'पाकिझा' 4K मध्ये पडद्यावर झळकणार, पण हा सिनेमा पूर्ण व्हायला तब्बल 15 वर्षे का लागली?

मीना कुमारी
    • Author, यासिर उस्मान
    • Role, बीबीसी न्यूज हिंदीसाठी
  • Published
  • वाचन वेळ: 10 मिनिटे

ऑक्टोबर महिन्यात पार पडणाऱ्या प्रतिष्ठित 'बीएफआय लंडन फिल्म फेस्टिव्हल'मध्ये हिंदी सिनेसृष्टीतील अजरामर चित्रपट 'पाकिझा' नव्या 4K रिस्टोरेशनसह मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.

18 ऑक्टोबर 2026 रोजी सेंट्रल लंडनमधल्या 'बीएफआय आयमॅक्स'मध्ये होणाऱ्या या खास स्क्रीनिंगची सर्व तिकिटं तब्बल महिनाभरापूर्वीच विकली गेली आहेत. सर्व तिकिटांचं 'सोल्ड आऊट' होणं हेच सिद्ध करतं की, रिलीजच्या 54 वर्षांनंतरही 'पाकिझा'ची जादू तशीच टिकून आहे. काळ बदलला तरी या सिनेमाची चमक मात्र जराही फिकी पडलेली नाही.

दिग्दर्शक कमाल अमरोही यांच्या या क्लासिक सिनेमाचं जतन अमरोही कुटुंबीयांच्या मदतीने 'फिल्म हेरिटेज फाऊंडेशन'ने केलं आहे.

या नव्या आवृत्तीचा वर्ल्ड प्रीमियर फ्रान्सच्या ल्यों शहरातील 'फेस्टिव्हल ल्यूमिएर'मध्ये पार पडेल आणि त्यानंतर हा सिनेमा 'बीएफआय लंडन फिल्म फेस्टिव्हल'मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

'पाकिझा' आणि यातील 'साहिबजान' साकारणाऱ्या अभिनेत्री मीना कुमारी यांच्याशी जोडलेल्या अशा अनेक कथा आहेत ज्या प्रत्येकाने कधी ना कधी ऐकल्या आहेतच. तरीही त्या वारंवार आठवल्या जातात, जेणेकरून काळाच्या पडद्याआड त्या कुठेतरी हरवून जाऊ नयेत.

'पाकिझा'चा हा संपूर्ण प्रवास एखाद्या अग्निपरीक्षेपेक्षा कमी नव्हता

'पाकिझा' हा चित्रपट पूर्ण व्हायला तब्बल 15 वर्षांचा प्रदीर्घ काळ जावा लागला. या चित्रपटाची सुरुवात 1957 मध्ये झाली होती खरी, पण त्याआधीच कमाल अमरोही आणि मीना कुमारी यांच्या प्रेमकहाणीचा अध्याय सुरू झाला होता.

1949 मधील 'महल' या ब्लॉकबस्टर चित्रपटामुळे कमाल अमरोही आघाडीचे दिग्दर्शक बनले. ते एक नावाजलेले पटकथाकारही होते आणि 'मुघल-ए-आझम'च्या लेखकांमध्ये त्यांचा समावेश होता.

दुसऱ्या बाजूला, मीना कुमारी या बालपणापासूनच चित्रपटांत काम करणाऱ्या एक उदयोन्मुख अभिनेत्री होत्या. या दोघांमध्ये प्रेम जुळले आणि व्हॅलेंटाईन्स डेच्या दिवशी, 14 फेब्रुवारी 1952 रोजी त्यांनी लग्नगाठ बांधली.

'पाकिझा' चित्रपटाचे दिग्दर्शक कमाल अमरोही
फोटो कॅप्शन, 'पाकिझा' चित्रपटाचे दिग्दर्शक कमाल अमरोही

कमाल हे वयाने मीना कुमारींपेक्षा मोठे होते आणि याआधी त्यांचे 2 विवाह झालेले होते. कमाल प्रेमाने मीना कुमारींना 'मंजू' म्हणायचे, तर मीना कुमारी त्यांना 'चंदन' नावाने हाक मारायच्या.

कमाल यांनी आधी मीना कुमारी यांना घेऊन 1954 मध्ये 'दायरा' सिनेमा बनवला खरा, पण तो फारसा चालला नाही.

दरम्यानच्या काळात 'बैजू बावरा' (1953) आणि दिलीप कुमार यांच्यासोबतचा 'आझाद' यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमुळे मीना कुमारी सिनेसृष्टीतल्या मोठ्या स्टार बनल्या होत्या. इतकेच नव्हे, तर पहिला फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कारही त्यांनीच पटकावला होता.

कमाल अमरोही यांचा 'ताजमहल'

कमाल अमरोही यांनी मीना कुमारी यांना डोळ्यांसमोर ठेवूनच 'पाकिझा'ची कथा लिहिली होती. 17 जानेवारी 1957 रोजी एका भव्य मुहूर्तावर त्यांनी 'पाकिझा'ची अधिकृत घोषणा करत चित्रपटाची सुरुवात केली.

'पाकिझा' हा त्यांच्या स्वप्नातील चित्रपट होता. मीना कुमारी यांच्यावर विनोद मेहता यांनी लिहिलेल्या पुस्तकात नोंद आहे, "शाहजहानने आपल्या पत्नीसाठी ताजमहाल बांधला होता. कमाल साहेबांनाही 'पाकिझा'च्या माध्यमातून अगदी तसेच काहीतरी करायचे होते."

सुरुवातीला कमाल अमरोही यांना 'पाकिझा'मध्ये स्वतः अभिनयही करायचा होता. मात्र जसजसा काळ पुढे गेला, तसतसा त्यांनी हा विचार सोडून दिला.

ब्लॅक अँड व्हाईट ते सिनेमास्कोपचा प्रवास

सुरुवातीला 'पाकिझा' ब्लॅक अँड व्हाईट स्वरूपात बनवली जाणार होती. परंतु नंतर ती रंगीत करण्याचा निर्णय घेण्यात आला. यानंतर कमाल अमरोही यांनी हा चित्रपट 'सिनेमास्कोप' तंत्रज्ञानामध्ये बनवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे चित्रपट आणखी लांबणीवर पडत गेला.

दिग्दर्शक गुरुदत्त यांचा 'कागझ के फूल' (1959) हा देशातला पहिलावहिला सिनेमास्कोप चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटला होता, पण तरीही कमाल अमरोही आपल्या निर्णयापासून तसूभरही मागे हटले नाहीत.

त्यांनी थेट लंडनच्या एमजीएम स्टुडिओमधून सिनेमास्कोप लेन्स भाड्याने मागवले. त्या काळी या लेन्सचं महिन्याचं भाडं तब्बल 50,000 रुपये होतं. त्या काळात ही एक प्रचंड मोठी रक्कम मानली जायची.

सुरुवातीचं शूटिंग

सिनेमास्कोप लेन्स हाती येताच कमाल अमरोही यांनी मीना कुमारी यांच्या प्रमुख दृश्यांचं शूटिंग तातडीने पूर्ण करून घेतलं.

संगीतकार गुलाम मोहम्मद यांच्या संगीतबद्ध केलेली आणि पुढे अत्यंत गाजलेली 3 सदाबहार मुजरा गाणी- 'इन्ही लोगो ने', 'ठाडे रहियो' आणि 'चलते चलते' कमाल यांनी मोठ्या देखणेपणाने कॅमेऱ्यात कैद केली.

या गाण्यांमधल्या आणि दृश्यांमधल्या मीना कुमारींच्या अप्रतिम सौंदर्याने जणू पडद्यावर जादूच केली होती. विशेष म्हणजे, इतकं शूटिंग पूर्ण झालं तरी सिनेमाचा हिरो कोण असणार, हे अजून ठरायचंच होतं.

परफेक्शनचं वेड

सुरुवातीचे काही सीन शूट झाल्यावर कमाल अमरोही यांच्या मनात शंका आली की, लेन्सचा फोकस कुठेतरी गडबडतोय. पण कॅमेरामन जोसेफ विर्शिंग ठामपणे म्हणाले की, फोकस अगदी बरोबर आहे. मात्र कमाल साहेबांचं समाधान झालं नाही. त्यांनी दुसऱ्या लॅबमध्ये तपासणी करून घेतली.

तिथल्या रिपोर्टनेही फोकस बरोबर असल्याचं सांगितलं, पण कमाल अमरोही आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. अखेर ते फुटेज लंडनला 'एमजीएम'कडे पाठवलं गेलं. तिथेही फोकस योग्यच असल्याचं सांगण्यात आलं. तरीही कमाल मानायला तयार नव्हते.

शेवटी हॉलीवूडमधल्या एका लॅबमध्ये तपासणी झाली आणि धक्कादायक सत्य समोर आलं. फोकसमध्ये खरंच 1/1000 मिलीमीटरचा सूक्ष्म फरक होता.

कमाल अमरोही यांच्या पारखी नजरेने ही क्षुल्लक वाटणारी चूकही अचूक पकडली होती. त्यांच्या या परफेक्शनने भारावून जाऊन एमजीएमने पुढच्या संपूर्ण शूटिंगसाठी लेन्सचं भाडंच माफ करून टाकलं.

10 लाखांचा 'बाजार-ए-हुस्न'

सिनेमातला 'बाजार-ए-हुस्न' हा भव्य सेट तयार करण्यासाठी त्या काळात तब्बल 10 लाखांहून अधिक रुपये खर्च करण्यात आले.

4 मजल्यांचा हा भव्य सेट उभा करण्यासाठी 600 लोक तब्बल 8 महिने रात्रंदिवस राबत होते. सेटवर सगळं काही खरं वाटावं म्हणून देशभरातल्या वेगवेगळ्या भागांतून खास दुकानं आणून तिथे मांडण्यात आली होती आणि ही दुकानं वर्षभरापेक्षा जास्त काळ सेटवर तशीच राहिली.

इतकंच नाही, तर या सेटवर मुजऱ्याचं शूटिंग करण्यासाठी शेकडो नर्तकींना कित्येक महिने खास ट्रेनिंग देण्यात आलं होतं.

कमाल-मीना यांच्यातील दुरावा

काळ वेगाने पुढे सरकत होता, पण 'पाकिझा'ची गती मात्र अत्यंत मंदावलेली होती. सिनेमा पूर्ण होता होता कमाल अमरोही आणि मीना कुमारी यांच्या नात्यातही दरी वाढत गेली. अखेर मार्च 1964 मध्ये हे दोघे एकमेकांपासून कायमचे वेगळे झाले.

कमाल यांच्यापासून विभक्त झाल्यानंतर मीना कुमारी पुरत्या खचल्या आणि त्यांना दारूचे प्रचंड व्यसन लागले.

लेखक मेघनाद देसाई आपल्या 'पाकीझा- ॲन ओड टू अ बायगॉन वर्ल्ड' या पुस्तकात लिहितात, "त्या काळात मुंबईत कडक दारूबंदी लागू होती, पण ही कायदेशीर बंदीही मीना कुमारींना त्यांच्या गरजेनुसार दारू मिळवण्यापासून रोखू शकली नाही."

मीना कुमारी

मीना कुमारी यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या अत्यंत जवळच्या मैत्रीण अभिनेत्री नर्गिस यांनी आठवण काढताना लिहिले होते, "स्वतःला दारूच्या नशेत बुडवून घेत मीना कुमारी आत्मविनाशाच्या उंबरठ्यावर जाऊन पोहोचल्या होत्या. त्यांच्या आयुष्यातला जगण्याचा उत्साहच हरवून बसला होता."

तब्येत कमालीची ढासळल्यामुळे 1968 मध्ये उपचारांसाठी त्यांना थेट लंडनला न्यावे लागले. तिथून पुढे त्यांनी जिनिव्हामध्ये अनेक आठवडे उपचारात काढले.

काही काळापुरता त्यांना आराम मिळाला खरा, पण लिव्हरच्या जुनाट आजाराने त्यांना कधीच सोडले नाही. इकडे 'पाकिझा'चे काम अजूनही अर्धवटच रखडलेले होते.

अमरोही यांचे मीना कुमारींना पत्र

25 ऑगस्ट 1968 रोजी कमाल अमरोही यांनी आपल्या विभक्त पत्नी मीना कुमारी यांना एक पत्र लिहिले. विनोद मेहता यांच्या 'मीना कुमारी- द क्लासिक बायोग्राफी' या पुस्तकानुसार कमाल अमरोही यांनी लिहिले होते की, आता फक्त 'पाकिझा' पूर्ण करण्याचे काम बाकी आहे. पण जोपर्यंत मला घटस्फोट मिळत नाही तोपर्यंत हा चित्रपट पूर्ण करणार नाही, अशी भूमिका मीना कुमारी यांनी घेतली होती.

चित्रपटातील एका दृश्यात मीना कुमारी
फोटो कॅप्शन, चित्रपटातील एका दृश्यात मीना कुमारी

कमाल अमरोही यांनी पत्रात स्पष्ट लिहिले की, जर मीना यांची तशीच इच्छा असेल, तर ते त्यांना घटस्फोट द्यायलाही तयार आहेत. पण त्यानंतरही जर त्या 'आपल्या पाकिझा'ला पूर्ण करण्यासाठी पुढे आल्या, तर त्यांना सर्वात जास्त आनंद होईल.

त्यांनी पुढे लिहिले, "'पाकिझा'वर कित्येक लोकांचे भवितव्य आणि खूप लोकांच्या आशा-आकांक्षा जोडलेल्या आहेत. हा सिनेमा असा अर्धवट सोडणं योग्य नाही."

पत्राच्या शेवटी त्यांनी कळकळीने लिहिलं, "हा सिनेमा सध्या वादळात सापडलेल्या बुडत्या जहाजासारखा झाला आहे आणि केवळ तुमच्याच साथीने त्याला सुखरूप किनाऱ्याला लावले जाऊ शकते."

जेव्हा नर्गिस आणि सुनील दत्त यांनी मीना कुमारींची समजूत काढली

नर्गिस यांनी लिहिलं की, कमाल अमरोही यांची अशी इच्छा होती की, सुनील दत्त यांनी 'पाकिझा'मध्ये काम करावे. नर्गिस आणि सुनील दत्त यांनी 'पाकिझा'चे काही सीन्स पाहिले आणि त्यातील मीना कुमारींची अप्रतिम दृश्ये पाहून ते थक्क झाले.

मीना कुमारी यांच्या निधनानंतर लिहिलेल्या आपल्या 'मीना, मौत मुबारक हो' (शमा मॅगझिन, जून 1972) या लेखात नर्गिस सांगतात की, त्या स्वतः मीना कुमारींना भेटायला गेल्या आणि समजावत म्हणाल्या, "मंजू हा सिनेमा जर असाच अर्धवट राहिला तर ती एक फार मोठी शोकांतिका असेल. तू परत येशील या आशेवर डोळे लावून बसलेले कमाल साहेब आता थकून गेलेत आणि दुसऱ्या अभिनेत्रीचा शोध घेतायत. जर तुझं मन तयार असेल, तर मी स्वतः कमाल साहेबांशी बोलते आणि तुझ्या कमबॅकची वाट सोपी करते."

यावर मीना कुमारी फक्त एवढंच म्हणाल्या, "तुम्ही जसं सांगाल, मी अगदी तसंच करेन."

मीना कुमारी
फोटो कॅप्शन, चित्रपटात आधी धर्मेंद्र मुख्य भूमिकेत दिसणार होते. पण मीना यांच्यासोबतच्या त्यांच्या अफेअरच्या चर्चा रंगू लागल्याने त्यांच्या जागी राजकुमार यांची वर्णी लागली.

नर्गिस आठवण काढत लिहितात, "मी याविषयी लगेच कमाल साहेबांशी बोलले. कमाल साहेब म्हणाले, 'मीना पुन्हा या सिनेमावर काम करायला तयार होतेय यापेक्षा दुसरी चांगली गोष्ट असूच शकत नाही, पण माझ्या काही अटी आहेत. तिला स्वतःची लाइफस्टाइल बदलावी लागेल, पुन्हा तंदुरुस्त व्हावं लागेल आणि दारू पूर्णपणे सोडावी लागेल.' मी स्वतः मीना यांच्या बाजूने कमाल साहेबांना या गोष्टीची खात्री दिली."

'पाकिझा'मध्ये मीना कुमारींची पुन्हा एंट्री

कमाल अमरोही आणि मीना कुमारी यांची अनेक दिवसांनंतर झालेली ती भेट प्रचंड भावूक करणारी ठरली. कमाल साहेबांनी शगुन म्हणून मीना यांच्या हातावर सोन्याची एक गिन्नी म्हणजे मोहोर ठेवली आणि 30 जानेवारी 1969 रोजी सिनेसृष्टीतील गाजलेल्या 'जर्नल ऑफ द फिल्म इंडस्ट्री' या साप्ताहिकातून मीना कुमारी 'पाकिझा'मध्ये परतल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली.

चित्रपटात आधी धर्मेंद्र मुख्य भूमिकेत दिसणार होते; पण मीना यांच्यासोबतच्या अफेअरच्या चर्चा रंगू लागल्याने त्यांच्या जागी राजकुमार यांची वर्णी लागली.

तोपर्यंत चित्रपटाचे मूळ सिनेमॅटोग्राफर जोसेफ विर्शिंग यांचे निधन झाले होते. त्यामुळे त्यांच्या जागी कॅमेऱ्याची सूत्रे जाल मिस्त्री यांच्या हाती सोपवण्यात आली.

दुसरीकडे, या सिनेमाला अमर संगीत देणारे संगीतकार गुलाम मोहम्मद यांनाही आपल्या आयुष्यातील सर्वात मोठे यश पाहण्याआधीच 1968 मध्ये जगाचा निरोप घेतला.

पाकिझा

16 मार्च 1969 चा तो दिवस... पतीपासून वेगळ्या झाल्यानंतर तब्बल 5 वर्षांनी, 35 वर्षांच्या मीना कुमारी पुन्हा एकदा 'पाकिझा'च्या सेटवर परतल्या.

कमाल अमरोही यांनी त्यांचे अतिशय थाटात स्वागत केले. मीना यांच्या परतण्याचा आनंद आणि दोघांमधील मनोमिलनाचे प्रतीक म्हणून कमाल साहेबांनी त्यांना स्वतःच्या हाताने पेढा भरवला.

इतकेच नव्हे तर मीना कुमारींच्या स्टुडिओमधील या ऐतिहासिक पुनरागमनावर त्यांनी एक छोटी डॉक्युमेंटरीही बनवून घेतली.

त्या काळात हिंदी सिनेसृष्टीचे रूप पार बदलून गेले होते. राजेश खन्ना सुपरस्टार बनले होते आणि अभिनेत्रींची एक नवी पिढीही रुपेरी पडद्यावर दाखल झाली होती.

खुद्द मीना कुमारी आता 'मेरे अपने' आणि 'दुश्मन'सारख्या सिनेमांमधून प्रौढ आणि गंभीर स्वरूपाच्या भूमिका साकारू लागल्या होत्या.

मार्च 1969 ते डिसेंबर 1971 या काळात कमाल अमरोही आणि मीना कुमारी यांनी दिवस-रात्र एक करून 'पाकिझा'वर काम केले. सिनेमाची शेवटची 3 वर्षे अक्षरशः वेगाने काम करण्यात निघून गेली.

प्रकृती बिघडत असतानाही केली शूटिंग

कित्येक वर्षांपूर्वी शूट केलेल्या सीन्सच्या तुलनेत आता मीना कुमारींचे वजन वाढले होते आणि चेहऱ्यावरील बदलही स्पष्ट दिसू लागले होते.

अनेक वर्षांच्या आजारपणाने आणि दारूच्या व्यसनाने त्यांच्या शरीराला आतून पुरते पोखरून काढले होते. त्यामुळेच अशोक कुमार आणि राजकुमार यांच्यासोबत मीना कुमारींचे जे रोमँटिक सीन्स चित्रित झाले. त्यात त्यांच्या चेहऱ्याचे क्लोज-अप शॉट्स अगदी मोजकेच ठेवण्यात आले.

मीना कुमारी

कमाल अमरोही यांनी लाइट अँड शेड्सचा कल्पक वापर करत 'लॉन्ग शॉट्स'च्या माध्यमातून मीना कुमारींचे सौंदर्य पडद्यावर मोठ्या नजाकतीने खुलवले.

असं म्हटलं जातं की, चित्रपटातील 'आज हम अपनी दुआओं का असर देखेंगे' या गाण्याच्या चित्रीकरणादरम्यान मीना कुमारी यांच्याऐवजी पद्मा खन्ना यांनी 'साहिबजान'च्या भूमिकेत 'बॉडी डबल' म्हणून काम केले होते.

केवळ काही मोजकेच क्लोज-अप शॉट्स मीना कुमारी यांच्या चेहऱ्याचे घेण्यात आले होते.

अखेर डिसेंबर 1971 मध्ये 'पाकिझा'चे शूटिंग एकदाचे पूर्ण झाले खरे, पण तोपर्यंत मीना कुमारींची प्रकृती दिवसेंदिवस ढासळतच चालली होती. वर्षांनुवर्षांच्या दारूच्या व्यसनाने त्यांच्या लिव्हरने काम करणे जवळजवळ थांबवले होते. 'लिव्हर सिरोसिस'सारख्या गंभीर आजारामुळे त्या खूपच अशक्त झाल्या होत्या.

'पाकिझा'चा भव्य प्रीमियर

'पाकिझा' अधिकृतपणे 4 फेब्रुवारी 1972 रोजी रिलीज झाला. पण त्याच्या आदल्या संध्याकाळी म्हणजे 3 फेब्रुवारीलाच मुंबईच्या प्रसिद्ध 'मराठा मंदिर'मध्ये या सिनेमाचा दिमाखदार प्रीमियर पार पडला.

चित्रपटाच्या रील्सचे बॉक्स चक्क एका सजवलेल्या पालखीत ठेवून थिएटरपर्यंत आणण्यात आले होते. त्या काळात तब्बल दीड कोटी रुपये खर्चून तयार झालेला, सिनेमास्कोप आणि ईस्टमनकलरच्या दिमाखात नटलेला 'पाकिझा' शेवटी 15 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर पडद्यावर झळकला.

आपल्या आयुष्यातील या शेवटच्या प्रीमियरसाठी मीना कुमारी पांढरी शुभ्र साडी नेसून अत्यंत साधेपणाने आणि देखण्या अंदाजात पोहोचल्या.

चित्रपटाचे हिरो राजकुमार यांनी मीडियाच्या कॅमेऱ्यांसमोर झुकून त्यांच्या हातावर प्रेमाने किस केलं आणि मग दोघं सोबतच थिएटरमध्ये गेले.

38 वर्षांच्या मीना कुमारी सभागृहात अगदी पहिल्या रांगेत बसल्या होत्या. समोर रुपेरी पडद्यावर त्यांचे अनेक वर्षांपूर्वीचे एक सुंदर स्वप्न अखेर साकार झाले होते.

'पाकिझा'च्या भव्य प्रीमियरचे एक खास पोस्टर
फोटो कॅप्शन, 'पाकिझा'च्या भव्य प्रीमियरचे एक खास पोस्टर

समीक्षकांनी उडवली खिल्ली- 'पाकिझा' म्हणजे 'पैशांची उधळपट्टी'

मात्र हा चित्रपट समीक्षकांच्या पसंतीस मात्र अजिबात उतरला नाही.

'द टाइम्स ऑफ इंडिया'ने थेट 'पैशांची भव्य उधळपट्टी' म्हणत सिनेमावर ताशेरे ओढले, तर 'फिल्मफेअर'च्या समीक्षकाने 5 पैकी फक्त 1 स्टार दिला.

अनेक जाणकारांना एका तवायफेची ही गोष्ट अगदीच जुनाट आणि रटाळ वाटली.

सुरुवातीच्या काही आठवड्यांत बॉक्स ऑफिसवरही 'पाकिझा'ची पाटी बऱ्यापैकी कोरीच राहिली; कमाईची गती इतकी मंद होती की, सिनेसृष्टीने या चित्रपटाला 'फ्लॉप'च्या यादीत जमा करायलाही सुरुवात केली होती.

'आता वेळ आली आहे'

मार्च 1972 च्या तिसऱ्या आठवड्यात मीना कुमारींची तब्येत अचानक फारच बिघडली. त्यांना घाईघाईने मुंबईतील सेंट एलिझाबेथ हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले.

त्यांच्या लिव्हरमधले इन्फेक्शन इतके वाढले होते की परिस्थिती हाताबाहेर चालली होती. 25 मार्चला त्रास जरासा कमी वाटल्यावर मीना कुमारी आपल्या मोठ्या बहिणीला खुर्शीद यांना म्हणाल्या, "आपा, आता जाण्याची वेळ आली आहे आणि कदाचित हीच ती खरी वेळ आहे. आज माझं कोणतंही काम अर्धवट राहिलेलं नाही."

"कमाल साहेबांचा 'पाकिझा', प्रेमजींचा 'दुश्मन' आणि सावन यांचा 'गोमती के किनारे'... सगळे सिनेमे पूर्ण झालेत. मीना आपलं काम अर्धवट सोडून निघून गेली, असं बोट आता कोणीही माझ्याकडे दाखवू शकणार नाही."

बहिणीबद्दल आणि तिच्या मुलांबद्दल काळजी वाटून त्या पुढे म्हणाल्या, "आपल्या परीने जेवढं जमेल तेवढं आपण त्यांच्यासाठी केलं; आता पुढची जबाबदारी खुर्शीद यांचीच आहे."

शेवटी जड अंतःकरणाने त्या म्हणाल्या, "आता मी जगाचा निरोप घ्यायला पूर्णपणे तयार आहे."

'मला मरायचं नाही'

29 मार्चच्या रात्री त्या असह्य वेदनेने तळमळत होत्या. अचानक त्यांच्या तोंडातून एक तीव्र किंकाळी उमटली.

तो आवाज ऐकताच मोठी बहीण खुर्शीद धावतच खोलीत आल्या. मीना यांनी हात पुढे करत खुर्शीद यांना जवळ ओढले आणि अश्रू ढाळत म्हणाल्या, "आपा, आपा… मला मरायचं नाहीये गं!"

पण खुर्शीद त्यांना सावरतील तोवर मीना यांची मान एका बाजूला झुकली आणि त्या थेट कोमात गेल्या.

पुढच्या 2 दिवसांतच म्हणजेच 31 मार्च 1972 रोजी मीना कुमारी यांनी या जगाचा कायमचा निरोप घेतला.

मीना कुमारी

पाकिझा ठरली 'मीना कुमारींची मजार(समाधी)'

मीना कुमारींच्या जाण्याने अवघा देश सुन्न झाला होता. परंतु आपल्या मृत्यूने मीना कुमारी जणू 'पाकिझा'चे भाग्यच लिहून गेल्या होत्या.

देशभरातील चित्रपटगृहांबाहेर प्रेक्षकांची अलोट गर्दी उसळू लागली.

'पाकिझा'मध्ये गौहर जानची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री नादिरा यांनी याविषयी बोलताना सांगितले होते, "चित्रपटगृहांमध्ये लोकांचा महापूर लोटला होता. ते लोक केवळ 'पाकिझा' पाहायला येत नव्हते, तर जणू मीना कुमारी यांच्या मजारीवर म्हणजेच समाधीवर नतमस्तक व्हायला येत होते."

यानंतर 'पाकिझा'ला प्रेक्षकांनी इतकं डोक्यावर घेतलं की, बघता बघता तो 1972 मधला सर्वाधिक कमाई करणारा ब्लॉकबस्टर ठरला.

आज 'पाकिझा' हा भारतीय चित्रपटसृष्टीचा एक अजरामर ठेवा मानला जातो. तवायफांच्या जीवनावर पुढे असंख्य चित्रपट बनले, परंतु 'पाकिझा'ने गाठलेली उंची मात्र कोणालाही गाठता आली नाही.

'पाकिझा' हा मीना कुमारींचा शेवटचा सिनेमा नव्हता!

अनेकांचा असा समज होता की 'पाकिझा' हाच मीना कुमारींचा शेवटचा चित्रपट होता. पण वस्तुस्थिती वेगळी आहे.

दिग्दर्शक सावन कुमार यांचा 'गोमती के किनारे' हा त्यांचा अखेरचा सिनेमा ठरला.

मीना यांच्या मृत्यूनंतर, नोव्हेंबर 1972 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. विशेष म्हणजे यातही त्यांची भूमिका एका तवायफेचीच होती. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा यशस्वी ठरू शकला नाही.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)