'लुलाच्या आर्मी'च्या व्हॉट्सॲप चॅनलनं ब्राझीलमधील निवडणुकीचं पारडं फिरवण्यास कशी मदत केली?

फोटो स्रोत, Reuters
- Author, जुलिया ब्रॉन
- Author, रुटे पिना
- Author, लुईझ फर्नांडो टोलेडो
- Role, बीबीसी न्यूज ब्राझील
- Reporting from, London & São Paulo
- Published
- वाचन वेळ: 5 मिनिटे
लुईझ इनासियो लुला दा सिल्वा हे पुन्हा एकदा ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान होणार आहेत. या पदावर त्यांची पुनर्निवड व्हावी, यासाठी तयार करण्यात आलेल्या एका व्हॉट्सॲप चॅनेलमुळं हे शक्य झालं असल्याचं त्यांच्या समर्थकांचं म्हणणं आहे.
खरं तर लुला यांची निवड ही ब्राझिलियन कारणातील अलीकडच्या काळातील सर्वांत अनपेक्षित अशी घटना मानली जात आहे.
लुला हे ब्राझीलमधील डाव्या विचारसरणीचे राजकारणी आहेत.
या निवडणुकीमध्ये त्यांना उजव्या विचारसरणीच्या फ्लाव्हिओ बोल्सोनारो यांनी आव्हान दिलं होतं.
एकंदरीत, या निवडणुकीमध्ये लुला हे बोल्सोनारो यांच्या मागे आहेत, असं काहीसं चित्र निर्माण झालेलं होतं.
परंतु, अवघ्या तीन आठवड्यांमध्येच लुला यांनी या निवडणुकीचं चित्र पालटून दाखवलं.

फोटो स्रोत, Anadolu via Getty Images
खरं तर, निवडणुकीदरम्यान अनेकांना शंका होती की लुला या निकालाचं पारडं फिरवू शकतील का?
या पार्श्वभूमीवरच, तेव्हा 'लुलाज आर्मी' नावाचं एक व्हॉट्सॲप चॅनेल समोर आलं आणि पाहता पाहता त्याचे 10.8 दशलक्ष फॉलोअर्सही झाले.
'लुलाज आर्मी'ची कमाल
काँग्रेसमन (खासदार) आंद्रे जानोनेस यांच्या नेतृत्वाखालील या मोहिमेमधून समर्थकांना व्हीडिओ शेअर करण्यास, हॅशटॅगचा प्रसार करण्यास आणि नवीन मतदारांना जोडण्यास प्रोत्साहित करण्यात आलं.
दोन फेऱ्यांच्या दरम्यान झालेली मतदारांची नाट्यमय वाढ उल्लेखनीय होती. कारण, ती ब्राझिलियन राजकारणात दीर्घकाळ चालत आलेल्या असंतुलनाला उलथून टाकणारी वाटत होती.
अनेक वर्षांपासून, माजी राष्ट्राध्यक्ष जाइर बोल्सोनारो यांच्याशी संबंधित पुराणमतवादी गट ऑनलाइन राजकीय प्रचारावर वर्चस्व गाजवत असल्याचं मानलं जात होतं. विशेषतः व्हॉट्सॲप आणि टेलिग्रामसारख्या प्लॅटफॉर्मवर त्यांचं वर्चस्व होतं.
'लुलाज आर्मी'च्या उदयानं अनेक समर्थकांना अशी खात्री पटवून दिली की, ब्राझीलमधील डाव्या विचारसरणीच्या गटांना अखेर डिजिटल क्षेत्रात स्पर्धा करण्याचा मार्ग सापडला आहे.
हा बदल विशेष महत्त्वाचा आहे. कारण, 2018 मध्ये जाइर बोल्सोनारो यांच्या निवडणुकीतील विजयापासून ब्राझीलच्या राजकारणात सोशल मीडियानं मध्यवर्ती भूमिका बजावली आहे.
त्यावेळी व्हॉट्सॲप नेटवर्क हे राजकीय प्रचाराचं एक निर्णायक वैशिष्ट्य बनलेलं होतं.

फोटो स्रोत, Getty Images
'लुलाज् आर्मी'च्या संदेशांमध्ये अनेकदा फॉलोअर्सना मित्र आणि कुटुंबीयांसोबत शेअर करण्यासाठी तयार टेम्पलेट्सचा समावेश असे.
प्रत्येक टेम्पलेटमध्ये समर्थकांना एक विशिष्ट कार्य सोपवलं जात असे. त्याचा उद्देश सोशल मीडियावर लुला यांचं 'प्रेझन्स' वाढवणं, हा अधिक होता.
काँग्रेसमन आंद्रे जानोनेस अनेकदा आपल्या या 'आर्मी'ला एखादा नवीन प्रचार व्हीडिओ "व्हायरल" करायला किंवा एखादा नवीन हॅशटॅग "प्रसिद्ध" करायला सांगत असत.
"मित्रांनो, तातडीची गोष्ट आहे!", "आत्ताच झोपायला जाऊ नका", "मोहीम फत्ते होण्यापूर्वी पेटपूजा नको!", आणि "तुम्हाला मोकळं करण्यापूर्वी माझ्याकडे अजून एक काम आहे", अशा प्रकारच्या काही सूचना त्यामध्ये दिल्या गेल्या होत्या.
निवडणुकीच्या पूर्वसंध्येला, आंद्रे जानोनेस यांनी 24 तासांचा एक लाइव्ह इव्हेंट आयोजित केला होता. त्याला 'टर्नअराउंड लाइव्हस्ट्रीम' असं नाव देण्यात आलं होतं.
खरं तर, त्या वेळीही जनमत चाचण्या बोल्सोनारो यांच्या विजयाचे संकेत देत होत्या.
एकीकडे, सोशल मीडियावर जानोनेस यांची अनेकदा आक्रमक असणारी शैली, लुला यांच्यासाठी पक्षाला अपेक्षित असलेल्या संयमित प्रतिमेला धक्का पोहोचवू शकते, अशी 'वर्कर्स पार्टी'च्या काही सदस्यांना चिंता होती. पण तरीही ही रणनीती यशस्वी ठरली.
आपल्या विजयाच्या भाषणात लुला यांनी जानोनेस यांचा उल्लेख "आमचे सेनापती" असा केला आणि "दररोज आमच्या सैन्याचं मनोधैर्य उंचावल्याबद्दल" त्यांचे आभारही मानले.
कमबॅकमध्ये सोशल मीडियाची भूमिका किती?
मात्र, या प्रकारच्या ऑनलाइन मोबिलायझेशनचा निवडणुकीवर किती प्रभाव पडला, याचं मोजमाप करणं अत्यंत कठीण असतं.
लुला यांचे समर्थक त्यांच्या पुनरागमनाला चालना देण्याचं श्रेय 'लुला आर्मी'ला जरी देत असले तरी, राजकीय विश्लेषक मात्र सावधगिरीचा इशारा देताना दिसतात.

फोटो स्रोत, Luca Meola/Getty Images
त्यांच्या मते, व्हॉट्सॲप मोहिमेमुळे किती मतांवर थेट प्रभाव पडला हे निश्चित करणं अशक्य आहे.
राज्यशास्त्रज्ञ डेनिल्डे होल्झाकर यांच्या मते, लुला यांच्या निवडणूक प्रचार धोरणात झालेला बदल त्यांच्या पुनरागमनासाठी निर्णायक ठरला.
केवळ ऑनलाइन सहभागावर अवलंबून न राहता, वर्कर्स पार्टीच्या उमेदवारानं डिजिटल प्रचाराला प्रत्यक्ष जमिनीवरील जनसंपर्क मोहिमेशी जोडण्यात यश मिळवलं, असं त्या सांगतात.
होल्झाकर यांच्या मते, या मोहिमेनं स्थानिक प्रयत्न अधिक तीव्र केले आणि आपल्या मेसेजिंगमध्ये काही मूलभूत बदल केला.
त्यामध्ये, महत्त्वाचा बदल म्हणजे, बोल्सोनारो यांचा विजय म्हणजे सामाजिक कार्यक्रमांमधील संभाव्य बदल आणि हक्क गमावणं, अशा प्रकारच्या भीतीशी जोडण्यात आलं.
"लुला यांनी स्वतःच्या त्रुटी ओळखल्या आणि आपली कार्यपद्धती पूर्णपणे बदलली, हे त्याचंच श्रेय आहे," असं त्या सांगतात.
"आणि जानोनेस यांनी अशी गोष्ट साध्य केली जी ब्राझीलच्या डाव्या विचारसरणीच्या लोकांसाठी अकल्पनीय वाटत होती, ती म्हणजे सोशल मीडियावर वर्चस्व गाजवणं."
याउलट, होल्झाकर यांचा असा युक्तिवाद आहे की, फ्लाव्हिओ बोल्सोनारो विजयाबाबत अतिआत्मविश्वास बाळगूनच दुसऱ्या फेरीच्या निवडणुकीत उतरले होते आणि ते आपला संदेश आपल्या समर्थकांपर्यंत तितक्या प्रभावीपणे पोहोचवू शकले नाहीत.
फेडरल युनिव्हर्सिटी ऑफ रिओ डी जानेरोमधील प्राध्यापिका, समाजशास्त्रज्ञ आणि राज्यशास्त्रज्ञ मायरा गुलार्ट यांनाही असं वाटतं की, लुला यांच्या पुनरागमनाचं श्रेय केवळ सोशल मीडियाला देणं योग्य ठरणार नाही.
"हे सोशल मीडिया आणि जमिनी स्तरावरील लोकसमीकरण यांचं मिश्रण होतं," असं त्या सांगतात.

फोटो स्रोत, Luca Meola/Getty Images
"आभासी नव्हे तर वास्तवातील जगानं अशा प्रकारचं लोकसमीकरण घडवून आणलं. त्याद्वारे मतदानापासून दूर राहणाऱ्यांचं प्रमाण कमी करणं आणि अनिर्णित मतदारांचं मन वळवणं शक्य झालं," असं त्या सांगतात.
त्यांच्या मते, लुला यांच्या समर्थकांनी ऑनलाइन उत्साहाचं रूपांतर प्रत्यक्ष राजकीय सहभागात करण्यात यश मिळवलं.
"लुला यांच्या विजयासाठी कटिबद्ध असलेल्यांनी लोकांना एकत्र आणण्याचं आणि त्यांना मतदानासाठी प्रवृत्त करण्याचं काम केलं," असं गुलार्ट म्हणतात.
त्यांच्या मते, या प्रयत्नांमुळे केवळ मतदानाची टक्केवारी वाढण्यास मदत झाली असं नाही, तर हे प्रयत्न लुला यांच्या पुढील प्रशासनासाठीही मोलाचे ठरू शकतात.
"माझ्या मते, हा सामूहिक प्रयत्न एक शिकण्यासाठी एक महत्त्वाचा अनुभव ठरला आणि भविष्यात अनेक आव्हानांचा सामना करणाऱ्या सरकारसाठी तो मोलाचा ठरेल. यामुळे केवळ मतदानापासून दूर राहणाऱ्यांचं प्रमाण कमी होण्यास मदत झाली असं नाही, तर ज्या मतदारांनी आपला निर्णय निश्चित केला नव्हता, अशा मोठ्या संख्येनं मतदारांनाही एका बाजूकडे वळवण्यात यश आलं."
लुला यांनी स्वतःच असं सूचित केलं की, त्यांच्या पुनरागमनासाठी झालेलं मोबिलायझेशन आगामी वर्षांतील त्यांच्या शासनपद्धतीला आकार देऊ शकतं.
आपल्या विजयानंतरच्या भाषणात त्यांनी सांगितलं की, या निवडणुकीनं त्यांना अनेक धडे दिले आहेत तसेच, त्यांनी ब्राझीलच्या शासनपद्धतीत बदल घडवून आणण्याचं आश्वासन दिलं.
"आम्ही निर्णय प्रक्रियेत जनतेचा सहभाग वाढवू आणि माझ्या सरकारमध्ये डिजिटल संवादाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असेल," असंही ते म्हणाले.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)
























