You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
रजनीकांत आणि कमल हसन यांना जे जमलं नाही, ते विजय यांनी कसं करून दाखवलं?
- Author, शंकर नारायण सुदलाई
- Role, बीबीसी तमिळ
- वाचन वेळ: 5 मिनिटे
"मी माझ्या चित्रपट कारकिर्दीच्या शिखरावर असताना राजकारणात आलो आहे."
विजय हे वारंवार सभांमध्ये सांगत होते. त्यामुळे चाहत्यांना आणि पक्ष कार्यकर्त्यांना प्रचारासाठी आणखी बळ मिळत होतं.
पण अगदी गेल्या काही वर्षांचा विचार केला, तरी विजय हे काही पहिलेच कलावंत नाहीत, जे राजकारणात येऊन नशीब अजमावू पाहत होते.
विजय यांच्यासारखेच अनेक मोठे आणि लोकप्रिय अभिनेतेही राजकारणात येण्याची इच्छा बाळगून होते. अभिनेते रजनीकांत यांनी त्यांचे राजकीय विचार मांडले होते, तर कमल हसन थेट निवडणूक लढवायला उतरले होते.
जयललिता आणि करुणानिधी यांच्या निधनानंतर तामिळनाडूच्या राजकारणाला कलाटणी मिळाली. तिथलं राजकारण अधिकच तापलं.
त्या दोन मोठ्या नेत्यांच्या काळातच विजयकांत यांनी राजकारणात प्रवेश केला. 2011 च्या निवडणुकीत त्यांनी एआयएडीएमकेसोबत आघाडी करून विरोधी पक्षातही स्थान मिळवलं. पण तरीही, विजय यांच्याप्रमाणे मोठं यश मिळेल इतकी त्यांच्या पक्षाची वाढ मात्र झाली नाही.
तामिळनाडूच्या राजकारणात एमजीआर आणि जयललिता यांच्यानंतर दुसऱ्या कोणत्याही चित्रपट कलाकाराला यश मिळालं नव्हतं.
अशा परिस्थितीत 2026 च्या निवडणुकीत विजय यांना सत्तेसाठी आवश्यक पूर्ण बहुमत मिळालेलं नाही, तरीही त्यांनी स्वतःचा पक्ष राज्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आणला आहे.
रजनीकांत आणि कमल हसन यांना जे जमलं नाही, ते विजय यांनी कसं साध्य केलं?
रजनीकांत यांचा राजकीय 'आवाज'
तमिळ चित्रपटसृष्टीत अनेक वर्षांपासून सुपरस्टार असलेल्या रजनीकांत यांच्या राजकारणात येण्याबाबतच्या चर्चा 1990 च्या दशकाच्या मध्यापासून सुरू झाली.
1996 च्या निवडणुकीच्या वेळी पहिल्यांदाच 'रजनी व्हॉईस' (रजनीचा आवाज) हा शब्द तामिळनाडूच्या राजकारणात चर्चेचा मुद्दा ठरला होता.
'बादशाह' चित्रपटाच्या 100 दिवसाच्या सेलिब्रेशनवेळी रजनीकांत यांनी 'तामिळनाडूत बॉम्ब संस्कृती वाढतेय' असं मोठं वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्याची मोठी चर्चा झाली होती.
या चित्रपटाचे निर्माते आणि तत्कालीन राज्यमंत्री आर. एम. वीरप्पनही त्यावेळी मंचावर उपस्थित होते.
यानंतर आर. एम. वीरप्पन यांना तामिळनाडूच्या मंत्रिमंडळातून हटवण्यात आलं. अलीकडेच त्यांच्या जीवनावरील एका माहितीपटात रजनीकांत यांनी त्यावेळी आपण कोणत्या परिस्थितीत ते वक्तव्य केलं होतं, याबद्दल सांगितलं आहे.
यानंतर 1996 च्या निवडणुकीच्या वेळी हा मुद्दा पेटला. अशा परिस्थितीत एआयएडीएमकेसोबत काँग्रेसने आघाडी करू नये, असा विरोध करून मूप्पनार यांनी तमिळ मनिला काँग्रेस पक्षाची स्थापना केली आणि त्यांनी डीएमकेसोबत आघाडी केली.
एआयएडीएमकेविरोधातील आघाडीला रजनीकांत यांनी पाठिंबा देत, "एआयएडीएमके पुन्हा सत्तेत आली तर तामिळनाडूला देवही वाचवू शकणार नाही," असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. त्या निवडणुकीत एआयएडीएमकेचा पराभव झाला.
पराभवामागे अनेक राजकीय कारणं असली तरी रजनीकांत यांच्या पाठिंब्याची चर्चाच मोठ्या प्रमाणात झाली.
चित्रपट कारकिर्दीच्या शिखरावर असताना रजनीकांत राजकारणात येतील अशी अपेक्षा चाहत्यांना होती.
परंतु, 20 वर्षांहून अधिक काळ ते पूर्णवेळ राजकारणात आले नाहीत. मात्र त्यांच्या चित्रपटांमध्ये अप्रत्यक्ष राजकीय संवाद दिसत राहिले.
सुरू होण्यापूर्वीच संपलेलं राजकारण
शेवटी 2017 मध्ये रजनीकांत यांनी राजकारणात प्रवेश करणार असल्याची घोषणा केली. परंतु, तीन वर्षांनी कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी राजकारणात सक्रिय होणार नसल्याचं जाहीर केलं. त्यामुळे त्यांचं राजकीय करिअर पूर्णपणे सुरू होण्याआधीच संपलं.
"रजनीकांत यांनी एक महत्त्वाचा क्षण गमावला," असं याबाबत बीबीसी तमिळशी बोलताना राजकीय विश्लेषक रामू मणिवन्नन म्हणाले.
त्याचवेळी एमजीआर आणि जयललिता यांच्यासारखा मजबूत राजकीय पाया किंवा पार्श्वभूमी रजनीकांत यांच्याकडे नव्हती, असं रामू मणिवन्नन सांगतात.
रामू मणिवन्नन सांगतात, "एमजीआर यांनी पक्षाची स्थापना करण्यापूर्वी डीएमकेत खजिनदार म्हणून काम केलं होतं, तर जयललिता एआयएडीएमकेत धोरण - प्रसार सचिव होत्या."
त्यांच्या मते, राजकारणाबाबत रजनीकांत यांची भूमिका ठाम नव्हती, त्यामुळे लोकांचा त्यांच्यावरचा विश्वास कमी झाला.
कमल हसन यांचं राजकीय 'केंद्र'
कमल हसन यांनी 2018 मध्ये राजकारणात प्रवेश केला. जयललिता यांच्या निधनानंतर आणि करुणानिधींच्या ढासळत्या प्रकृतीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी 'मक्कल नीधी मय्यम' या पक्षाची स्थापना केली.
त्यांच्या पक्षाला 2019 आणि 2021 च्या निवडणुकांमध्ये विशेष यश मिळालं नाही. 2021 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाला सुमारे 3.7 टक्के मतं मिळाली. त्यानंतर 2024 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी डीएमके आघाडीला पाठिंबा दिला होता.
यानंतर कमल हसन हे राज्यसभेचे सदस्य म्हणून निवडून आले. 2026 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या 'मक्कल नीधी मय्यम' पक्षाने थेट निवडणूक लढवली नाही आणि डीएमकेला पाठिंबा दिला.
रामू मणिवन्नन यांच्या मते, रजनीकांत यांच्याप्रमाणेच कमल हसन यांच्यामागेही ठोस राजकीय पार्श्वभूमी नव्हती.
त्यांच्या मते, रजनीकांत आणि कमल हसन हे चित्रपटसृष्टीत यशस्वी होत असले तरी केवळ सिनेमातील यशावर राजकारणात यश मिळत नाही.
रजनीकांत-कमल हसन यांच्यापेक्षा विजय कसे वेगळे?
रजनीकांत राजकारणात न येताच बाजूला झाले, तर कमल हसन राजकारणात प्रवेश करूनही कोणताही मोठा बदल घडवू शकले नाहीत.
प्रा.रामू मणिवन्नन यांच्या मते, रजनीकांत आणि कमल हसन यांच्याकडे नसलेला राजकीय आणि आर्थिक पाया विजयकडे आहे.
मणिवन्नन यांच्या मते, योग्य वेळ साधल्यामुळे विजय यांनी निवडणुकीत प्रभाव निर्माण केला. सिनेमातून मिळालेल्या लोकप्रियतेच्या जोरावर ते आता नेता म्हणून उदयास आले आहेत.
त्यांच्या मते, विजय अजून पूर्णपणे जनतेत लोकप्रिय नेता म्हणून तयार व्हायचे आहेत. ते लोकांच्या भावना समजून घेणारा नेता बनतील की नाही, हे त्याच्या पुढील राजकीय कामगिरीवर अवलंबून असेल.
सरकार चालवण्यावर लक्ष देणं आणि पक्ष संघटना मजबूतपणे उभा करणं, यावरच विजय यांचं भवितव्य ठरणार आहे, असंही ते सांगतात.
रजनीकांत-कमल हसन यांच्यापेक्षा विजय कसे वेगळे?
रजनीकांत राजकारणात न येताच बाजूला झाले, तर कमल हसन राजकारणात प्रवेश करूनही कोणताही मोठा बदल घडवू शकले नाहीत.
प्रा.रामू मणिवन्नन यांच्या मते, रजनीकांत आणि कमल हसन यांच्याकडे नसलेला राजकीय आणि आर्थिक पाया विजयकडे आहे.
मणिवन्नन यांच्या मते, योग्य वेळ साधल्यामुळे विजय यांनी निवडणुकीत प्रभाव निर्माण केला. सिनेमातून मिळालेल्या लोकप्रियतेच्या जोरावर ते आता नेता म्हणून उदयास आले आहेत.
त्यांच्या मते, विजय अजून पूर्णपणे जनतेत लोकप्रिय नेता म्हणून तयार व्हायचे आहेत. ते लोकांच्या भावना समजून घेणारा नेता बनतील की नाही, हे त्याच्या पुढील राजकीय कामगिरीवर अवलंबून असेल.
सरकार चालवण्यावर लक्ष देणं आणि पक्ष संघटना मजबूतपणे उभा करणं, यावरच विजय यांचं भवितव्य ठरणार आहे, असंही ते सांगतात.
तामिळनाडूचा जेन झी क्षण
रामू मणिवन्नन यांच्या मते, विद्यार्थी चळवळींतून वाढलेल्या द्रविड पक्षांनी सत्तेत आल्यानंतर विद्यार्थ्यांना राजकारणापासून दूर ठेवलं, याचा त्यांना आता फटका बसतो आहे. विजय यांचं यश म्हणजे तमिळनाडूचा 'जेन झी क्षण' आहे, असं ते म्हणतात.
त्यांच्या मते, डीएमके आणि एआयएडीएमके या दोन्ही पक्षांमध्ये विद्यार्थी संघटना मजबूत राहिलेल्या नाहीत. त्यामुळेच 50 वर्षांपेक्षा जास्त वयाचे लोकही विद्यार्थी आणि युवक संघटनांमध्ये दिसत होते, त्याचाच हा परिणाम आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)