेस."

निना म्हणते, "त्या दिवशी मला आयुष्यात पहिल्यांदाच पूर्णपणे एकटं असल्यासारखं वाटलं. जणू मी एखाद्या काळोख्या दरीत कोसळत आहे."

'आम्हाला इच्छामरण हवं आहे. डॉक्टर, तुम्ही आम्हाला मदत करू शकाल का?'

मग अचानक सगळंच बदललं.

पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल झाल्यानंतर निनाची भेट बालरोगतज्ज्ञ डॉ. व्ह्रिएन्टेन यांच्याशी झाली.

तुला पुन्हा चालता यावं, तुझ्या हाता-पायांची हालचाल सुधारावी यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांकडे उपचारासाठी पाठवायचं आहे, असं डॉ. व्ह्रिएन्टेन यांनी निनाला सांगितलं.

हे ऐकून निना आणखी गोंधळून गेली.

तिची आई नेहमी तिला सांगायची की, तिला स्नायूंचा असाध्य आजार आहे आणि त्यातच तिचा मृत्यू होणार आहे. निनाच्या मनात याबद्दल शंका यायची, पण तिने कधीही आईला याबद्दल विचारण्याचं धाडस केलं नव्हतं.

1990 मध्ये घराबाहेर ठेवले गेल्यानंतर रुग्णालयात असताना आईस्क्रीम खाणारी निना.

फोटो स्रोत, Courtesy of Nina Blom

फोटो कॅप्शन, 1990 मध्ये घराबाहेर ठेवले गेल्यानंतर रुग्णालयात असताना आईस्क्रीम खाणारी निना

हे ऐकून तिची आई प्रचंड संतापली. घरी आल्यावर तिने निनाचे पाय जबरदस्तीने 'एक्स' आकारात ठेवले आणि उशांच्या मदतीने घट्ट बांधून ठेवले. तिने निनाचं जेवणही कमी केलं, नाकातून फीडिंग ट्यूब घातली आणि दिवसाला 20 गोळ्या घ्यायला भाग पाडलं.

एका डॉक्टरांच्या भेटीदरम्यान निनाच्या आईने तिच्यासाठी इच्छामरणाची (युथेनेशिया) मागणी केली. त्या वेळी आजारपणाने आणि सततच्या त्रासाने निना खूप थकली होती. त्यामुळे तिनेही डॉक्टरांना म्हटलं, "डॉक्टर, मला मरायचं आहे. तुम्ही माझी मदत करू शकाल का?"

हे ऐकून डॉक्टर काही क्षण मागे सरकले. ते निनाच्या आईशी थोडं बोललं आणि निनाला 24 तासांसाठी मॉर्फिन लिहून दिले.

डॉक्टर म्हणाले, "आम्ही तिला झोपेतच ठेवू."

अखेर संकटातून बाहेर

पण डॉ. व्ह्रिएन्टेन यांनी सर्व गोष्टींचा नीट विचार करून त्या जुळवून पाहिल्या, त्यांनी सत्य ओळखलं. त्यांनी बाल संरक्षण विभागाशी संपर्क साधला.

एक दिवस एक महिला निनाच्या खोलीत आली आणि तिला दुसऱ्या रुग्णालयात घेऊन जाणार असल्याचं सांगितलं. हे ऐकून निना तिला विनवणी करत म्हणाली, "नको, प्लीज मला मरू द्या."

निनाने पाहिलं की, तिची आई घाबरलेली होती. जवळच दोन पोलीस अधिकारीही उभे होते.

1989 मध्ये निनाने अनेक वर्षांनंतर पहिल्यांदाच सामान्य कपडे घालून बसलेला क्षण.

फोटो स्रोत, Courtesy of Nina Blom

फोटो कॅप्शन, 1989 मध्ये निनाने अनेक वर्षांनंतर पहिल्यांदाच सामान्य कपडे घातले होते

थोड्याच वेळात निनाला स्ट्रेचरवर रुग्णवाहिकेतून दुसऱ्या रुग्णालयात नेण्यात आलं.

तिच्या हात-पायांवरील पट्ट्या काढून टाकण्यात आल्या. तिच्या खोलीत एक व्हीडिओ कॅमेरा बसवण्यात आला.

दोन दिवस निनाने तिच्या आई-वडिलांपैकी कोणालाही पाहिलं नाही.

अखेरीस जेव्हा आई-वडील भेटायला आले तेव्हा निना त्यांना वारंवार म्हणाली, "मी आजारी नाही."

ती हेच वाक्य पुन्हा पुन्हा म्हणत राहिली. एकूण 18 वेळा तिने हे म्हटलं.

कॅमेरा सुरू असल्याचं तिच्या आईच्या लक्षात राहिलं नाही. ती निनावर रागावली. अनेक वर्षांपासून काय सुरू होतं, याचा हा महत्त्वाचा पुरावा ठरला.

आयुष्याची नवी सुरुवात

काही काळानंतर निनाने आई-वडिलांशी सर्व संबंध तोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर तिला एका उपचार केंद्रात हलवण्यात आलं. तिथे तिच्यावर शारीरिक आणि मानसिक उपचार करण्यात आले.

पुढे तिने नवीन ओळख स्वीकारली आणि दुसऱ्या शहरात जाऊन नवीन आयुष्य सुरू केलं.

नंतर तिने एक नवीन आयुष्य उभं केलं. कला शाखेचं शिक्षण पूर्ण केलं, नोकरी मिळवली आणि ती प्रेमातही पडली.

तिच्या आई-वडिलांनी त्यांनी केलेल्या कृत्याची कधीच कबुली दिली नाही किंवा मान्य केलं नाही. उलट, एकदा त्यांनी निनाचा शोध घेण्यासाठी खासगी गुप्तहेर नेमला. त्यामुळे निनाला पुन्हा प्रचंड मानसिक ताण आणि भीतीचा सामना करावा लागला.

निनाने भूतकाळ मागे सोडून नव्याने आयुष्य जगण्याचा निर्णय घेतला. आपण वाचलो, याचा आनंद तिने साजरा केला.

फोटो स्रोत, Courtesy of Nina Blom

फोटो कॅप्शन, निनाने भूतकाळ मागे सोडून नव्याने आयुष्य जगण्याचा निर्णय घेतला. आपण वाचलो, याचा आनंद तिने साजरा केला.

निनाने आपल्या आई-वडिलांविरोधात तक्रार करण्याचाही विचार केला. परंतु, तिची सुटका झाल्यानंतर त्या वेळी कुणीही काही केलं नव्हतं. शेवटी तिने तक्रार न करण्याचा निर्णय घेतला. काही वर्षांनी तिच्या आई-वडिलांचा एकापाठोपाठ मृत्यू झाला.

निना म्हणते, "माझ्या आई-वडिलांनी माझ्यासोबत जे केलं, तो गुन्हाच होता. तो माझ्यावर झालेला अतिशय गंभीर अत्याचार होता. त्यातून मी कसंबसं वाचले."

पण आता आयुष्य एका चांगल्या मार्गावर आल्याबद्दल ती स्वतःला नशीबवान समजते.

"मी वाचले, याचा मला खूप आनंद आहे. आयुष्यात जगण्यासारख्या अनेक सुंदर गोष्टी आहेत."

(हा लेख बीबीसी वर्ल्ड सर्व्हिसवरील आउटलुक या कार्यक्रमातील एका भागावर आधारित आहे.)

(निना यांच्या आत्मचरित्राचं नाव 'यू आर अ हॉरिबल चाइल्ड' असं आहे. तसेच त्यांची कहाणी 'यू आर गोइंग टू डाय' या ग्राफिक कादंबरीतही मांडण्यात आली आहे. ही कादंबरी मार्ग्रीट डे हीर आणि निना ब्लॉम यांनी लिहिली आहे.)

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)