'जय भीम' चा नारा देत अभिजीत दिपके निघाला भारताकडे, समर्थकांना केले 'हे' आवाहन

व्हीडिओ कॅप्शन, ‘जय भीम, भारतात येतोय’, अभिजीत दिपकेंचं नवीन आवाहन
'जय भीम' चा नारा देत अभिजीत दिपके निघाला भारताकडे, समर्थकांना केले 'हे' आवाहन
Published

"कॉक्रोच जनता पार्टी" (CJP) चे संस्थापक अभिजीत दीपके 6 जूनच्या सकाळी भारतात पोहोचणार आहेत.

शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ते दिल्लीच्या जंतर-मंतर येथे आंदोलन करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. मात्र, दिल्ली पोलिसांची परवानगी न घेता हे आंदोलन कसं होणार, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

दीपके यांनी शुक्रवारी सकाळी एक्सवर भारतात रवाना होत असल्याची माहिती देताना म्हटलं, "मी माझं भविष्य संविधानाच्या हाती सोपवतो. जय भीम."

रवाना होण्यापूर्वी एका व्हिडिओ संदेशात त्यांनी लोकांना दिल्ली विमानतळावर मोठ्या संख्येने जमू नये, अशी विनंती केली. यामुळे सामान्य लोक आणि सुरक्षा यंत्रणांना अडचण होऊ शकते, असं त्यांनी सांगितलं.

त्यांनी सांगितलं की ते थेट संसद मार्ग पोलीस ठाण्यात जाऊन जंतर-मंतर येथे शांततापूर्ण आंदोलन करण्यासाठी परवानगी मागणार आहेत.

दीपके म्हणाले, "आम्ही कायद्याचं पालन करणारे लोक आहोत. त्यामुळे कोणीही कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये, याची काळजी घ्या."

याआधी गुरुवारी, सीजेपीच्या प्रवक्त्यांनी सांगितलं होतं की त्यांचं आंदोलन पूर्णपणे शांततापूर्ण असेल आणि कोणत्याही प्रकारच्या हिंसेला किंवा अव्यवस्थेचं समर्थन केलं जाणार नाही.

याआधी एका पत्रकार परिषदेत सीजेपीचे प्रवक्ते सौरव दास यांनी सांगितलं होतं, "अभिजीत दीपके 6 जून रोजी सकाळी 8 वाजता दिल्ली विमानतळावर उतरतील. त्यांनी सोनम वांगचुक यांच्यासह आपल्या समर्थकांना संसद मार्गावर यावं आणि जंतर-मंतर येथे आंदोलनासाठी परवानगी मागावी, असं आवाहन केलं आहे."

जेव्हा अभिजीत म्हणाला होता,'मी दलितच आहे'

अभिजीत दिपके यांनी 'कॉक्रोच जनता पार्टी' नावाने सुरू केलेल्या ऑनलाईन चळवळीला अचानक मोठा प्रतिसाद मिळाला. त्यावेळी दिपके यांना सोशल मीडियावरही अनेक प्रकारचे प्रश्न विचारले जात होते.

अशाच प्रकारचा एक मुद्दा एका सोशल मीडिया हँडलने उपस्थित केला होता. कॉक्रोच जनता पार्टी किंवा अभिजीत दिपकेनं आरक्षण, दलितांचे मुद्दे किंवा सामाजिक न्यायाच्या मुद्द्यावर काहीही मत मांडलं नसल्याचं एका हँडलनं एका ट्विटमध्ये म्हटलं होतं.

हिंदू मुस्लिम, धर्मनिरपेक्षता अशा मुद्द्यावर अभिजित दिपके बोलले पण सामाजिक न्यायाचा मुद्दा दिसला नाही, असं या यूझरनं म्हटलं होतं.

यावर तुमची भूमिका स्पष्ट करा असं एका सोशल मीडिया हँडलनं दिपके यांनी म्हटलं होतं.

"मी स्वतः दलित आहे. यातून तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील अशी आशा आहे", असं उत्तर अभिजीत दिपकेनं दिलं होतं.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)