18 वर्षं मराठवाडा पदवीधर संघाचे नेतृत्व करणारे सतीश चव्हाण कसे हरले, त्यांना हरवणारे प्रतापसिंह पाटील कोण आहेत?

सतीश चव्हाण आणि प्रतापसिंह पाटील
फोटो कॅप्शन, सतीश चव्हाण आणि प्रतापसिंह पाटील
    • Author, श्रीकांत बंगाळे
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
  • Published
  • वाचन वेळ: 4 मिनिटे
सतीश चव्हाणांची 18 वर्षांची सत्ता प्रतापसिंह पाटलांनी कशी उलथवली? पाटलांच्या विजयाची 5 कारणं
फोटो कॅप्शन, प्रतापसिंह पाटील

मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत धक्कादायक निकाल पाहायला मिळाला. महायुतीचे उमेदवार सतीश चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्यात ही प्रमुख लढत झाली.

गेल्या तीन टर्म म्हणजेच 18 वर्षं मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या सतीश चव्हाण यांना या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला.

प्रतापसिंह पाटील यांनी सतीश चव्हाण यांचा 18 हजार 124 मतांनी पराभव केला.

सतीश चव्हाणांची 18 वर्षांची सत्ता प्रतापसिंह पाटलांनी कशी उलथवली? पाटलांच्या विजयाची 5 कारणं

महायुतीचा पाठिंबा असूनही सतीश चव्हाण यांचा पराभव झाल्यामुळे या निकालाची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. मात्र, या निकालामागे नेमकी कोणती 5 कारणं आहेत? आणि प्रतापसिंह पाटील यांचा राजकीय प्रवास कसा राहिला? जाणून घेऊया.

1. प्रस्थापितांविरोधातील नाराजी

सतीश चव्हाण गेल्या 18 वर्षांपासून या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत होते. मात्र, दीर्घकाळ एकाच नेत्याकडे प्रतिनिधित्व असल्यामुळे मतदारांमध्ये नाराजी निर्माण झाली होती. ती अनेकांच्या बोलण्यातून दिसून येत होती.

ही नाराजी एवढ्या मोठ्या प्रमाणावर होती की अनेक संस्था आणि मोठी यंत्रणा दिमतीला असूनही सतीश चव्हाण यांना पराभवाचा सामना करावा लागला.

2. महायुतीतील अंतर्गत मतभेद

सतीश चव्हाण सत्ताधारी महायुतीकडून लढले. तरीही त्यांचा पराभव झाला. प्रचाराच्या काळात महायुतीतील नेत्यांमधील मतभेद समोर आले.

शिवसेनेचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांनी सतीश चव्हाण यांना पाठिंबा देणार नाही, अशी भूमिका घेतली आणि माध्यमांसमोर बोलून दाखवली. त्यानंतर सतीश चव्हाण यांनी शिरसाट यांची भेट घेतली. तेव्हा मात्र आपण सतीश चव्हाण यांच्या पाठीशी आहोत, असे शिरसाट यांनी सांगितले.

सतीश चव्हाण
फोटो कॅप्शन, सतीश चव्हाण

महायुतीमधील या अंतर्गत मतभेदांचा निवडणुकीवर परिणाम झाला असे दिसत आहे. मराठवाड्यात महायुतीचे 40 आमदार आहेत. त्यामुळे या निकालातून महायुतीच्या नेत्यांनी सतीश चव्हाण यांना किती साथ दिली? असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

3.पक्षांतराचा मुद्दा

महाराष्ट्राच्या राजकारणात पक्षांतर करणाऱ्या नेत्यांविषयी मतदारांची भूमिका काय आहे, हा प्रश्नही महत्त्वाचा ठरतो.

सतीश चव्हाण यांनी 2024 ची विधानसभा निवडणूक महाविकास आघाडीकडून गंगापूर विधानसभा मतदारसंघातून लढवली होती. या निवडणुकीत भाजपचे उमेदवार प्रशांत बंब यांनी त्यांचा पराभव केला. विधानसभा निवडणुकीनंतर सतीश चव्हाण पुन्हा महायुतीत दाखल झाले आणि त्यानंतर महायुतीकडून त्यांनी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढवली. आता या निवडणुकीतही त्यांना पराभव स्वीकारावा लागला.

4. प्रतापसिंह पाटील यांचा आक्रमक प्रचार

डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी प्रचारादरम्यान पदवीधर मतदारांच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित केलं. त्यांनी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये कार्यरत मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. बेरोजगारी, रखडलेल्या भरती प्रक्रिया, स्पर्धा परीक्षांमधील अडचणी आणि शिक्षकांचे प्रश्न हे मुद्दे त्यांनी प्रचारात मांडले.

एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनांशी संबंधित प्रश्नांवरही त्यांनी लक्ष दिलं. पदवीधर मतदारांच्या प्रश्नांशी थेट जोडलेला प्रचार त्यांच्या विजयासाठी महत्त्वाचा ठरला असे दिसून येत आहे.

प्रतापसिंह पाटील
फोटो कॅप्शन, प्रतापसिंह पाटील

18 वर्षांत तुम्ही पदवीधरांसाठी काय केलं? असा प्रश्न ते सातत्याने आपल्या प्रचारात विचारत राहिले.

5. मतांचं विभाजन

या निवडणुकीत एकूण 41 उमेदवार रिंगणात होते. त्यामुळे प्रमुख उमेदवारांव्यतिरिक्त इतर उमेदवारांना मिळालेल्या मतांचाही निकालावर परिणाम झालेला दिसून येतो.

या निवडणुकीत अपक्ष उमेदवार रविराज उर्फ अण्णासाहेब साबळे-पाटील यांना 19 हजार 835, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे उमेदवार दिलीप घुगे यांना 8 हजार 439 मते मिळाली.

'आपण प्रस्थापितांना गाडलं', अशी प्रतिक्रिया रविराज साबळे यांनी त्यांना मिळालेल्या मतांनंतर दिली.

कोण आहेत प्रतापसिंह पाटील?

डॉ. प्रतापसिंह पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षाचे नेते असून ते पक्षाचे धाराशिव जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून काम करतात. 2024 मध्ये त्यांच्याकडे पक्षाच्या प्रदेश सरचिटणीसपदाची जबाबदारी देण्यात आली होती.

सुमारे सात वर्षांपूर्वी त्यांनी भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळण्याची चर्चा होती. मात्र, त्यांना उमेदवारी मिळाली नाही. त्यानंतरही त्यांनी पक्षाचं काम सुरू ठेवलं.

कोण आहेत डॉ. प्रतापसिंह पाटील?
फोटो कॅप्शन, प्रतापसिंह पाटील

पुढे त्यांना मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची संधी मिळाली. पक्षाने दिलेल्या उमेदवारीसोबतच त्यांचा जनसंपर्क आणि पदवीधर मतदारांच्या प्रश्नांवर केंद्रित केलेला प्रचार यांची या निवडणुकीत महत्त्वाची भूमिका राहिली आणि त्यांचा विजय झाला.

डॉ. प्रतापसिंह पाटील यांचे बंधू राहुल पाटील हे परभणीचे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आहेत. पाटील कुटुंबियांच्या महाराष्ट्रसह इतर राज्यात देखील अनेक शैक्षणिक संस्था आहेत.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)