पानिपतच्या तीन लढायांनी कसा बदलला भारताचा इतिहास? मराठ्यांना दिल्लीच्या गादीपासून दूर ठेवणारी रणभूमी

पानिपतची तिसरी लढाई मराठे आणि अहमदशाह अब्दाली यांच्यात झाली .
    • Author, मिर्झा बेग
    • Role, बीबीसी उर्दू, दिल्ली
  • वाचन वेळ: 8 मिनिटे

आजपासून सुमारे 500 वर्षांपूर्वी, एप्रिलच्या मध्यात काबूलचा शासक झहीरुद्दीन मोहम्मद बाबर सुमारे 10 हजार सैनिक घेऊन थकलेल्या अवस्थेत पानिपत येथे पोहोचला. तेव्हा त्याला कळलं की, दिल्लीचा सुलतान इब्राहिम लोधी दिल्लीतून एक लाखाहून अधिक सैन्य घेऊन त्याच्याविरोधात निघाला आहे.

बाबरसाठी ही चांगली बातमी नव्हती. कारण त्याला दिल्लीवर हल्ला करण्यासाठी बोलावणारे मेवाडचा राजा संग्राम सिंहने (राणा संगा) त्याच्याकडे पाठ फिरवली होती.

त्याचवेळी त्याला आमंत्रण देणारी दुसरा व्यक्ती दौलत खान लोधीही त्याच्या विरोधात गेला होता. त्यामुळे बाबरने आधी त्याचा पराभव करून पुढे जाण्याचा निर्णय घेतला.

बाबरकडे आता आपल्या सैन्यासह पानिपतच्या रणांगणावर नशीब आजमावण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नव्हता.

खरं तर त्या काळातील बदख्शान, कंदहार आणि काबूलचा तत्कालीन शासक झहीरुद्दीन मोहम्मद बाबर 17 नोव्हेंबर 1525 रोजी काबूलहून भारताकडे मोहिमेला निघाला होता. तो 21 एप्रिलपूर्वी पानिपतच्या मैदानात पोहोचला होता.

आपलं आत्मचरित्र 'तझक-ए-बाबरी' मध्ये बाबर लिहितो की, 1526 साली, 932 हिजरीमध्ये, गुरुवारी तो पानिपतला पोहोचला. जमादी-अल-आखिर महिन्याचा तो शेवटचा दिवस होता. त्या वेळी पानिपतच्या मैदानात दोन्ही सैन्यं जमली होती.

सकाळी लवकरच बातमी समजली की, शत्रू थेट पुढे येत आहे. त्यानंतर बाबरनेही आपलं सैन्य तयार केलं. त्याचा मुलगा हुमायूनही त्याच्यासोबत होता. बाबरने आपल्या वेगवेगळ्या सरदारांवर सैन्याची जबाबदारी सोपवली.

तो पुढे लिहितो की, 'सुलतान इब्राहिमचं सैन्यदल लांबून येताना दिसत होतं आणि ते सतत पुढे सरकत होतं. हे पाहून बाबरच्या सैन्यात घबराट निर्माण झाली. काही सैनिकांना समजत नव्हतं की थांबावं की पुढे जावं, लढावं की माघार घ्यावी.'

'त्यांना भीती वाटत होती, कारण समोरचे सैनिक अजिबात न घाबरता सरळ पुढे येत होते.'

'मी माझ्या सैन्याला आदेश दिला की, शत्रूवर बाण मारायला सुरुवात करा आणि लगेच युद्धात सहभागी व्हा.'

सूर्य अजून फार वर आला नव्हता, तेवढ्यातच जोरदार युद्ध सुरू झाले. साधारण दोन-अडीच तासांतच इब्राहिम लोधीचे सैन्य मागे हटू लागले.

युद्धाचे वर्णन

बाबर युद्धाचं वर्णन करताना लिहितो की, 'जोरदार लढाई सुरू झाली. धूळ इतकी उडाली होती की जवळची गोष्टही स्पष्ट दिसत नव्हती. सूर्य अजून फार वर आलेला नव्हता, तितक्यात शत्रूचे सैन्य पराभूत होऊ लागले.'

'अल्लाहने एक कठीण काम सोपं केलं आणि काही तासांतच मोठं सैन्य संपुष्टात आलं. सुलतान इब्राहिमसोबतच 5 ते 6 हजार सैनिक एकाच ठिकाणी मारले गेले. सगळीकडे फक्त मृतदेहांचा खच पडला होता.'

इतिहासकारांचं मत आहे की, या युद्धामुळे दिल्ली सल्तनतमधील लोधी घराण्याचं राज्य संपलं. तसेच मुघल साम्राज्याची सुरुवात झाली. या युद्धाने केवळ सत्ता बदलली नाही, तर इतिहासाची दिशाही बदलून टाकली.

आज, 500 वर्षांनंतर पानिपतमध्ये त्या युद्धाचे मोठे रणांगण जरी नसले, तरी त्याच्या आठवणी जपणारी काही चिन्हे तिथे आहेत. इब्राहिम लोधीची समाधी तिथे आहे.

तसेच काबुली बाग मशीदही आहे, जी बाबरने विजयाचे स्मारक म्हणून ती बांधली होती. या मशिदीवर एक शिलालेख आहे, ज्यावर ती 1526 साली बांधण्यात आली असं लिहिलं आहे.

पानिपतची लढाई

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, 'तुझक-ए-बाबरी' मध्ये पानिपतच्या पहिल्या लढाईचं दृश्य असं चित्रित केलं आहे.

पण पानिपत हे असं ठिकाण आहे जिथे एक-दोन नाही तर तीन मोठी युद्धं झाली. या तिन्ही युद्धांनी भारताच्या इतिहासाला नवीन दिशा दिली.

इथे प्रश्न असा निर्माण होतो की, भारतातील तीन प्रमुख युद्धं नेमकी पानिपतमध्येच का झाली?

याचं उत्तर देताना दिल्ली विद्यापीठातील इतिहासाचे माजी प्राध्यापक सय्यद झहीर हुसेन जाफरी यांनी बीबीसीला सांगितलं की, "लाहोर आणि दिल्ली यांच्या मधोमध पानिपत हे ठिकाण होतं."

"इथे मोठं मोकळं मैदान होतं, जे मोठ्या सैन्य दलासाठी योग्य होतं. जनावरांना चरण्यासाठी पुरेशी जागा होती, शिकारीसाठी जंगल होतं आणि माणसं व जनावरे यांच्यासाठी पाणीही मुबलक होतं. आजूबाजूला वस्तीही होती. त्यामुळे लष्करी दृष्टीने हे ठिकाण अतिशय महत्त्वाचं मानलं जात होतं."

म्हणूनच बाबरने हीच जागा निवडली. दिल्लीच्या शासकांसाठीही पानिपत योग्य ठिकाण होतं, कारण ते राजधानीपासून अशा अंतरावर होतं की शत्रूला तिथे थांबवता येऊ शकत होतं. हे अंतर सुमारे एक दिवस इतकं किंवा थोडं जास्त होते. परंतु, लोधीच्या सैन्याची हालचाल तुलनेने मंद झाली होती.

बाबर

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, बाबर

जामिया मिलिया इस्लामिया येथील इतिहासाच्या प्राध्यापिका डॉ. रहमा जावेद रशीद यांनी बीबीसीला सांगितलं की, भारतावर बहुतेक वेळा हल्ले उत्तर-पश्चिम म्हणजेच वायव्य दिशेने झाले.

दिल्लीवर राज्य करू इच्छिणाऱ्यांसाठी लाहोर आणि दिल्ली यांच्यातील पानिपत हे असं ठिकाण होतं, जिथे समोरासमोर मोठी लढाई करण्यासाठी सर्व सुविधा उपलब्ध होत्या.

आम्ही 500 वर्षांनंतर पानिपतला भेट दिली, तेव्हा तिथे तीनही युद्धांच्या ठिकाणांची आठवण म्हणून काही स्मारकं दिसून आली. पण त्यापूर्वीच्या काळातीलही काही ऐतिहासिक स्मारकं तिथे आहेत. त्यात 13व्या आणि 14व्या शतकातील सुफी संत शेख शरफुद्दीन बु अली शाह कलंदर यांच्या दर्ग्याचाही समावेश आहे.

रहमा रशीद सांगतात की, पानिपतची पहिली (1526) आणि दुसरी (1556) लढाई यामधून दिल्लीवर कोण राज्य करेल, हे ठरलं.

पण तिसऱ्या लढाईने (1761) मात्र दिल्लीच्या गादीवर कोणाचे राज्य राहणार नाही, हे ठरवलं.

पानिपतची पहिली लढाई : 21 एप्रिल 1526

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

पानिपतच्या पहिल्या लढाईत केवळ सैन्याची संख्या महत्त्वाची नव्हती. चांगली युद्धनीती, उत्तम प्रशिक्षण आणि आधुनिक शस्त्रास्त्र यामुळेही लढाईत विजय मिळवण्यात मोठी भूमिका बजावली.

इतिहासकारांच्या मते, बाबरच्या तोफा या युद्धात निर्णायक ठरल्या. त्यामुळे युद्धाचा निकाल बाबरच्या बाजूने गेला. या प्रदेशात पहिल्यांदाच हत्तींचा सामना तोफांशी झाला होता, आणि इब्राहिम लोधीचं सैन्य यासाठी अजिबात तयार नव्हतं.

रहमा जावेद सांगतात की, बाबरच्या युद्धनीतीत 'तुलगमा रणनीती'चा समावेश होता. या योजनेत अनेक बैलगाड्या एकत्र बांधून समोरच्या सैन्याचा मार्ग अडवला जात असत. त्यामुळे शत्रूला पुढे जाणं कठीण होत असे. या गाड्यांच्या मागे तोफा आणि बंदूकधारी सैनिक असत, जे तिथूनच हल्ला करत असत.

त्याशिवाय घोडदळाच्या तुकड्या होत्या, ज्यावर कुशल धनुर्धारी बसलेले असत. हे धनुर्धारी घोड्यावर बसूनच अचूकपणे बाण मारू शकत असत.

त्या सांगतात की, त्या काळात बंदूक आणि तोफ पुन्हा भरायला वेळ लागत असत. त्यामुळे समोर उभ्या केलेल्या गाड्यांचा अडथळा खूप उपयोगी ठरत असत.

त्यामध्ये असे घोडेस्वारही असत, जे अतिशय वेगाने शत्रूच्या मागे जाऊन त्यांना घेरत आणि त्यांच्यावर हल्ला करत.

पानिपत

फोटो स्रोत, Getty Images

प्रा. जाफरी सांगतात की, इब्राहिम लोधीच्या सैन्यात सैनिकांची संख्या जरी जास्त असली, तरी त्यापैकी अनेकांना योग्य लष्करी प्रशिक्षण नव्हतं. बहुतांश शेतकरी होते आणि गरज पडली की ते शस्त्रं उचलून लढाईत सहभागी होत असत.

बाबरचा उल्लेख करताना ते सांगतात की, बाबरने आपल्या पुस्तकात इब्राहिम लोधीच्या सैन्याबद्दल लिहिलं आहे की, "त्यांच्या सैन्यातील बहुतांश सैनिकांना प्रत्यक्ष युद्धाचा अनुभव नव्हता."

प्रा. जाफरी यांच्या मते, "बाबरचे सैनिक मात्र चांगले प्रशिक्षित होते आणि त्यांना युद्धांचा भरपूर अनुभव होता."

पण बाबरला मुघल साम्राज्य मजबूत करण्यासाठी फारसा वेळ मिळाला नाही. त्याचा मुलगा हुमायून याला अफगाण सेनापती शेरशाह सूरीने पराभूत केले.

परिस्थिती अशी झाली की, हुमायूनला भारत सोडावा लागला आणि त्याला इराणमधील सफाविद साम्राज्याचा शासक शाह तह्मास्प यांच्याकडे आश्रय घ्यावा लागला.

शेरशाहच्या (1540 ते 1545) मृत्यूनंतर, इराणच्या सफाविद बादशहाच्या मदतीने हुमायूनने 1555 मध्ये पुन्हा दिल्लीचे राज्य मिळवले. पण दिल्लीतील जुन्या किल्ल्यातून पडून त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याचा 13 वर्षांचा मुलगा, जलालुद्दीन मोहम्मद अकबरला बादशाह बनवण्यात आले.

या काळात अफगाण शासक आदिल शाह सूरीच्या दरबारातील मंत्री आणि सेनापती हेमचंद्रने (हेमू) मुघल सैन्याचा वारंवार पराभव केला. दिल्लीतही मुघल सैन्याला हरवून तो स्वतः गादीवर बसला आणि 'विक्रमादित्य' ही पदवी धारण केली.

पण दिल्लीपासून दूर असलेल्या अकबर आणि त्याचे संरक्षक बैराम खानला हे कळताच, त्यांनी दिल्ली परत मिळवण्यासाठी मोहीम सुरू केली. आणि पुन्हा एकदा पानिपतच्या रणांगणात निर्णायक लढाईसाठी दोघे समोरासमोर आले.

पानिपतची दुसरी लढाई : 5 नोव्हेंबर 1556

पानिपतच्या दुसऱ्या लढाईत पुन्हा एकदा मुघल आणि अफगाण सैन्य एकमेकांविरोधात लढले. पण यावेळी या सैन्याचे नेतृत्व एका हिंदू राजाकडे होते, ज्याने मुघलांविरुद्ध आधीच अनेक लढाया जिंकल्या होत्या.

अकबर आणि बैराम खान यांचं मुख्य सैन्य अजून मागे होतं. पण अली कुली खान शैबानीच्या नेतृत्वाखाली सुमारे 10 हजार मुघल सैनिक आधीच पानिपतच्या रणांगणात पोहोचले होते.

हे ठिकाण इब्राहिम लोधीच्या कबरीपासून सुमारे अडीच मैल अंतरावर आहे, जिथे दुसरी लढाई झाली होती.

अकबर अवघ्या 13 वर्षांचा असताना भारताचा बादशाह बनला, आणि त्याच वर्षी त्याला एक अत्यंत महत्त्वाची लढाई लढावी लागली.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, अकबर अवघ्या 13 वर्षांचा असताना भारताचा बादशाह बनला, आणि त्याच वर्षी त्याला एक अत्यंत महत्त्वाची लढाई लढावी लागली.

प्रा. जाफरी सांगतात की, तुघलकाबादच्या विजयामुळे हेमूचे सैन्य खूप आत्मविश्वासात होते. त्यांच्याकडे हत्तीही जास्त होते. पण पुन्हा एकदा मुघलांच्या तोफांनी आपलं सामर्थ्य दाखवून दिलं.

इतिहासकारांच्या मते हेमूला आपला विजय जवळजवळ निश्चित वाटत होता. कारण त्याच्याकडे सुमारे 30 हजार घोडेस्वार आणि सशस्त्र सैनिक होते. यामध्ये बहुतांश प्रशिक्षित अफगाण सैनिक होते.

तसंच हेमूकडे सुमारे 500 हत्तींचा मोठा ताफाही होता, जो कोणताही हल्ला परतवून लावण्यास सक्षम होता.

डॉ. रहमा रशीद सांगतात की, ."अचानक कुठूनतरी एक बाण येऊन हेमूच्या डोळ्याला लागला. तो खाली पडताच त्याच्या सैन्याचं मनोधैर्यही खचलं.."

 हेमू दुसरी लढाई जवळजवळ जिंकला होता, पण एका बाणामुळे संपूर्ण लढाईचा निकाल बदलला.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, हेमू दुसरी लढाई जवळजवळ जिंकला होता, पण एका बाणामुळे संपूर्ण लढाईचा निकाल बदलला.

त्यांच्या मते, हेमूच्या सैन्यापुढे कोणतेही उद्दिष्ट नव्हते. त्यामुळे त्यांचा नेता पडताच बाकीचे सैनिक घाबरले आणि गोंधळून गेले.

हेमूला जखमी अवस्थेत, (काही ठिकाणी मृतावस्थेत असा उल्लेख आहे)अकबरसमोर आणलं गेलं. त्यानंतर बैराम खानच्या सांगण्यावरून अकबरने हेमूचा शिरच्छेद केला.

नंतर 'आइन-ए-अकबरी'मध्ये असं लिहिलं आहे की, अकबरने शिरच्छेद करण्यास नकार दिला. त्याने म्हटलं की मृत व्यक्तीचा शिरच्छेद करणं हे आपल्या प्रतिष्ठेच्या विरोधात आहे.

याआधी, पहिल्या लढाईनंतर जेव्हा इब्राहिम लोधीचे शीर बाबरसमोर आणले गेले, तेव्हा बाबरने त्याला आदराने वागवलं होतं.

इतिहासकार इब्राहिम ऐराली आपल्या 'एम्पायर्स ऑफ द पीकॉक थ्रोन' या पुस्तकात लिहितात की, "मुघलांना सुलतानचा मृतदेह सापडल्यावर त्या काळाच्या प्रथेप्रमाणे त्याचे शीर धडापासून वेगळे केले गेले आणि ते बाबरसमोर आठवण म्हणून सादर करण्यात आले."

बाबरने आपले सेनापती दिलावर खान आणि अमीर खलिफा यांना इब्राहिम लोधीच्या मृतदेहाला आंघोळ घालून, जिथे त्याचा मृत्यू झाला तिथेच त्याला पूर्ण सन्मानाने दफन करा, असा आदेश दिला.

पानिपतच्या दुसऱ्या लढाईमुळे मुघल साम्राज्य खूप मजबूत झाले. त्यानंतर जवळपास 150 वर्षे मुघल राजवटीचा सुवर्णकाळ टिकून राहिला.

पण 1707 मध्ये बादशाह औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुघल साम्राज्याचा ऱ्हास सुरू झाला. त्याचवेळी दख्खनमध्ये मराठ्यांचा उदय झाला आणि पुढे त्यांनी दिल्लीवर सत्ता मिळवण्याचे स्वप्न पाहायला सुरुवात केली.

अशा परिस्थितीत पुन्हा एकदा पानिपतचे रणांगण युद्धभूमी बनले, पण यावेळी त्याने मराठ्यांच्या स्वप्नांचा चुराडा केला.

पानिपतची तिसरी लढाई : 14 जानेवारी 1761

ही लढाई मराठे आणि अफगाणिस्तानातील दुर्रानी साम्राज्याचा शासक अहमद शाह अब्दाली यांच्यात झाली.

असं म्हणतात, की मराठ्यांना मोकळ्या मैदानातील मोठ्या युद्धांची सवय नव्हती. ते 'गनिमी कावा' म्हणजेच अचानक आणि वेगाने हल्ला करून शत्रूला चकित करण्यात पारंगत होते.

परंतु, पानिपतच्या मैदानात त्यांचा सामना अहमद शाह अब्दालीशी झाला. मराठा सैन्यात इब्राहिम गार्दीही होता. त्याने याआधी कर्नाल आणि कुंजपुरा येथील लढायांमध्ये अफगाणांना पराभूत केलं होतं आणि नजाबत खान, मियां कुतुब शाह व अब्दुल समद खान यांसारख्या महत्त्वाच्या व्यक्तींना ठार मारलं होतं.

या वेळी दोन्ही सैन्यांची संख्या जवळपास सारखीच होती. पण प्रा. जाफरी यांच्या मते अहमद शाह अब्दालीकडे अधिक चांगल्या तोफा होत्या.

अहमद शाह अब्दालीने पानिपतची लढाई जिंकल्यानंतर दिल्लीत थांबण्याऐवजी परतण्याचा निर्णय घेतला.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, अहमद शाह अब्दालीने पानिपतची लढाई जिंकल्यानंतर दिल्लीत थांबण्याऐवजी परतण्याचा निर्णय घेतला.

रहमा जावेद यांच्या मते, मराठे मोकळ्या मैदानात समोरासमोर लढण्यासाठी सरावलेले नव्हते. त्यांच्या सैन्यासोबत साधू, गायक-नर्तक, महिला आणि मुलंही होती, त्यामुळे त्यांची वेग खूप कमी होता.

ही लढाईही लवकरच संपली. परंतु, दुसऱ्या दिवशी अहमद शाह अब्दालीच्या सैन्याने युद्धकैद्यांची मोठ्या प्रमाणात हत्या केली. त्या काळात सुमारे 40 हजार लोकांना त्या वेळी ठार मारण्यात आले.

हा नरसंहार इब्राहिम लोधीच्या कबरीपासून आणि काबुली बाग मशिदीपासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या 'काला आम बाग' येथे झाला होता. आज त्या ठिकाणी पानिपतच्या तिन्ही लढायांची आठवण म्हणून एक उद्यान बांधण्यात आलं आहे.

पानिपतची तिसरी लढाई जिथे झाली होती तिथे ही बाग बांधण्यात आली आहे

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, पानिपतची तिसरी लढाई जिथे झाली होती तिथे ही बाग बांधण्यात आली आहे

सध्या तिथे पहिल्या आणि तिसऱ्या लढाईचे प्रसंग काळ्या दगडावर कोरलेले दिसतात. स्थानिक गाईड सचिन उपाध्याय यांच्या मते, दुसऱ्या लढाईचे दृश्य तिथून सुमारे सहा किलोमीटर दूर असलेल्या हेमूच्या स्मारकाजवळ हलवण्यात आले आहे.

बीबीसीशी बोलताना प्रा. जाफरी म्हणाले की, बाबरप्रमाणेच अहमद शाह अब्दालीलाही भारतात येण्यासाठी आमंत्रण दिले गेले होते. त्या काळात भारतात मराठा सत्तेची दडपशाही वाढली होती, म्हणून काहींनी त्याला बोलावलं होतं.

ते सांगतात की, या लढाईत मराठ्यांना काही मोजक्या अफगाण सरदारांखेरीज सामान्य लोकांचा पाठिंबा नव्हता. पण अहमद शाह अब्दालीला ज्यांनी बोलावले होते, त्यांनी मात्र त्याला साथ दिली होती.

डॉ. रहमा रशीद सांगतात की, या लढाईमुळे हे स्पष्ट झालं की मराठे दिल्लीच्या गादीपासून दूर राहतील. परंतु, अहमद शाह अब्दाली परत गेल्यानंतर सत्तेत एक पोकळी निर्माण झाली. पुढे हीच पोकळी इंग्रजांनी, म्हणजेच ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने भरून काढली.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)