अर्धा तास सिंहाच्या तावडीत, धाडसाने वाचवला स्वतःचा जीव; नेमकं घडलं काय?

सिंहानं कालूभाई नावाच्या एका व्यक्तीला पकडलं होतं.

फोटो स्रोत, UGC

फोटो कॅप्शन, सिंहानं कालूभाई नावाच्या एका व्यक्तीला पकडलं होतं.
    • Author, गोपाल काटेशिया, अल्पेश डाभी
    • Role, बीबीसी गुजराती
    • Reporting from, राजकोट आणि भावनगरहून
  • Published
  • वाचन वेळ: 4 मिनिटे

भावनगर जिल्ह्यातील गराजिया गावात सोमवारी (6 जुलै) सकाळी सिंहांच्या एका कळपाने कालूभाई परमार नावाच्या व्यक्तीवर हल्ला केला. या हल्ल्यात कालूभाई जखमी झाले.

कालूभाई यांचा पशूपालनाचा व्यवसाय आहे. आपल्या गायींना पाणी पाजण्यासाठी नेत असताना हा हल्ला झाल्याचे त्यांनी सांगितले.

गंभीर जखमी झाल्यामुळे कालूभाईंना उपचारासाठी 60 किलोमीटर दूर असलेल्या भावनगर शहरातील सर तख्तसिंहजी जनरल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे, असं तिथल्या ग्रामस्थांनी सांगितलं.

भावनगर जिल्ह्यात सिंहांनी माणसांवर हल्ला केल्याची गेल्या काही दिवसांतील ही दुसरी घटना आहे. याआधी 18 जून रोजी पालिताना तालुक्याला लागून असलेल्या महुवा तालुक्यातील गढडा गावात नागजीभाई गुजरिया नावाच्या तरुणाचा मृतदेह घराशेजारील झुडपात आढळून आला होता.

नागजीभाईचा मृत्यू सिंहांच्या हल्ल्यात झाला होता, असा दावा नागजीभाईच्या कुटुंबीयांनी केला होता.

सिंहाच्या तावडीत कसे सापडले?

बीबीसी न्यूज गुजरातीचे अल्पेश डाभी यांनी दिलेल्या माहितीनुसार, कालूभाईंनी हॉस्पिटलमधून प्रसारमाध्यमाध्यमांना सांगितलं की, ही घटना सोमवारी सकाळी साधारण साडेआठ वाजता घडली. त्यावेळी ते आपल्या घरी होते.

शॉर्ट व्हीडिओ पाहा
व्हीडिओ कॅप्शन, गाईला चारा घालण्यासाठी गेला आणि सिंहाने हातच पकडला...

कालूभाई म्हणाले की, "मी सकाळी साडेआठ वाजता माझ्या गायींना पाणी पाजण्यासाठी जात होतो. त्यावेळी एक सिंह तिथे बसलेला होता. त्याने अचानक माझ्यावर हल्ला केला."

"सर्वात आधी त्याने माझ्या खांद्यावर वार करून मला खाली पाडलं. त्यानंतर माझा हात त्याने तोंडात पकडला. मला त्याने जवळपास अर्धा तास पकडून ठेवलं होतं. काहीवेळाने मी त्याला हाताने कुरवाळलं, तेव्हा त्याने मला सोडून दिले."

या हल्ल्याला दुजोरा देताना शेत्रुंजी वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक चिराग अमीन यांनी बीबीसीला सांगितलं की, गराजिया गावात एका सिंहाने शेतकऱ्यावर हल्ला केला. या हल्ल्यात तो शेतकरी जखमी झाला.

सुमारे 50 वर्षे वय असलेल्या कालूभाईंनी पुढे सांगितलं की, लोकांनी सिंहाची माहिती वन विभागाला दिली होती. पण, वन विभागाची टीम येण्यापूर्वी सिंह तिथून निघून गेला. वन विभागाची टीम लवकर पोहोचू शकली नाही.

हल्ल्यावेळी रेकॉर्ड करण्यात आलेल्या व्हीडिओमध्ये आजूबाजूचे लोक आरडाओरड करताना आणि सिंहावर दगड फेकताना दिसत आहेत.

सुटका कशी झाली?

कालूभाईंनी सांगितले की, सिंहाने त्यांना पकडल्यानंतर गावकरी देखील त्यांची फारशी मदत करू शकले नाहीत.

व्हीडिओमध्ये दिसत आहे की, सिंहाने अचानक कालूभाईंना सोडून दिलं आणि तो निघून गेला. कालूभाईंनी सांगितलं की, सिंह त्यांना सोडून त्यांच्या गायींच्या दिशेने गेला होता.

परंतु, स्थानिक नेते करमशीभाई चौहान यांनी बीबीसीला सांगितलं की, सिंह कालूभाईंच्या दोन गायींना कोणतंही नुकसान न करता तिथून निघून गेला.

गराजिया गावाजवळीस शेत्रूंजय पर्वत परिसरात बिबटेही आढळतात.
फोटो कॅप्शन, गराजिया गावाजवळीस शेत्रूंजय पर्वत परिसरात सिंह आणि बिबटेही आढळतात.

करमशीभाईंनी म्हणाले की, "अचानक गावात एक सिंह आला आणि कालूभाईंच्या शेजाऱ्याच्या शेतात गेला. पण, शेजाऱ्याच्या म्हशीने शिंगे दाखवल्यामुळे सिंह तिथून पळून गेला."

"त्यानंतर तो कालूभाईंच्या घराकडे गेला, जिथे दोन गायी बांधलेल्या होत्या. पण गायींवर हल्ला करण्याऐवजी त्याने कालूभाईंवर हल्ला केला. शेवटी त्याने कालूभाईंना सोडलं आणि त्याने गायींकडे धाव घेतली. परंतु, गायींनाही कोणती इजा न करता सिंह तिथून निघून गेला."

करमशीभाई यांच्या पत्नी जिकुबेन या गराजिया गावच्या विद्यमान सरपंच आहेत. करमशीभाई म्हणाले, "सिंहाच्या हल्ल्यात कालूभाईंच्या मानेला, खांद्याला आणि हाताला दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी सुरुवातीला पालिताना येथील रुग्णालयात नेण्यात आले. पण, जखमा गंभीर असल्याने डॉक्टरांनी त्यांना भावनगरला नेण्याचा सल्ला दिला."

सिंहाने हल्ला का केला?

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

गराजिया हे गाव पालिताना शहरापासून साधारण पाच किलोमीटर अंतरावर, शेत्रुंजय पर्वताच्या पायथ्याशी वसलेले आहे. स्थानिक वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी बीबीसीला सांगितलं की, शेत्रुंजय पर्वत हा राखीव वनक्षेत्राचा भाग असून येथे सिंह आणि बिबटे यांचा अधिवास आहे.

हे गाव शेत्रुंजी वन्यजीव विभागाच्या पालिताना रेंजमध्ये (परिक्षेत्र) येते.

चिराग अमीन यांनी बीबीसीला सांगितलं, "या घटनेच्या आदल्या दिवशी या सिंहांनी गराजियाजवळील सोनपारी गावात एका व्यक्तीचा बळी घेतला होता. त्यानंतर हे तीन सिंह त्यांच्या राहण्याच्या भागाकडे परत जात होते. सकाळ होताच लोकांचं येणं-जाणं वाढलं."

"या कळपात एक तरुण नर सिंह होता. लोकांचा गोंधळ आणि आरडाओरडीमुळे तो घाबरला आणि त्याने पशूपालन करणाऱ्या व्यक्तीवर हल्ला केला. पण, त्याने त्या व्यक्तीला जीवे मारण्याचा प्रयत्न केला नाही. व्हीडिओमध्येही दिसतं की, सिंहाने त्या व्यक्तीला जखमी केलं, त्यानंतर तो तिथून निघून गेला."

कालूभाई आपल्या गुरांचे रक्षण करण्यासाठी गेले असताना सिंहाने त्यांच्यावर हल्ला केला, असं वन विभागाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.

या भागात सिंह कधीपासून दिसत आहेत?

1990 च्या दशकाच्या सुरुवातीपर्यंत सिंह केवळ गीर राष्ट्रीय उद्यान आणि गीर अभयारण्यातच आढळून येत (यालाच गीरचे जंगल असं म्हटलं जातं). हे जंगल सध्याच्या जुनागढ, गीर सोमनाथ आणि अमरेली जिल्ह्यांमध्ये पसरलेले आहे.

जसजशी सिंहांची संख्या वाढली, 1990 च्या दशकाच्या मध्यापासून ते गिर जंगलाबाहेरही दिसू लागले. त्यानंतर अमरेली जिल्ह्यातील पनिया परिसरातही सिंह आढळून येऊ लागले.

त्यानंतर शेत्रुंजी नदीच्या काठाने सिंहांचा वावर वाढत गेला. ते अमरेली जिल्ह्यातील लिलिया परिसरात गेल. तिथून भावनगरच्या महुवा तालुक्यात पोहोचले आणि गेल्या सुमारे 10 वर्षांपासून ते तिथेच आहेत. महुवानंतर सिंहांनी पालिताना तालुक्यातील शेत्रुंजय पर्वत आणि आसपासच्या परिसरातही आपला अधिवास निर्माण केला आहे.

गेल्या महिन्यात शेत्रुंजय पर्वताच्या पायऱ्या चढणाऱ्या एका भाविकाची बॅग घेऊन पळणाऱ्या सिंहाचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

पालिताना शहराच्या तळापासून सुरू होत शेत्रुंजय पर्वताकडे जाणाऱ्या पायऱ्या

फोटो स्रोत, Bipin Tankaria/BBC

फोटो कॅप्शन, पालिताना शहराच्या तळापासून सुरू होत शेत्रुंजय पर्वताकडे जाणाऱ्या पायऱ्या

गीर जंगलाबाहेरील दाट लोकवस्तीच्या भागात सिंहांचे संरक्षण करण्यासाठी आणि सिंह आणि मानवाचा संघर्ष टाळण्यासाठी राज्य सरकारने 2019 मध्ये शेत्रुंजी वन्यजीव विभागाची स्थापना केली. यासाठी वन विभागाकडून कर्मचारीही नियुक्त करण्यात आले होते. या विभागाच्या उपवनसंरक्षकांचे कार्यालय पालिताना शहरात आहे.

करमशीभाई म्हणाले, "गेल्या तीन वर्षांपासून आमच्या गावाजवळ सिंहांचा वावर वाढला आहे. ते अनेकदा जनावरांवर हल्ला करतात. परंतु, माणसावर हल्ला केल्याची ही पहिलीच घटना आहे."

उपवनसंरक्षक चिराग अमीन यांनी गराजिया गावात दिसलेल्या तीन सिंहांचा ठावठिकाणा वन विभागाला लागला असून पुढील कार्यवाही केली जात असल्याचे सांगितले.

"जखमी व्यक्तीला ज्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तिथे आमचे कर्मचारी उपस्थित आहेत आणि रुग्णालयाशी समन्वय साधून आहेत."

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.